‘पन्नास खोके, समदं ओके’- प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे

‘पन्नास खोके, समदं ओके’- प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे

यशवंतरावांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे आजचे बरबटलेले चित्र पाहिल्यानंतर तेही स्वर्गातून अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशाचाच राजकीय पोत इतका बदललाय, की ‘सत्तेसाठी वाटेल ते’ करण्याची पक्षांची आणि नेत्यांची तयारी आहे.

राजकारणाचा पोत बदलतोय. काळानुरूप तो बदलत असतो हे जरी मान्य केले, तरी एक प्रश्‍न उरतोच, की राजकारणाला स्तर असतो की नाही? एकूण देशातले आणि राज्यातले राजकारण बघितले, की राजकारण आणि राजनेते कोणत्या थराला पोहोचलेत, हे पाहून सामान्य माणूसच गळीतगात्र झाल्याशिवाय राहत नाही. राजकारण्यांना मात्र याबद्दल काहीही वाटत नाही. गेंड्याची कातडी पांघरूण त्यांनी आपल्या सवंग राजकारणाचा ‘धंदा’ तेजीत आणलाय. पूर्वी राज्य करायचे असेल, तर ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब केला जाई. आता मात्र एक पाऊल पुढे टाकत राजकारणासाठी, सत्ता आणि संपत्ती अबाधित राखण्यासाठी ‘विका अथवा विकत घ्या’ हे नवे सूत्र विकसित होताना दिसतेय.


राजकारण ही जनसेवा नसून तो एक ‘बिझनेस’ झालाय?


थोडक्यात काय, तर राजकारण ही जनसेवा नसून तो एक ‘बिझनेस’ झाला आहे. आता बिझनेस म्हटले, की ‘पैसा लगाओ और पैसा निकालो’ हे सूत्र आलेच. राजकारणात येण्यासाठी पैसे लागतात, हे तर पूर्वीही आपण बघत आणि ऐकत आलो आहोत. पक्षाकडून तिकीट हवे असेल, तर पक्षाला फंड द्यावा लागत होता. निवडून येण्यासाठी खर्च करावा लागत होता. पूर्वीचा राजकारणी आपला पक्ष आणि आपला मतदार यांच्याशी एकनिष्ठ राहत होता. त्या एकनिष्ठतेच्या आधारावरच पुन्हा-पुन्हा निवडून येत होता. यशवंतराव चव्हाणांच्या या महाराष्ट्रात त्यांच्यानंतर अनेकांनी तहहयात एकाच पक्षात राहून त्याच पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवला. सत्तेसाठी अनेकांनी अनेक पक्षांत खांदेपालट करून आपली भूक भागवली; पण जनतेशी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहणारे, सत्तेसाठी कधीही सौदेबाजी न करणारे अनेक नेते या महाराष्ट्राने पाहिले आहेत.


आपल्या पक्षाशी व विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ


अगदी आता आताचे उदाहरण द्यायचे झाले, तर ज्यांच्या पुढे आदराने नतमस्तक व्हावे वाटायचे असे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्राने पाहिलेय, अनुभवलेय. त्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे नाव होते, भाई गणपतराव देशमुख. मरेपर्यंत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व केले. एकदा, दोनदा, तीनदा नव्हे, तर तब्बल अकरा वेळा ते ‘सांगोला’ या मतदारसंघातून निवडून आले. 52 वर्षांहून अधिक काळ ते आमदार होते. खरं म्हणजे, हा एक विक्रमच होता. ज्याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल; पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा, की 52 वर्षे हा माणूस एकाच पक्षाशी आणि आपल्या जनतेशी एकनिष्ठ राहिला. त्याने कधीही आपले इमान विकले नाही. त्यांच्यासमोर अनेक माणसे पक्ष सोडत होती, सत्तेसाठी हातमिळवणी करीत होती, नवा पक्ष काढत होती. 52 वर्षे सत्तेत राहिलेल्या या माणसासमोर किती तरी पक्षांनी, राजकारण्यांनी हात पुढे केला असेल; पण समाजवादी निष्ठा असलेल्या माणसाने कधीही समझोतावादी होणे पसंत केले नाही. त्यांनी ते केले असते, तर सत्ता आणि संपत्ती दोन्ही मिळाले असते; पण इतिहासाने त्यांची नोंद ‘गद्दार’ म्हणूनच केली असती. म्हणूनच त्यांनी स्वतःशी आणि जनतेशी कधीच बेइमानी केली नाही आणि आपला पक्ष व विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.
शेतकरी, शेतमजूर, दीन-दलितांच्या हक्कांसाठीच आयुष्यभर लढत राहिले  
याच महाराष्ट्रातले दुसरे एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे प्रा. एन.डी. पाटील यांचे. तेही गपतरावांच्या पावलावर पाऊल टाकून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व. तेही शेकापचे माजी आमदार. पुन्हा-पुन्हा निवडून यायचे भाग्य त्यांना नाही लाभले; पण तेही मरेपर्यंत एकाच पक्षाचा झेंडा अभिमानाने खांद्यावर मिरवत आले. विशेष म्हणजे, ज्या महाराष्ट्रात घराणेशाही आणि नात्यागोत्याचे राजकारण होत राहिले, त्या महाराष्ट्रात एन.डी. पाटील यांनी महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांचे सख्खे मेहुणे असूनदेखील आपला पक्ष आणि विचार कुणाच्याही दावणीला बांधला नाही. वेळप्रसंगी शरद पवार यांच्यावरदेखील कठोर टीका केली. आयुष्यभर शेतकरी, शेतमजूर, दीन-दलितांविषयी बोलत राहिले. नव्हे, त्यांच्या हक्कांसाठीच लढत राहिले.
अर्थात, ही अपवादात्मक उदाहरणे असली, तरी याच महाराष्ट्रातील आहेत. यशवंतरावांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे आजचे बरबटलेले चित्र पाहिल्यानंतर तेही स्वर्गातून अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशाचाच राजकीय पोत इतका बदललाय, की ‘सत्तेसाठी वाटेल ते’ करण्याची पक्षांची आणि नेत्यांची तयारी आहे. अनेक दिवसांनी महत्प्रयासाने सत्ता मिळाली आहे. आता काहीही झाले, तरी ही सत्ता सोडायची नाही. उलट तिच्यासाठी जे-जे म्हणून करावे लागेल ते-ते करायचे. सत्तेचा उपयोग जनतेसाठी, विकासकामासाठी नव्हे, तर साम, दाम, दंड, नीती, भेद निर्माण करण्यासाठीच करायचा. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर ज्या राज्यात आपली सत्ता नाही तिथेही ‘खोके’ सोडून ‘ओके’ राजकारण करायचे, अशी नवी राजनीती आता जन्माला घातली गेली आहे.


अनेक राज्यांत भाजपचा आमदार खरेदीचा फंडा यशस्वी!


गोवा, मिझोरम, त्रिपुरासारख्या राज्यांत आमदार खरेदीचा फंडा यशस्वी झाल्यानंतर मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांना गळाला लावून तिथेही सत्तापालट करण्यात भाजपला यश आले आणि मग त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला. अर्थात, यापूर्वीच 2019 लाच सत्ता संपादनाची सर्व तर्‍हेने पायाभरणी केली गेली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीत पिढ्यान्पिढ्या राजकारणात राहिलेली दिग्गज घराणी ईडी, सीबीआयचा धाक दाखवून, आपल्या दावणीला बांधून झाली होती. ही सगळी मंडळी प्रस्थापित असल्याने निवडूनही आली होती. भाजपची ताकद पूर्वीपेक्षा आणखी वाढली होती. भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते; पण सेनेचा पूर्वानुभव चांगला नव्हता. दुय्यम खाती, दुय्यम दर्जा, सतत डावलले जाणे, यामुळे मानापमानाचे विष अनेक वेळा पचवावे लागले होते. त्यात मुख्यमंत्रिपदाने कार्‍हळ कालवण्याचे काम केले आणि युती दुभंगली. शरद पवारांनी या संधीचा फायदा घेत तीन पक्षांची मोट बांधली, सेनेला मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न दाखवले, महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आले.


त्यांना पाहिजे ते द्या अन् लवकर आपल्या कळपात आणा…


आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आणि नवखे असूनही महाराष्ट्राच्या जनतेवर आपल्या कामाचा ठसा उमटवला; पण सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्यामुळे भाजप अस्वस्थ झाला. आता थेट उद्धव ठाकरेंशीच दोन हात करायचा चंग त्यांनी बांधला. ज्यांच्या जिवावर उद्धव ठाकरे फुरफुर करतात, ते सैन्यच आपल्या कळपात आणायचे. ‘त्यांना पाहिजे ते द्या अन् लवकर आपल्या कळपात आणा’ असे फर्मानच वरच्या साहेबांनी केले. म्होरक्याला मुख्यमंत्रिपद देऊ केले आणि जे मंत्री होते त्यांना मंत्रिपदे, प्रत्येक आमदाराला पन्नास खोके, निवडून आणण्याची जबाबदारी, मतदारसंघासाठी मागाल तेवढा निधी, असे म्हणताच सगळे निसटले. शिंदेंबरोबर वीस आमदारांचा ताफा होता. नंतर वीस त्यांना जाऊन मिळाले. आमदारांची सुरत, गुवाहाटी, गोवा, अशी वारी झाली. गुवाहाटीला असताना एका आमदाराला सामान्य कार्यकर्त्याने ‘बापू कुठं आहात, काय हे’ म्हणून फोन केला, तर आमदार म्हणाले, ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, समदं ओके!’ कहर म्हणजे ही क्लिप प्रचंड व्हायरल झाली. त्यावरून अनेकांनी कविता, विनोद तयार केले. मुख्यमंत्र्यांनादेखील हे खूप भारी वाटले. त्यांनीही त्या आमदाराला जाहीर कार्यक्रमातून हा डायलॉग ऐकवण्याची फर्माईश केली. इतकेच काय, त्या प्रराक्रमामुळेच ते आमदार महाशय थेट माझा कट्ट्यावर दाखल झाले. एवढे लोकप्रिय काम त्यांनी केले.


‘पन्नास खोके, समदं ओके’ हा स्लोगन महाराष्ट्रभर पोहोचला


महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले अन् बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावण्यात आले. विधिमंडळात बोलताना दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी ‘दिवसा मी यांच्याबरोबर असायचो अन् रात्री त्यांच्याबरोबर असायचो. आम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या, आमच्यावर अनेक आरोप झाले, आम्ही जेलमध्ये गेलो’, असेही अभिमानाने सांगितले. अनेक मंत्री आक्रमक होऊन बोलले, ‘आम्ही अनेक वेळा तडीपार झालो, अनेक वेळा जेलमध्ये गेलो.’ राजकारणात आवश्यक असलेली पात्रता कशी आमच्यात ठासून भरलेली आहे, असे ही मंडळी कशाचाही मुलाहिजा न बाळगता राजरोसपणे सांगत होती.
एव्हाना ‘पन्नास खोके, समदं ओके’ हा स्लोगन महाराष्ट्रभर पोहोचला होता. विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दारात उभे राहून ‘पन्नास खोके, समदं ओके’ या घोषणा देऊन  फुटिरांना उघडे पाडायचा प्रयत्न केला. घोषणा देण्यात आघाडीवर असलेले धनंजय मुंडे यांच्याकडे बघून मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुम्ही मला कशाला बोलायला लावता, तुमचं मला सगळंच माहितीये, तुमची करुणा फडणवीसांनी एकदा ऐकलेली आहे.’ झाले, दुसर्‍या दिवसापासून धनंजय मुंडे पायर्‍यांवर घोषणा देताना दिसलेच नाहीत. ठाण्याच्या बारचा प्रश्‍न जेव्हा चर्चेला आला, तेव्हा ‘ठाण्याचा बार आणि बारबालांविषयी जितेंद्र आव्हाडांना सगळंच माहितेय. सांगू का आव्हाड साहेब?’ असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही गप्प केले.


राज्यात ‘निष्ठे’ऐवजी ‘निसटा’ हे नवे राजकीय झाड रुजू पाहतेय


थोडक्यात काय, तर ‘मस्त चाललंय आमचं’. लोक काय म्हणतील याच्याशी कुणालाच देणे-घेणे नाही. लोकांचा फारसा विचार करायची गरज नाही. लोकांनाही सत्तेचे वलयच आवडत असते. कार्यकर्ता तर सत्तेसाठीच धडपडत असतो. तो झक मारत आपल्यामागे येणार, हा विश्‍वासही त्यांना आहे. या अडीच वर्षांत भरपूर निधी मिळवू आणि लोकांना आपल्या बाजूने वळवू, हा आशावादही त्यांच्या मनात आहे. एक महाशक्ती आपल्या पाठीशी उभी असल्याचा त्यांना सतत भास होतो. बरं, यापूर्वीही अनेकांनी पक्ष फोडला आहे किंवा सोडला आहे; पण महाराष्ट्रात पक्ष पळवायचीदेखील रणनीती आखली गेली आहे. खरा प्रश्‍न हा आहे, की ज्या पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ दिले, मोठे केले, आमदार-मंत्री केले, चार-चार, पाच-पाच वेळा निवडून आणले, त्यांनी असलेली सत्ता सोडून सौदेबाजी करीत इतरांशी घरोबा करावा, ही घटना महाराष्ट्राचे राजकारण किती रसातळाला गेलेय, ही गोष्ट अधोरेखित करते. महाराष्ट्रात ‘निष्ठे’ऐवजी ‘निसटा’ हे नवे राजकीय झाड रुजू पाहतेय. ते मूळ धरण्याआधीच महाराष्ट्राच्या जनतेने उखडून फेकले पाहिजे, तरच महाराष्ट्राचे भविष्य आपल्याला वाचवता येईल! नाही तर महाराष्ट्राच्याच जाहिरातीप्रमाणे ‘कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र!’ असे म्हणण्यावाचून काहीही गत्यंतर उरणार नाही.

प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे


(लेखक प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *