कोटातल्या आत्महत्या आणि स्पर्धांचा फाकता जबडा

कोटातल्या आत्महत्या आणि स्पर्धांचा फाकता जबडा

जगातल्या शिक्षण क्षेत्राचं एक नफेखोर म्हणजे धंद्याचं एक केंद्र बनलंय हे नव्याने सांगायला नको. जगाच्या पाटावर वेगवेगळी गॅरन्टी देऊन उदंड नफा कमावणारी अनेक केंद्रे तयार झाली आहेत. त्यात आपल्याकडील कोटा नावाचं एक केंद्र. जे राजस्थानमध्ये आहे. खरे तर महत्त्वाच्या स्पर्धा परिक्षांमध्ये मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली ते स्वप्ने विकणारे एक महान केंद्र बनले आहे. ट्यूशनचे शहर, यशापर्यंत पोहोचणारे शहर, गॅरन्टी देणारे शहर अशी वेगवेगळी ओळख या शहराने करून घेतली आहे. स्वप्नांचा पाठलाग करत देशभरातून लाखो विद्यार्थी येथे येतात आणि स्वप्ने विकणार्‍या केंद्रांमध्ये तळहातावरच्या रेषा पाहत स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, सर्वच लाखो विद्यार्थ्यांना स्वप्नांच्या गावात जाता येत नाही. लाखो रुपये खर्चून येथे पोहोचणार्‍या अनेक विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयश येते. अनेकदा प्रयत्न करूनही अपयशच मागे लागते. ते पचवण्याची शक्ती कोणत्याही मार्गदर्शक दुकानात मिळत नाही. कुटुंबातला सारा पैसा ट्यूशनवर आणि स्वप्नांवर उधळला. घरी तोंड दाखवायचे कसे आणि आपल्यात डॉक्टर, इंजिनिअर पाहणार्‍यांना तोंड दाखवायचे कसे, असा एक गंभीर प्रश्‍न तयार होतो. गावाकडे जगता येत नाही आणि कोटात कटू अपयश पचवता येत नाही, अशा द्विधा अवस्थेत अनेक तरुण जगतात. ऊर्जा, स्वप्ने, ध्येये आदी सार्‍याच गोष्टी खाऊन टाकणार्‍या व्यवस्थेत कसलीच पात्रता शिल्लक राहिली नाही, की मग काही जण आत्महत्या करतात. गेल्या पाच-सहा वर्षांत दीडशेहून अधिक तरुणांनी आत्महत्या केली आहे. दुकान चालवणार्‍या नफेखोरांनी किंवा देश पळतोय असे रोज आपापली छाती मोजून आणि टिर्‍या बडवून सांगणार्‍यांनी कधी या मुलांसाठी शोकसभा घेतल्याचे कोणी सांगू शकत नाही. व्यवस्थेचे दलाल बनलेल्या आणि टी.व्ही.च्या पडद्यावर रोज कोणत्या तरी फडतूस विषयांवर बोंबाबोंब करणारेही आत्महत्यांची नोंद घेताना अपवादानेच नसतात. आपल्याकडे साधू सन्याशांना पेन्शन, पुरोहितांना पेन्शन, म्हातार्‍या-कोतार्‍यांना पेन्शन; पण उद्याचा देश आणि समाज असणार्‍यांना काहीच नाही. ना सिलिंडर, ना धान्य, ना खात्यावर सरकारचे पैसे?
खासगीकरणात आणि एकूणच स्पर्धेच्या जगात लाभाच्या जागा कमी कमी होत जातात आणि स्पर्धकांची संख्या वाढत जाते. एक व्यस्त चित्र तयार होते. उदा. महाराष्ट्रात पोलिसांसाठीच्या चौदा हजार जागांकरिता चौदा लाख अर्ज. म्हणजे हजारी एक लाख अर्ज. नोकर्‍या चौदा हजारांनाच मिळणार. बाकीच्या तेरा लाख 86 हजार युवकांनी काय करायचे. मग ते वार्‍या करतात. वारीत चालून वय वाढते. चालत राहिल्याने वय वाढते आणि वय वाढल्याने नोकरी नाही, अशा दुष्टचक्रात कोट्यवधी जीव जगत आहेत आणि तेच अयशस्वी झाल्यानंतर एक तर गुन्हेगार जगत, अध्यात्माला किंवा मूलतत्त्ववादाला कवटाळत आहेत. ‘एक नोकरी मिळू दे बाबा’ असे म्हणणारे काही कमी नाहीत. मरणारा निघून जातो हे जसे खरे, तसे तो बरेच काही बुडवून जातो, हेही खरे आहे. आपल्या मुलाला रेसचा घोडा बनवू पाहणारी असंख्य कुटुंबेही डुबलेली असतात. घोड्यांत पाहिलेली स्वप्नेही बुडतात. तरुण पिढीला वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्येचा रोग जडू पाहतो आहे. स्पर्धा परीक्षेशिवाय त्याला अन्यही कारणे आहेत. कारणांचा एक भला मोठा सापळा तयार होतोय. कधी कधी स्पर्धा असे नावही त्याला लाभत असते. स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली, तुम्ही अयशस्वी झालात त्याला कोण जबाबदार? असा प्रश्‍न तयार होतो आणि उत्तर कोणीच नाही, असे येते. उत्तर बदलू शकलो नाही आणि पोकळी तयार करू शकलो नाही, तर हे सारे असेच चालत राहणार…


– पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.