झेडपीच्या गुरुजींमध्ये आली आंधळे, पांगळे होण्याची साथ

झेडपीच्या गुरुजींमध्ये आली आंधळे, पांगळे होण्याची साथ

आपल्याकडे बारक्या शाळेतल्या बारक्या गुरूजीइतका चतूर प्राणी जगात कुठेही सापडणार नाही. आपल्या स्वार्थासाठी तो अशी काही शक्कल लढवतो, की जगातल्या सार्‍या प्रतिभावंतांनी त्याच्यासमोर गुडघे टेकून उभे व्हावे, तर हा महापराक्रमी असलेला, पण हुद्याने बारका म्हणजे प्राथमिक शिक्षकाने केलेल्या अनेक पराक्रमांची यापूर्वी नोंद झालेली आहे. कुणी खिचडी पळवली, कोणी भोजनात दंगल केली, कोणी खोली सुधार योजनेत हात ओले केले, कुणी आश्रमशाळेत गैरवर्तन केले, कोणी खोटी माहिती देऊन आदर्श झाले, तर कुणी अजून कोणता तरी खादी उद्योगाचा पराक्रम केला. याचा अर्थ, दांडगे गुरूजी स्वच्छ असतात असे नाही. त्यांचे पराक्रमही दांडगे असतात. बारक्याचे बारकेपण गाजणारे असतात. तर बीड जिल्ह्यातल्या 78 झेडपी गुरुजींवर दिव्यांग असल्याचे खोटे दाखले सादर करून बदलीचा लाभ घेतल्याच्या आरोपाखाली खटले दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. बदली करताना अपंगत्व असलेल्या शिक्षकांविषयी सहानुभूतीचा दृष्टिकोन बाळगला जातो. त्याचाच लाभ या गुरुजींनी उठवला. कमी अपंग असलेले जास्त अपंग झाले. काही काही खोटे खोटे झाले आणि बदलीसारखी एक मोठी लढाई त्यांनी जिंकली.
कोणत्याच गुरुजींना बदली नको असते. कोणीही नोकरीच्या ठिकाणी मुक्काम करत नाहीत. कुणीही आपल्या शाळेत आपल्या मुलांना पाठवत नाहीत. यांच्या शाळेत खिचडीवाली गरीब पोरं आणि यांची पोरं डोनेशन घेणार्‍या शाळेत. अनेक शिक्षक मोटारीतून शाळेला जातात. एकाच्या मोटारीत चार-चार गुरुजी बसतात. ज्यांची शाळा खूप लांब असते, ते तीन दिवस शाळेत चार दिवस स्वतःच्या पोरांबाळात असतात. बदली चुकवण्यासाठी कोणतेही दिव्य करायला मास्तर तयार होतात. त्यापैकी एक म्हणजे पूर्ण अपंग असल्याचा दाखला मिळवून बदली करून घेणे. मानवी भूमिकेतून सुरू केलेली ही सवलत अमानवी, अनैतिक मार्गाने मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आटापिटा सुरू झाला. एका बीड जिल्ह्यात तीनशे शिक्षकांनी अशी प्रमाणपत्रे मिळवली. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. किती मास्तरांनी प्रमाणपत्रे मिळवली असतील आणि त्यातही किती खोटी असतील, म्हणजे किती मास्तर खोटे असतील याची कल्पना यायला मदत होईल. बीडमध्ये प्रमाणपत्रधारकांची फेरतपासणी केली, तर त्यात 78 बहादूर मास्तर खोटे अपंग निघाले. सर्वत्र अशीच तपासणी केल्यास जसे बोगस आदिवासी सापडले तसे बोगस अपंग शिक्षक सापडतील, यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. जणू काही साथ आल्याचे चित्र दिसायला लागेल.
मास्तरांना सर्व प्रकारचे हक्क आणि लाभ पाहिजे आहेत. पण जबाबदार्‍या नको. परिणाम देण्याचे बंधन नको, अशी स्थिती आहे. अर्थात, सर्वच मास्तर असे आहेत असे समजणे अन्यायकारक होईल. खूप चांगले मास्तरही आहेत; पण खोट्या मास्तरांच्या गर्दीत ते झाकून जातात, हेही तितकेच खरे आहे. सवलती मागणार्‍या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांना जोडाक्षरे का काढता येत नाहीत, पाढे का पाठ होत नाहीत, हे अनेक गंभीर प्रश्‍न तयार झाले आहेत. देशाचा, समाजाचा पायाच असा वाळवीने कुरतडला जात असेल, तर सक्षम देशाचे स्वप्न कसे बाळगणार? खिचडी खाणारी पोरे अशीच शेंगदाणे हुडकत वार्‍यावर जाणार आणि खोटी प्रमाणपत्रे मिळवणार्‍यांची पोरे सिलिकॉन व्हॅलीत जाणार… अर्थात, त्यांच्याविषयी कोणी वाईट विचार करता कामा नये. पण प्रश्‍न आहे तो खिचडीवाल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना आपल्याच शाळेत टिकवून पट पकडणार्‍या मास्तरांचा.
बीडमधील ज्यांनी खोटी प्रमाणपत्रे मिळवली त्यात तीन प्रमुख रोगांचा समावेश आहे. कमी दिसणे, कमी ऐकायला येणे, हाडे दुखणे हे तीन रोग आहेत. हे रोग असे आहेत, की एखाद्याने मला कमी दिसते, कमी ऐकायला येते, कमी हालचाली करता येतात, असा दावा केला तर काय करायचे? दिसतच नाही हो, असे एखाद्याने खोटे सांगितले तर काय करायचे? मग या सार्‍यांची वैद्यकीय तपासणी होते. दूध का दूध होते. तसे बीडमध्ये झाले. खोटे अपंग असणार्‍यांवर आता कारवाई होईल. पण आपल्या कारवायाही बोगस असतात. काही दिवस फायलीतील कागद फडफड करतात. त्यांच्यावर वजन ठेवले, की त्यांची फडफड थांबते. पुन्हा तेच चक्र चालू राहतं. नाव बदलतं, प्रयोग तेच असतात. ज्यात अप्रामाणिकपणा, अनैतिकता याची दुर्गंधी येते. नैतिकतेचे पाठ घेणारे स्वतःच अनैतिक बनलेेले असतात. बीडमधील प्रकरणात निम्मे पुरूष शिक्षक तर निम्म्या शिक्षिका आहेत. आता बोला!

– तात्या विंचू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.