विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का पडतात ईडीचे छापे…

विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का पडतात ईडीचे छापे…

भारत आतून आणि बाहेरून स्वच्छ करणार अशी आवई उठवत स्वच्छ भारत अभियान राबवणार्‍या सरकारने पहिल्यांदा काळ्या पैशाला हात घालण्याचं ठरवलं. नोटबंदी कार्यक्रम राबवला. ऑनलाईन व्यवहार करन्सी सुरू केली. आता यालाही आठ-दहा वर्षे होतील; पण या सार्‍या कालावधीत आठ-दहा काळे पैसेही कुणाच्या म्हणजे सरकारच्या हाताला लागले नाहीत. याउलट मल्ल्यासारखे अनेक गब्बर देशातले पैसे लुटून परदेशात फरार झाले. अनेक बँका त्यांनी डुबवल्या. मल्ल्याची साखळी अदानीपर्यंत पोहोचते. सरकारनेच या धनिकांना आपल्या बँका आणि विमा संस्थांपासून हजारो कोटी रुपयांचे कर्ज दिले. शिवाय सार्वजनिक मालमत्ताही विकली. त्यात विमानापासून मुंबईतल्या झोपडपट्ट्या सुधार योजनांचा समावेश आहे. जगातले सर्वात जास्त श्रीमंत भारतात असतील आणि भारत जगाचे नेतृत्व करेल, अशी धारणा यामागे असावी. पण जगातले सर्वात जास्त गरीब भारतातच आहेत आणि त्यांना सरकारी कुरिअरने धान्य पाठवून जगवावे लागते, हेही एक वास्तव शिल्लकच राहते. या काळ्या वास्तवावर पडदा टाकला जातो. त्यामुळे चकाकता भारत सतत दिसत राहतो.
देश स्वच्छ करण्यासाठी गेल्या आठ वर्षांत एक मोहीम सुरू करण्यात आली. ज्या बीबीसीने पंतप्रधानांवर काढलेला माहितीपट बंद करण्यात आला म्हणजे त्यावर बंदी घालण्यात आली, त्याच बीबीसीने छाप्यासंदर्भातही एक बातमी आपल्या मराठी साईटवर दिली आहे. (27 फेब्रुवारी 2023) या बातमीत गेल्या आठ वर्षांत टाकण्यात आलेल्या छाप्यांची सविस्तर माहिती आहे. त्यानुसार ईडी आणि सीबीआयने 121 छापे टाकले. अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले. काही आत तर काही बाहेर आहेत. कोट्यवधीची बेहिशेबी मालमत्ता उजेडात आली, असा छापा टाकणार्‍या संस्थांचा दावा आहे. महाराष्ट्रात तर कधी कोणाच्या घरी छापे पडणार हे सांगणारा एक कुडमुड्या जोशी असतो. पत्रकार परिषदा घेऊन तो भविष्य सांगतो. सत्ताधारी पक्षातला तो असल्याने त्याचे भविष्य म्हणजे छापा पडणार हे भविष्य अजून तरी खरे ठरत आले आहे. वेगवेगळ्या राज्यात असे भविष्यवेते आहेत. जणू काही मरिआईचा गाडा येणार असे ते हाकाटी देतात. वाचायचे असेल, तर कमळाच्या पाकळ्याखाली लपा असे सांगतात. जे आश्रय शोधत जातात तो त्यांना मिळतो. त्यांना शुद्ध करून घेतले जाते आणि त्यांची शक्ती पक्षासाठी, सत्ता मिळवण्यासाठी वापरली जाते. अशा प्रकारे अनेक कावळ्यांचे बगळे झाले. ज्यांनी बगळे व्हायला आणि शरणागतीस नकार दिला त्यांचे काय झाले? तर त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे पडले. एक-दोन नव्हे, तर एकशे पंधरा विरोधी नेत्यांवर छापे पडले. काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, शिवसेना आदी अनेक विरोधी पक्ष आहेत, जे भाजपच्या सुरात सूर मिसळून राम राम म्हणायला तयार नाहीत. यामध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. गेल्या सप्टेंबरपर्यंत हा आकडा वाढत गेला. राष्ट्रवादीचे अकरा तर शिवसेनेचे आठ नेते रडारवर आले. अजून अनेक जणांच्या मागे या ईडी आणि सीबीआयचा वेताळ मागे लागला आहे. त्यांची सापळ्यातून सुटका होण्याची शक्यता दिसत नाही.
आसाममध्ये काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सरमा यांच्यामागे वेताळ धावला. सरमा हुशार निघाले. काँग्रेसमधून बाहेर पडले. भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री झाले. आता त्यांच्यावर डाग दिसत नाहीत. जे दिसतात त्याचे वर्णन ‘दाग अच्छे लगते है’ असे केले जाते. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला सळो की पळो करणार्‍या ममता दीदींच्या तृणमूल काँगे्रसच्या पानावर दुर्बिणी रोखण्यात आल्या. या पक्षाच्या तब्बल दीड डझन म्हणजे 19 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या चार नेत्यांवर कारवाई झाली, तर अजून पाच नेते रडारवर आहेत. झारखंडमध्येही कारवाई सुरू झाली. दक्षिणेकडील अनेक नेत्यांना यापूर्वीच अटक झाली होती. त्यांच्यावर वेगळे आरोप होते. चिदंबरम् आदी नेत्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आहे. हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरुद्ध तपासचक्रे फिरत आहेत. 2024 च्या निवडणुका दारात उभ्या राहून कॉलबेल वाजवत आहेत. तपास यंत्रणा आणखी गतिमान आणि व्यापक होऊ शकतात. विरोधी पक्षमुक्त भारत हे सत्ताधार्‍यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मदतकारक ठरू शकतात. विरोधी पक्ष म्हणजे लोकांचा आवाज असतो. तोच बंद झाला तर, ‘भाईयो और बहनो…’ शिवाय आपण दुसरे काय ऐकणार? राज्यघटनेने स्वायत्त आणि विश्‍वासू बनवलेल्या काही संस्थाच सत्ताधार्‍यांच्या गडद सावलीत विवेकहीन होत असतील तर…
छापे टाकून काळी संपत्ती शोधण्यास कुणाचाच विरोध असता कामा नये. भ्रष्टाचाराची कीड संपवण्यास कोणाचाच विरोध असता कामा नये. हे सारे संपवण्यासाठीची कारवाई राजकीय असता कामा नये. भाजपकडे असे अनेक मोठे नेते आहेत, जे बिगरभाजप पक्षातून भाजपमध्ये आले आणि शुद्ध झाले. एका रात्रीत त्यांचे चेहरे काळ्याचे गोरे कसे काय झाले? मुळातच सत्ताधार्‍यांमधील नेते आहेत आणि गब्बर आहेत, ते कसे तपास यंत्रणांना दिसत नाहीत? सत्ताधारी बघितले, की तपास यंत्रणांच्या डोळ्यात मोतीबिंदू उगवतात काय अशा अनेक प्रश्‍नांमुळे जनता बेजार झाली आहे; पण उत्तर कोण देणार? मारून मुसलमान केल्यासारखा हा प्रकार आहे. जो सत्ताधार्‍यांत मिसळतो तो आपोआप शुद्ध होतो आणि जो स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान राखून विरोधकांत बसणे पसंत करतो, तो तपास यंत्रणांचा बळी ठरतो. शिवसेना भाजपबरोबर गेली असती, तर महाराष्ट्रात आजचे चित्र निर्माण झाले असते काय?

-तात्या विंचू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.