गोरबंजारा समाजाचा ऐतिहासिक ठेवा आणि संस्कृती उजागर करणारा अनमोल ग्रंथ ‘गोरमाटी’ – याडीकार पंजाबराव चव्हाण

गोरबंजारा समाजाचा ऐतिहासिक ठेवा आणि संस्कृती उजागर करणारा अनमोल ग्रंथ ‘गोरमाटी’ – याडीकार पंजाबराव चव्हाण

मी आतापर्यंत लिहिलेल्या गोरबंजारा समाजाच्या पन्नास समीक्षांचे लिखाण पाहून प्राचार्य सलतान राठोड यांनी आपला अनमोल ‘गोरमाटी’ ग्रंथ समीक्षेसाठी मला पाठवला. सदर ग्रंथ वाचून गोरबंजारा गौरवशाली इतिहासाची अत्यंत सूक्ष्मपणाने मांडणी केल्याचे पाहून मी आनंदित झालो. गोरविचारवंत, गोरअभ्यासक प्राचार्य सलतान राठोड यांच्या गोरमाटी ग्रंथात संदर्भासहित सोळा प्रकरणे आहेत. गोरबंजारा समाजाचा इतिहास सर्वप्रथम 1936 मध्ये लोकनेते बळीराम पाटील मांडवीकर यांनी मांडला. त्यानंतर भीमणीपुत्र मोहन नाईक यांनी ‘गोरमाटी संकेत आणि संस्कृती’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून गोरबंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास उजागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रा. मोतीराज राठोड, प्राचार्य ग.ह. राठोड, प्रा. डॉ. अशोक पवार, प्रा. डॉ. सुनीता पवार, प्रा.राजूसिंग आडे यांनीसुद्धा गोरबंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची गंभीरपणे नोंद घेऊन तमाम गोरगणासाठी ऐतिहासिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे. आज गोरबंजारा समाजात नवतरुण लेखक गोरबंजारा समाजाचा इतिहास, लोकजीवन आणि गोर संस्कृती धुंडाळण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. माझ्या वाचनात गोरबंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची जी अनेक दर्जेदार पुस्तके आली, त्या लिखाणाच्या पलीकडेही प्राचार्य सलतान राठोड यांनी इतिहासाची लेखणी ज्यांनी विसरली त्याकरिता अनमोल गोरमाटी ग्रंथ लिहून गोरबंजारा साहित्यातच नाही, तर मराठी साहित्यामध्ये फार मोलाची भर घातलेली आहे. त्यामुळे त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती-जमाती संघाचे संस्थापक अध्यक्ष, लोकनेते, आमचे मार्गदर्शक जी.जी. चव्हाण यांनी या पुस्तकाची भारदस्त प्रस्तावना लिहिल्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व फार वाढलेले आहे. प्रा. वीरा राठोड यांनी मलपृष्ठामागे नोंदवलेले लिखाण पुस्तकाला आणि लेखकाला साजेसे आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या गोरबंजारा समाजाच्या ऐतिहासिक ग्रंथांमधील काही सुटलेला भाग यांचा तांड्यातांड्यामध्ये जाऊन सखोल अभ्यास करणे, तांड्यांवरील बुद्रुक मंडळीकडून मौखिक असलेले साहित्य वदवून घेऊन प्राचार्य सलतान राठोड यांनी या पुस्तकाची सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. बंजारा लोकजीवन आणि गोरसंस्कृती, आल्हा-उदल एक योद्धे, राजा जयचंद राठोड, सम्राट हेमचंद भुकीया, लोकनायक लाखा बंजारा, शूर लाखा बंजारा, स्वामिनिष्ठ कुत्रा, सामका, सामका याडी, एक विभूती-संत सेवालाल, सेवाभायांची अप्रतिम भेट: प्रशासन व्यवस्था, भायार लडी, आरद, सतीमाता-सामत दादा, खरा जाणता राजा: वसंतराव नाईक, गोरबोलीतील शब्दकळा आणि संदर्भ असे एकूण 16 प्रकरणे असून शेवटच्या भागांमध्ये सुंदर चित्रे दिलेली आहे. या पुस्तकाची संदर्भयादी बघितली, तर गोरबंजारा व्यतिरिक्त इतर विचारवंतांनी गोरबंजारा समाजाचा ऐतिहासिक इतिहास लिहिलेला आहे. अशा एकूण 62 मान्यवरांच्या पुस्तकांचा, भजनांचा, सिडी व इतर साहित्यांचा सखोल अभ्यास करून प्राचार्य सलतान राठोड यांनी हे पुस्तक केसुला फाउंडेशनच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेले आहे. प्राचार्य सलतान राठोड हे केवळ शिक्षण क्षेत्रातच नावाजलेले व्यक्ती नसून केसूला फाउंडेशनच्या माध्यमातून ते दुर्लक्षित झालेल्या कलाकार, कवी, लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि गोरबंजारा समाजामध्ये काम करणार्‍या अनेक घटकांचा दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार करतात. केवळ सत्कार करून ते थांबत नाहीत, तर गोरबंजारा समाजातील अनेक लोकांना अडीअडचणींमध्ये मदत करण्याचे त्यांचे काम अहोरात्र सुरू आहे. अशा या गोरबंजारा समाजसुधारकाने आपल्या गोरबंजारा समाजाचा इतिहास खर्‍या अर्थाने उत्खनन करून न्याय देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. समाजातील अनेक प्रथा, परंपरा, धाटी रुढी, चालीरिती अनेक जाणत्या व वडीलधार्‍या मंडळीकडून जाणीवपूर्वक अभ्यास करून त्यांनी गोरमाटी या अनमोल ग्रंथांमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी गोरबंजारा समाजाची संस्कृती व माणूसपण जपण्याचा फारच सुंदर प्रयत्न केलेला आहे. गोरबंजारा समाजातील जुने शब्द, राहणीमान, रूढी, परंपरा, गौरवशाली इतिहास, ऐतिहासिक नोंदी, सणवार, गोर बोलीतील शब्दकळा अशा अनेक विषयांचा त्यांनी या ग्रंथामध्ये समाविष्ट केला आहे. त्यामुळे प्राचार्य सलतान राठोड हे गोरबंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास मांडण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.


लको जकोणं मिट जाय,
हारदं करं जको हारदं रे जाव।


या म्हणीप्रमाणे पिढ्यान्पिढ्या मौखिक असलेले साहित्य पिढी दर पिढी आजही गोरबंजारा समाजात जिवंत आहे .बंजारा लोकगीत दोहरा, वाजणां, लेंगी, केणांवट, धावलो, साकतर, साकी इत्यादी स्वरूपात जिवंत असून प्राचीन काळापासून ही गोरसंस्कृती पाहायला मिळते. सिंधू संस्कृती ही बंजारा समाजाची गोरसंस्कृतीच आहे, हे अनेक गीतांतून सिद्ध असल्याचे त्यांनी या ग्रंथांमध्ये सांगितले आहे.


सिंधु नंदीरे पाळेमं.
सप्त सिंधुरे राळेमं। आरिया दामडिया दमाड लगानाकेरे मारे सेना नायक।


एवढेच नव्हे, गोरबंजारा समाज हा सिंधू धाटीचा वारसदार आहे, असेही सांगण्यास ते  विसरले नाहीत. गोरबंजारा संस्कृती ही पुरातन काळापासून आजही भक्कमपणे उभी असून ती पाच स्तंभांवर असल्याचे त्यांनी या ग्रंथात प्रतिपादन केलेले आहे. ते स्तंभ म्हणजे 1) गोरगड (तांडा), 2) गोरधाटी (गोर धर्म), 3) गोरबाणी (गोर भाषा), 4) गोरबांणो (वेशभूषा), 5) गोरकला (गोरसाहित्य). बाराव्या शतकापासून लखीशा बंजारा यांनी सुरू केलेला लदेणीं व्यवसाय अठराव्या शतकात सेवालाल महाराजांपर्यंत चांगलाच फोफावला होता. तांड्यात कोणावरही अन्याय होऊ नये, प्रत्येकाला समान न्याय मिळावा यासाठी समाजात एक प्रशासन व्यवस्था निर्माण केली होती. ती प्रशासन व्यवस्था सेवालाल महाराजांच्या काळात ठळकपणे जाणवते. यामध्ये गोरगड, गोरधाटी, गोत्र, पाची पुजेर, होळी, धुंड, वदाई, तिज ढमोळी, ढावळो, गोधन, गोदंण, गोरबांणो, गोरबोली, साकतर, फेटिया, काचळी पांमडी, फडकी यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, बंजारा स्त्रियांचे दागदागिने, जुडो टोपली, पटिया, हार, काटो, कंगणी, बामट्या, वाळा, बलिया, आंगतुळा, विटी फुला, मुंगाहार, सातकाटा फुली, भुरिया, पामडी, ठोळी, गोरकला (गोर साहित्य) अशा गोरबंजारा समाजाच्या दाग-दागिने सणवारांवर अत्यंत अभ्यासपूर्ण व विस्तृतपणे केलेले हे लिखाण तमाम गोरबंजारा समाजाकरिता वाचनीय आहे. प्राचार्य सलतान राठोड यांचा गोरबंजारा संस्कृती विषयी दांडगा अभ्यास असून पुस्तक लिखाणाकरिता लेखकांने प्रंचड मेहनत घेतल्याचे दिसून येते. बाराव्या शतकातील आल्हा उदल या योद्ध्याची रसभरी कहानी देऊन त्यांनी या पुस्तकाची शान वाढवली आहे. मोहम्मद घोरीला भारतात जयचंद राठोडने बोलावले, असे इतिहासकारांनी खोटे दाखवलेले असताना त्यांनी राजा जयचंद राठोड कसा पराक्रमी व शूरवीर होता याचे ऐतिहासिक दाखले देत राजा जयचंद राठोड यांच्याविषयी इतिहासात केलेल्या चुकांवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. सन 1580 ते 1671 मध्ये झालेल्या लोकनायक लाखा बंजारा यांचा गौरवशाली इतिहास, त्यांचे वंशज, त्यांच्याकडे असलेली तेराशे एकर जमीन, राष्ट्रपती भवन उभारलेली जागा, ती जागा इंग्रजांनी इमारत बांधण्यासाठी लाखा बंजाराचे वंशज रतनसिंग बंजारा यांच्याकडून 99 वर्षांच्या करारावर घेतल्याच्या कोलंबिया गॅझेटमधील नोंदीचा सविस्तर व सखोल अभ्यास करून त्यांनी लाखा बंजाराचा गौरवशाली इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे.
संत सेवालाल महाराजांचे सत्य बोल गोरबंजारा समाजासाठी प्रचंड ऊर्जा स्त्रोत आहेत.


सत्य धर्म लिनताती रेणूं।
सदा सासी (खरे) बोलणूं॥
हर वात सोच समजन केणूं।
भवसागर पार करलेणूं॥


असे ते  आपल्या वचनात सांगतात. क्रांतीसूर्य सेवालाल महाराजांची प्रशासन व्यवस्था कशी सर्वांना न्याय्य, हक्क आणि समानता देणारी होती. याचे सुंदर विवेचन लेखकाने या पुस्तकामध्ये करून गोरबंजारा समाजाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. अकराव्या शतकात पिठागोर नामक राजाने गोरसमाजाची स्थापना केली असली तरी हा समाज अठराव्या शतकापर्यंत स्थिर होऊ शकला नव्हता, ही मांडणी संदर्भासहित या पुस्तकात केलेली आहे.
प्राचार्य सलतान राठोड यांनी प्रचंड ताकदीने लिहिलेले पुस्तक असून सर्व लेखक आणि कवींनी वाचलेच पाहिजे, असे मला वाटते.


पुस्तक : गोरमाटी
लेखक : प्राचार्य सलतान राठोड
प्रकाशक : केसुला फाऊंडेशन, नाशिक
किंमत : 170 रुपये 

— याडीकार पंजाबराव चव्हाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.