आई समजून घेताना : उत्कट भावनांच्या कल्लोळाचे प्रभावी चित्रण- डॉ. अनमोल शेंडे

आई समजून घेताना : उत्कट भावनांच्या कल्लोळाचे प्रभावी चित्रण- डॉ. अनमोल शेंडे

उत्तम कांबळे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत आहेत. त्यांच्या एकूणच साहित्याला महाराष्ट्रातील वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून त्यांचे लेखन सूर्यसंस्कृतीशी आणि ज्ञानसंस्कृतीशी अभेद्य असे नाते जोडणारे आहे. परिवर्तन आणि स्पष्टता हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. उत्तम कांबळे यांचं समग्र लेखन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उगवलेलं असून त्यांच्या लेखनात असलेलं विचारलालित्य वाचकांना झपाटून टाकणारं आहे. मानवी समाज सुखी होण्याची अखंड तहान त्यांच्या लेखनाला लागलेली असते. जगणे आणि लिहिणे यात कुठलेही अंतर न पडल्यामुळे त्यांचं लेखन पूर्ण एकजीव, घट्ट, जिवंत, प्रवाही नि जीवनाशी पूर्णपणे समरस झाल्याचे प्रत्ययाला येते.
उत्तम कांबळे यांचं ‘आई समजून घेताना’ हे मराठी साहित्यातील बहुचर्चित असं पुस्तक आहे. मागील पंधरा वर्षांत या पुस्तकानं अमाप लोकप्रियता संपादन केलेली असून वाचकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलं आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या पुस्तकाचा काही भाषांमध्ये अनुवादही झाला आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध होणार्‍या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचा नामोल्लेख झाला असून सर्वाधिक खपाचं पुस्तक म्हणून ई टीव्हीने या पुस्तकावर बातमीही केली. एकूणच मराठी साहित्यसृष्टीतील एक महत्वाचं पुस्तक म्हणून ‘आई समजून घेताना’ या पुस्तकाची महता मान्य केली गेली.
उत्तम कांबळे यांच्या लेखनाला वेधक असे सामाजिक मूल्य आणि वाङ्मयमूल्यही आहे. त्यांची भाषा वाचकांच्या थेट काळजाशी नातं सांगणारी आहे. त्यांच्या भाषेला नाविन्यतेचा सोस असल्यामुळे कलाकृतीत उतरणारा आशय त्यामुळे अधिकच जिवंत आणि रसरशीत वाटतो. उत्तम कांबळे यांचे लेखन वाचणे हा प्रसन्न करणारा अनुभव जसा असतो, तसा स्वत:ला अद्ययावत करणारा, जागरूक करणारा, संपन्न अनुभवही असतो. केवळ वाचले पाहिजे म्हणून उत्तम कांबळे यांचे लेखन वाचले जात नाही; तर मनात आणि जीवनातही त्यांच्या साहित्यकृतीची प्रत्यक्ष नोंद व्हावी, या उत्कट जाणिवेतूनच त्यांच्या लेखनाचा विचार होतो. ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक तर वाचकांच्या विचार-भावनांशी सख्य जोडणारं, सुंदर जीवनानुभव देणारं आणि नेणिवेचं कॅथॉर्सिस करणारं पुस्तक आहे.
‘आई समजून घेताना’ हे पुस्तक म्हणजे आईच्या म्हातारपणातील हकिकत आहे. आईच्या आयुष्याची चित्तरकथा आहे. वर्गीय आणि वर्णीय संघर्षाचा आलेख आहे. हे पुस्तक म्हणजे पिकलेल्या पानाचे जिवंत मनोगत आहे आणि स्त्रियांकडे तथा समाजाकडे पाहणारा नवा दृष्टिकोनही प्रदान करणारं आहे. ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक स्वकथनाच्या अंगाने जाणारे असून मराठी साहित्यक्षेत्रात आईसंबंधी इतक्या प्रांजळपणे आणि सविस्तरपणे लिहिले गेलेले हे पहिलेच पुस्तक मानायला हवे. ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा उल्लेख यासंदर्भात गैरलागू ठरावा. कारण ‘श्यामची आई’ ही कादंबरी आहे. कल्पनेचे मिश्रण या कादंबरीत असून वस्तुस्थितीपासून दूर जाणारी ही कादंबरी आहे. ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक सद्यस्थितीवर आधारित आहे. इथे कुठल्याही कल्पनेला थारा नाही.
हे पुस्तक म्हणजे आईला समजून घेण्याचा मनस्वी प्रयत्न आहे; परंतु आईचे मानसविश्‍व आणि भावविश्‍व जाणून घेताना, समजून घेताना लेखकाला प्रचंड त्रास होतो. याचे कारण असे आहे, की लेखकाची आई वेगळ्या पर्यावरणात वाढलेली आहे. तिच्या दु:खाचा पोत वेगळा आहे. तिने जीवनाशी केलेला संघर्ष वेगळा आहे आणि लेखक ज्या सामाजिक पर्यावरणात वाढलेला आहे, ते वातावरण वेगळं आहे. लेखकाच्या वाट्याला आलेला संघर्ष, दु:ख वेगळं आहे. आईच्या जगण्याच्या कल्पना वेगळ्या आणि लेखक जगू पाहणार्‍या प्रतिष्ठेच्या कल्पना वेगळ्या. त्यामुळे संवाद साधताना बर्‍याचदा दोघांचीही अडचण झालेली आहे. दोघांचंही अनुभवविश्‍व वेगळं असल्यामुळे, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे एकमेकांच्या जाणीवविश्‍वाला छेद देणारी विधाने या पुस्तकात येणं हे स्वाभाविकच मानायला हवं.
आईची पाळेमुळे ग्रामीण भागाशी घट्टपणे जुळलेली आहेत. वरवरचेपणा किंवा देखावा तिला अजिबात आवडत नाही. लेखकाच्या जगण्यात शिरलेल्या मध्यमवर्गीय संकल्पना तिने झुगारून दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत मातीशी असलेलं नातं ही आई तुटू देत नाही. त्यामुळेच व्हॅक्युम क्लिनर, वॉशिंग मशीन, कुकर, मिक्सर, टोस्ट मेकर ही आधुनिक उपकरणे तिला महत्त्वाची वाटत नाहीत. त्यामुळे कांदा-भाजी कापायला गावाकडून आणलेलं खुरपं तिला अधिक महत्त्वाचं वाटतं.
‘आई समजून घेताना’ या पुस्तकातील आई म्हणजे आक्का आहे. ही आक्का बोलायला अतिशय रोखठोक आहे. तिचं बोलणं खणखणीत नाण्याप्रमाणं आहे. म्हातारपणी उपवास करणं योग्य नाही, हे वय उपवास करण्याऐवजी सुखानं चार घास खाण्याचं आहे,असं जेव्हा लेखक म्हणतो तेव्हा आक्का म्हणते, मी काय स्वत:साठी उपवास करते ? तुझ्या मुलाबाळांसाठी, तुझ्यासाठी उपवास करते. तुझं चांगलं व्हावं म्हणून उपवास करते. खरे तर उपवास केल्याने काहीही होत नाही. उपवास करणे ही अंधश्रध्दा आहे; परंतु श्रध्दा-अंधश्रध्देचा विचार करण्याऐवजी ही आक्का घरच्यांच्या भल्याचा विचार करते, आपल्या मुलाच्या हिताचा विचार करते. आपण कसेही जगलो तरी आपला मुलगा चांगला जगला पाहिजे, नैतिकता त्याच्यातून गहाळ होऊ नये, प्रामाणिकतेला त्याने तिलांजली देऊ नये, वाईटाच्या मार्गाने त्याने जाऊ नये असे सतत तिला वाटते. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाज म्हणून एखाद्या शेतात ती शेंगा किंवा इतर वस्तू चोरी करण्यासाठी स्वत: जाते; परंतु आपल्या मुलाला मात्र ती चोरी करण्यासाठी पाठवत नाही. मुलाने खूप शिकावं, अशा चोरीच्या भानगडीत पडू नये, असं सतत तिला वाटत राहतं. आपल्या मुलावर तिचा प्रचंड विश्‍वास आहे. त्यामुळे सुगीच्या दिवसात आक्काला न सांगता तिने जमा केलेल्या थोड्याशा ज्वारीची चोरी लाडू विकत घेण्यासाठी जेव्हा लेखक करतो, तेव्हा चोरीचा आळ ती नवर्‍यावर आणते; परंतु आपल्या मुलावर मात्र आणत नाही. लेखकाचे वडील म्हणजे अण्णा चोरी न केल्याचं वारंवार सांगतात तरी त्यावर आक्काचा अजिबात विश्‍वास बसत नाही. उलट अण्णा मारतात तेव्हा ही आक्का लेखकाला म्हणते, तू नको घाबरू. रात्रंदिवस कष्ट करेन पण तुला शिकवेन. वाघिण आहे मी, कधी हरायची नाही. दिवसभर रोजगार करेन पण तुम्हाला जगवेन. काहीकाही पोरांना बाप नाही भावत. आपण लक्ष नाही द्यायचं. मी झाडाला झिंज्या बांधून संसार करेन. स्वत: उपाशी राहीन. तुला शिकविन. तू खूप शिक. तुझं तू चांगला जग. लेखकाच्या मनात अशा पद्धतीने ऊर्जेची पेरणी आक्का करते. आपलं जीवन शिक्षणाअभावी वाईट झालं तरी शिक्षण घेऊन आपल्या मुलाने मोठं व्हावं, अशी तिची सार्थ अपेक्षा असते.
आक्काला आपल्या आयुष्यात अर्थकारणाची फार मोठी लढाई लढावी लागली. ‘जिभेचे लाड करू नये माणसानं. आहे त्याच्यात समाधान मानावं.’ हे तिचं तत्त्वज्ञान गरिबीतूनच उगवलेलं असतं. मुलांना मोठं करतांना तिची दमछाक व्हायची; मात्र मुलांना वाढवण्यासाठी जितके कष्ट करता येतील तेवढे कष्ट तिनं प्रामाणिकपणे केले. पैशासाठी नातेवाईकांकडे किंवा इतरांकडे तिने कधी हात पसरला नाही. त्यासाठी तिनेच आपल्या गरजा कमी केल्या. तिने कधी चैन केली नाही. डोक्याला महिन्यातून एकदाच तेल लावलं जायचं. कपडे धुण्यासाठी घेतलेला पाचशे एक नावाचा साबणच आंघोळीसाठी वापरला जायचा. नव्या बांगड्या ती भरत नाही. दहा-बारा किलोमीटरवर असलेल्या माहेरी बसवर पैसे खर्च न करता ती पायीच जाते. बसचे पैसे शिल्लक ठेवण्यात तिला शहाणपणा वाटतो. कारण याच पैशातून तिला कुटुंबातील अन्य गरजा पूर्ण करायच्या असतात. या पुस्तकात आक्कामधील हिशोबीपणा जसा अभिव्यक्त होतो, तशी आक्कामध्ये असलेली स्वाभिमानी वृत्तीही अधोरेखित होते. व्यवस्थेने केलेला आक्काचा हा छळ आपसुकच लेखकांपर्यंत पोचतो. लेखकानंही आपल्या आयुष्यात प्रचंड गरिबी अनुभवली. बोर्डिंगमध्ये अधीक्षकांचे कपडे धुतले. त्यांच्या चादरी धुतल्या. त्यातून उरणारा साबण स्वत:च्या कपड्यांसाठी वापरला. हे सर्व करताना लेखकामधील मोठे होण्याचे जिद्दीचे दीप कधी विझले नाहीत. लेखकामधील हा बाणेदारपणा कमी न होण्यामागे आईच्या शिकवणुकीचे धडेच कारणीभूत आहेत, असेच हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते.
या पुस्तकात एका जिद्दी आणि आयुष्यावर प्रचंड विश्‍वास असणार्‍या आईचे चित्र अतिशय समर्थपणे साकार झालेले आहे. थांबण्यापेक्षा नव्या जीवनाचे स्वप्न पाहणारी ही आई स्वत:ला कधी निष्पर्ण होऊ देत नाही आणि इतरांनाही निष्पर्ण होण्याची दीक्षा देत नाही. मनाला पालवी देणारी, उगवणार्‍या नवनव्या उष:कालाशी नाते जोपासणारी ही आक्का सतत मनाचे पुनर्वसन व्हावे यासाठी खंबीरतेचा पाठ उभी करते. निराश होऊन स्वस्थ बसणे तिला अजिबात आवडत नाही. उद्विग्न होऊन नकाराचे अंदाजपत्रक रेखाटत राहणे तिच्या तत्त्वात बसत नाही. वणव्यात उभे राहूनही तिच्यात कधी कडवटपणा येत नाही. तिचे जगणे म्हणजे युद्धाची छावणी झालेली आहे. या छावणीतून ती स्वप्न वजा होऊ देत नाही. हे स्वप्न सौहार्दाचं असते. चांगलं जगणं वाट्याला यावं यासाठीचं असते.
या देशातील व्यवस्था मोठीच नामर्द आहे. या व्यवस्थेने काहींच्या आयुष्यात मनमुरादपणे आनंद दिला. सुख दिलं. पण अनेकांच्या आयुष्यात मात्र प्रचंड दु:ख ओतलं. वेदनेशिवाय त्यांच्या वाट्याला काही येऊच नये यासाठी व्यवस्थेने पुरेपूर खबरदारी घेतली. इलंदा हे आईचे नाव. या नावाला विशेष असा कुठला अर्थ नाहीच. आमच्या काळात महार-मांगाच्या नावाला काही अर्थ होता का, हे मावशीचे विधान लेखकासमोर या देशातील विषम व्यवस्था जशी उभी करते, तसे या व्यवस्थेने अस्पृश्यांच्या वाट्याला आलेल्या भोगांसाठी ही चातुर्वर्ण्यव्यवस्था कशी कारणीभूत आहे हेही समजावून सांगते. काही बाबतीत आक्काने नोंदविलेले मत अतिशय मार्मिक असते. व्यवस्थेवर केलेले भाष्य मोठे चपखल असते. एकदा लेखक सहजपणे म्हणून जातो, आक्का माझा इन्कमटॅक्स खूप वाढला आहे. आक्का म्हणते, तो कसा असतो? अगं मला जो पगार मिळतो ना त्यावर टॅक्स असतो. कोण घेतं ते? अगं कोण म्हणजे, सरकारच घेणार. असं जेव्हा लेखक म्हणतो तेव्हा आक्का बावरते आणि म्हणते, लाज वाटत नाही का सरकारला. माझं पोरगं राबतं आणि रांडंचा हा पैसे घेतो. अगं तो टॅक्स आहे. सर्वांना भरावा लागतो. त्या रकमेतून सरकार काम करतो. खरे तर आक्काच्या प्रश्‍नांना लेखक अशा पद्धतीने सहजपणे उत्तर देत जातो. पण शेवटी आक्का जे विधान करते ते विधान म्हणजे या व्यवस्थेच्या अंतर्विरोधी वृत्तीवर केलेली नेमकी टिप्पणी असते. आक्का म्हणते, होय रे पण आपण उपाशी जगत होतो, तेव्हा सरकार येत होतं का पैसे घेऊन? लेखक आणि आक्का यांच्यामधील या संवादाचे तपशील जाऊ द्या; पण आक्कामधील बिनीचा शहाणपणा मात्र वाचकांना विचार करायला बाध्य करतो.
‘आई समजून घेताना’ या पुस्तकामध्ये व्यवस्थेने जन्माला घातलेला संघर्ष आहे. त्या संघर्षाचं मूर्त रूप लेखक आणि आक्का यांच्यामध्ये दिसून येते. हा सांस्कृतिक संघर्ष अनेक प्रश्‍नांना आपल्यासमोर उभे करतो. आपल्या भारताची संस्कृती खूप महान आहे, असे सरळधोपटपणे वारंवार बोलले जाते; परंतु नेमकी कुठली संस्कृती महत्त्वाची आणि कुठल्या, कशा संस्कृतीचा आपण गौरव गेला पाहिजे, याबद्दल स्पष्ट मत देण्याचे आपण बर्‍याचदा कटाक्षाने टाळत असतो. अन्याय करणार्‍यांचीही एक संस्कृती असते. ती संस्कृती आपल्याला अभिप्रेत आहे का? कारण अशीही संस्कृती आपल्या देशात हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. ‘आई समजून घेताना’ या पुस्तकातून आईचे अनेक पातळ्यांवरील जगणे आणि तिचे व्यक्त होणे पाहिले, म्हणजे संस्कृतीचे खरे रूप आपल्याला दिसून येते. ‘आई समजून घेताना’ या पुस्तकातील कथन अतिशय मोकळं, प्रामाणिक नि पारदर्शक असं आहे. सर्व गुणवैशिष्ट्यांसह लेखकानं अतिशय प्रभावी पद्धतीनं आपली आई वाचकांसमोर उभी केली आहे. ही आई ज्या अचूक नि नेमक्या पद्धतीनं लेखक शब्दांमध्ये पकडतो, ते पाहणं खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. या पुस्तकातील संवाद अतिशय तरल आहेत. अनेक प्रसंग वाचकांच्या भावनांना हळूवारपणे स्पर्श करतात आणि त्यातील उत्कटता एवढी शिगेला पोचते, की डोळे ओले झाल्याशिवाय मग कुठला पर्यायच उरत नाही. या पुस्तकातील शैलीही निवेदनात्मक असून या शैलीमध्ये आंतरिक जिव्हाळा, तळमळ, ओढ नि जिवंतपणाही आहे. पुढे काय घडेल याची उत्कंठा वाढविणारी माय-लेकातील ही संवादशैली अतिशय प्रत्ययकारी पद्धतीनं या पुस्तकात प्रगट झालेली दिसून येते.
लेखक उत्तम कांबळे यांचं हे चिंतनशील स्वकथन मनाला भिडणारं आहे. आईविषयीचे लेखकाचे निवेदन पाहिले म्हणजे वाचकांना या आईतच आपली आई दिसायला लागते इतकं हे स्वकथन मार्मिक नि प्रांजळ झालं आहे. आईचा आयुष्याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन, तिच्या जगण्यातील ताणेबाणे आणि आईसोबत संवाद साधताना लेखकाची होणारी घुसमट फार सुंदर नि प्रभावी पध्दतीनं प्रगट झालेली आहे. आई आणि मुलगा या दोन पिढ्यांमधील संघर्ष या पुस्तकात पहायला मिळत असून सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, मागासलेपण-पुढारलेपण असे काही महत्त्वाचे कंगोरे या संघर्षाला चिकटलेले आहेत. हा एका कष्टाळू आईचा जिद्दीचा प्रवास आहे. परिस्थितीने अस्तित्वच नाकारलेल्या एका पिढीचा हा एक प्रवास आहे. हा प्रवास लेखकाने अतिशय समर्थपणे आपल्या लेखनीतून चितारला आहे. आईला शब्दात बांधणं कसं कठीण काम आहे, पण हे कठीण कामही लेखकाने लीलया पेललेलं दिसून येते. स्वकथनाच्या रूपात साकार झालेली ही एक सेंद्रीय जीवनाकृती असून मुक्त मनाने गौरव करावा, अशी ही अतिशय सुंदर नि महत्त्वाची कलाकृती मानली पाहिजे.

पुस्तकाचे नांव : आई समजून घेताना
लेखक : उत्तम कांबळे
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई
पृष्ठ : 130, किंमत : 150/- रुपये 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.