द लाईट ऑफ एशिया : बौद्ध संस्कृतीचा परिचय देणारा ग्रंथ – नागसेन बागडे

द लाईट ऑफ एशिया : बौद्ध संस्कृतीचा परिचय देणारा ग्रंथ – नागसेन बागडे

आपण सर्व तथागत बुद्धांना ओळखतो. नव्हे सर्व जगंच ओळखतं. भारताच्या प्राचीन इतिहासाचे अवलोकन केल्यास संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप बौद्धमय होता, असे आपणास पहावयास मिळते. संपूर्ण उपमहाद्वीपातील बौद्ध धर्म स्वत:च्या जन्मस्थळातच लोप पावला व मध्ययुगीन काळानंतर त्याच्या खाणाखुणासुद्धा नष्ट करण्यात आल्या. आज आपण सर्वत्र बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार होताना बघत आहोत. मात्र, लोप पावलेल्या या धर्माचे पुनरुज्जीवन कसे झाले? याचा इतिहास बघणेदेखील मोठे रंजक ठरेल.
युरोपमधील पुनर्जागरण (Renaissance) नंतर त्या लोकांनी जगभर आपले राज्य पसरवण्यास सुरुवात केली. अगदी श्रमिकांपासून ते विद्वान, इंजिनिअर, अभ्यासक, धर्मगुरु ते सैनिकांपर्यंत हे लोक जगाच्या कानाकोपर्‍यात पसरले. पुनर्जागरण (Renaissance) आणि औद्योगिक क्रांतीसोबत मिळालेली चिकीत्सा करण्याची कला या बहुमूल्य भेटीने यापैकी काहींना ज्या ज्या देशात किंवा प्रांतात ते गेले, तेथील इतिहास, संस्कृती इत्यादींचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. त्यापैकी काहींचे लक्ष लोप पावलेल्या बौद्ध धर्माच्या अभ्यासाकडे गेले आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत गौतम बुद्ध हे एक हाडामांसाचे व्यक्ती होते, हे निश्‍चित करण्यात आले. त्यापूर्वी बुद्धाला एक मिथकीय स्वरुप प्राप्त होते. यासोबतच हिंदु धर्माने त्यांना विष्णुचा नववा अवतार म्हणून जनमाणसाच्या स्मृतित ठसवले होते. भगवान बुद्ध हे ऐतिहासिक पुरुष होते, हे निश्‍चित झाल्यावर त्यावर अभ्यास करण्याची प्रचंड चढाओढ निर्माण झाली. यात ब्रिटीश, फ्रेंच, जर्मन व इटालियन लोकांचा जास्त भरणा होता. या देशातील विद्वानांनी भारतास भेटी दिल्या, भ्रमण केले व अपार कष्ट उपसून या ज्ञानशाखेचा विस्तार केला. आपण या लोकांना यासाठीच धन्यवाद देणे पर्याप्त नसून त्यांनी आपणास वैज्ञानिक अभ्यासपद्धतीचीदेखील ओळख करुन दिलेली आहे, यासाठीही त्यांचे आपण कृतज्ञ असले पाहिजे.
भारतात बौद्ध धर्माचा अभ्यास सुरू झाल्यावर त्याचा आधुनिक काळात जगभर प्रचार-प्रसार करण्याचे श्रेयदेखील याच युरोपियन/अमेरिकन लोकांना जातं. यासाठी सुरुवातीच्या काळातील एका प्रभावशाली व्यक्तीची मदत झाली. त्याचं नाव होतं सर एडवीन अर्नाल्ड.

अर्नाल्ड जमीनदार कुटूंबातून आलेले होते. ऑक्सफोर्डमधून शिक्षण घेतलेल्या अर्नाल्ड यांनी पुणे येथे नोकरी केली. त्याच दरम्यान त्यांना भारतीय इतिहास, तत्त्वज्ञान, धर्म यांचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली व त्यांनी 1879 मध्ये प्रथम भगवान बुद्धांच्या जीवनावर दीर्घ काव्य लिहीलं. त्याचं नाव होतं “The
Light of Asia. या चरित्रानं स्वामी विवेकानंदांपासून ते लिओ टॉलस्टॉयपर्यंत अनेक दिग्गजांवर खोलवर प्रभाव टाकला. या भगवान बुद्धाच्या अत्यंत प्रभावशाली चरित्रास युरोप-अमेरिकेतील लोकांपर्यंत पोचविण्यास मदत करणार्‍या कवितेवर अत्यंत संशोधनात्मक व प्रचंड मेहनत घेवून विस्तृत व विवेचनात्मक ग्रंथ जयराम रमेश यांनी लिहीलेला आहे. जयराम रमेश केंद्रीय मंत्री होते व त्यांची कारकीर्द पर्यावरण मंत्री म्हणून खूप गाजली होती. काँग्रेसचा वरिष्ठ नेता असलेल्या या माणसाचे अप्रतिम ग्रंथ लिहील्याबद्दल कुणीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणी म्हटला, की फार कमी अभ्यास असलेला व्यक्ती असा आजकालचा समज आहे. मात्र, शशी थरूर वा जयराम रमेश यांसारखे राजकारणी या समजास अपवाद आहेत. शशी थरूर यांचे ग्रंथ वाचले, की त्यांच्या चौफेर वाचन आणि समज याबद्दल अचंबा वाटल्याशिवाय राहवत नाही.
जयराम रमेश यांच्या ग्रंथात ते प्रथम अर्नाल्ड यांचा जन्म, शिक्षण, नोकरी या विषयी आपणांस परिचय करून देतात. त्यांनी पुणे येथे घालविलेल्या जीवनाविषयी ते विस्तृत चर्चा करतात. दुसर्‍या प्रकरणात अर्नाल्ड यांचा भारतीय सभ्यतेशी झालेला परिचय याबाबत सांगतात. टी.डब्ल्यू. रेसडेविड्स, मॅक्समुलर, अलेक्झांडर कनिंगहॅम, मोनीर-मोनीर विल्यम्स यांच्या प्रभावाविषयी सांगतानाच अर्नाल्ड यांच्या ‘The Light of Asia’ निर्मितीमागील पार्श्‍वभूमी उकलत जातात. ग्रंथाचे मूळ नाव ‘The Gospel of Asia’ होते. रमेश यांनी संपूर्ण ग्रंथात भरपूर चित्रे व फोटो प्रकाशित केलेले आहेत. त्यात अर्नाल्ड यांनी लिहीलेल्या मूळ प्रतिच्या हस्तलिखीताचा फोटोदेखील आहे. अर्नाल्ड यांची वाड्:मयीन कारकीर्द आपल्यासमोर ठेवत असतांना त्यांनी लिहीलेल्या इतर ग्रंथाबाबतसुद्धा यात महाभारतावरील The song celestial चादेखील समावेश आहे, अशी रमेश आपल्याला माहिती देतात.
‘The Light of Asia’ प्रसिद्ध झाल्यावर ते प्रचंड लोकप्रिय झाले. अमेरिकेत या ग्रंथाने मोठी खळबळ माजवून दिली. याचा एक फायदा असा झाला, की बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी प्रचंड मोठी उत्सुकता निर्माण होवून खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती आणि संशोधनास चालना मिळाली. ‘The Light of Asia’ वर जशी प्रसिद्धी मिळून स्तुतिसुमने उधळली गेली, तशीच टीकासुद्धा करण्यात आली. टीकात्मक लिखानाचा आढावासुद्धा रमेश विस्तृतपणे घेतात.
बुद्धगया येथील सर एडवीन यांची भेट व त्यांनी केलेल्या कामाचे वर्णन केल्यावर पुढील भागात ‘The Light of Asia’ ची विविध भाषांमध्ये झालेल्या भाषांतरावर प्रकाश टाकण्यात येतो. दक्षिण भारतातील आयोथी थास व पी.लक्ष्मी नरसू यांनीदेखील या महाकाव्यातून प्रेरणा घेतली होती. गांधीजीदेखील यापासून अत्यंत प्रभावित झाले होते. डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथसंग्रहात या ग्रंथाच्या दोन प्रती होत्या. त्याचा फोटो रमेश यांनी या ग्रंथात दिलेला आहे. जयराम रमेश यांचा ग्रंथ विकत घेतल्यावर मी त्यांना जेव्हा मेल केला तेव्हा अगदी तासाभराच्या आत त्यांनी मला उत्तर दिले. व्यस्त असतानादेखील अभ्यासाबाबत आणि अभ्यासकांबाबत असलेल्या आस्थेचे हे उदाहरण आहे, असे माझे मत आहे.
जयराम रमेश यांनी ‘The Light of Asia’ वर ग्रंथ साकारताना तत्कालिन संशोधने, मिमांसा यावर विस्तृत प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी केवळ सर एडवीन यांच्या दीर्घ काव्यावर एक अप्रतिम ग्रंथच लिहीलेला नाही, तर त्या अनुषंगाने रमेश यांनी इतिहास व धर्मावरील आपल्या ज्ञानात फार मोठी भर घातलेली आहे.
भारताचा इतिहास, संस्कृती, बौद्ध तथा हिंदू धर्म, विविध अधिकारी व्यक्तींपासून ते बौद्ध साहित्यातील अभ्यास पर्वाचे सखोल विवेचन करून अत्यंत अप्रतिम ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात रमेश यशस्वी झालेले आहेत, यात शंकाच नाही. प्रत्येक अभ्यासकाच्या संग्रही असावा, असा हा ग्रंथ आहे.

– नागसेन बागडे


(लेखक महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात अधिकारी आहेत.)

The Light of Asia
The poem that defined the Buddha

लेखक :- जयराम रमेश
प्रकाशक :- पेंग्वीन
मुल्य :- रु.799/- 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.