दलित पँथर आणि मी

दलित पँथर आणि मी

 ‘दलित पँथर’ची जाहीरनामा घटना ही नामदेवनं लिहिली होती आणि नामदेवच्या विचारांची जडणघडण अन् पिंड, स्वभावधर्म पाहता फक्त तोच ही घटना लिहू शकत होता! आणि ‘दलित पँथर’ ही संकल्पना फक्त आणि फक्त तोच जन्माला घालू शकत होता! इतर कुणाहीमध्ये ती वैचारिक ताकद नव्हतीच!

‘चित्तावलोकन’ करायचं म्हटलं तर खूप मागं जावं लागेल; (सिंहावलोकन म्हणतात कारण खूप चांगलं, की सिंह मागं वळून पाहतो.) तसं ‘चित्ता’ जो पँथरचा लोगो-प्रतीक आहे- तो तसं पाहतो का माहीत नाही; पण चित्ता सगळ्यात चपळ व आक्रमक समजला जातो… तो पुढंच झेप घेऊन हल्ला चढवतो! त्यामुळं खरोखर पँथरचा लोगो निवडण्यात नामदेवचं बुद्धिचातुर्य व दूरदृष्टीच दिसते. जरी ब्लॅक पँथरवरून त्याला हे सुचावं हेसुद्धा भारी आहे. कारण त्या वेळच्या चळवळींची नावं गुळमुळीतच होती.
– तर साल १९७२! हे साल माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं आणि नामदेवच्याही!

नामदेव ढसाळ व मलिका अमर शेख

हेच मुळी चित्तथरारक सनसनाटी होतं


माझं शालेय जीवनातलं अत्यंत लक्षणीय अभिमानास्पद पर्व! नृत्य, गायन, एकांकिका, अभिनय, सर्वांत मी प्रथम येत होते. याच वर्षी ‘सर्वोत्कृष्ट बालकवयित्री महाराष्ट्र राज्य १९७२’ या किताबानं नाशिकच्या कलायतननं मला गौरवून मोठी ढाल दिलेली! तर शाळेतही मला सततच प्रथम क्रमांक प्रत्येक वर्षी (कलामध्ये-अभ्यासात नाही) मिळवण्यानं ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी’ म्हणून गौरविलं. माझं मराठी कवितालिखाण चालूच होतं! याच काळात महाराष्ट्रात दलितांवरचे अन्याय-अत्याचार वाढलेले – नामदेव कविता लिहिता-लिहिताच राजकारणात उतरला. आपल्या समाजाचं दुःख दूर करायचं असेल, तर संघटना हेच उत्तर आहे, असं त्याला प्रकर्षानं वाटलं. त्याचा राजकीय अभ्यास सुरू झाला… स्वतःच स्वतःला घडवणारा समर्थ माणूस झाला. नपेक्षा गावातून महारवाड्यात राहणारा-शाळेत न जाणारा व त्यासाठी आईचा मार खाणारा मुंबईत येतो काय न् एवढ्या भयानक कामाठीपुर्‍यातल्या अधोविश्‍वात राहूनही तो टॅक्सी चालवत कविता करत चक्क बंडाची भाषा बोलत नव्या संघटनेचा विचार करणं हेच मुळी चित्तथरारक सनसनाटी होतं.
तेव्हा ७३ मध्ये माझ्या बहिणीचं लग्न होऊन अनिलभैया घरी राहायला आलेले… अनिलभैया ‘रणांगण’ पाक्षिक चालवत होते आणि नक्षलवादी असण्याच्या केसमध्ये जेलमध्ये जाऊन आलेले; पण नंतर त्यांनी ते सर्व सोडून लेखन-पेपर व ‘दलित पँथर’ या नवीन झंझावाताला फोकस करून त्यांना मदत करायचं ठरवलं, तर वरळीच्या सनसनाटी सभेचं ते रिपोर्टिंग करायला गेलेले- भलतेच भारावले नामदेवच्या घणाघाती आक्रमक भाषणानं व विचारानं! ते त्याला घेऊनच घरी आले..!


एकमेकांशी लोभस नातं


ही नामदेवची माझी पहिली भेट. नंतर अनिलभैयांनी त्याची मुलाखत घेतली. पँथरची भूमिका, त्याचे विचार, त्याची कविता सगळंच विलक्षण, प्रभावी व क्रांतिकारी त्यांना वाटलं. मी मात्र राजकारण, समाजकारण या सर्वांपासून अलिप्त होते. माझं वेगळं जग-त्यात मी मग्न; पण वयाच्या सातव्या वर्षापासून मी कविता करत होते, इतर कविता वाचत होते. या भेटीनंतर माझ्या मित्रांनी नामदेवच्या कवितेची फार स्तुती केली. मी मनोहरमधली त्याची मुलाखत वाचली, कविता वाचली. बापरे… मी उडालेच. एखाद्या हिंस्र जनावराने पिसाळून झडप घालून आपल्याला जबड्यात घट्ट पकडलं आणि मेंदू चावू लागला तर कसं वाटेल? तसं वाटलं त्याची कविता वाचताना! मी भलतीच प्रभावित झाले. त्याचं रांगडं मर्दानी व्यक्तिमत्त्व, काव्य आणि विचार तर क्रांतिकारक. या सर्वांमुळं मी त्याच्याकडं ओढले गेले. यथावकाश त्याच्याबरोबर भाई-राजा-ज.वि.-अविनाश-अर्जुन-सुनील-बाळ-जयदेवभाऊजी-बादशहा-काळा चंद्या-टकला चंद्या पूर्ण पँथर्सची भलीमोठी फौज! आमच्या संसाराआधी हा संसार मोठाच होता नामदेवसाठी. पैशाची चणचण असूनही त्या सर्वांचं प्रेमळ असणं- वहिनी-वहिनी करत मागं-पुढं फिरणं- त्या सर्वांचं एकमेकांशी नातं खूप लोभस होतं आणि समाजातल्या प्रश्‍नांसाठी, दुःखासाठी ते डोक्याला कफन बांधून मैदानात उतरलेले. सर्वांचं ध्येय एकच होतं…
पण वरळी दंगलीनंतर अचानक खूप वेगळी विचित्र कलाटणी मिळाली… राजा-नामदेव वेगळे झाले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप- एका चांगल्या चळवळीला फुटीचं ग्रहण लागलं… नामदेवची कोंडी करू लागले. राजा व त्याच्या बरोबरच्या लोकांनी नामदेवला कम्युनिस्ट ठरवलं… आणि यात मी काहीच करू शकत नव्हते. कदाचित तो मला काहीच सांगत नव्हता. आपल्याच माणसांच्या विरोधात तो लढूही शकत नव्हता… महाभारतातल्या अर्जुनासारखीच अवस्था! त्यात मी आशूच्या वेळी- जडावलेल्या शरीरानं स्वयंपाकपाणी करायचे. पैसे नसल्यानं भांडीवाली बाईपण नाही. आई नामदेवच्या वेड्या झालेल्या… आम्ही पुण्याला गेलो असताना त्यांना कुणी तरी येऊन सांगितलं, की तुझ्या मुलाला व सुनेला मारून टाकलं! अन् त्या धक्क्यानं वेड्या झाल्या..

…तर सकाळी ७ लाच मोर्चा येऊन थडकला


त्या खूप आधी- नामदेवनं स्टडीसर्कल घेतलेलं… दहा पदाधिकारी मुंबईचे-पुण्याचे घरी राहायला, जेवायला, रोज तीन-चार वेगवेगळे लोक व्याख्यानाला बोलावलेले- खरं तर मलाही ते ऐकायचं असायचं; पण जेवण-भांडी-चहा यातच वेळ जायचा…
त्यानंतर आम्ही पुण्यात राहिलो. डेक्कनच्या हॉटेलवर रोज रात्री मीटिंग, काम कसं करायचं, पुढची भूमिका, सभा, चर्चा, ११-१२ वाजता मी पेंगाळून झोपायचे. हळूहळू मला राग येऊ लागला. अरे, आमचं आता-आता लग्न झालंय. जरा तरी प्रायव्हसी द्या! नाही. चोवीस तास सगळे हॉटेलच्या त्या एका रूममध्ये. नामदेव तर फारच उत्साही. नामदेव मला फारच कमी वेळ द्यायचा… नंतरही मुंबईत सातरस्त्याला माझ्या घरी येऊन राहिलो. तेव्हा तर सकाळी ७ लाच मोर्चा येऊन थडकला…
जेवणं खावणं झाली, की भल्या मोठ्या टोपात स्टोव्हवर मी खळ बनवायचे. चक्कीवरून खाली पडलेलं पीठ कुणी आणून द्यायचं. मग बादल्या-पोस्टर्स घेऊन नामदेव व त्याचे आठ-दहा कार्यकर्ते टॅक्सी करून १२ वाजता पोस्टर लावायला बाहेर पडत. ते डायरेक्ट सकाळीच यायचे. मी त्याच्या राजकारणात पडायचे नाही. कारण मला ते आवडत नव्हतं… कार्यकर्त्यांसाठी जेवण करणं एवढंच माझं काम राहिलेलं अन् हे कधी दत्त म्हणून उभे राहत. मग रात्री दहाला पण उठून स्वयंपाक करा… नंतर नंतर नामदेवलाच माझी दया आली असावी- मग तो त्यांना घेऊन नवाबकडे जाऊन शिगपराठे आणायचा. त्याचं रात्री-अपरात्री जाणं मला आवडायचं नाही. त्याबाबतीत मी टिपिकल बायको होते!
पँथरच्या सुरुवातीच्या काळात त्यानं मला चिक्कार फिरवलं! छावण्यांत, वरळी, वडाळा, मायानगर, हॉस्टेल, कामाठीपुरा, पैसे असले तर टॅक्सी-नसले की सरळ चालत… एकदा तो सचिवालय ते वांद्रा विजयनगर इथपर्यंत चालत आलेला.
पण तरी या सगळ्या धुमश्‍चक्रीत हे सगळे पँथर्स यांना मी ‘फणसलोक’ म्हणते. मी रागराग केला तरी त्यांनी मला समजून घेतलं. कारण त्यांनाही माहीत होतं… नामदेवचा संसार म्हणजे निखार्‍यावरून चालणं! साक्षात ‘अग्नीपथ’! अन् नामदेव म्हणजे काय! पैसे आले, की बरोबरच्या सार्‍या कार्यकर्त्यांना जेवण, कपडे, चपला- त्यानं कधीच स्वतःचा विचार केला नाही. सतत पँथर… पँथर… का नसावा? ते त्यानं जन्म दिलेलं मूल होतं!
म्हणूनच तर राजासारख्या इगोइस्ट माणसाला ते खटकलं, की आपण तर त्यानं जन्म दिलेल्या ‘दलित पँथर’मध्ये राहतोय! म्हणून तर त्यांनी ‘मास मुव्हमेंट’ काढली! की ज्यात मांस पण नव्हतं, रक्तही नव्हतं! ती ‘मासेंस’मध्येपण गेली नाही.
‘दलित पँथर’चा जाहीरनामा घटना ही नामदेवनं लिहिली होती आणि नामदेवच्या विचारांची जडणघडण अन् पिंड, स्वभावधर्म पाहता फक्त तोच ही घटना लिहू शकत होता! आणि ‘दलित पँथर’ ही संकल्पना फक्त आणि फक्त तोच जन्माला घालू शकत होता! इतर कुणाहीमध्ये ती वैचारिक ताकद नव्हतीच!
हे फार गंभीर विधान मी जबाबदारीनं करतेय. कारण त्यातल्या हरेक क्षणांची मी साक्षी आहे. नामदेवची वैचारिक ताकद ओळखूनच त्याला वेगळं पाडलं गेलं. कारण मग त्याची भाषणं इतकी गाजायची, की त्यांना महत्त्व मिळेना. मग पोटशूळ अन् डोकेदुखी. मग पद्धतशीरपणे नामदेवला बाजूला काढण्याचा गेम खेळला गेला…
पण असं आहे. कपाळावर मारलं किंवा चोळलं तरी तुम्ही त्याचे विचार मारू शकत नाही वा चोरूही शकत नाही. बुद्धिमान माणसाची कितीही कोंडी केली तरी तो त्यातून मार्ग काढतोच!
बाकी सारे मागं राहिले. नामदेव मात्र या सार्‍या छळकपटातून बाहेर पडून ‘राखेतून निघालेल्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे’ झेपावला-! त्याची ‘दलित पँथर’ पुन्हा झळाळली. पुनःश्‍च मोर्चे, मीटिंगा, सभा, इनाम ६ ब च्या जमिनीच्या प्रश्‍नासाठी मोठा सेमिनार-
कवितांचा अश्‍वमेधी घोडा तर देशाबाहेर गेला- बर्लिन फेस्टिव्हलमध्ये तो एकटाच भारताचं प्रतिनिधित्व करणारा कवी होता. त्याचे दहा काव्यसंग्रह एकापेक्षा एक सरस-

दलित पँथरचे कार्यकर्ते


खरोखर ‘फणसलोक’


राजकारणात तो विचारी व सकारात्मक होता; पण डँबिस नव्हता. हुजरेगिरी करणारा नव्हता. त्याला कधी डावपेच जमले नाहीत, तो विचारवंत असूनही भोळा सांब होता. त्यामुळं काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला; पण तो सुष्ट, दुष्ट दोघांवर प्रेम करायचा. त्याला फक्त त्याच्या रंजल्या-गांजल्या समाजाचे प्रश्‍न सोडवायचे होते! हे त्यानं त्याच्या एका लेखात कबूलही केलंय! की ‘मला घरावर तुळशीपत्र ठेवायची हौस आणि मल्लिकाला संसार सुरळीत ठेवायची खोड’ आता पाहा, कोणत्या बाईला संसारावर तुळशीपत्र ठेवणारा नवरा सहन होईल? तरी पण माझ्या परीनं मी बर्‍याच तडजोडी केल्या- सभा, मीटिंग किंवा निवडणुकीत त्याचा उभं राहण्याचा निर्णय, की माझ्या पोटात गोळा यायचा! पोस्टातली ठेव, सोन्याचा नेकलेस, कानातले सगळं काही स्वाहा! मी आपली पुन्हा लंकेची पार्वती! आता मला काही त्याचं वेड नव्हतं; पण आपण परत खंक ही जाणीव- एकदा तो आजारी असताना मून आलेले. त्या सगळ्या लोकांना नामदेवचं सगळं माहीत असताना त्यानं समाजासाठी जो ‘दलित पँथर’चा यज्ञ सुरू केला त्याचं एवढं अप्रूप व अभिमान होता, की त्यांनी आल्या-आल्या वाण्याकडे शंभर किलो गव्हाचे पैसे भरले! आता नुसता गहू कसा खाणार?
मी डोक्याला हात लावून, ते गेल्यावर परत वाण्याकडे जाऊन तेवढ्या पैशात तेल, तांदूळ, डाळी, मसाले, असं सगळं द्यायला सांगितलं!

सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळीही मी बंगल्यात राहिले असते. ‘कोट्यवधीची माया’ गोळा केली असती; पण नामदेव तसा नव्हता! अन् मीही तशी नव्हती! आम्ही ‘कोट्यवधी लोकांची माया’ गोळा केली! अन् तीच जास्त महत्त्वाची मानली अन् त्या कोट्यवधी पँथर्सनी पण नामदेववर वेड्यासारखं प्रेम केलं. त्याच्या गुणांवरपण, दोषांवरपण- खरोखर ‘फणसलोक’!

– मलिका अमर शेख

(लेखिका प्रसिद्ध मराठी कवयित्री व नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत.)

Related Articles

1 Comment

Avarage Rating:
  • 0 / 10
  • Pratik Kukade , August 9, 2022 @ 2:42 am

    मलिका मॅडमनी खूप सुंदर पँथरच्या आठवणी जाग्या केलेल्या आहेत..भाऊक लेख!👌💐

Leave a Reply

Your email address will not be published.