!! नाते भीमरायाशी, जयभीम हाच श्‍वास नि ध्यास !! – सतीश कुलकर्णी

!! नाते भीमरायाशी, जयभीम हाच श्‍वास नि ध्यास !! – सतीश कुलकर्णी

बाबासाहेबांच्या विचारस्पर्शामुळे जीवनाला प्रेरणा मिळाली, मरगळ दूर गेली. विचार कसा करावा याचे मार्गदर्शन घडले. नवे जग मिळाले. बाबासाहेब अभ्यासल्यामुळे ज्ञानकक्षा रुंदावल्या. अहंकाराची पिसे गळून पडली. चारित्र्य नि निर्व्यसनीपणा यांचा संस्कार घडला. अलीकडे तर पत्नी सांगते, “कोणाचे ऐेकून वा पाहून किंवा थोडा बदल म्हणून दुसर्‍या कोणालाही डोक्यात घेऊ नका. त्याची गरज नाही. आपले डोके बाबासाहेबांसाठीच, डोळे बाबासाहेब वाचण्यासाठी आहेत, याचे भान ठेवा व त्या अनुषंगाने उचित वागा.” असा उपदेश मिळणेही भाग्याचेच.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींशिवाय आपण जगू शकत नाही, याची जाणीव मला फार लहानपणीच झाली होती. एकदा आई म्हणाली, “हे बघ. तुझा जन्म बुद्धिमान माणसांच्या घराण्यात झाला आहे. घराण्याला विद्वतेची परंपरा आहे. या सर्वांत तुला टिकायचे असेल, वेगळेपण जपायचे असेल, उठावदार व्हायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उपासक हो. बुद्धीच्या जोरावर कोणापुढे न वाकता, भल्याभल्यांना त्यांनी आव्हान दिले आहे. असे तेज हवे, तरच ध्रुवासारखे अढळस्थान मिळेल…” स्वयंपाकघरात मातीच्या चुलीपुढे फुंकणी फुंकत फुंकत स्वयंपाक करताना ती अधूनमधून असेच काहीतरी सांगे. बाबासाहेब आंबेडकर बेडकीहाळ-निपाणीला येणार आहेत, असे ‘पेशंट’ लोक ‘ह्यांना’ सांगत होते, असे म्हणे. बेडकीहाळला त्या भागात बाबासाहेब आल्यावर त्यांच्या पायावर घालण्याचे तिचे स्वप्न होते. ते तिने जिद्दीने पूर्ण केले. रत्नाप्पा सूर्यवंशी हे दलित समाजातले. बाबासाहेबांचे ते निष्ठावंत अनुयायी, कार्यकर्ते होते. आमच्या परिवाराशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आज बेळगावला स्थायिक झालेल्या त्यांच्या घराण्यातील मंडळीही या आठवणींना उजाळा देतात. फोनवर बोलतानाही सद्गदित होतात. बेडकीहाळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव येथील बहुजन समाजाच्या मराठी शाळा क्रमांक चार या प्राथमिक शाळेत माझे सातवीपर्यंत शिक्षण झाले. आईने जाणिवपूर्वक याच शाळेत मला घातले. सर्व समाजातील मुलांशी संबंध यावा, हा तिचा हेतू होता.


माझे दैवत माझ्याशी


प्राथमिक शाळेत असतानाच एक दिवस अचानक बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची दुःखद वार्ता येऊन धडकली. त्यावेळी दलित समाजाने केलेला आक्रोश आजही आठवतो. सारा दलित समाज धाय मोकलून रडत होता. बाबा, आता आम्ही कोठे जायचे, आमच्याकडे कोण बघणार, असे मराठी नि कन्नडमध्ये बोलून टाहो फोडत होता. माझा चेहरा रडवेला झाला. त्या दुःखी समुदायाबरोबर वाट फुटेल तिकडे सैरभैर होऊन मी जात होतो.
दुसर्‍या दिवशी आलेल्या सर्व वृत्तपत्रांचे पहिले पान बाबासाहेबांच्या छायाचित्राने पूर्ण भरलेेले होते. त्याच क्षणी मी बाबासाहेबांकडे अधिक वळलो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याच्या आधी दीड महिन्यांपूर्वी बाबासाहेबांचा नागपूर येथे धम्मदीक्षेचा सोहळा पार पडला होता. बाबासाहेब व माईसाहेब धम्मदीक्षा घेत आहेत, हा वृत्तपत्रातील संपूर्ण पानभरचा फोटो आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या फोटोचाही माझ्या जीवनाला कलाटणी देण्यात मोठा वाटा आहे. प्राथमिक शाळेत शिकत असतानाच मी माझ्या अभ्यासाच्या स्वतंत्र खोलीत बाबासाहेबांचे एका वृत्तपत्राच्या अंकातील चित्र कापून पुस्तकाच्या लाकडी कपाटावर चिकटविले होते. माझे दैवत माझ्याशी. बाकीच्यांचा विचार करण्याचे कारण काय, ही त्यामागील भूमिका. माझे वडील बेडकीहाळमधील नामांकित डॉक्टर होते. दलित समाजाची त्यांच्यावर अपार श्रद्धा. दलित वस्तीतूनच आमच्या मळ्याची वाट जाते. त्यामुळे रोज त्यांच्याशी येता-जाता बोलणे असे. दलित समाजातील पेशंट आले, की वडील त्यांना अभिमानाने सांगायचे, “बघा रे. सतीशने त्याच्या खोलीत कोणाचा फोटो लावला आहे ते.” पेशंट माझ्या खोलीत डोकावत व अत्यंत भक्तिभावाने, दोन्ही हात जोडून बाबासाहेबांना वंदन करून मूकपणाने निघून जात. हे प्रसंग मी पाहिले आहेत. माझ्या श्रद्धास्थानाला काही तोड नाही. मी करतोय ते बरोबर आहे, अशा प्रकारच्या भावनेने मी आनंदून जाई.


हत्तीवर बसण्याचे भाग्य हा केवळ बाबासाहेबांचा प्रसाद


चिकोडी राखीव मतदारसंघ (लोकसभा) हा आमचा मतदारसंघ. त्याचाही माझ्या मनोभूमिकेला आधार मिळाला. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे उमेदवार अ‍ॅड. दत्ताआप्पा कट्टी हे लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे होते (1957). बाबासाहेबांचे ते कर्नाटकातील निष्ठावंत सहकारी होते. त्यांची खूण होती हत्ती. शालेय वयात त्यांच्या प्रचारसभेतही अगदी उन्हातान्हात घोषणा देत मी हिरीरिने भाग घेतला होता. जवळजवळ महिनाभर प्रचार केला. माझे कौतुक वाटून एका कार्यकर्त्याने मला एके दिवशी हत्तीवर बसविले होते. हत्तीवर बसण्याचे भाग्य हा केवळ बाबासाहेबांचा प्रसाद. दत्ता कट्टी प्रचंड मतांनी निवडून आले. त्या सुमारास त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी काय केले’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. वडिलांमार्फत ते माझ्यापर्यंत आले. मला मिळालेले हे पहिले भेटपुस्तक. त्यामुळे त्याला माझ्या जीवनात फार महत्त्व आहे. ते आजही माझ्या संग्रही आहे.
दत्ता कट्टी यांनी बाबासाहेबांचे पहिल्या पानावर केलेले वर्णन, बाबासाहेबांना दिलेल्या उपमा मुखोद्गत कराव्यात अशा आहेत. बाबासाहेबांवर त्यावेळी फार साहित्य उपलब्ध होत नव्हते. मिळेल तिथून मी मिळवी. प्रसंगी रस्त्यात उभे राहूनही मिळालेला मजकूर लिहून काढून ज्याचा त्याला अंक परत करी. ग्रामपंचायतीच्या लायब्ररीत जाई. तेथील सेवकाला पुस्तकाची यादी रजिस्टरवर लिहिण्यास, शिक्के मारण्यास मदत करी. त्याला मराठीचा सराव नव्हता. डॉक्टरांचा मुलगा मदत करतोय याचे त्याला अप्रूप वाटे. पण माझा अंतस्थ हेतू वेगळा असे. मला पाहिजे ते पुस्तक तो देई व पाहिजे ते पुस्तक खरेदी करी. बेडकीहाळच्या ग्रामपंचायतीत बाबासाहेबांचा फार सुरेख फोटो ठेवलेला होता.


‘जागृतीचा विस्तव विझू देऊ नका…’


बेडकीहाळचे आमदार एस.एस. (शिंदगोंडा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मळ्याकडे जाणार्‍या दलित वस्तीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी होणार आहे, याची मला काणकूण लागली. प्रमुख वक्ते होते कोडणीचे बॅरिस्टर एस.एन. माने आणि कोल्हापूरचे सत्यशोधक विचारवंत डी.एस. नार्वेकर. माझा घसा बसला आहे, त्यामुळे मी फार बोलणार नाही असे बॅरिस्टर माने चहापानाच्या वेळी म्हणाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मला भाषण करायला सांगितले. मी उत्स्फूर्तपणे बोललो. रात्रीचे साडेबारा-एक वाजले होते. घरातील सगळे उन्हामुळे अंगणात झोपले होते. मी कोणालाही न सांगता गेलो होतो. थोरला भाऊ जागा होता. त्याने विचारले, ‘कोठे गेला होतास रे?’ मी म्हणालो, ‘तू झोप. सकाळी सांगतो.’ मी त्यावेळी बेडकीहाळच्या बी.एस. हायस्कूलमध्ये शिकत होतो. दुसर्‍या दिवशी आमदारांनी माझ्या वडिलांना सभेचा सगळा वृत्तांत सांगितला. आज बेडकीहाळला बाबासाहेबांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मोठे उद्यान आहे. ‘जागृतीचा विस्तव विझू देऊ नका. जागृतीची लाट निर्माण करा’ असे बाबासाहेब सांगून गेले. निष्ठावंत बाबासाहेबांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुढील शिक्षणासाठी अर्जुननगरच्या (निपाणी) देवचंद कॉलेजला गेलो. वसतिगृहात राहिलो. वसतिगृहात विविध भागांतील दलित विद्यार्थ्यांचा सहवास लाभला. मला घडविण्यात त्यांचा वाटा आहे. माझ्या रुमवर रात्री ते चर्चेसाठी जमत. फार छान वातावरण होते. अनुभवसमृद्ध झालो. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान’ या विषयावरील निबंध स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके मिळाली. पद्मभूषण श्रीमान देवचंदजी शाह यांचे अपार प्रेम मिळाले. प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र यांनी अलोट माया केली. कॉलेज निवडणुकीत निवडून आलो. त्या काळात बाबासाहेबांवर वृत्तपत्रांत लेख लिहिण्यात मी आघाडीवर होतो.


रोज नवे बाबासाहेब समजत आहेत


बाबासाहेबांच्या विचारस्पर्शामुळे जीवनाला प्रेरणा मिळाली, मरगळ दूर गेली. विचार कसा करावा याचे मार्गदर्शन घडले. नवे जग मिळाले. बाबासाहेब अभ्यासल्यामुळे ज्ञानकक्षा रुंदावल्या. अहंकाराची पिसे गळून पडली. चारित्र्य नि निर्व्यसनीपणा यांचा संस्कार घडला. अलीकडे तर पत्नी सांगते, “कोणाचे ऐेकून वा पाहून किंवा थोडा बदल म्हणून दुसर्‍या कोणालाही डोक्यात घेऊ नका. त्याची गरज नाही. आपले डोके बाबासाहेबांसाठीच, डोळे बाबासाहेब वाचण्यासाठी आहेत, याचे भान ठेवा व त्या अनुषंगाने उचित वागा.” असा उपदेश मिळणेही भाग्याचेच. वाईत स्वतःचा बंगला झाला. बंगल्याला ‘शिल्पकार’ हे नाव तिनेच सुचविले. 26 जानेवारी (1987)ला राहायला आलो. बाबासाहेबांचा मोठा फोटो तिनेच आपल्या पगारातून आणला. बंगल्याचा वरचा संपूर्ण मजला भीममय आहे. बाबासाहेबांचे फोटो, पुतळे, मला मिळालेले पुरस्कार यांनी तो संपन्न आहे. बाबासाहेबांनी लिहिलेेले संपूर्ण वाङ्मय, बाबासाहेबांवर इतरांनी लिहिलेेले साहित्य, स्मृतिग्रंथ, गौरव अंक, स्मरणिका, वृत्तपत्रांचे अंक, हजारो कात्रणे आदी प्रचंड साहित्यसंसार मला जगण्याची ताकद देतो. कशासाठी जगायचे नि कोणासाठी जगायचे, हे सांगतो. अजूनही संपूर्ण बाबासाहेब वाचून झालेले नाहीत. ते एका जन्मात शक्यही नाही. ते अथांग आहेत, ते विस्तृत आहेत. रोज नवे बाबासाहेब समजत आहेत. ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जिथे तिथे बाबासाहेब दिसतील ते ते टिपण्याचा सराव कायम ठेवला आहे. वयाच्या 74 व्या वर्षीही तो उत्साह अजून टिकून आहे. अशा टिपणांनीच 50 ते 60 वह्या भरगच्च भरल्या आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून वाचतच असतो. वाचन थांबविले, की अंग दुखायला लागते हा अलीकडचा अनुभव. ‘चष्म्याचा नंबर वाढला तरी चालेल; पण बाबासाहेब वाचण्याचे सोडू नका’ हा डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मला दिलेला आदेश मी शिरोधार्ह मानला आहे.


‘प्रिय बाबा. प्रेमाची भेट’


संग्रहात बाबासाहेबांवरील दुर्मीळ चांगली किमती पुस्तके पाहून अभ्यासक विचारतात, ‘ही पुस्तके तुम्हाला कोठे मिळाली?’ मी म्हणतो, पुस्तकाचे पहिले पान वाचा. त्यावर लिहिलेले असते, ‘प्रिय बाबा. प्रेमाची भेट’ कन्या व चिरंजीव अशी पुस्तके मला आवर्जून पाठवितात. आई, वडील, काका, बहीण, भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगा, कन्या, सून, जावई या घटकांनी सहकार्य केले. एकदा तर रस्त्यात फिरताना बाबासाहेबांवरील दुर्मीळ पुस्तके दृष्टीस पडली. खिशात पैसे नव्हते. जीव कळवळला. तेव्हा थोरल्या वहिनींनी आपली पर्स उघडली व पैसे दिले. पुण्यातील एका मावस बहिणीने फूटपाथवर मला न मिळालेले पुस्तक शोधून काढून, जपून ठेऊन मला दिले. ज्यांना माझे पसंत नव्हते त्यांनी उघड विरोध केला नाही; वा तिरस्कारही केला नाही. अपरोक्ष काय म्हणतात, याची कधी पर्वा केली नाही. बाबासाहेब मोठे आहेत हे त्यांना आतून तरी कबूल आहे, याचे मला समाधान असे. माझे थोरले चुलते (काका) अ‍ॅड. व्ही.एन. कुलकर्णी, बेडकीहाळकर वकील (चिकोडी) हे बाबासाहेबांचे समकालीन. बाबासाहेब कोर्टकामासाठी चिकोडीच्या कोर्टात आले होते, असे त्यांनी आपल्या एका लेखात नमूद केले आहे.
धाकटे चुलते प्रा. पां.ना. कुलकर्णी (कोल्हापूर) हे राजाराम कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. बाबासाहेब राजाराम कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला आले होते (1952). काकांच्या खांद्यावर हात टाकून त्या आधारे बाबासाहेब त्या वेळच्या राजाराम कॉलेजचा गोल जिना उतरत होते, अशी आठवण काकांनी सांगितली आहे.


त्यामुळे माझे नाव महाराष्ट्र पातळीवर गेले


नोकरीच्या निमित्ताने 1968 साली वाई (जि. सातारा) येथे आलो. जयंतीच्या निमंत्रणाची वाट पाहत होतो. विचार कधी सांगणार? तशी संधी आली. आचार्य अत्रे यांच्या कन्या व माझ्या सदैव हितचिंतक दैनिक ‘मराठा’च्या संपादिका शिरीष पै यांनी ‘मराठा’च्या रविवार पुरवणीत पहिल्या पानावर बाबासाहेबांचा सुरेख फोटो देऊन माझा मोठा लेख छापला (7 डिसेंबर 1969). बाबासाहेबांवर, दलित चळवळीवर अनेक लेख लिहिण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे माझे नाव महाराष्ट्र पातळीवर गेले. व्याख्यानांची निमंत्रणे येऊ लागली. सातारा जिल्ह्यात, वाई तालुक्यात असंख्य ठिकाणी गेलो. मिळेल त्या वाहनाने गेलो. कधी ट्रक, रिक्षा, टॅक्सी, सायकल वा बैलगाडी. मोठेपणाची, मानपानाची हाव ठेवली नाही. आपण कोणासाठी जातो याचे भान ठेवले.


दादासाहेब रुपवतेंच्या संदेशाने मन भारावून गेले…


समाजकल्याण मंत्री असताना दादासाहेब रुपवते यांनी “गावात राहणारे; पण ज्यांचे मन सतत गावकुसाबाहेर असते अशा सतीश कुलकर्णी यांना जपा. आपल्या कार्यक्रमांना त्यांना हक्काने बोलवा,” असा दलितांना संदेश दिला होता. मन भारावून गेले. गेल्या पन्नास वर्षांत बहुतेक सर्व आंबेडकरवादी नेते, लेखक, विचारवंत, संपादक, अभ्यासक यांच्याशी संपर्क आला. संवाद झाले. ‘शिल्पकार’ला त्यांनी भेट दिली. भावनिक नाते निर्माण झाले. हे सर्व घडले ते केवळ बाबासाहेबांमुुळे. मुखात बाबासाहेबांचे नाव असले, की कोणाला भेटायची अडचण येत नाही. लोकांना आपण कोण आहोत, कोण नाही हे चांगले कळते.


भय्यासाहेब आंबेडकरांचे निर्व्याज प्रेम मिळाले


आमदार शांताबाई दाणी आजारी असतानाही त्यांनी आम्हा उभयतांचे स्वागत केले. दोन पुस्तके भेट दिली, सत्कार केला, मनसोक्त बोलल्या, खाऊ घातले. वामनराव कर्डकांनी तर खर्डा-भाकरी खाण्याचा आग्रह केला. चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी भोजनासाठी थांबवून धरले. दया पवार यांनी महाडमध्ये पाठीवरून हात फिरवून काळजी घेतली. डॉ. रावसाहेब कसबे यांनी बर्‍याच दिवसांनी भेट झाल्यावर ‘बार्टी’मध्ये कडकडून मिठी मारली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रावणकुमार बनसोडे तर व्यासपीठावरच मला तपासत, काळजी घेत. बेळगावला तर बी. शंकरानंद यांनी ते स्नान करीत असताना आपल्या स्नानगृहातूनच ‘मी आलोच, थांबा.’ असा निरोप दिला. भय्यासाहेब आंबेडकर यांचे निर्व्याज प्रेम मिळाले. आर.आर. पाटील (क्रांतिपर्व), डॉ. यशवंत मनोहर, प्रा. अरूण कांबळे, डॉ. ज्योती लांजेवार, विलास वाघ, उत्तम कांबळे, लक्ष्मण माने, डॉ. विनायकराव मोरे, राजा ढाले, दिनकर झिंब्रे, डॉ. संभाजीराव बिरांजे, लक्ष्मणराव ढोबले, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, शंकरराव खरात, वामन होवाळ, भास्करराव भोसले, प्रा. केशव मेश्राम, नारायण सुर्वे, एन.एम. कांबळे, प्रा. जोगेंद्र कवाडे, पां.ना. राजभोज, शशिकांत दैठणकर, एकनाथराव गायकवाड, अ‍ॅड. जी.बी. माने, प्रा. एम.डी. नलावडे, प्रा. रमेश ढावरे, प्रा. रतनलाल सोनाग्रा, डॉ. रोहिदास जाधव, प्रा. मनोहर जाधव, डॉ. डी.टी. माने, सुहास सोनावणे, धनःश्याम (के.बी.) तळवटकर, बाबूराव बागुल, हरिभाऊ पगारे यांच्याशी झालेल्या सुसंवादामुळे, भेटीमुळे बाबासाहेब वाचण्यात मला आनंद घेता आला.


वराळे घराण्याचा सार्थ अभिमान वाटतो


आमच्या चिकोडी-निपाणी तालुक्याच्या भाग्याची गोष्ट अशी, की ज्या घराण्याच्या उल्लेखाशिवाय आंबेडकर चरित्र पूर्ण होऊच शकत नाही, ते भाग्यवान घराणे आमच्या भागातील आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. ऊर आनंदाने भरून येतो. कर्नाटकसिंह आमदार बळवंतराव हणमंतराव वराळे हे बाबासाहेबांचे अत्यंत निकटचे व विश्‍वासू सहकारी होते. दलित साहित्य संमेलनाच्या वेळी (1972) महाडमध्ये गाडीतून फिरताना त्यांनी मला मोठ्या प्रेमाने आपल्या मांडीवर घेतले होते. राधाताई वराळे यांना तर आम्ही कायम स्मरणात ठेवू. संपूर्ण वराळे घराण्याचा माझ्यावर गेली 50 वर्षे मोठा प्रभाव आहे. त्यांचा आदर्श घ्या, असे मुलांना सांगतो.


लोकच आपल्याला अभ्यासाला लावतात


‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या उक्तीनुसार बाबासाहेबांचा प्रभाव एकाकडून दुसर्‍याकडे जातो याचा आमच्या घरातच प्रत्यय आला. बी.एड. करीत असताना सौ. प्रज्ञा यांनी स्वतःच्या निवडीनुसार ‘दलित कविता ः एक दर्शन’ या विषयावर प्रकल्प सादर केला. त्याची खूप प्रशंसा झाली. कन्येने (सौ. प्रतिष्ठा सोनटक्के) एम.जे.सी. ला असताना लघुप्रबंध तयार केला आणि तो मातोश्री सौ. रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीस अर्पण केला. एकमेकांत मतभेद असणारे, एकमेकांचे तोंडही न बघणारे दलित नेते व विचारवंत हे निःसंकोच एकत्र येतात, ते ‘शिल्पकार’ बंगल्यावर. खूप अभ्यासाने, व्यासंगाने विषयात तशी तज्ज्ञता येते. रात्री-अपरात्रीदेखील मग खूप दुरून शंकांचे निरसन करून घेण्यासाठी फोन येतात. त्यासाठी आपण तत्पर असायला हवे. कंटाळून चालत नाही. हक्काने फोन करतात. यातच आपल्या अभ्यासाची सार्थकता मानावी लागते. पुन्हा अभ्यासासाठी बैठक मारावी लागते. आपण अभ्यास करतो म्हणण्यापेक्षा लोकच आपल्याला अभ्यासाला लावतात. त्यामुळे आपण नित्यनूतन राहतो हा फायदा आहे. ते त्यांचे आपल्यावर उपकार आहेत.


चुका सांगाव्यात तर ते आपलेच लोक असतात  


लेखात, भाषणात कोणी बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती दिली, चुकीचा संदर्भ दिला,  की खूप त्रास होतो. चुका सांगाव्यात तर ते आपलेच लोक असतात. त्यांना दुखावल्यासारखे होते. सांगू नयेत, तर आपल्याला हे मान्य आहे असा समज होतो. अशा कात्रीत आपण सापडतो. चुकीचे लिहिण्याचा पायंडा पडू नये, कोण काय करतंंय ही बेफिकीर वृत्ती लेखकात, वक्त्यात वाढू नये, अशी आपली तळमळ असते. अशा वेळी मी मार्ग काढतो. लेखक हौशी असेल, उमेदीचा असेल व मुख्य म्हणजे त्याचा हेतू शुद्ध असेल, तर त्याला खाजगीत सांगतो. आडदांड, माझेच खरे असा आविर्भाव असणारा अहंभावी असेल, तर मग त्याला जाहीरपणे उत्तर देतो. तोच तोच मजकूर, तीच तीच माहिती, पण शीर्षक वेगळे, अशा पद्धतीने ज्यावेळी भारंभार साहित्य पुढे आणण्यात येते त्यावेळी फसगत होते. वाचक संभ्रमित होतो. शीर्षकाला लागू पडेल अशी माहिती त्यात असेल याचीही खात्री वाटत नाही. अशा वेळी काय जवळ ठेवावे व काय जवळ ठेवू नये, याचे तारतम्य बाळगावे लागते. बाबासाहेबांना आदर्श मानणार्‍या आंबेडकरवादी साहित्यिकांनी अचूकच लिहिले पाहिजे, ही आम्ही अपेक्षा ठेवणे चूक होईल का? बाबासाहेबांबद्दल गैरसमज पसरविणार्‍यांना त्यांच्या समाजातील स्थानाबद्दल आदर बाळगून प्रसंगी मी धाडसाने, पुराव्यानिशी सडेतोड उत्तरे दिली आहेत. हे करावेच लागते. माझ्या निर्हेतूक भूमिकेमुळे त्यांनीही माझा मान राखला. हे कृतज्ञतापूर्वक कबूल करावे लागेल.


हे घडले ते फक्त बाबासाहेबांमुळे


जयभीम या शब्दात मोठी ताकद आहे. बाबासाहेबांबद्दलची चर्चा ऐकून एकदा एका रिक्षावाल्याने (औरंगाबाद) मजकडून पैसेच घेतले नाहीत. सातारा ग्रंथमहोत्सवाला जाताना एका रिक्षावाल्याने अर्धेच पैसे घेतले. मुंबईत रेल्वेने प्रवास करताना उभ्याने पुस्तक वाचताना मुखपृष्ठावरील बाबासाहेब पाहून एकाने सरकून आपणहून मला जागा दिली. एकदा पटांगणात बाबासाहेबांवर माझे भाषण चालू असताना एका गरीब, गलितगात्र माणसाने अचानक माझ्या गळ्यात हार घालून पलायन केले. व्यासपीठावर भर्रकन चढून निघून गेला. तो एका खेड्यातील होता. त्याच्या गाडीची वेळ झाली होती. फिरतीवर असताना एक मोठे अधिकारी व्याख्यान ऐकण्यासाठी लांब श्रोत्यात बसले. व्याख्यान संपल्यावर माझी चर्चा ऐकून ते ‘शिल्पकार’वर आले. रत्नागिरीचे हापूस आंबे घेऊन भेटायला आले. हे घडले ते फक्त बाबासाहेबांमुळे. एका उपजिल्हाधिकारी साहेबांनी तर आपल्या आईवडिलांच्या स्मृतीदिनाला भाषणासाठी आपल्या गावी बोलाविले. मी सहकुटुंब, सहपरिवार गेलो.
कन्येला पोचवायला एकदा एस.टी. स्टँडवर गेलो. तिला ठाण्याला जायचे होते. स्टँडवर प्रचंड गर्दी. गाडीची वाट पाहत बाकड्यावर बसलो. शेजारी नातू (वय 8) त्याने स्टँडवरच विचारले, ‘आबूजी, आज बाबासाहेब आंबेडकर असते, तर तुम्ही काय केले असते?’ त्याला चटकन म्हणालो, “आजा बाबासाहेब असते, तर तुला सोडवायला स्टँडवर कशाला आलो असतो? त्यांच्याबरोबर राहिलो असतो.” मला वाटते हा संवाद काहींनी ऐकला असावा. गाडी आली त्यावेळी एका प्रवाशाने नातवाला म्हटले, ‘गडबड करू नको. मी तुझी जागा धरीन…’ असे जिकडे तिकडे बाबासाहेब आपल्या मदतीला धावून येतात, असा साक्षात्कार घडतो.
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, विचारवंत कालिचरण स्नेही यांचा एके रात्री 10 वाजता अचानक फोन आला. ख्यालीखुशाली विचारली आणि म्हणाले, “आप जैसे लोगों की लखनौ में बहुत जरूरत है। यहाँ के लोगों को बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर अच्छी तरीकेसे समझना चाहिए।”


‘आपके समाज में आप जैसे लोगों की संख्या क्यों नही बढती?’


यावर्षी वाढदिवसाला आपण औरंगाबादच्या मिलिंद कॉलेज परिसरात असायला हवे, या तीव्र भावनेने तेथे गेलो. तेथे गेलो, की बाबासाहेबांनी लावलेल्या बोधिवृक्षाचे दर्शन घेतो. सकाळी सकाळी तेथे गेलो. मिलिंदचे विद्यार्थी भेटतात. त्यांच्याबरोबर बोधिवृक्षाला वंदन केले. योगायोगाने चार भिक्खू तेथे होते. त्यांच्याशी संवाद घडला. त्यांनी आशीर्वाद दिले. त्यांनी मला विचारलेला प्रश्‍न आजही कानात घुमतो, ‘आपके समाज में आप जैसे लोगों की संख्या क्यों नही बढती?’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजला गेलो. झाडाखाली अनेक विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणल्या, “आम्ही लांबून लांबून आलो आहोत. आम्हाला दुसरीकडे कोठेही जायचे नव्हते. बाबासाहेबांच्याच कॉलेजमध्ये शिकायचे, या जिद्दीने येथे आलो.” त्यांनी बाबासाहेबांबद्दल मला काही प्रश्‍न विचारले. त्यांचा निरोप घेतना त्या म्हणाल्या, “बाबासाहेबांबद्दल अनेकजण सांगतात. पण पाच मिनिटात तुम्ही त्यांचे जे मोठेपण सांगितले त्याने डोळे पाणावले. त्याने प्रेरणा मिळाली.” भेटलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगितले, “खूप मोठे व्हा. कोणामुळे मोठे झालात ते विसरू नका. मोठे झाल्याचे मला कळवा. भेटीचा संदर्भ द्या.”
बाबासाहेबांवर माझे प्रेम आहे. एवढ्या कारणासाठी माझ्यासारख्या सामान्य माणसावर आंबेडकरी समाज जर एवढे प्रेम करीत असेल, तर प्रत्यक्ष बाबासाहेबांसाठी त्याकाळी किती जीव टाकत असेल, याची कल्पना करा. त्यातून बाबासाहेब काय होते याचा अधिक उलगडा होईल, असे मला वाटते.
काही माणसे, अभ्यासक ठराविक काळात काही विचारांनी झपाटलेली असतात. 30-40 वर्षे झपाटून काम करतात. त्या विचारांचे समर्थन करतात. प्रचार, प्रसार करतात व नंतर तेथून सरकतात, सटकतात. दुसरीकडेच कोठेतरी जातात. असे का होते वा असे का करतात, कळत नाही. पण तसे दृष्टोत्पतीस येते, हे मात्र खरे. पण मी निश्‍चयाने सांगतो, अखेरच्या क्षणापर्यंत मला बाबासाहेबांचा आणि फक्त बाबासाहेबांचाच लळा असेल. एकवेळ पाण्यावाचून मासा राहू शकेल. पण मी बाबासाहेबांपासून दूर राहू शकणार नाही. हे लादलेले नाते नाही, स्वीकारलेले नाते आहे.
एकदा एका जाहीर व्याख्यानात एका ख्यातनाम व लोकप्रिय दलित विचारवंत, संपादकाने म्हटले, “यांचे नाव मी अनेक वर्षे ऐकतो आहे. पण आज त्यांना बघतोय. अरे हे तर अगदी आमच्यासारखं दिसतंय. आमच्यासारखं बोलतंय.”
रात्री अंथरूणावर पडल्यावर सार्‍या स्मृती जागृत होतात. किती किती माणसं भेटली. आगदी बेळगावपासून नागपूरपर्यंत, दिल्लीपासून बंगलोरपर्यंतची. त्यांची नावानिशी उजळणी करतो. आज कोण कोठे आहे? कसा आहे? असेल का? अशा प्रश्‍नांची मनात गर्दी होते.
प्रा. भगवान भोईर व्याख्या विचारतात, ‘तुम्ही आपला माणूस कोणाला मानता?’ मी म्हणतो, “जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तो माझा माणूस. त्यांना जो मानत नाही तो माझा नाही. मग तो कोणीही व कोठलाही असो.”
कोणी विचारते, ‘आंबेडकरवादाची तुमची व्याख्या काय?’ मी सांगतो, “सर्वांगीण मानवकल्याणी, लोकशाहीनिष्ठ, विवेकी, नीतिप्रहार, ज्ञानमार्ग म्हणजे आंबेडकरवाद.” (11 ऑगस्ट 2018 ला रात्री 11 वाजता सुचलेली).
मी आयुष्यात एकही वाईट गोष्ट केली नाही, असे सांगणारे नेतृत्व, कोणत्याही जातीचा द्वेष न करता दलितांसाठी वेचलेले संपूर्ण आयुष्य, क्षणोक्षणी समताधिष्ठित समाजासाठी नि देशाला हिताचा अहर्निश विचार म्हणजे आमचे बाबासाहेब. अलीकडे झोपताना बाबासाहेबांच्या विविध प्रतिमा डोळ्यापुढे येतात नि डोळे पाणवतात. रात्ररात्र झोप लागत नाही. सकाळी डोळा लागतो. सगळे बाबासाहेब कधी वाचून होणार याने चिंताग्रस्त होतो. बाबासाहेब, मी कोण, कुठला, काय; पण आयुष्यभर अदृश्यरूपाने माझ्या अवतीभोवती आहात, असा भास होतो. खरोखरच तुमची कमाल आहे.
बाबासाहेबांपासून प्रेरणा घेण्यासाठी दलित समाजातच जन्माला आले पाहिजे, असे नव्हे व बाबासाहेबांपासून प्रेरणा घेतली तर फक्त दलितच मोठा होतो असेही नव्हे. हे मला आवर्जून सांगावे वाटते.

– सतीश कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.