धम्म परिषदांची जबाबदारी

मराठवाड्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात धम्म परिषदा होत असतात. नुकतीच अजिंठा येथे एक धम्म परिषद होऊन गेली. आता नांदेड, पूर्णा, मुळावा, लातूर, छत्रपती संभाजीनगर येथेही धम्म परिषदा होऊ घातल्या आहेत.
धम्म परिषदा या धम्माच्या निर्दोषीकरणाची प्रक्रिया म्हणून आयोजित केल्या जातात. किमान आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर धम्म सुरक्षित ठेवण्यासाठी एकूण सहा धम्मसंगीती म्हणजेच सहा धम्म परिषदा झाल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धम्म परिषदा होऊ लागल्या. तेव्हा आता प्रश्‍न असा पडतो, की आजकालच्या धम्म परिषदांमधून धम्माच्या शुद्धतेची प्रक्रिया पार पडते काय, की धम्म परिषदांना आज केवळ एक कर्मकांडी स्वरुप प्राप्त होऊ लागले आहे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दीक्षेला धार्मिक आशयापेक्षा एक मोठा सामाजिक आशय होता. म्हणजेच आपण एक आदर्श अशी बौद्ध संस्कृती निर्माण करायला पाहिजे होती. बौद्ध म्हणून आपल्या आचार-विचार-वर्तणुकीतून बौद्ध म्हणून आपण एक आपले वेगळेपण निर्माण करायला पाहिजे होते. असे घडले काय?
धम्म चळवळीत आज एक अराजक निर्माण झालेेले दिसतेय. उदा. विपश्यना. बाबासाहेबांनी कधीही विपश्यनेचा पुरस्कार केला नाही. बाबासाहेबांना डोळे मिटून बसणारा नव्हे तर डोळे उघडे ठेऊन जगाकडे पाहणारा बुद्ध अभिप्रेत होता. पण आता विपश्यना म्हणजेच धम्म होय, असा एक आभास निर्माण केला जात आहे. विपश्यनेमुळे जर कुणाला मानसिक समाधान मिळत असेल, तर त्याने जरूर विपश्यना करावी. पण विपश्यना म्हणजे धम्म नव्हे. बाबासाहेबांचा धम्म व्यक्तिगत मोक्षासाठी नव्हे, तर सबंध मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. या संदर्भात बौद्ध भिक्खूचे आदर्श चित्र रेखाटताना म्हणून त्यांनी म्हटले होते, “बौद्ध भिक्खूची भूमिका सामाजिक कार्यकर्त्याची हवी.
भिक्खूने सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून दिले पाहिजे. त्याची भूमिका मित्राची, मार्गदर्शकाची व तत्त्वचिंतकाची असावी.” याचा अर्थ असा, की डोळे तासन्तास मिटून सामाजिक क्रांती होत नसते, तर ती डोळे उघडे ठेऊनच करावी लागते. याचा मात्र विपश्यनेचा प्रचार-प्रसार करणार्‍यांना विसर पडला. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली ही बौद्ध संस्कृती नव्हे. तेव्हा मुद्दा असा, की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली बौद्ध संस्कृती आपण निर्माण का करू शकलो नाही? तर बौद्ध संस्कृती निर्माण होण्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे संघटीत शक्तीचा अभाव, ही होय. बौद्ध समाज आज गटातटात विभागला गेला आहे. परिणामी आपण बौद्ध संघटन उभारू शकलो नाही. ते जर उभारावयाचे असेल, तर धम्म संघटना राजकीय नेत्यांपासून मुक्त असल्या पाहिजेत. धम्मकारण व राजकारण यात फरक असला पाहिजे. तात्पर्य, ज्यांना कुठल्याही राजकीय आकांक्षा नाहीत अशा नितीमान बुद्धीजीवींनी एकत्र येऊन बौद्ध संस्कृती निर्माण केली पाहिजे. या संदर्भात धम्म परिषदांची जबाबदारी मोठी आहे.
धम्म परिषदांना आजकाल कर्मकांडाचे स्वरूप येत चालले आहे. सामाजिक प्रश्‍नांची चर्चा धम्म परिषदांतून होताना दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर भिक्खूसंघाने विचार आणि वर्तनाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविली पाहिजे. भिक्खूंनी दैवी शक्ती, चमत्कार, परित्राणपाठ अशा गोष्टी समाजाला शिकवू नयेत. अत्तदीपभव व परित्राणपाठ यात अंतर्विरोध आहे. एखादी गाथा म्हटल्यावर सुखप्राप्ती होते, संकट निवारण होते अशा भ्रामक गोष्टी लोकांना शिकवू नयेत. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक चळवळ, साहित्य चळवळ, धम्म चळवळ अशा सर्वच स्तरावर आज समाज दुभंगला आहे. स्वाभीमानशून्यतेने कहर केला आहे. माणसाचे माणूसपण हरवत चालले आहे. अशा संभ्रमावस्थेत धम्म परिषदांनी माणसाला माणुसकीच्या पायावर उभे करण्याचे काम करावे. त्यांच्या सौहार्द, सहिष्णूता, चारित्र्य, शील जोपासण्याची पराकाष्टा करावी. त्यांच्यात करूणेचे, सूज्ञतेचे, सद्सद्विवेकाचे सेतू उभारावेत. धम्म परिषदांना कर्मकांडाचे स्वरूप न येता बुद्ध विचारांची घुसळण करणार्‍या त्या कार्यशाळा ठराव्यात. आंबेडकरी विचार व बावीस प्रतिज्ञांचे पालन करणारा समाज घडवावा. प्रज्ञा-शील-करूणेचे आंदोलन घरोघरी पोहचविण्याचा वसा धम्म परिषदांनी अंगिकारावा. धम्म परिषदांनी बुद्धाचे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, बुद्धाची ज्ञानमिमांसा, त्याचा इहवाद, बुद्धाचा बुद्धीवाद, बुद्धाचे क्रांतीकारी राजकारण, बुद्धाचा विज्ञानवाद, बुद्धाचा शोषण-वर्ण-जातीव्यवस्था निर्मूलनाचा विचार, बुद्धाची लोकशाही, बुद्धाचे मानसशास्त्र, भारताचे संविधान आदी विषयांचे चिंतन-मनन धम्म परिषदांतून केले जावे. बौद्ध संस्कृती समाजात रुजविण्यासाठी हे उपक्रम साह्यभूत ठरतील, असे वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.