काँग्रेस नेत्याने लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र – प्रा. अविनाश कोल्हे

काँग्रेस नेत्याने लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र – प्रा. अविनाश कोल्हे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘आंबेडकर: ए लाईफ’ हे इंग्रजीत चरित्र लिहिले आहे. या वाक्यातील ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते’ हा उल्लेख महत्त्वाचा आहे. याचे कारण बाबासाहेबांनी हयातभर काँग्रेसच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्यांच्या हयातीत जेवढा मानसन्मान मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त मानसन्मान त्यांना मरणोत्तर, खास करून एकविसाव्या शतकात मिळत आहे. 1990 साली त्यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा बहुमान प्रदान केला. 2016 साली तर संयुक्त राष्ट्रसंघाने ’14 एप्रिल’ म्हणजे बाबासाहेबांचा जन्मदिवस जागतिक पातळीवर साजरा केला होता. याचे साधे कारण म्हणजे अलीकडे बाबासाहेबांच्या कार्याचे खरे स्वरूप जगासमोर उलगडत आहे. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात बाबासाहेबांनी दलितोद्धाराचे अलौकिक कार्य केले, हे जरी खरे असले तरी या कार्याचे योग्य आयाम आता जगासमोर यायला लागले आहेत. ते म्हणजे, जगातील जवळपास सर्व समाजात दोन वर्ग आढळतात. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन वर्गात जग विभागलेले दिसते. बाबासाहेबांचे विचार, त्यांनी केलेले लेखन, त्यांनी लढवलेले सामाजिक न्यायाचे लढे, आज जगभरच्या ‘नाही रे’ वर्गाला लढण्याची प्रेरणा देत आहे. ‘नाही रे’ वर्गाच्या संदर्भात आजही जगात एकही देश असा नाही, की ज्या देशाला ‘आदर्श देश’ म्हणता येईल. अनेक लोकांना अमेरिका हा आदर्श देश वाटतो. पण तेथील कृष्णवर्णीय समाजाची स्थिती बघितली, तर आपल्याला वेगळीच अमेरिका दिसते. 25 मे 2020 रोजी जॉर्ज फ्लॉईड या 44 वर्षांच्या कृष्णवर्णीय माणसाला मिनियापोलिस येथील डेरेक चौव्हिन या पोलिस अधिकार्‍याने मानेवर गुडघा ठेऊन दिवसाढवळ्या मारून टाकले. फ्लॉईडवर खोट्या नोटा खपवल्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. आजही अमेरिकेत फ्लॉईडसारख्या घटना घडत असतात. म्हणूनच बाबासाहेबांनी ‘नाही रे’ वर्गाला दिलेला संदेश महत्त्वाचा ठरतो.


बाबासाहेबांनी हयातभर काँग्रेसच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्या


ज्या पाश्‍चात्य जगतात अशा घटना घडतात, त्याच पाश्‍चात्यांच्या बौद्धिक जगतात नेपोलियन, जॉन केनेडी वगैरे महामानवांची दर दहा-पंधरा वर्षांनी नवीन चरित्रं लिहिली जातात. दर दहा-पंधरा वर्षांनी नवीन पुरावे, नवीन माहिती समोर येते. त्या प्रकाशात महामानवांच्या कार्याचे पुनर्मूल्यमापन होत असते. भारतात आता हा प्रकार सुरू झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘आंबेडकर: ए लाईफ’ हे इंग्रजीत चरित्र लिहिले आहे. या वाक्यातील ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते’ हा उल्लेख महत्त्वाचा आहे. याचे कारण बाबासाहेबांनी हयातभर काँग्रेसच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्या होत्या. विसाव्या शतकातील दलित आणि ब्राह्मणेतरांच्या राजकारणाचा विचार केला तर असे दिसते, की उत्तर भारतातील बाबू जगजीवनराम (1908- 1986) यांनी काँग्रेसमध्ये राहून राजकारण केले. दक्षिणेत रामसामी नायकर (1879-1973) यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये, तर नंतर काँग्रेसबाहेर पडून राजकारण केले. मात्र डॉ. आंबेडकरांनी (1891-1956) शेवटपर्यंत काँग्रेसच्या, त्यातही गांधीजींच्या विरोधात भूमिका घेतल्या होत्या.


बाबासाहेबांच्या कार्याच्या लेखाजोख्याचा पुरावा म्हणजे हे चरित्र


डॉ. आंबेडकरांचे जीवन बहुआयामी होते. त्यांची विद्वत्ता, त्यांचे लेखन, त्यांचे घटना समितीतील योगदान, त्यांचे समाजकारण, त्यांची पत्रकारिता, त्यांनी केलेल्या सामाजिक न्यायाच्या चळवळी, स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था आणि सर्वात शेवटी म्हणजे त्यांनी ऑक्टोबर 1956 मध्ये केलेले धर्मांतर वगैरे अनेक घटनांनी भरलेल्या जीवनाबद्दल एकविसाव्या शतकात आणि तेसुद्धा अवघ्या दोनशे पानांत मांडणे हे एक वेगळेच आव्हान आहे. हे आव्हान शशी थरूरांनी पेलले आहे. मुख्य म्हणजे त्यांनी सोप्या इंग्रजीत चरित्र लिहिले आहे. अन्यथा ‘थरूरांचं इंग्रजी’ हा और प्रकार आहे. थरूरांनी हे चरित्र भारतीय जनतेला अर्पण केले आहे. To the people of India, to whom Ambedkar gave so much that we are yet to fully बाबासाहेबांनी आपल्याला काय दिले याचा अंदाज अजूनही आपल्याला आलेला नाही, हे निरीक्षण अंतर्मुख करणारे आहे. आता बाबासाहेबांकडे अनेक अभ्यासकांचे लक्ष गेलेले आहे आणि आजही बाबासाहेबांच्या कार्याचा लेखाजोखा मांडावा लागतो, याचा पुरावा म्हणजे हे चरित्र.


या घटनेतील नाट्य नीट समजून घेतले पाहिजे!


या छोटेखानी चरित्रात एकूण सहा प्रकरणं आहेत. यातील पहिल्या पाच प्रकरणांत लेखकाने बाबासाहेबांच्या जीवनाचा वेध घेतला आहे, तर सहाव्या प्रकरणात बाबासाहेबांच्या वैचारिक वारशाची चर्चा केली आहे. डॉ. आंबेडकरांचा जीवनपट एव्हाना सर्वांना माहीत आहे. जून 1913 मध्ये बाबासाहेबांना बडोद्याच्या महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेला उच्चशिक्षणासाठी पाठवले. ही घटना अनेक अर्थांनी अभूतपूर्व होती. आजपासून 110 वर्षांपूर्वी एक दलित समाजातला तरुण उच्चशिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात दाखल होतो, या घटनेतील नाट्य नीट समजून घेतले पाहिजे. थरूर नमूद करतात त्याप्रमाणे, तेथे बाबासाहेबांनी मे 1916 मध्ये Castes in India : Their genesis, mechanism and development या विषयावर शोधनिबंध सादर केला. पुढे हाच विषय त्यांच्या व्यासंगाचा झाला. बाबासाहेब तेथे शिकत असताना लाला लजपत राय ‘इंडियन होम रूल’च्या वतीने अमेरिकेत भाषणं देत होते. बाबासाहेबांनी त्यांचे एक भाषण ऐकले. बाबासाहेबांनी त्यांना भारतातील दलितांच्या समस्येबद्दल विचारले असता लालाजींनी उत्तर दिले, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा समस्यांचा विचार करता येईल. या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही आणि नंतर बाबासाहेबांनी या चळवळीतून अंग काढून घेतले (पृ.13). हा प्रसंग काळजीपूर्वक समजून घेतला तर असे दिसते, की इथेच बाबासाहेबांच्या आगामी कार्याचा आणि राष्ट्रीय चळवळीशी त्यांच्या असलेल्या मतभेदांचा उगम दिसतो. 1918-1919 दरम्यान इंग्रज सरकारने भारतातील सुधारणांसाठी साऊथबरो समिती पाठवली होती. तेव्हा बाबासाहेब मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात शिकवत होते. त्यांनी 27 जानेवारी 1919 रोजी या कमिटीपुुढे स्वतःची भूमिका मांडली आणि अस्पृश्यांसाठी विभक्त मतदारसंघाची मागणी केली. हीच मागणी 1932 साली झालेल्या पुणे कराराच्या केंद्रस्थानी होती.


बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना


थरूर यांनी लिहिलेल्या चरित्राकडे ‘बाबासाहेबांचे बौद्धिक चरित्र’ या नजरेने बघितले पाहिजे. 9 मार्च 1924 रोजी मुंबईत बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. बाबासाहेबांचा समाजजीवनातील वावर इथून सुरू झाला. याबद्दल थरूर लिहितात, की ही संस्था आणि अशा प्रकारचे दलितोद्धाराचे कार्य करणार्‍या इतर संस्था, यांच्यात मूलभूत फरक होता. बाबासाहेबांच्या मते, इतर संस्था वरवरचे कार्य करत होत्या, त्यांचे कार्य मलमपट्टीसारखे होते. यामुळे मूलभूत बदल होणार नव्हता.’ (पृ.32) खरं तर इथूनच बाबासाहेबांच्या विचारांचे वेगळेपण अधोरेखित होते. इंग्रज सरकारनेसुद्धा बाबासाहेबांच्या कार्याची दखल घ्यायला सुरुवात केली आणि जानेवारी 1927 मध्ये त्यांना मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर नेमले. बाबासाहेबांनी एप्रिल 1927 मध्ये ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरू केले. थरूरांनी अनेक ठिकाणी इतरत्र पसरलेली माहिती एका सूत्रांत गुंफून वाचकांसमोर ठेवली आहे. उदाहरणार्थ, बाबासाहेबांच्या 1927 सालच्या महाड सत्याग्रहाअगोदर दक्षिण भारतातील त्रावणकोर संस्थानात वायकोम येथे दलितांनी मंदिर प्रवेशासाठी मार्च 1924 मध्ये सत्याग्रह केला होता (पृ.40). अशा तपशिलांमुळे दलितोद्धाराच्या चळवळीचे देशव्यापी स्वरूप समोर येते.


काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह


बाबासाहेबांचे नेतृत्व आधुनिक विचारसरणीवर आधारलेले होते. 1928 सालच्या सुरुवातीला ते अस्पृश्य समाजाच्या एका परिषदेचे अध्यक्ष होते. बैठकीत महार समाजातील नामवंत संत चोखामेळाचे मोठे मंदिर बांधण्याबद्दल चर्चा झाली. या बैठकीत बाबासाहेबांनी वेगळे मंदिर बांधायला विरोध केला. अशा प्रकारे आपण वेगळी मंदिरं बांधली, तर अस्पृश्यता कधीच संपणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यापेक्षा आपण मंदिरप्रवेशासाठी लढले पाहिजे, असा बाबासाहेबांचा आग्रह होता. परिणामी असे मोठे मंदिर बांधण्याची योजना रद्द झाली. पुढे 1930 साली बाबासाहेबांनी नाशिक येथे काळाराम मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह केला.


…म्हणूनच मग बाबासाहेबांनी सायमन कमिशनला सहकार्य केले  


याच काळात बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाची घटना घडली. जून 1928 मध्ये बाबासाहेब मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजमध्ये शिकवायला लागले. त्याच महिन्यात मुंबईत सायमन कमिशनचे आगमन झाले. या कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. देशात सर्वत्र ‘सायमन, गो बॅक’च्या घोषणा ऐकू येत होत्या. थरूर यांनी या अगोदर देशातील राजकीय वातावरणाचा अचूक वेध घेतला आहे. 1918 साली संपलेल्या पहिल्या महायुद्धानंतर इंग्रज सरकारने भारतीय समाजाच्या अपेक्षा पूर्ण केल्या तर नाहीच, उलट 1919 साली रौलॅट कायद्यासारखा कायदा केला. दुसरीकडे, 1928 साली मोतीलाल नेहरू समितीने एका अहवालातून भारताची राज्यघटना बनवली होती. या राज्यघटनेत मुस्लिमांच्या हितसंबंधांचे रक्षण केले होते. पण दलित समाजासाठी काहीही तरतुदी नव्हत्या (पृ.46). यामुळे ‘काँग्रेस म्हणजे उच्चवर्णीय हिंदूंचा पक्ष’ हा बाबासाहेबांचा आरोप खरा ठरला. म्हणूनच मग बाबासाहेबांनी सायमन कमिशनला सहकार्य करण्याचे ठरवले.


सार्वभौम सत्ता जनतेकडे असते, संस्थानिकांकडे नाही


देशात गोलमेज परिषदांचे वातावरण असताना बाबासाहेब आणि महात्माजींची पहिली भेट मुंबईत 14 ऑगस्ट 1931 रोजी झाली. थरूर नमूद करतात त्याप्रमाणे, ही भेट यशस्वी झाली नाही (पृ.56). दोघांनी एकमेकांचे मतपरिवर्तन करण्याचे प्रयत्न केले; पण व्यर्थ. लेखकाने गोलमेज परिषदेदरम्यान घडलेला एक प्रसंग नमूद केला आहे, ज्यातून बाबासाहेबांचे लोकशाहीप्रेम ठसठशीतपणे व्यक्त होते. परिषदेत बिकानेरचे महाराज सर गंगा सिंग म्हणाले, की काँग्रेसने संस्थानिकांना गृहीत धरू नये. यावर बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले, की आधुनिक काळात सार्वभौम सत्ता जनतेकडे असते, संस्थानिकांकडे नाही.


भारतातील खरा लढा ब्राह्मणवाद आणि बुद्ध यांच्यात


याच काळात बाबासाहेब हिंदू धर्माच्या विरोधात जाहीरपणे टीका करत होते. 13 ऑक्टोबर 1935 रोजी बाबासाहेबांनी येवला येथे केलेल्या भाषणात ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे जाहीर केले होते. त्याच काळात मसूरकर महाराजांनी दहा हजार कॅथॉलिक ख्रिश्‍चनांना हिंदू धर्मात परत आणले होते (पृ.77). बाबासाहेबांनी मसूरकर महाराजांना हिंदूंनी अस्पृश्यता निवारणाचा कालबद्ध कार्यक्रम देण्याचे आवाहन केले. यानंतर मे 1936 मध्ये बाबासाहेबांचे ‘अ‍ॅन्हिलेशन ऑफ कास्ट’ प्रसिद्ध झाले. हिंदूंच्या मानसिकतेत फरक न पडल्याने बाबासाहेबांनी ऑक्टोबर 1956 मध्ये सामूहिक धर्मांतर केले.
जुलै 1946 मध्ये झालेल्या घटना समितीसाठीच्या निवडणुकांत बाबासाहेब मुंबई इलाख्यातून पराभूत झाले, तरी बंगाल प्रांतातून मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर निवडून आले (पृ.103). येथून बाबासाहेबांचा घटना समितीतील प्रवास आणि योगदान सुरू झाले. 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीने मसुदा समिती स्थापन केली आणि तिचे अध्यक्षपद बाबासाहेबांना देण्यात आले. याच काळात म्हणजे 1946 साली बाबासाहेबांचा ‘शुद्र पूर्वी कोण होते?’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ महात्मा फुल्यांना अर्पण केला. यात बाबासाहेबांनी ‘आर्याच्या आक्रमणाचा सिद्धांत’ अमान्य केला आणि भारतातील खरा लढा ब्राह्मणवाद आणि बुद्ध यांच्यात आहे, या लढ्यातून अस्पृश्यतेचा जन्म झाला, अशी मांडणी केली.


डॉ. बाबासाहेबांच्या कार्यातील चार उणिवांची चर्चा


थरूरांच्या पुस्तकाचा दखलपात्र भाग म्हणजे त्यांनी उत्तरार्धात बाबासाहेबांच्या कार्यातील चार उणिवांची (flaws) चर्चा केली आहे. पहिली म्हणजे बाबासाहेबांनी आदिवासी समाजाकडे सहानुभूतीनं बघितलं नाही (पृ.171). 6 मार्च 1945 रोजी मुंबईत भरलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनातल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते,  Aboriginal Tribes have not as yet developed any political sense to make the best use of their political opportunities and they may easily become mere instruments in the hands of either a majority or a minority. बाबासाहेबांच्या मांडणीतील दुसरी उणीव दाखवतांना थरूरांनी प्रा. भिखू पारेख यांची साक्ष काढली आहे. बाबासाहेबांनी ‘हिंदू धर्म’ आणि ‘हिंदू समाज’ एकच आहेत, असे गृहीत धरून हिंदू धर्मावर कडवट टिका केली. यामुळे जातीव्यवस्था न मानणारे, पुरोगामी विचारांचे असंख्य हिंदू व्यक्ती बाबासाहेबांच्या विचारविश्‍वात येऊ शकल्या नाहीत (पृ.173). तिसरी उणीव म्हणजे गांधीजींच्या विचारांचा सामना करताना बाबासाहेब गांधीजींशी व्यक्तीगत वैर असल्यासारखे वागले. गांधीजींचा खून झाल्यानंतर बाबासाहेबांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. चौथी उणीव म्हणजे सामाजिक-आर्थिक बदलांसाठी बाबासाहेबांचा शासनव्यवस्थेवर असलेला विश्‍वास. यथावकाश हा विश्‍वास अनाठायी असल्याचे सिद्ध झाले. असे असले तरी, ज्या काळात बाबासाहेबांचा विश्‍वास शासनव्यवस्थेवर होता तो काळ समजून घेतला पाहिजे. ऑक्टोबर 1917 मध्ये रशियात कामगारक्रांती झाली. यामुळे जागतिक पातळीवर खळबळ माजली. या क्रांतीनंतर सत्ता घेतलेल्या सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाने देशात अभूतपूर्व प्रगती केली. 1927 साली या क्रांतीला दशक पूर्ण झाले. त्या निमित्तानेे झालेल्या कार्यक्रमांना पंडित नेहरू आमंत्रित होते. त्यांनी रशियाने शासनव्यवस्थेच्या माध्यमातून केलेली प्रगती बघितली आणि जाहीर केले, की जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा आम्हीसुद्धा रशियाचे विकासाचे प्रारूप वापरू. अशा वातावरणात बाबासाहेबांनी जर शासनव्यवस्थेवर विश्‍वास दाखवला, तर त्यात फारसे चुकले नाही. आज 2023 मध्ये जर बाबासाहेब असते तर वेगळी मांडणी केली असती. आजच्या भारतात बाबासाहेबांना सर्वपक्षीय मान्यता मिळालेली आहे. भाजपासारखा हिंदुत्व प्रमाण मानणारा पक्ष तर बाबासाहेबांचा सतत उदोउदो करत असतो. थरूर नमूद करतात त्याप्रमाणे, 2022 साली पंजाबात सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाने सरकारी कार्यालयात शहीद भगतसिंग आणि बाबासाहेबांचे फोटो लावण्याचा हुकुम काढला (पृ.180).
थरूरांनी बाबासाहेबांच्या योगदानाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघितले आहे. म्हणूनच ते पुस्तकाच्या शेवटी नोंदवतात, की बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याची थोरवी भारतीयांनाच नव्हे, तर जगातील अनेकांना पटली आहे. प्रा. पारेख यांच्या मते, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि बाबासाहेब यांची तुलना केली, तर बाबासाहेब फार मोठे नेते ठरतात (पृ.184). असे असले तरी, आजही भारतातील दलितांची अवस्था वाईट आहे. थरूर 29 सप्टेंबर 2006 रोजी भोतमांगे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करतात. याशिका दत्त या लेेखिकेच्या लेखातील एक उल्लेख अंजन घालतो Our Dalitness is imprinted onto us through the burn bodies of our children, suicides of our PhD scholars and college students, rapes of young girls and women, asphyxiation of our manual scavengers and ‘honour killings’ of lovers (पृ. 196). अशा प्रकारे थरूर बाबासाहेबांच्या चरित्राच्या शेवटी आजच्या भारतात दलितांची स्थिती काय आहे, हे वाचकांसमोर आणतात. म्हणून ते चरित्र महत्त्वाचे ठरते. माझ्या मते, थरूर यांनी लिहिलेल्या चरित्रातील महत्त्वाची उणीव म्हणजे त्यांनी ‘आंबेडकरपूर्व दलित चळवळीचा उल्लेखही केला नाही. असे असले तरी बाबासाहेबांच्या कार्याचा अभ्यास करणार्‍यांसाठी हे महत्त्वाचे चरित्र आहे. 

प्रा. अविनाश कोल्हे

(लेखक हे राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.