धर्माचा नवीन पद्धतीने अभ्यास – नागसेन बागडे

धर्माचा नवीन पद्धतीने अभ्यास – नागसेन बागडे

धर्माच्या नावावर आज सर्वच देशांमध्ये वातावरण तापलेलं आहे. आपल्या देशात तर अलिकडच्या काळात धर्मातून प्रचंड संघर्ष होतांना दिसतो आहे. धर्मांतरण, लव्ह जिहाद, घरवापसी यासारखे शब्द दररोज कानावर पडतात. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय वा इतर महत्वाच्या बाबींवर जितकी घसळण व्हावयास हवी तितकी न होता धार्मिक मुद्यावंर रान माजवून समाजात कलुषित वातावरण निर्माण करण्यापर्यंत भयावह स्थिती निर्माण झालेली आहे.

धर्म या संकल्पनेवर आजवर अनेक विद्वानांनी खल केलेला आहे. विचारवंतांनी आणि तत्ववेत्त्यांनी या समाजासाठी अनिवार्य असलेल्या मुद्यावर अनेक बाजूंनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय विचारवंतांनी देखील अगदी प्राचीन काळापासून ते अलिकडील काळापर्यंत या विषयावर उहापोह करुन आपल्या ज्ञानात भर घातलेली आहे.पाश्चिमात्यांच्या संकल्पनेमध्ये देव मानणे हा ‘धर्म’ या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहे. मात्र भारतात बौद्ध धर्मात देवाला स्थान नाही. त्यावरुन तो रुढ अर्थाने धर्म ठरत नाही. याबाबत बरीच मतमतांतरे आहेत.
आजवर धर्माच्या उगमापासून त्याचा मानवी जीवनात असलेल्या अनिवार्यतेबाबत बरीच मोठी ग्रंथ निर्मिती झालेली आहे. त्यात काही महत्वाचे मराठी, हिंदी वा इतर भारतीय भाषांमध्ये प्रमाणभूत ठरतील असे ग्रंथ आहेत. इंग्रजीत यासंबंधाने उत्तमोत्तम ग्रंथ दरवर्षी प्रकाशित होत असतात. धर्माचा अनेक अंगांनी अभ्यास केला जातो.ज्या पद्धतीने पाश्चात्य देशात यासंबंधाने चिकीत्सा, चर्चा व विचार केला जातो तो बघून अगदी स्तिमीत झाल्यासारखं होतं. धर्माच्या विविध पैलूंवर प्रकाश पाडतांना मोठमोठ्या दिग्गजांना आपण वाचलेले आहे. अगदी Classics पासून ते In search of dreamtime (Tomoko Masuzawa) पर्यंत ग्रंथ उपलब्ध आहेत. अगदी अलिकडील ग्रंथ घेतले तर त्यात John Gray यांचे Seven types of atheism, Sellah चे Religion in human evolution ते Neil MacGregor चे Living with the gods उपलब्ध आहेत.
Seven types of atheism मध्ये Gray यांनी माणसाचा धर्म आणि विज्ञान यामध्ये असलेला अनाकलनीय रस यावर प्रकाया टाकून देवाचा तिरस्कार करणारे लोक ते आधुनिक धर्माचे राजकारण Santayana, Spinoza ते Schopenhaur पर्यंत विचारवंतांची चर्चा केलेली आहे. हा अगदी वेगळ्या अंगांनी केलेला अभ्यास आहे.
Sellah यांनी तर माणसाच्या उत्क्रांतीत धर्माचा प्रभाव वा धर्माचा सहभाग यावर महाग्रंथच लिहून काढलेला आहे. वास्तविकता आणि धर्म, आदीम धर्म पासून ते जगातील प्रमुख प्रभावी संस्कृतित धर्माचा प्रभाव यावर विस्तृत चर्चा केली आहे. प्राचीन भारतातील धर्माच्या विचारास त्यांनी तब्बल 85 पृष्ठे दिलेली आहेत.
MacGregor यांच्या ग्रंथात त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या समजूतीवर अतिशय अभ्यासपुर्ण ग्रंथ साकारलेला आहे. भरपूर चित्रांद्वारे त्यांनी मानवाच्या चालीरीती व धार्मिक रुढी, परंपरा यावर प्रकाश टाकतांना आपल्याला जगाची सफर घडवून आणलेली आहे. या सर्व ग्रंथकारांनी अगदी वेगवेगळ्या angle ने धर्माचा अभ्यास केलेला आढळतो.
यात अगदी अलिकडेच (2022) Rober Dunbar यांनी How religion evolved या ग्रंथाची भर घातलेली आहे. डनबार यांनी त्यांच्च्या ग्रंथाची विभागणी दहा भागांमध्ये केलेली आहे. धर्माचा अभ्यास कसा करावा हे पहिल्या भागात तर भक्ती संप्रदायाशी संबंधित बाबींवर दुसऱ्या भागात चर्चा केलेली आहे. धार्मिक असणं माणसासाठी कसे उपकारक ठरू शकते याची चर्चा तिसऱ्या भागात आहे. यात नैतिकतेचा आर्थिक बाबींशी व त्याचा धर्माशी कसा संबंध आहे हे लेखकाने दाखविले आहे. माणसाच्या सामाजिक मेंदू ते धार्मिक मेंदूपासून ते प्राचीन काळातील धार्मिक बाबींवर अगदी नव्या पद्धतीने लेखक प्रकाश टाकतो.
धर्मात असलेल्या संप्रदाय, पंथ, धर्मातील वेगवेगळे मार्ग तसेच इतिहासात आणि वर्तमानात पडत असलेले मतभेद व फुटीपर्यंत लेखकाने तर्कशुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे.
सर्व धर्म एका प्रभावशाली व्यक्तीच्या भवती निर्माण झाल्याचे लेखक म्हणतो. यापैकी कितीतरी व्यक्ती काही काळासाठीच प्रभावी होत्या आणि त्यांच्या पश्चात फार कमी काळातच त्या विस्मृतीत गेल्यामूळे त्यांनी स्थापन केलेले पंथ, धर्म, संप्रदाय प्रचार-प्रसारीत होवू शकले नाही असे देखील लेखकाचे निरिक्षण आहे. धर्माच्या बाबतीत काही वैशिष्ट्यपुर्ण पद्धतीबाबत आपल्याला लेखक अवगत करतो. जसे, जापानमध्ये प्रत्येक व्यक्ती बौद्ध आणि शिंटो असतो. बहुदा लग्न शिंटो पद्धतीनेच होतात, तामिळनाडूमध्ये थाइपुस्सम सन साजरा करतांना स्वत:चे शरीर टोचवून घेवून स्वत:स यातना देण्याचा प्रकार इत्यादी.
रॉबीन डनबार हे आधूनिक मानववंशशास्त्रज्ञांच्या फळीत अग्रक्रमाचे अभ्यासक मानले जातात. त्यांचे बरेच ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यापैकी The human story व Human evolution (माझ्याकडे असलेले) विशेष प्रसिद्ध आहेत.
त्यांनी आपली विवेचक, वैज्ञानिक दृष्टी धर्माच्या अभ्यासाकडे वळविल्याने या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. अगदी रोगांमूळे, आजारांमूळे माणसाच्या धार्मिक भावनांमध्ये किंवा विचारांमध्ये कसा फरक पडू शकतो ते वैज्ञानिक प्रगतीमूळे धार्मिक अवस्थांतर किंवा स्थित्यंतर यावर प्रकाश टाकण्यासाठी लेखकांने आपले कसब पणाला लावलेले आहे. यासाठी त्यांनी प्रचंड संशोधन केलेले आहे हे पदोपदी जाणवते. त्यांनी ग्रंथात त्यांचे निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी चित्र व नकाशेदेखील दिलेले आहेत. मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून धर्माचा उगम आणि व्याप्तीची केलेली ही चिकीत्सा खरोखरच आपल्या ज्ञानात भर घालते. शेवटी पुढील वाचनासाठी निवडक ग्रंथांची व साहित्याची सूची लेखक आपल्याला पुरवितो. डनबार यांनी केलेला ‘धर्म’ या संज्ञेचा अभ्यास अगदी उद्बोधक आहे.

(लेखक प्रशासकीय अधिकारी आहेत.)

How religion evolved
and why it endures
लेखक :- Robin Dunbar
प्रकाशक :- Pelican Books
मुल्य :- रु.999/-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.