आंबेडकरी विचारांचा प्रेरणादायी पँथर : यशपाल सरवदे- शीतलकुमार शिंदे

आंबेडकरी विचारांचा प्रेरणादायी पँथर : यशपाल सरवदे- शीतलकुमार शिंदे

तेंव्हा नुकतेच रिपब्लिकन ऐक्य झाले होते. एकीकृत रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून कुठल्याही एका नावावर एक मत होतं नव्हते. एकीकृत रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आपल्याच गटाचा व्हावा असे, प्रत्येक गटाला वाटत होते. या महत्वकांक्षेतून पक्षात आणखी फाटाफूट होऊ नये म्हणून सर्वानुमते एक अध्यक्षीय मंडळच बनवण्यात आले होते. अध्यक्षीय मंडळात प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, नामदेव ढसाळ, राजा ढाले, रा. सु. गवई, भाई संगारे, टी. एम. कांबळे, जोगेंद्र कवाडे इत्यादींसह दहा नेत्यांचा समावेश होता. या एकीकृत रिपब्लिकन पक्षाची पहिली जंगी सभा तत्कालीन औरंगाबाद (आत्ताचे छत्रपती संभाजी महाराज नगर) शहरातील आमखास मैदानात भरली होती. सभेत एकएका नेत्यांची आवेशपूर्ण भाषणे होत होती.
नामदेव ढसाळांचेही भाषण सुरू झाले होते. त्याचवेळी अचानक ढसाळांना बाजूला ढकलून, त्यांचा माईक हिसकावून दुसराच कोणीतरी आगंतुक भाषण करू लागला होता. एकीकृत रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय मंडळाबद्दल अक्षरशः अभद्र बोलू लागला होता. यावेळी मंचावर विराजमान अध्यक्षीय मंडळासह संपूर्ण मंच हातप्रभ होऊन हे पहात होता. समोरील लोकांचा जमावही गोंधळा होता. असले अपमानित करणारे वर्तन किंवा चाळे गप्पबसून पहात राहणे हे यशपाल सरवदे यांच्या तत्वात बसणारे नव्हते. यशपालजी सरवदे यांनी लगोलग प्रसंगवाधान राखून, उपद्रव माजवणाऱ्या त्या व्यक्तीला स्टेजवरच धडा शिकवला. वाघाच्या चपळाईने त्यांनी, त्याची गचांडी पकडून त्याला स्टेजवरून अक्षरशः खाली फेकून टाकले. खाली गणवेशात आणि शिस्तीत असलेल्या समता सैनिक दलाच्या लोकांनीही प्रसंगावधन राखून त्या आगंतुकास दंडुक्याचा चांगलाच प्रसाद दिला. यामुळे ऐक्याची सभा पूर्ववत सुरू झाली. अन्यथा सभेत मोठा गोंधळ झाला असता. ती सभा उधळून लावली गेली असती. उपद्रवखोरांचा तोच हेतू असावा. मात्र यशपाल सरवदे यांच्या धाडसामुळे, प्रसंगावधानामुळे सभेत गोंधळ घालून सभा उधळवून लावण्याचे विरोधकांचे मनसुबे बेचिराख झाले होते.  त्यांच्या या धाडसाचे, प्रसंगावधानाचे तत्कालीन सर्व नेते मंडळींनी कौतुक केले होते. सर्व वरिष्ठ नेते मंडळी यशपालजींवर खुश होती. सभेनंतर उस्मानाबादला परतताना कांही अघटित होऊ नये म्हणून आम्ही नेलेल्या वाहनावरील उस्मानाबाद‘ अशी लिहलेली नावे पुसून टाकण्याच्या सूचना अध्यक्षीय मंडळातील कांही नेत्यांनी केल्या होत्या. मात्र यशपालजींनी ती लिहिलेली नावे पुसली नाहीत. असे बेडर आणि बेदरकार होते यशपालजी सरवदे.


सन 2000 साली भारतीय संविधानाचे अर्धशतक देशभर साजरे होत होते. या काळात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी राज्यात संविधान गौरव महामार्च काढला होता. या महामार्चचे उस्मानाबाद शहरात जंगी स्वागत करण्यात आले होते. संविधानाच्या मोठमोठ्या प्रतिकृती तयार करून त्यांची शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रांगणात आणि शहराच्या भीमनगरातील क्रांती चौकात भारतीय संविधानाची उद्देशिक संगमरवरात कोरून उभारण्यात आली होती. आशा प्रकारे संविधानाबद्दल लोकांत जागृती निर्माण व्हावी म्हणून एक रचनात्मक उपक्रम तेंव्हा यशपाल सरवदे यांनी मराठवाड्यात प्रथमच राबविला होता. या उपक्रमाचे नंतर देशभरात ठिकठिकाणी अनुकरण करण्यात आले. संगमरवरी दगडात कोरलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिक नंतर शहराशहरात दिसू लागल्या.
पँथरसह रिपब्लिकन आदी आंबेडकरी चळवळीतील शीर्ष नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. माईसाहेब अर्थात डॉ. सविता आंबेडकर यांच्याशीही त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे आणि दृढ होते. प्रा. अरुण कांबळे यांच्या अध्यक्षीय काळापासून माईसाहेबांचे पंथरामध्ये एक स्थान होते. अरुण कांबळे पँथरचे अध्यक्ष असताना रामदास आठवले हे पँथरचे संघटक होते. तेंव्हा पासून यशपालजी आणि आठवले साहेबांचे घनिष्ठ संबंध होते. अरुण कांबळे यांच्या नंतर रामदास आठवले यांना पँथरचे अध्यक्ष करण्यात यशपाल सरवदे यांच्या नेतृत्वाखालील उस्मानाबाद जिल्हा आणि मराठवाड्याचा महत्वाचा वाटा होता. आठवले यांच्या विरोधात तेंव्हाचे दिग्गज पँथर नेते अध्यक्षपदासाठी इच्छूक होते. मात्र तेंव्हा यशपाल सरवदे रामदास आठवले यांच्याबाजूने ठाम राहिले आणि रामदास आठवले पँथरचे अध्यक्ष झाले. आणि पुढचा इतिहास आपल्याला ज्ञात आहेत. अर्थात रामदास आठवले यांचे नेतृत्व घडविण्यात यशपाल सरवदे, तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा आणि मराठवाड्याचे खूप मोठे सहकार्य आहे. हे येथे मुद्दाम नमूद करायला हवे. आशा प्रकारे यशपालजींच्या कर्तृत्वाला अनेक पैलू होते, हे स्पष्ट होण्यास मदत होते. यावरून आपण किती मूल्यवान नेत्याच्या सानिध्यात होतो हे ही दिसून येते.
संसदीय राजकारणात विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा या सर्वोच्च सभागृहाना अनन्यसाधारण महत्व आहे. बाबासाहेबांच्या नंतर चळवळीतील कांही मोजक्या शीर्ष नेत्यांनाच या सभागृहात जाता आले. आंबेडकरी चळवळीतील बहुतांश नेत्यांना या सभागृहात जाण्यापासून प्रस्थापितांनी येनकेन प्रकारे रोखले. विषारी प्रचारकरून, सर्वस्व पणाला लावून रोखले. अशाच प्रकारे सन 1989 साली काँग्रेस – रिपब्लिकन युतीकडून यशपाल सरवदे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब राखीव मतदार संघातून हत्ती या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र मित्रपक्ष म्हणून सोबत असलेल्या काँग्रेसनेच दगलबाजीचा खंजीर पाठीत खुपसत यशपालजींच्या विरोधात छुपा प्रचार केला. याची कबुली तत्कालीन काँग्रेस नेते दिवंगत पवन राजेनिंबाळकर यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर निघाल्यानंतर दिली होती. त्यावेळी अगदी थोडक्या अंतराने यशपालजींचा पराभव झाला होता. या निवडणुकीत निवडणूक चिन्ह म्हणून त्यांनी हत्ती ऐवजी पंजा हे चिन्ह घेतले असते तर, त्यांचा विजय निश्‍चित झाला असता. असे मत जाणकार लोक नोंदवत असतात. मात्र हत्ती हे निवडणूक चिन्ह घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रिय चिन्ह होते. ते चिन्ह, या निवडणुकीत यशापालजींनी नाकारण्याचा प्रश्‍नच नव्हता. ते बाबासाहेबांच्या चळवळीतील सच्चे आणि निस्सीम कार्यकर्ते होते. मात्र त्यांच्या या पराभवाने आंबेडकरी चळवळीच्या गतीला मोठी खीळ बसली होती. ते निवडून सभागृहात गेले असते तर, आजचे चित्र निश्‍चितच वेगळे दिसले असते. बाबासाहेबांच्या विचारांसाठी, सामाजिक परिवर्तनासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या एका अभ्यासू नेत्याला विधानसभेत जाण्यापासून रोखण्यात प्रस्थापित लोक मात्र यशस्वी झाले होते. आज स्वबळावर बाबासाहेबांच्या ज्वलंत विचारांसाठी अशी निवडणूक लढविणारे किती कार्यकर्ते आहेत. याचे उत्तर निराशाजनक आहे. समाजात परिवर्तन घडवत असताना प्रस्थापितांनी आपल्यातच पेरलेले सुरुंग उध्वस्त करत करत पुढे जावे लागते. अभ्यासू आणि स्वयंभू आशा आंबेडकरी कार्यकर्त्यांसमोर हे मोठे आव्हान असते. सहकारी म्हणून जवळ वावरणारे लोकसुद्धा थोड्याथोडक्या कारणांनी प्रस्थापितांच्या हातचे बाहुले बनण्यास तयार असतात. आशा परिस्थितीत यशपालजींनी मराठवाड्यात आंबेडकरी चळवळीचा एक झंझावात निर्माण केला होता. हे वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या जाण्याने आपण किती अनमोल रत्न गमावून बसलो आहोत, हे त्यांच्या जाण्यानंतर आज आपणास कळत आहे.
बौद्ध शिल्पकृती, बौद्ध प्रतीके यांचा संशोधनात्मक केलेला अभ्यास आणि त्यातून धम्म संस्कारांचे, धम्म संस्कृतीचे रूप ते चर्चेतून उलगडून सांगत असत.
विद्यमान चालीरीती, जीवनपद्धती, भारतीय संस्कार पद्धती यात धम्माचा प्रभाव वेगळ्या रूपाने का असेना मात्र असल्याचे ते अनेक उदाहरणांनी स्पष्ट करत असत. जुन्या गुलामी दर्शविणाऱ्या व्यक्ती नामांचा उल्लेख ते बौद्ध पद्धतीच्या नामाने करत असत. याचे एक उदाहरण आमच्या महादेव नावाच्या व्यक्तीचे देता येईल. ते त्याला मैत्रेय या नावाने संबोधित असत. या माध्यमातून व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गुलामगिरी झुगारणारा असावा. सम्यक मार्गाचे म्हणजे सारासार विविकेचा अंगीकार करणारा असावा, असा त्यांचा आग्रह राही. व्यक्तिच्या सर्वंकष उत्कर्षासाठी ते सतत आग्रही असत.
दलित स्त्रियांचा उत्कर्ष व्हावा, त्यांनी शिकावे, जुन्या रितिभातीला चिकटून राहू नये, असे त्यांना वाटे. यासाठी ते बौद्ध काळातील स्त्रियांचे दाखले देत असत. त्यांच्या कर्तबगारीच्या ऐतिहासिक कथा सांगत असत.
उस्मानाबाद येथे घेतलेल्या धम्म परिषदेवेळी महाराष्ट्रतील प्रसिद्ध बौद्ध लेण्या, प्रसिद्ध बौद्ध ठिकाणांना त्यांनी आवर्जून भेटी दिल्या. अनेक ठिकाणी अन्य धर्मीय लोकांनी बौध्द स्थळांचे विकृत रुपांतरीकरण केले आहे. त्यांच्या अभ्यासू दृष्टीने ते नेमके हेरले जात असे. तेर येथील त्रिविक्रम मंदिर आणि सिद्धेश्‍वर वडगाव (ता. उस्मानाबाद) येथील प्राचीन स्तुपासदृश्‍य एक टेकडी, उस्मानाबाद येथील हातलाई डोंगर, धाराशिव लेणीतील कांही शिल्पकृती या विकृतीकरणाच्या बळी ठरल्या आहेत. याबद्दल केलेल्या संशोधनातून आपले निष्कर्ष, लोकांना ते सांगत असत. उस्मानाबाद येथील धाराशिव लेण्यांचे उपद्रवखोरांकडून होणारे विकृतीकरण आणि अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला धाराशिव लेण्यांच्या ठिकाणी धम्म सहल सुरू केली होती. या काळात त्यांच्या सोबत धाराशिव लेणीत सहलीला जाणाऱ्या लोकांसह ते धम्मा बद्दल अभ्यासपूर्ण, मुद्देसूद चर्चा करत. कांही जणांना त्यांनी अगोदरच वाचनाचे विषय ठरवून दिलेले असत. त्यावर यावेळी अभ्यासपूर्ण चर्चा व्हायची. त्यावर ते आपली अभ्यासपूर्ण मते मांडायचे. लेणीत कोरलेल्या मूर्तींच्या वेगवेगळ्या मुद्रा, प्रवेशद्वारावरील नक्षी काम, बुद्धांच्या मूर्तीवरील व्यक्तीचित्रण याबद्दल ते उपस्थितांना माहिती देत. डोंगर दऱ्यात तत्कालीन शिल्पकारांनी कोरलेल्या बुद्ध लेणीसाठी विशिष्ट आकारातील डोंगर रांगांचीच बहुतेक ठिकाणी तत्कालीन शिल्पकारांनी निवड केल्याचे निरीक्षण त्यांनी तेंव्हाच मांडले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश यासह देशभरातील प्रसिद्ध आणि पडद्याआड लपलेल्या बौद्ध स्थळांना दिलेल्या भेटीवेळी केलेल्या निरीक्षणातून हे ज्ञानरुपी सार त्यांनी मिळवले होते. याची माहिती त्यांच्या खास शैलीतून ते विशद करीत असत. म्हणून यां धम्म सहलीत त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना अशाप्रकारे धम्म या विषयी माहितीपूर्ण मेजवानीच मिळत असे. त्यांच्या या उपक्रमामुळे तेंव्हा धाराशिव लेणीचे होणारे विद्रुपीकरण थांबण्यास चांगली मदत झाली होती. होणाऱ्या अतिक्रमणास पायबंद बसला होता.
तेरच्या त्रिविक्रम मंदिरात असलेला नागवेलींनी वेढलेला बौद्धस्तुप आहे. अशाच प्रकारचे बौद्धस्तुप नागर्जूनकोंडा आणि अन्यत्र असल्याचे त्यांनी तेंव्हा सप्रमाण दाखवून दिले होते. धम्म परिषदेच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या माहिती पत्रक त्यांनी या स्तुपाचे चित्र ठळक पद्धतीने छापले होते. आपल्या राहत्या घराच्या मुख्य द्वारावरसुद्धा त्यांनी हे प्रतीक कोरून घेतले होते. त्यात कसलीही बारीकसारीक चूक राहूनये म्हणून ते स्वतः या कोरीव कामाची देखरेख करत असत. त्यांनी पुनर्जीवित केलेल्या परंपरागत घरावर त्यांनी बौद्ध धम्माची अनेक प्रतीके आणि वचने कोरून घेतलेली आहेत. एवढेच नव्हे तर घरातील प्रत्येक फर्निचर वर त्यांनी धम्माची प्रतीके कोरून घेतलेली आहेत. यावरून ते सामाजिक आणि धार्मिक कामात स्वतःला किती झोकून देत असत याची प्रचिती येते.

– शीतलकुमार शिंदे
(लेखक उस्मानाबाद येथील पत्रकार आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.