शांताबाई कृष्णाजी कांबळे- प्रो. डॉ. नितीश सावंत

शांताबाई कृष्णाजी कांबळे- प्रो. डॉ. नितीश सावंत

मनुवादी संस्कृती ‘स्त्री‘ आणि ‘शूद्र’ या समाजातील घटकांना शिकू देत नव्हती; परंतु या व्यवस्थेला तडा देण्याचे काम सुमारे शंभर वर्षापूर्वी शांताबाई कृष्णाजी कांबळे या पहिल्या दलित लेखिकेने केले. शिक्षिकेपासून शिक्षणाधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास मनाला चटका लावून जातो. जातीयतेचे दाहक चटके, स्त्री म्हणून होणारी अवहेलना सहन करीत शांताबाई कृष्णाजी कांबळे या शंभर वर्षांचे आयुष्य जगून, भोगून 27 जानेवारी 2023 रोजी आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्याविषयी थोडेसे…

हजारो वर्षे प्रस्थापित व्यवस्थेने गुलामगिरीत जीवन जगायला लावणार्‍या दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने नवे आत्मभान आले. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र जपून त्यांनी शिकायला सुरुवात केली; परंतु मनुवादी संस्कृती ‘स्त्री‘ आणि ‘शूद्र’ या समाजातील घटकांना शिकू देत नव्हती; परंतु या व्यवस्थेला तडा देण्याचे काम सुमारे शंभर वर्षापूर्वी शांताबाई कृष्णाजी कांबळे या पहिल्या दलित लेखिकेने केले. जन्माने महार. महारकीची कामे करीत करीत पोटाला पोटभर अन्न नसताना, सुगीच्या वेळी, शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धुऊन स्वच्छ करून खाऊन त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहून खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. शिक्षिकेपासून शिक्षणाधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास मनाला चटका लावून जातो. जातीयतेचे दाहक चटके, स्त्री म्हणून होणारी अवहेलना सहन करीत शांताबाई कृष्णाजी कांबळे या शंभर वर्षाचे आयुष्य जगून, भोगून 27 जानेवारी 2023 रोजी आपल्यातून निघून गेल्या.
भारतीय समाजरचनेत आजही जातीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात जाणवते. मानवनिर्मित विषम समाजरचनेमुळे मानव म्हणून जन्माला येऊनही समाजातील काही घटकांना दाबण्या-दडपण्यासाठी व स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी ही अमानुष व्यवस्था काही वर्गाने उभारली आणि तळागाळातील समाजाचे मानवत्व हिरावून घेतले. जात कशी निर्माण झाली याविषयी विविध विचारवंतांनी विविध सिद्धांत मांडले आहेत. जातीमध्ये उपजाती आणि पोटजाती आहेत. प्रत्येक जातीत श्रेष्ठ-कनिष्ठतेची उतरंड आढळते. त्या उतरंडीमध्ये प्रत्येक जातीचे विशिष्ट स्थान निश्‍चित आहे. स्मृती-श्रुतीच्या आधाराने स्तरीकरण आहे व ते दैवी असल्याकारणाने त्यात परिवर्तन अशक्य आहे. हे सांगण्यासाठी व स्त्रीमहात्म्य नाकारण्यासाठी ब्रह्मा हा विश्‍वाचा निर्माता आहे, ही संकल्पना मांडली गेली. ज्याने-त्याने आपापल्या दर्जानुसार रहावे हा विचार मांडला गेला. मनुस्मृतीच्या कालखंडापासून ब्राह्मणेत्तर समूहाला दडपण्याचे कार्य विविध माध्यमांतून होत आहे.

क्रांतीबा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारक कार्याचा परिपाक म्हणून प्रस्थापित समाजरचनेला हादरे बसले. फुले-आंबेडकरांनी कठोर धर्मचिकित्सा केली आणि समाजपरिवर्तनाचे नवे प्रारुप बहुजन आणि शूद्रातिशूद्रांसमोर ठेवले. ज्या समूहाला आपले शोषण होत आहे याची जाणीव नव्हती, त्या समूहास आपण शोषित आहोत याची जाणीव त्यांनी करून दिली. अशी जाणीव झालेली मराठी साहित्यातील पहिली दलित लेखिका म्हणजे आपल्या जन्माची चित्तरकथा मांडणारी म्हणजेच “माझ्या जन्माची चित्तरकथा” या आत्मवृत्ताची लेखिका सौ. शांताबाई कृष्णाजी कांबळे होय. त्यांचा जन्म 01/03/1923 रोजी मु. पो. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली येथे दलित कुटुंबात झाला. घरची गरिबी, वडील गावातील पाटलांकडे सालानं जनावरे राखण्याचे काम करायचे. आई गावात गवताचे भारे विकायची. भीक मागायची. इतके दारिद्य्र असूनही ते मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतात. मुलींच्या परीक्षेसाठी वडील व्याजाने पैसे काढून ज्वारी आणतात व तिच्या जेवणाची व्यवस्था करतात. मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करता यावा म्हणून जेवणाखाण्यावरील खर्च कमी करताना दिसतात.
शांताबाईंच्या वडिलांना मुलाची अपेक्षा असताना तिसरी मुलगीच जन्माला येते तेव्हा ते तिला (शांताबाईला) जिवंत गाडण्यासाठी नेत असतात; पण आईमुळे ती वाचते. पारंपारिक हिंदू मानसिकता डोक्यामध्ये भिनलेली असल्यामुळे मुलीचा जन्म त्यांना ओझे वाटतो. वय वाढेल तसे शांताबाई आईला घरकामात मदत करतात. वडिलांपेक्षा आईची भूमिका प्रभावी दिसते. “पोरीची शाळा पुरी करा. तिला मास्तर नवरा करून द्या. माजी आन हाय तुम्हाला” असे ती मरताना आपल्या नवर्‍याला सांगते. शांताबाई साध्या शिक्षिकेपासून नोकरीला प्रारंभ करतात. वेळोवेळी जात या घटकामुळे ग्रामीण भागातील सवर्ण व्यक्ती त्यांच्या बदलीचा आग्रह धरीत असतात; परंतु शांताबाई त्या ठिकाणी अधिक मेहनतीने उत्कृष्ट स्वरुपाचे कार्य करून त्यांचा आग्रह अनाठायी असल्याचे सिद्ध करतात. त्यांच्या प्रौढ शिक्षण वर्गाला शिक्षण अधिकार्‍यांच्या वतीने शाबासकी मिळते आणि लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होते. शांताबाई या जशा पहिल्या दलित लेखिका त्याचप्रमाणे त्या सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका आहेत. शिक्षिका असूनदेखील त्यांना जातीयतेचे चटके सहन करावे लागतात. त्यांना पिण्यासाठी पाणी भरू दिले जात नाही. महार समाजातील म्हणून सीता कासारीन बांगड्या भरण्यास नकार देते. शिक्षण विस्तार अधिकारी होऊनदेखील राहायला जागा मिळत नाही; परंतु आई-वडील कांबळे गुरुजी (शांताबाईचे गुरु) महाजन मास्तर, गनी मास्तर, पाटील मास्तर व मास्तरीणबाई, यशवंत बापू, ग. दि. कुलकर्णी, देशमुख यांसारख्या चांगल्या लोकांनी त्यांना प्रेरणा आदी प्रोत्साहन दिले.
शांताबाई शिक्षिका झाल्यावर त्यांचा कृष्णाजी कांबळे यांच्याबरोबर विवाह होतो. ते आटपाडीच्या शाळेवर शिक्षक होते. ते करगणी या गावचे. शिकविण्यात हुशार होते. त्यांचा आवाज गोड होता; परंतु स्त्रियांविषयी त्यांचे वर्तन फारसे चांगले नव्हते. कारण लग्नातच एक स्त्री मास्तरनं माझं वाटोळं केलं, असं म्हणत गोधळ घालतात. दुसरं म्हणजे शांताबाई गरोदर असताना ते मामेबहिणीशी लग्न करतात आणि शांताबाईला म्हणतात, मी तुलाही वागवीण घाबरू नकोस असे उपकार केल्याच्या आविर्भावात ते बोलतात. स्त्रीला अबला, भोगवस्तू मानणार्‍या हिंदुत्ववादी परंपरेचा प्रभाव त्यांच्यावर होता, हेच दिसून येते. मनुवादी व्यवस्थेचे ते पाईक आहेत. स्त्रियांशी आपण कसेही वागलो तरी ते उपकारच असतात, अशी त्यांची वर्तणूक दिसते. ते शांताबाईंशी निष्ठेने वागत नाहीत; परंतु शांताबाईंनी आपली निष्ठा आयुष्याच्या अखेरपर्यंत सोडली नाही. आज त्या आपल्याला सोडून गेल्या. राहिल्या त्यांच्या फक्त आठवणी…

– प्रो. डॉ. नितीश सावंत
(लेखक साहित्याचे अभ्यासक असून जयसिंगपूर कॉलेजमध्ये मराठी विभागप्रमुख आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.