वैश्विक शोषणाशी नाळ जोडलेली राजकीय भानाची कविता – अंशुमन पाटील

वैश्विक शोषणाशी नाळ जोडलेली राजकीय भानाची कविता – अंशुमन पाटील

Photo Courtsey : Aksharnama Portal

Courtsey : Majesticsreaders.com

1)    महान दिग्दर्शक कोस्ता गाव्हास यांच्या ‘झी’ या 1969 साली प्रदर्शित झालेल्या राजकीय रहस्यपटात डिस्क्लेमरमध्ये (opening credit/अस्वीकार/तळटीप) पडद्यावर एक वाक्य उमटतं –

“सदर चित्रपटातील पात्र आणि घटनांचे जीवित वा मृत व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास त्यास योगायोग समजू नये. तसे (साधर्म्य) मुद्दाम केलेले आहे”.

2)   जॉर्ज ऑरवेल, त्यांच्या 1945 सालच्या ‘ऍनिमल फार्म’च्या ब्लर्बमधून सांगतात – “सगळे प्राणी समान असतात पण काही इतरांच्या तुलनेत अधिक समान असतात”.

3)   सन 2023 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अनुराधा पाटील त्यांच्या “आता वह्या सगळ्या बुडीत खाती” या कविता संग्रहाच्या पहिल्या पानावर लिहितात –

‘‘आम्ही भटकतोय आजही

मोहेंजो-दडोच्या सुनसान गल्लीबोळात

रहिवासी असल्याचा पुरावा शोधत

नकाशाचे कानेकोपरे

पुन्हा एकदा पुसून जाताना’’.

सन 1945, 1969, आणि 2023. भिन्न काळ. भिन्न भूगोल. भिन्न समाज. साहित्याचे भिन्न प्रकार. साधर्म्य एकच. राजकीय व्यवस्थेनं सामान्य माणसाची केलेली दैना दाखवणं. तिन्ही साहित्य रूपे प्रात्यक्षिक, (एमपेरिकल), रूपकात्मक, प्रखर राजकीय. ही तिन्ही साहित्यरूपे विभिन्न कालखंडात, भिन्न परिस्थितीत लिहिली गेली. तरी जगाच्या कोणत्याही कालखंडात, कोणत्याही परिस्थितीत ती लागू होतात. कारण शोषणाच्या व्यवस्था पूर्वापार आहे तशाच आहेत. निराळी रूपे त्या घेत राहतात. पण शोषण आणि वर्चस्व कायम राहतं. या आदिम शोषणव्यवस्थेचं आधुनिक रूप आपल्याला अनुराधा पाटील यांच्या ‘‘आता वह्या सगळ्या बुडीत खाती’’ या अलीकडेच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहात सविस्तर पहायला मिळतं. एकप्रकारे रूपकांचं आवरण घेतलेला हा कवितासंग्रह वर्तमानाचा सर्व्हे आहे. नोंद आहे. आणि भविष्यातील ‘राजकीय इतिहास’ आहे. त्यामुळे या संग्रहावर लिहिणं मला उचित आणि महत्त्वाचं वाटतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादी रशियात स्टॅलिनची असलेली एकाधिकाशाही ‘ऍनिमल फार्म’चा विषय बनली तर 60 च्या दशकातील ग्रीकमध्ये सुरू झालेली मिलिटरी एकाधिकारशाही कोस्ता गव्हासच्या सिनेमाचा. ‘‘आता वह्या सगळ्या बुडीत खाती’’ या काव्यसंग्रतूनही सद्यस्थितीतील कमी अधिक फरकाने याच प्रकारच्या एकाधिकारशाहीवर नेमकं बोट ठेवलं गेलं आहे. त्यामुळे या कवितासंग्रहाकडे राजकीय कवितासंग्रह म्हणून पाहणं महत्वाचं ठरतं. या संग्रहातील एकूण 52 कवितांपैकी 25 कविता या राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या आहेत. काही कविता सामाजिक प्रश्नांच्या तर 6 कविता कोरोना संदर्भातील आहेत आणि अनुराधाबाई ज्या आत्मनिष्ठ कवितांसाठी ओळखल्या जातात त्या कवितांची संख्या फार थोडी आहे. पाच दशकं आत्मनिष्ठ कविता लिहिणारी बाई आपली साठी ओलांडल्यानंतर राजकीय व्यवस्थेचं विषण्ण करणारं चित्र का रेखाटत असेल? समाजाशी एकरूप होऊन आत्मनिष्ठ कविता लिहिणारी बाई समाजाला आपल्यातून बाहेर काढून, त्याच्या डोळ्याला डोळा देत, राजकीय व्यवस्थेच्या समाजावर वाढणाऱ्या प्रभावाचे काटेकोर परीक्षण का करत असावी? हे सारं समजून घेण्याआधी राजकीय कवितेचा इतिहास चाचपडून पाहणं आवश्यक आहे.

राजकीय कविता ही विश्वातील, समाजातील, महत्त्वाच्या मुद्दयांवर जागृती करण्याचे आणि वाद-संवाद घडवून आणण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे. याद्वारे कवी व्यवस्थेच्या शोषणावर, राजकारण्यांच्या चलनावर बोट ठेवत असतो. त्यामुळेच राजकीय कविता ही ‘पोएटरी ऑफ डिसेंट- विरोधाची कविता’ म्हणून ओळखली जाते. होमर आणि आपल्याकडे व्यासापासून सुरू झालेली ही कविता ‘रेनेसन्स’च्या काळात खऱ्या अर्थाने डिसेंटची कविता बनली. या कवितेतून राजकीय व्यवस्था सामाजिक व्यवस्थेला कशी प्रभावित करते वा नासवते याकडे कवींनी लक्ष वेधलं आहे. ही कविता घटिताला प्रतिसाद देणारी असते म्हणून तिला प्रतिक्रियावादी कविता म्हणता येईल. त्यातही प्रात्यक्षिक, रूपकात्मक, मिथकी, व्यंगात्मक, अमूर्त अशी रूपे ही कविता धारण करू शकते. अनुराधाबाईंच्या या संग्रहातील जवळपास 25  कविता या कवितेच्या अशा विभिन्न अंगांचे बोट धरून ठेवतात. त्यामुळे त्यांची स्वतःची ओळख असलेला ‘फॉर्म’ यातही अगदी रुतून बसतो. अगदी प्रत्येक पानातल्या ओळीओळींमधून.

अलीकडे एखादी राजकीय भूमिका घेऊन लिहिलेली कविता ही राजकीय कविता संबोधण्याचा प्रकार फार संकुचित आहे. कारण रेनेन्सन्स च्या काळात जॉन मिल्टन, एडमंड स्पेन्सर, अलेक्सण्डर पोप, जोनाथन स्विफ्ट यांनी जुलमी सत्तेच्या विरोधात कविता लिहिल्या. त्यांना डाव्या, उजव्या, पुरोगामी, समाजवादी, कम्युनिस्ट, मार्क्सवादी अशा आधुनिक राजकीय प्रकारांत गणता येत नाही. लोकांचं राज्य, विचारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक सहिष्णुता, लोक शिक्षण, जुलमी कायद्यांना विरोध या मूलभूत मूल्यांचा पुरस्कार करणारी कविता या काळात वर उल्लेखिलेल्या कवींनी लिहिली. जिला आज राजकीय कविता म्हणून संबोधलं जातं. आपल्याकडे याच मूल्याचा स्वीकार,पुरस्कार आणि प्रचार करणारी कविता कबीराने लिहिली. व्यास, होमर, व्हर्जिल इत्यादी प्राचीन कवींनी कधी तटस्थ तर कधी सत्तेचा गौरव करणाऱ्या कविता लिहिल्या. पण मध्ययुगापासून राजकीय कवितांचं स्वरूप हे प्रामुख्याने सत्तेच्या विरोधात आणि ‘माणसाच्या’ बाजूने राहिलं आहे. त्यामुळेच या दोन निकषांवर लिहिलेल्या कविता ह्या स्थळकाळाची मर्यादा ओलांडून वैश्विक ठरतात. कित्येक कवींना अशी ‘माणसा’ची राजकीय कविता लिहिताना अतोनात छळ सहन करावा लागला. अनुराधाबाईंना अशा छळाची पार्श्वभूमी नसली तरी ‘माणसाला नागवणारी व्यवस्था, त्यामुळे पुसट होत चाललेलं सामान्य माणसाचं अस्तित्व आणि शोषणाचे धागे’ त्यांच्या या कवितांच्या केंद्रस्थानी असल्यानं अनुराधाबाईंची कविताही मिल्टन, पाब्लो, फैज, कबीर आणि ढसाळ यांच्या कवितांसारखीच वैश्विक ठरते.

‘आता वह्या…’ हा संग्रह तसा सर्वांनाच धक्का देणारा आहे. अगदी त्यांच्या टीकाकारांना सुद्धा. अनुराधा पाटील तशा आत्मनिष्ठ भाव-कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. याकडे अनेकदा त्यांच्या कवितेची मर्यादा म्हणून देखील पाहिलं जातं. पण त्यांची कविता ही आत्ममग्नतेकडे झुकणारी कधीच नव्हती. ‘…तरीही’ या कवितासंग्रहातून जेव्हा त्या लिहितात –

‘जेव्हा जाणवतं कुणाच्याही

दुःखाचा आतला चेहरा एकच असतो

आणि मातीची तहान त्यांनाही लागते’

तर ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ यात एके ठिकाणी त्या लिहितात –

‘पण चेहरा असो कवितेला

विनाशानंतर उगवणाऱ्या पहिल्या किरणांचा….’

तेव्हा त्या समस्त मानव जातीची जाणीव- नेणीव कवेत घेऊ पाहतात. स्वतःच्या कक्षेत राहून सभोवताल फिरणाऱ्या मानवी शृंखलेची नाळ पकडू पाहतात. त्यांच्यातली ही मानवीय संवेदनशीलता अधिक खोल उतरते ती ‘कदाचित अजूनही या कवितासंग्रहात’. बदलत्या राजकीय वातावरणाने सामान्य माणूस नागवला जात असल्याची स्पष्ट जाणीव घेऊन हा कवितासंग्रह येतो. विषमता, दुःख, सामान्य माणसाचं मातीमोल जगणं, हालअपेष्टा, स्त्रीजीवन, ग्रामीण जीवन, शिक्षण, इत्यादी सामाजिक विषयांवर जेव्हा अनुराधा बाई या संग्रहातून लिहितात तेव्हा खरं तर ती राजकीय कवितांची एकप्रकारे नांदीच असते. सद्यस्थितीतील राजकारण आणि पर्यायाने समाजकारण ‘माणूसपण’ कायमचं घालवून बसण्याची बौद्धिक वर्गाला पडलेली धास्ती 2017 साली आलेल्या या कवितासंग्रहात अनेक पानांवर दडून बसलेली दिसते. या एका कवितेतून

ते अधिक स्पष्ट होतं-

‘जिथं ऐकू येत नाही

कुणालाच कुणाचा टाहो

जिथं रचल्या जातात भ्रमाच्या गाथा

आणि लादलं जातं

आपल्या पाठीवर पुन्हा पुन्हा

सक्तीचं रेखीव कुबड

दंतकथेच्या रूपानं’

किंवा

‘आणि त्यांच्या नोंदवहीत तर

पुसट होत चाललंय

इतरांसारखं माझंही,

टिकली एव्हढं बिन चेहऱ्याचं नाव’

गेली 40 वर्षे आत्मनिष्ठ कवितांतून चेहरा नसलेल्या माणसांच्या कथा सांगणारी ही कवयित्री अत्यंत संवेदनशील आहे आणि सभोवतालचा इतिहास, राजकारण आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेचा तिला नीट अभ्यास आहे; जाणीव आहे. पण मागील 40 वर्षांत कधीच वाटली नव्हती इतकी ‘माणूसपण’ संपण्याची भीती तिला वाटते आहे आणि त्यामुळेच जेव्हा ती ‘कदाचित’…मध्ये लिहिते-

‘कदाचित अजूनही जगण्याला अर्थ असेल

पण नावानिशी जगण्याचं स्वातंत्र्य

संपूर्ण गहाळ होताना

करता येत नाही मला वाळूत तोंड खुपसून

सुटकेचा देखावा..’

तेव्हा ती सरळपणे माणसाला गहाळ करणाऱ्या सत्तेविरूद्ध भूमिका घेते, जी भूमिका ‘आता वह्या….’ मधून स्पष्टपणे अवतरते. त्यामुळे ‘कदाचित अजूनही’ हा कवितासंग्रह म्हणजे अनुराधाबाईंच्या ‘आता वह्या….’ ची नांदी वाटते.

(2)

– ‘‘आम्ही भटकतोय आजही

मोहेंजो-दडोच्या सुनसान गल्लीबोळात

रहिवासी असल्याचा पुरावा शोधत…’’

असं जेव्हा सुरुवातीलाच कवयित्री म्हणते तेव्हा ती एका काळ्याकुट्ट गुहेच्या तोंडाशी उभी असते. इथून पुढे वाचकाला या अंधाऱ्या गुहेतून ती घेऊन जाते. ही गुहा राष्ट्रवाद, धर्मवाद, जातीवाद, देशद्रोही, अरबन नक्सल अशा ‘भारत’ या संकल्पनेला खीळ पाडणाऱ्या ‘ॲक्शन प्लॅन’ आणि ‘टूल किट’ने काळीकुट्ट बनली आहे. कवयित्री अगदी निष्ठूरपणे वाचकाला यातून नेताना प्रकाशाचा एक किरणसुद्धा दाखवत नाही. कारण आपला ‘अच्छे दिन’ चा भ्रम दूर सारून उघडं नागडं भयांकीत करणारं वास्तव आणि ‘‘छप्पन इंच छातीच्या योध्यांनी ओढून आणलेला नव्या स्वातंत्र्याचा सूर्य’’ वाचकाला दाखवण्याचं कवयित्रीने मनाशी ठाम ठरवलेलं दिसतं. त्यामुळेच वास्तव समाजाचे इत्थंभूत प्रकटन करताना कवयित्री जराही कचरत नाही. उलट मोहेंजो-दडो नंतर सुरू झालेला शोषणाचा आदिम इतिहास सांगताना कवयित्री सांगते –  

‘‘ते जाळतात तुमचं पिढीजात खांडव वन

आणि सांगत फिरतात गावगन्ना

घेऊन येऊ तुमच्यासाठी

नदी, हवा, डोंगर, पाणी

देऊ, न संपणारे चांगले दिवस’’.

अनुराधा पाटील या समाजजीवनात रुळलेल्या सांस्कृतिक प्रतिमांचा वापर त्यांच्या कवितांतून करत असतात. पण या संग्रहातील राजकीय कवितेत त्यांनी वापरलेल्या प्रतिमा या स्वतःहून त्यांच्याकडे चालत आल्यात असं वाटतं आणि त्यांचा वास्तवाशी संबंध लावताना त्यांनी तो ‘मात्र एक योगायोग आणि अपघात’ न ठेवता कोस्ता गव्हास प्रमाणे ‘मुद्दाम’ केलेला दिसतो. उदा.

‘‘ते देतात गाईंना चारा, खाऊ घालतात

निरागसता पांघरून नाचऱ्या मोरांना दाणे

आणि रया गेलेल्या माणसांच्या पाठीवर

कोरडेपणाने संवेदनशील थोपटण्याची

कृती करतात धीरगंभीर

अन गायब होतो

अचानक पाठीचा कणा,

माणसाच्या अवघ्या देहातून’’….

एक ताकदीची अॅलीगरी यातून आपल्याला पाहायला मिळते. यातल्या प्रत्येक ओळीचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध लावण्यासाठी वाचकांना सुज्ञ होण्याचीही गरज नाही, केवळ मेंदू शाबूत असला तरी ही कविता म्हणजे ‘निव्वळ योगायोग’ नाही हे लक्षात येतं. याच कवितेच्या सुरुवातीला कवयित्री लिहिते –

‘‘ते पाहतात आपल्याकडे

नजर रोखून

तहान आणि भुकेसारखी

भीतीची लागणही

सार्वत्रिक असते

याचं पुरेपूर भान बाळगत.’’

या लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राजकीय भानाच्या/डिसेंटच्या कविता या वैश्विक असतात. या कवितेतून सुद्धा गोबेल्सच्या नाझी सत्ता टिकवण्यासाठीच्या अजेंड्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ‘सत्य लपवा, एक खरा खोटा शत्रू निर्माण करा, लोकांना भीती दाखवा, आपल्या वाचून गत्यंतर नाही असा प्रचार करा आणि अमर्याद सत्ता उपभोगा; ‘ हा तो हिटलर – गोबेल्स अजेंडा. सद्यस्थितीतील भारतात वाढत चाललेली फॅसिझमची ही चतुसूत्री कवयित्रीने ‘या टोकापासून’, ‘ते पाहतात’, ‘नव्या स्वातंत्र्याची गोष्ट’, ‘खेळ’, ‘हाक’, ‘ढोल ताशांच्या गजरात’, ‘नव्या लोकशाहीत’, ‘लपंडाव’ आदी कवितांतून खुबीने मांडली आहे. लपंडाव आणि त्यापुढील कविता तर अंकल सॅमच्या ‘I want you’ पोस्टरची सुद्धा आठवण करून देतात; जिथे हे पोस्टर लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीचं (आणि तत्सम प्रचाराचं) प्रतीक ठरलं. त्यामुळेच आज देशात राष्ट्रप्रेमाची प्रतिकं बदलत चालली आहेत हे सांगताना कवयित्री लिहिते –

‘‘माझ्या दाराबाहेर रस्त्यावर

उभा केलेला आहे

एक विशाल बुलडोझर

एखाद्या अशोक स्तंभासारखा…’’

बदललेल्या काळात राष्ट्रप्रेमाची आणि राष्ट्रप्रतिकांची व्याख्या कवयित्रीसकट साऱ्याच सामान्य माणसांसाठी किती भयग्रस्त करणारी आहे हे कवयित्री या कवितेत सांगू पाहते.

‘‘आदिम गुहेत शिरतांना

उतरवले त्यांनी

आपले कपडे, बूट आणि पट्टे

आत काहीच नव्हतं

बुजगावण्याखेरीज…

मग भय नेमकं कशाचं होतं

भोवतालात दाटलेलं ??’’ (या टोकापासून)

“And in the panic

The air

In the shape of silence

Flared up

and behind

from an abyss of fear

it rose back into our mouths

sealed up

by walls.

Pain

branded itself on the skin,

a pact

Of tears…..”

‘निळ्या डोळ्यांचा मनुष्य’ ही जुजेपे उंगरेती या इटालियन कवीची गाजलेली कविता. काळ फॅसिस्ट. इटलीचा. राजसत्ता एकसारख्या असल्या की त्यांची माणसाला गुलाम बनवण्याची प्रक्रिया जशी सार्वत्रिक असते तशीच सामान्य आणि संवेदनशील माणसाला होणारी भीतीची लागणही सार्वत्रिक असते. 40 च्या दशकातील ही कविता आज तब्बल 80 वर्षांनंतर जगाच्या दुसऱ्या टोकावरून तीच भितीची जाणीव घेऊन जन्माला येते. ‘We Are at war’ ही जाणीव आता फक्त सीमेपर्यंत सीमित नसून आपल्या घरादारापर्यंत पसरली आहे, फोफावते आहे आणि याची जाणीव संवेदनशील मनाच्या कवींना अधिक असते. फॅसिस्ट इटलीच्या काळातील उंगरेतीची कविता भीती, पीडा, दुःखाने जर्जर झालेल्या मनुष्याच्या भावना दर्शवत होती. त्याची कविता एका काळाची साक्ष देणारी होती. अनुराधाबाईंच्या कवितासंग्रहातील या राजकीय कविता नेमक्या कोणत्या काळाची साक्ष देतात ? आणि –

“पाय टेकता येईल

तेच आपलं घर समजणारी

खरीखुरी माणसं तेवढी

चालताहेत देशाच्या

या टोकापासून त्या टोकापर्यंत

सैरभर होऊन

पंख घेऊन उडून गेलेल्या

माणसाच्या शोधात

श्वास दर श्वास पाय ओढत”

असं जेव्हा कवयित्री म्हणते तेव्हा नक्की ती कोणत्या माणसांबद्दल बोलू पाहते? ‘गाजर गवताचा हंगाम’ या कवितेची सुरुवात अशी आहे –

‘‘मी थांबते वाटेवर चालता चालता

पायाखालची जमीन सुटून बेदखल होण्याच्या भयानं

मी उचलते नकळत रस्त्यावरचा एखादा दगड

आणि सोडते भयभीत

त्याच्यावर बोट घट्ट आवळण्यापूर्वी

मी पाहते माझी तीक्ष्ण नखं

गळ्याकडे हळूहळू सरकणारी आणि हादरते

तो नक्की कुणाचा गळा होता म्हणून…’’

1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर उफाळलेल्या हिंदू मुस्लिम दंग्यांनी आणि हिंसेने अनेक प्रेम करणारी मनं दुरावली गेली होती. त्यांपैकीच दोन मित्र होते अभिनेता श्याम चड्डा आणि सादत हसन मंटो. आपल्या परिवारावर झुंडीने केलेल्या अत्याचारांनी व्यथित होऊन श्याम मंटोला म्हणतो ‘हिंसा साहजिकच आहे. अशा वेळी मीही तुला मारू शकतो. शेवटी तू मुस्लिम आहेस.’ आपल्या जीवश्चकंठश्च मित्राच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर निधर्मी मंटो त्वरित भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतो. तो श्यामला सांगतो – ‘‘मुझे इस बात का अफसोस नहीं के तुमने मेरे अंदर के इंसान को एक धर्म में सीमित कर दिया, मैं डरता हूं की, इस धर्म द्वेष के वातावरण में मैं कही तुमसा न बन जाऊ |’’ (तुमसे नफरत न करने लग जाऊ, हिंसक न बन जाऊ |) जिथं द्वेषाच्या विखारी वातावरणात मंटोसारख्या संवेदनशील,बौद्धिक, अहिंसक आणि निधर्मी माणसाला सुद्धा स्वतः हिंसक बनण्याची भीती वाटत होती, तिथं कुणाच्याच खिजगणतीत नसलेल्या माणसांपर्यंत बुलडोझर पोहचतो, मतदार यादीतली नावं गायब होतात, त्यांच्या वागण्या-बोलण्या-खाण्यावर आणि पेहरावावर सतत बोललं जातं, भर रस्त्यात मारहाण केली जाते, तेव्हा त्यांच्या मनात असुरक्षिता पसरून हिंसा निर्माण होणे कसे गाजर गवताइतके सार्वत्रिक आहे हे कवयित्री सांगू पाहते. आणि या हिंसेच्या उन्मादात एकमेकांवर प्रेम करणारी माणसं हरवत चाललीयेत (घरात प्रेत झाकून/पेरणी करणारं/माझं गणगोत हरवलंय) आणि तिरस्कार विषाणूसारखा घराघरात पोहचतोय (आणि गाजर गवताचा हंगाम फोफावतोय शिवार दर शिवार) असं कवयित्री सांगू पाहतेय. द्वेषाच्या वातावरणात हिंसक बनणं ही एक मानसिक, भावनिक प्रतिक्रिया असते, ज्यावर अनेकदा कुणाचा ताबा राहत नसतो. नंतर तो वणव्यासारखा पसरत जातो आणि जिवंत असण्याची किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते. ‘मूकनाट्य’ कवितेतून देखील माणसाच्या याच खच्चीकरणावर अनुराधाबाईंनी बोट ठेवलं आहे. (पाण्याचा रंग होतोय लाल आणि पाण्याहून पातळ माणसाचं रक्त) अनुराधाबाई अनेकदा सांगतात की, त्यांची कविता ही चेहरा नसलेल्या, ‍कुणाच्याच खिजगणतीत नसलेल्या माणसांचे दुःख मांडते. त्यामुळे अनुराधाबाईंची कविता ही नेहमीच अभावग्रस्त माणसाची कथा सांगत आली आहे. यावेळी हे ‘नसलेपण’ अधिक जास्त जाणवते ते राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपामुळे ! आणि ‘नसले’पण घेऊन जगणारा माणूस दररोज नागवला जातोय ही जाणीव त्यांच्या सर्वच कवितांतून दिसून येते. काही प्रातिनिधिक ओळी अशा –

‘पाय टेकता येईल तेच आपलं घर समजणारी

खरीखुरी माणसं

तेवढी चालत आहेत

देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत

सैरभर होऊन

पंख घेऊन उडून गेलेल्या

माणसाच्या शोधात श्वास दर श्वास पाय ओढत’ (या टोकापासून)

दूर क्षितिजाच्या अफाट पडद्यावर

हलत आहेत

आवाज हरवलेल्या माणसांच्या

नुसत्याच सावल्या (मूकनाट्य)

आणि दूर राहिलेलं ढासळतं घर

मनाआड करताना

माहितेय त्यांना की आपण आहोत निराधार आपल्या भूमीवर

आणि इथंही नकोसे

घासातल्या खड्यासारखे

भुकेला कोंडा देणाऱ्या

सरकारी घोषणांच्या

नामधारी आश्रयाखाली (वर्तमान)

यावरून एक निश्चित सांगता येतं की, त्यांची कविता ‘माणसाच्या’ बाजूने ठाम उभी राहते आणि म्हणूनच ती राजकीय ठरते.

(3)

स्वातंत्र्याचे धार्मिकीकरण (मूकनाट्य), माणुसकीचे विशिष्टीकरण, राजसत्तेची सामान्य माणसाला संपवण्याची कुवत आणि त्यामुळे पसरणारी भीती, सामान्य माणसाची हतबलता, देशप्रेमाच्या आडोशातून / आडून लोकशाही संपवण्याची प्रक्रिया, अराजकता (ढोल ताशाच्या गजरात), वर्णवर्चस्व, सामाजिक-मानसिक अनैतिकता (खेळ), शोषणाच्या आदिम व्यवस्था (हाक), हिंसा (लपंडाव), देशद्रोह (संसदेच्या आरशात), झुंडीचा न्याय, सटायर (ढोल ताशांच्या गजरात) हे कांही प्रमुख विषय (थीम) प्रस्तुत संग्रहातील राजकीय भानाच्या कवितांतून पाहायला मिळतात. या विषयाला प्रस्तुत करण्यामागचा कवयित्रीचा विचार ‘रोमँटिक’ नाही तर ‘रिऍलिस्टक’ आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक अर्थात एमपेरिकल प्रकारात तिला गणता येऊ शकतं, जिथं कवयित्री वर्तमानात होत असलेल्या प्रत्येक राजकीय घटनाचे आणि त्यांच्या समाजमनावर होणाऱ्या परिणामाचे  सूक्ष्म निरीक्षण कवितेतून नोंदवते. अशा कविता पुढं राजकीय-सामाजिक इतिहास म्हणून सुद्धा महत्त्वाच्या ठरतात कारण एका ‘काळाची’ नोंद त्यात होत असते.

अनुराधाबाईंच्या कवितेची ताकद त्या वापरत असलेल्या प्रतिमांत आणि शैलीत आहे. त्यामुळे ‘आता वह्या…..’ मधील कविता विधानात्मक न बनता अनुराधाबाईंच्या 4 दशकांच्या कवितेचा हात धरून ठेवतात. या राजकीय कवितांतून वापरल्या गेलेल्या प्रतिमा बाईंच्या प्रतिभेची साक्ष तर देतातच पण राजकीय व्यवस्थेचे भान त्यांना किती सूक्ष्म आणि प्रगाढ आहे, हेही दर्शवतात. ‘जिव्हारी लागणारी तळटीप, भूक तेवढी लॉकडाऊन होत नाहीय जन्मापासून, रुतलेलं चाक, वल्कलं नेसून झाडांवर राहणारी माणसं, विशाल बुलडोझर एखाद्या अशोक स्तंभासारखा, वाळलेल्या रक्ताचा कुबट वास, वाघ मारला जातो वाघ असतो म्हणून, गंजत पडलेली शस्त्रं शतकानुशतकं, व्यवस्था नावाची पुतना मावशी, पिढीजात खांडव वन, पराभूत माणुसकीच्या पताका, नव्या स्वातंत्र्याचा सूर्य, तुटलेल्या पुलाच्या संवादहीन कठड्याला टेकून, भुकेला कोंडा देणाऱ्या घोषणा, पाण्याचा रंग होतोय लाल, या अरण्य काळात’ इत्यादी प्रतिमांनी सम्पृक्त रचना या राजकीय कवितांना एक सशक्त रूपक बनवतात (A strong allegory). त्यामुळे गद्य कवितेचा धोका त्या खुबीनं टाळू शकतात. उत्कटता ही अनुराधाबाईंच्या कवितेची ओळख या संग्रहातही कायम राहते. या कवितेचा चेहरा ‘माणूस’ असला तरी ती त्याला पार करून मुख्यत्वे व्यवस्थेची शहानिशा करणारी कविता ठरते. आपली शैली कायम ठेवून ती व्यक्तीकडून व्यवस्थेकडे शिरते. माणसाचा विचार करताना माणसावर प्रभाव टाकणारी राजकीय व्यवस्था त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आल्याने ती एकदम वेगळी वाटते आणि आपल्याच वळणात रुतून बसलेली बाईंची कविता नदीचे पुनरुज्जीवन व्हावे तशी धबधब्यासारखी नावीन्य घेऊन प्रवाही होताना दिसते.

(4)

भवतालाचा विषण्ण करणारा पट हुबेहूब तितक्याच तीव्रतेनं रेखाटल्यावर कवयित्री वाचकांना थोडा तरी आशावाद देते का? मुळात ‘कदाचित अजूनही’ कवयित्रीत आशावाद शिल्लक आहे का? परिस्थिती हाताबाहेर जात असताना कुठलीही आशा शिल्लक आहे असं कवयित्रीला वाटतं का ? ‘एक हट्टी म्हातारा’ ही कविता या प्रश्नाचं उत्तर देते.

‘‘पण पुस्तकातलं तुझं चित्र

पूर्ण करायचं मनातलं धुसर स्वप्न

आणि मी ऐकायचे

अंथरुणावर पडल्या पडल्या

त्यांनी न सांगितलेल्या दूरदेशीच्या गोष्टी

तुझा चेहरा आठवत….’’

अलीकडे अनेक साहित्यिकांच्या साहित्यातून गांधी डोकं वर काढू लागलाय. चित्रकाराच्या कुंचल्यातून पांढऱ्या कागदावर रंग ओतू लागलाय. गांधीला जेवढे मारण्याचे प्रयत्न होतायेत तेवढा तो ठळकपणे अढळ होताना दिसतोय. सद्यपरिस्थितीने हळुवार मागे पडत गेलेला गांधी सर्वांच्या पुढ्यात आणून ठेवलाय. आणि हे गांधी‘दर्शना’चं काम प्रामुख्याने कवी बजावत आहेत. गांधी हे शांती, अहिंसा आणि सहिष्णुतेचे  प्रतीक तर आहेच पण तो ‘समतोल’ आणि ‘मध्यम मार्गाचे’ देखील नेतृत्व करतो. एकतर ‘हे’ किंवा ‘ते’ अशा टोकाच्या भूमिका घेणाऱ्या जवळपास सगळ्याच विचारधारांवर ‘गांधी’ हे उत्तर असावं म्हणून तर कदाचित कवयित्री गांधीला शोधत नसेल ना?

सत्य, अहिंसा आणि माणसाच्या बाजूनं उभी राहण्याची कवयित्रीची भूमिका तिच्याकडे तिच्या आधीच्या पिढ्यांकडून चालत आली आहे. गांधींना मानणारी, त्यांच्या पुण्यतिथीला उपवास करणारी आणि मिठाला जागणारी ही पिढी होती आणि तिचाच वसा कवयित्रीने घेतलाय. गांधी तिच्या जगण्याचा, जेवण्याचा, उपवासाचा, जीवनशैलीचा आणि श्रद्धेचा भाग राहिला आहे. त्यामुळेच कवयित्रीचा गांधी अत्यंत ‘अनौपचारिक’ स्वरूपाचा आहे. जिव्हाळ्याचा आहे. म्हणूनच ती लिहिते –

‘‘आठवायचे नाहीत नंतर

कुणाचेही चेहरे

तुझं बोळकं हसू मात्र

रेंगाळत राहायचं मनात

कुठेतरी निरागस’’

हा देश गांधींचा आहे. गांधीला आज ‘पुन्हा पुन्हा मारण्याचे’, त्याच्यावर ‘देश द्रोहाचा खटला’ चालवू म्हणण्याचे अनेक प्रकार झाले तरी ह्या मातीच्या कणाकणांतून गांधी नावाचा ‘एक हट्टी म्हातारा’ वाहतोय आणि या विषण्ण करणाऱ्या जगात कवयित्रीला तोच आधार आणि आशा वाटतोय. म्हणून कवयित्री लिहिते –

‘‘….पण मला माहीत आहे

तू कातायचास

त्या सुतासारखा चिवट तू

जन्माचा हट्टी म्हातारा

तू उरशीलच इथल्या मातीत

पुन्हा पुन्हा उगवून येत

आणि चालत राहशील

काठी टेकत

देशाच्या नकाशावर

आमच्या अस्तित्वाला बिलगलेले

माणूसपणाचे काही कण

उजळून टाकत,

या सर्वभक्ष्यी काळोखात’’

‘गांधी संस्काराच्या’ ह्या वश्याने कवयित्रीचं बोट ‘अदृश्य पणे धरून’ ठेवलं आहे. बालपणी हे बोट तिला ‘दुर्मीळ ढब्बू पैसे शोधण्यात’ मदत करायचं नि आता भूमिका घेण्यात. कवयित्रीची ही पार्श्वभूमी समजली  तर या संग्रहातील राजकीय भानाच्या कविता लिहिण्यामागचं कारण कळतं. आणि ते असं की –

‘‘पण दाटून येते मनात खोलवर भीती

की मी उभी असेल खाली मान घालून

अपराधी

माझ्या बाईपणापुढे

तेव्हा विचार-आशयाची एखादी

दुधारी फांदी लवलवताना

कोवळ्या तरल शब्दांची मिजास भिरकावून

अचानक उग्र वासाच्या

काटेरी जंगलात शिरेल

माझी कविता

आणि भोवतालाचा

दांभिक मुखवटा फाडून

माझ्यासकट,

देईल नजरेला नजर

निर्भय

आणि काळोख्या दरीतून येणाऱ्या हाका ऐकत

वाहती होईल एल्गाराच्या

मोकळ्या रानवाऱ्यावर ’’.

‘कोवळ्या तरल शब्दांची’ आत्मनिष्ठ कविता लिहिणारी बाई राजकीय भानाच्या कविता का लिहिते?  याचं उत्तर  ‘हाक’ या कवितेत सापडतं, जिथं कवयित्री स्वतःशीच बोलतेय आणि काहीतरी निश्चित असं ठरवतेय. हे ठरवणं कदाचित ‘आता वह्या सगळ्या बुडीत खाती’ हा कवितासंग्रह असावा…!

कारण हा संग्रह म्हणजे कवयित्रीची भूमिका आणि तिचं विधान (स्टेटमेंट) आहे, जे माणुसकीच्या आणि माणुसकीच्याच बाजूने उभं आहे.

– अंशुमन पाटील

(आता वह्या सगळ्या बुडीत खाती :  अनुराधा पाटील, शब्द पब्लिकेशन, मुंबई) 

. . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.