तरुणांनी बाबासाहेबांना समजून घ्यावे – शेषराव चव्हाण

तरुणांनी बाबासाहेबांना समजून घ्यावे – शेषराव चव्हाण

माझी तरुण पिढीकडून अशी अपेक्षा आहे, की त्यांनी खरे डॉ. आंबेडकर व त्यांचे महान कार्य ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही, ते समजून घ्यावे व त्यांचे कार्य खारीचा वाटा म्हणून चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा, हीच डॉ. बाबासाहेब यांना खरी श्रद्धांजली होईल.

भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बांधवांच्या, जनतेच्या उद्धारासाठी जो त्याग केला त्याला तोड नाही. वयाच्या अवघ्या पस्तीताव्या वर्षी ब्रिटिश सरकारने त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली व तीही या आश्‍वासनासह, की तीन वर्षात त्यांना हायकोर्ट जज या पदावर पदोन्नती दिली. त्याबद्दल त्याकाळात हायकोर्ट जज हे पद किती मोठे होते, याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही; परंतु बाबासाहेबांनी ते नाकारले. कारण त्यांच्या मते, या पदामुळे त्यांना सरकारी नोकरीच्या बंधनात अडकावे लागेल, त्यामुळे त्यांनी वाहून घेतलेल्या कार्यात खंड पडेल.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा

डॉ. आंबेडकरांना आपल्या समाजातील बंधु, भगिनींमध्ये शिक्षणाने जागृती होईल, असा त्यांना दृढ विश्‍वास होता. म्हणून त्यांनी दलितांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांना मंत्र दिला. त्यासाठी त्यांनी पीपल्स ऐज्युकेशन सोसायटी स्थापन केली व त्याअंतर्गत शाळा व महाविद्यालये सुरू केली.
यात संस्थेच्या अंतर्गत औरंगाबाद आता संभाजीनगरमध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू केले. शाळा व महाविद्यालयासाठी उत्तमात उत्तम विद्वान शिक्षकांची नियुक्ती करण्यात बाबासाहेबांचा कटाक्ष होता. याचे उदाहरण मला स्वतःला माहीत आहे-
संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेब स्वतः आराम खूर्चीवर बसून बांधकामाची देखरेख करीत असत. एक दिवस ते असेच बसले असताना त्यांचा खास सेवक रूंजाजी भारसाखळे काही मंडळींना घेऊन त्यांच्याकडे आला. त्या लोकांतील एक बाबासाहेबांना म्हणाला, शहारे आपला मुलगा आहे आणि त्याला तुम्ही नापास केले. त्याला बाबासाहेबांनी उत्तर दिले, मला या महाविद्यालयांतून उत्कृष्ट विद्यार्थी निर्माण करायचे आहेत आणि ती निर्माण करण्यासाठी ज्या शिक्षकांचा उपयोग होइल त्यांनाच मी घेईन. शहारेला पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करून यायला सांगा. तो जर पास झाला तर त्याला घेऊन या. या बोलण्याचा संदर्भ असा होता, की वनस्पती शास्त्र या विषयाच्या प्राध्यापकासाठी मुलाखती झाल्या होत्या. त्यात बाबासाहेबांनी खरे नावाच्या ब्राह्मण उमेदवाराची निवड केली होती. ही होती बाबासाहेबांची शिक्षणाप्रती बांधिलकी. पुढच्या वर्षी शहारे तयारीनिशी आले व वनस्पती शास्त्र विषयाच्या प्राध्यापकपदी निवडले गेले. हेच शहारे पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग व अखिल भारतीय कृषी आयोगाचे सदस्य म्हणून निवृत्त झाले. या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे. कारण मी मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांना पाहण्यास व ऐकण्यास जात असे. हा संवाद मी माझ्या कानाने ऐकला.


मराठवाड्यात उच्च शिक्षणाला चालना


डॉ. बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय स्थापन करून मराठवाड्यात उच्च शिक्षणाला चालना दिली. तत्पूर्वी मराठवाड्यात एकच शासकीय महाविद्यालय होते आणि तेही इंटरमेजियट म्हणजे आजच्या बारावीपर्यंत शिक्षण देणारे. मिलिंद महाविद्यालय सुरू झाल्यानंतर मराठवाड्यात पदवीपर्यंत शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू झाली व कालांतराने मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. त्याच्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार झाला. आज मराठवाड्यात पाचशेहून अधिक महाविद्यालये आहेत आणि दोन विद्यापीठे आहेत. याचा पाया डॉ. आंबेडकरांनी घातला आहे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.


राजकीय पक्षांचा उदय आणि र्‍हास


इंडिपेन्डट लेबर पार्टी :
डॉ. आंबेडकरांनी ब्रिटिश लेबर पार्टीच्या धर्तीवर 1936 साली भारतात इंडिपेन्डट लेबर पार्टीची स्थापना केली. त्यावेळी ते म्हणाले, “हा पक्ष लोकशाही तत्त्वावर समाजाला जागृत करील, त्यांच्यासमोर वास्तव ठेवील व राजकीय कार्यालाही कायद्यानुसार संघटित करील.”
1937 साली मुंबई विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत बाबासाहेबांनी आपल्या या पक्षातर्फे 17 उमेदवार उभे केले. त्यापैकी 15 उमेदवार निवडून आले. बाबासाहेब स्वतः काँग्रेसवर मात करून प्रचंड बहुमताने निवडून आले. बाबासाहेबांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याचा सविस्तर आढवा मी माझे पुस्तक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतारणा’ या पुस्तकात केला आहे.


इंडिपेन्डट लेबर पार्टीचे अल्पायुष्य


कामगारांना एकत्रित करून मजबूत मोर्चा बांधण्याचा प्रयत्न अव्यवहारिक आहे, असे बाबासाहेबांना जाणवले. कारण कामगारांना जाती जातीतून विभक्त करणे कठीण आहे. जाती संपुष्टात आणल्या पाहिजेत, असे डॉ. आंबेडकरांचे ठाम मत होते. दलित वर्गाला संघटित करावयाचे असेल, तर इंडिपेन्डट लेबर पार्टी गुंडाळावी लागेल; या निष्कर्षाप्रत आंबेडकर पोहचले व तसा निर्णय त्यांनी घेऊन अखिल भारतीय दलित संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला.


ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन


17 ते 20 जुलै 1942 ला नागपूर येथे अखिल भारतीय दलित संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला सुमारे 75 हजार पुरुष व दोन हजार महिला उपस्थित होत्या. डॉ. आंबेडकर यांनी अधिवेशनात दलितांची अखिल भारतीय संघटना असणे किती आवश्यक आहे, याचे विवेचन केले. त्यानुसार ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना करण्याचा एकमताने निर्णय झाला. डॉ. आंबेडकर हे स्वतः फेडरेशनचे अध्यक्ष होणार होते. पण अधिवेशन चालू असताना त्यांना त्यांची व्हाईसरॉयच्या EXECUTIVE COUNCIL वर नियुक्ती झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे रावबहादूर एन. शिवराज यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.


1945 ची निवडणूक


जानेवारी 1945 रोजी पीपल्स हेरॉल्ड या दलित वृत्तपत्राचे विमोचन करताना डॉ. आंबेडकर म्हणाले, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा एक महत्त्वाचा पक्ष आहे. तो नैतिक आणि राजकीयदृष्टीने या देशाचा शक्तिशाली पक्ष बनविण्यासाठी मी स्वतःला समर्पित केले आहे. सप्टेंबर 1945 ला व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथ गो ने सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. 4 ऑक्टोबरला डॉ. आंबेडकरांसह सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. 4 ऑक्टोबरला डॉ. आंबेडकरांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. आपला प्रचार अधिक जोमाने करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी दक्षिण भारताचा दौरा केला. मद्रास, मदुराई, कोइमतूर येथे प्रचारसभा संबोधित केल्या. 13 जानेवारी 1946 ला ते मुंबईत परत आले. तेथून सोलापूरला गेले. सोलापूरला प्रचारसभेत घोषणा केली, की जर शेड्यूल्ड कास्टच्या उमेदवारांनी निवडणूक जिंकली नाही, तर ते पांढरी टोपी घालून काँग्रेससमोर आत्मसमर्पण करतील. काँग्रेस प्रवेश करतील; परंतु निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा फज्जा उडाला आणि डॉ. आंबेडकर यांची घोषणा हवेत विरली.


1952 च्या निवडणूका


जानेवारी 1952 मध्ये लोकसभेसाठी निवडणूका झाल्या. डॉ. आंबेडकरांनी मुंबईतील आरक्षित जागेवरून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. पण त्यात ते काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. मार्च 1953 मध्ये डॉ. आंबेडकरांना मुंबई राज्यातून राज्यसभेवर घेण्यात आले. ते त्याला बॅकडोअर एन्ट्री म्हणत. म्हणून त्यांनी 1954 ला भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली; परंतु तेथूनही दुसर्‍यांदा त्यांचा पराभव झाला.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया


शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा 1952 च्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर बाबासाहेबांनी राष्ट्रीय पक्ष निर्माण करण्याचा विचार केला. जो स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या त्रीसुत्रीनुसार आधारलेला असेल. तसेच तो सर्वांसाठी खुला असेल. त्यासाठी त्यांनी एक पत्रक तयार केले व ते जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अशोक मेहता, प्रल्हाद केशव अत्रे, एस.एम. जोशी आदींसारख्या काँग्रेस विरोधी नेत्यांना पाठविले. तसेच काही मुस्लिम नेत्यांनाही हे पत्रक पाठविले. त्यात त्यांनी नवीन पक्षाचा सात कलमी कार्यक्रम नमूद केला. ज्याचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ‘डॉ. आंबेडकर यांची प्रतारणा’ या पुस्तकात केला.
डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 13 ऑक्टोबर 1953 रोजी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हा पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा केली. हा पक्ष स्थापन करण्यात डॉ. आंबेडकरांना मनोमन असे वाटत होते, की अस्पृश्य व बहुजन समाज हा बहुसंख्येत असल्यामुळे त्यांच्या सहकार्याची याचना केल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही; परंतु तसे झाले नाही. कारण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांची जागा घेणारा एकही नेता झाला नाही, किंबहुना बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे वागण्यापेक्षा ते या काँग्रेसकडे किंवा त्या कॉग्रेसकडे लाळ घोटीत राहिले. काँग्रेसच्या उतरत्या काळानंतर हे नेते भाजप व शिवसेनेकडे धाव घेऊ लागले. त्यात रामदास आठवले पासून तर प्रकाश आंबेडकरांपर्यंत कोणीही अपवाद नाही. त्यामुळे बाबासाहेबांना त्यांच्या बांधवांना सत्ता स्थापन करण्यात पाहण्याचे जे स्वप्न होते ते स्वप्न राहिले. तसेच बाबासाहेबांची त्यांच्या सुशिक्षित बांधवांकडूनही घोर निराशा झाली व त्यांनी तसे बोलून दाखविले व मी आता माझ्या अशिक्षित बांधवांकडे लक्ष केंद्रित करीत असल्याचे बोलून दाखविले.


‘हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही’


13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे झालेल्या जाहीर सभेत बाबासाहेबांनी घोषणा केली, की ते ‘हिंदू म्हणून जन्माला आले, कारण ते त्यांच्या हातात नव्हते; परंतु ते हिंदू म्हणून मरणार नाही आणि त्यांची ही घोषणा म्हणा किंवा प्रतिज्ञा म्हणा’ त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार करून पूर्ण केली. नागपूर येथे त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. याप्रसंगी केलेल्या भाषणात ते म्हणाले, आज मी विषमतेवर, शोषणावर आधारित असलेल्या हिंदुधर्माचा त्याग केला आहे. आज माझा पूनर्जन्म झाला. आजपासून मी कोण्याही हिंदू देवदेवतांचा भक्त नाही. यापुढे मी बौद्ध धर्मातील अष्टांग मार्गाचेच निष्ठेने अनुसरण करील. यापुढील माझे जीवन बुद्धांचे ज्ञान, सत्य आणि करूणा या तीन मूल्यांच्या मार्गातून जाईल. भारतात बौद्ध धर्म वाळवंटासारखा झाला आहे. या धर्माचे निष्ठेने पालन करून बौद्ध धर्म पुढे कसा नेता येईल, याचा आपण विचार करावयास पाहिजे. जर आपण हे केले नाही, तर लोक आपली व आपल्या धर्माची खिल्ली उडवल्याशिवाय राहणार नाहीत. बुद्धाचे अनुयायी म्हणून आपण केवळ आपल्या मुक्तीचा विचार करणार नसून त्याचबरोबर आपल्या देशाचा व संपूर्ण जगाचे भले करण्याचा विचार करू. आपण आपल्या कमाईतला किमान 20 टक्के भाग धम्मप्रचारासाठी दिला पाहिजे. येत्या 15 वर्षांत भारतात धर्मांतराची लाट येईल व भारत बुद्धमय होईल, असा आंबेडकरांना आत्मविश्‍वास होता. 5 डिसेंबर 1956 च्या संध्याकाळी आंबेडकरांना दोन जैन मुनी भेटले. त्यांच्यासोबत आंबेडकरांची चर्चा झाली. त्या दोन्ही जैन मुनींनी ते लवकरच बौद्ध धर्माचा स्वीकार करतील, असे आंबेडकरांना आश्‍वासन दिले. 16 डिसेंबर 1956 ला मुंबई येथे धर्मांतराचा कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी डॉ. आंबेडकर 14 डिसेंबरला मुंबईला पोहोचतील असा प्रवासाचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. मुंबईचा कार्यक्रम संपवून ते औरंगाबादला येणार होते; परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी दिल्लीतच अखेरचा श्‍वास घेतला.
डॉ. आंबेडकर यांची स्वप्ने अपुरी राहिली


डॉ. आंबेडकर यांची चार स्वप्ने होती.
1) आपल्या समाजाला सत्तास्थानी पाहणे.
2) औरंगाबाद येथे बौद्ध विद्यापीठ स्थापन करणे.
3) ‘स्कूल ऑफ पॉलिटीकल थॉट’ स्थापन करणे.
4) बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करणे.


या चार स्वप्नांपैकी त्यांची पहिली दोन स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. तिसरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत स्कूल ऑफ पॉलिटीकल स्थॉट सुरू केले. ते स्वतः या स्कूलचे संस्थापक आणि संचालक झाले. एस.एस. रेेगे यांना रजिस्ट्रार केले. सुरुवातीला 15 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला; परंतु डॉ. आंबेडकर स्वतःच्या प्रकृतीमुळे व डोळ्याच्या विकारांमुळे हे स्कूल पुढे चालू ठेऊ शकले नाहीत. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा मी व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती श्री. अंकुशराव कदम यांनी एमजीएम विद्यापीठांतर्गत स्कूल ऑफ पॉलिटीकल थॉट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात लवकरच होईल.
चौथे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी म्हैसूरच्या महाराजांनी दिलेल्या जागेवर बौद्ध भिक्खूंना शिक्षित करण्यासाठी सेमिनरीची सुरुवात केली. पण ती पुढे चालू शकली नाही. अशा प्रकारे आंबेडकरांची चारही स्वप्ने त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या अनुयायांचे खुजेपण. त्यांच्यापैकी कोणातही स्वार्थापलिकडे बघण्याची दृष्टी कुवत विकसित झाली नाही. सत्ता व संपत्ती प्राप्त करण्यासाठी ते सत्तेवर आलेल्या वा येऊ घातलेल्या पक्षाबरोबर तडजोड करू लागले. प्रशासनात जे उच्चशिक्षित आले त्यांच्यापैकी बहुतेकांनी ब्राह्मण मुलीबरोबर लग्न केले. त्यांचे रीतीरिवाज आणि कर्मकांड स्वीकारले. त्यामुळे आंबेडकर हे त्यांच्या शेवटच्या काळात अत्यंत कष्टी व दुःखी होते. ज्यांना आंबेडकरांची शेवटच्या काळातील वेदना जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक नानकचंद रत्तू यांनी लिहिलेले पुस्तक ‘LAST FEW YEARS OF DR. AMBEDKAR’ अवश्य वाचावे.
जॉर्ज बर्नाड शाहनी असे म्हटले आहे, की परमेश्‍वराला जेव्हा कळले नाही, की थोर पुरुषांना काय शिक्षा द्यावी, तेव्हा त्याने शिष्य परंपरा निर्माण केली आणि शिष्यांनी ते काम व्यवस्थीतपणे पार पाडले. शिष्य आपल्या गुरूच्या पातळीवर पोहोचू शकत नाही तर त्याने गुरूला आपल्या पातळीवर आणले आणि नेमके हेच काम डॉ. आंबेडकर यांच्या शिष्यांनी केले असे म्हटले तर वावगे होणार नाही, की ते डॉ. आंबेडकर यांच्या आत्म्याची हत्या प्रत्येक क्षणी करीत आहेत.
तरुण पिढीकडून माझी अशी अपेक्षा आहे, की त्यांनी खरे डॉ. आंबेडकर व त्यांचे महान कार्य ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही, ते समजून घ्यावे व त्यांचे कार्य खारीचा वाटा म्हणून चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा, हीच डॉ. बाबासाहेब यांना खरी श्रद्धांजली होईल.

– शेषराव चव्हाण
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.