काय, झाले काय महाराष्ट्राला? – बी.व्ही. जोंधळे

काय, झाले काय महाराष्ट्राला? – बी.व्ही. जोंधळे

महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरांचे एक पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. यशवंतराव चव्हाण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा.सु. गवई, एस.एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, बापू काळदाते, दि.बा. पाटील, गोविंद पानसरे, दाभोळकर, नानासाहेब गोरे, मृणाल गोरे, बॅ. नाथ पै, मधू लिमये, मधू दंडवते, अण्णाभाऊ साठे आदी किती तरी राजकारण-समाजकारण धुरंधरांनी महाराष्ट्राचे उत्तुंग वैचारिक नेतृत्व केले. जुन्या पिढींच्या नेत्यात वैचारिक मतभेद जरूर होते. ते एकमेकांवर कठोर टीका सुद्धा करीत असत. पण वैचारिक चर्चेचा स्तर त्यांनी कधीही खालावू दिला नाही. वैर तर दूरच राहिले. सहिष्णूता, सभ्यता, सुसंस्कृतता त्यांनी जपली. पण आता महाराष्ट्राने जपलेली ही उच्च कोटीची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मूल्ये इतिहासजमा होत असून महाराष्ट्राच्या राजकीय नि सामाजिक जीवनात आज जे काही चालू आहे, ते सारे पाहून सुसंस्कृत, सभ्य व शालिन माणसाची मान शरमेने खाली गेल्यावाचून राहत नाही.
महाराष्ट्रात आज काय चालू आहे? शत्रुत्व, वैरभाव कोणत्या टोकाला जाऊन पोहोचला आहे? तर सभ्यता. शालीनता, संस्कृतीसाठी ख्यातनाम असलेल्या शरद पवारांना कुणी तरी माथेफिरू उठतो आणि सोशल मीडियावरून ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी देतो. पाठोपाठ अजून कुणी तरी उठतो शिवसेना नेते संजय राऊत यांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची धमकी देतो. सहिष्णूता, सभ्यता, सुसंस्कृतता यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रात हे घडावे, यासारखे दुर्दैव ते दुसरे कोणते? राज्यात आज जनजीवनाचे अगणित प्रश्‍न तुंबून पडले आहेत. महागाई, बेकारीने जनता त्रस्त आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. महाराष्ट्रातील कमालीचे दुषित राजकीय नि सामाजिक वातावरण पाहून उद्योगपती महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार नाहीत. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांच्या आघाडीवर सामसूम आहे. या प्रश्‍नांवर चळवळी न होता आज महाराष्ट्राचे राजकारण-समाजकारण असहिष्णू हिंस्त्रतेकडे झुकले आहे. महाराष्ट्राचे आदर्श असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमा हनन करून त्यांची बदनामी होत आहे. गावोगाव जातीय वणवे पेटून जातीय दंगलसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. काय चाललेय काय सध्या महाराष्ट्रात? आणि सामाजिक स्तर तो घसरून घसरून किती घसरावा? आंतरजातीय विवाह केला म्हणून बाप, भाऊ, आई या सार्‍यांनीच मिळून पोटच्या मुलीला निर्दयीपणे मारून टाकावे ना? मुंबईत काय झाले? तर कुणा तरी एका नर पशूने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या आपल्या प्रेयसीची हत्या करून तिच्या देहाचे तुकडे-तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्याला खायला दिले. इतकी क्रूरता, इतका निर्दयीपणा येतो तरी कुठून? ज्या महाराष्ट्रात म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिला-मुलींच्या आत्मसन्मानासाठी जीवाचे रान केले त्या महाराष्ट्रात असले रानटी प्रकार घडावेत ना? उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा आदी राज्यातून ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होतात, त्याच वाटेने आता महाराष्ट्रदेखील निघाला आहे काय? शरम वाटते. लाज वाटते. प्रश्‍न असा आहे, की हे सारे थांबून महाराष्ट्र आपली सभ्यता, संस्कृती, सहिष्णूता, महिलांचा सन्मान जपणार आहे की नाही? आणि असहिष्णूतेबाबत काय बोलावे? एखाद्याचे राजकीय, सामाजिक विचार पटत नाहीत म्हणून त्याला ‘तुमचा दाभोळकर करू’, ‘सकाळचा भोंगा बंद करा, नाही तर तुमच्यावर गोळ्या झाडू’ अशी हिंसक भाषा झडावी?
प्रश्‍न असा आहे, की एखाद्या व्यक्तीला संपवून त्यांचे विचार कसे मारून टाकता येतील? म. गांधींची हत्या करण्यात आली म्हणून काय गांधीवाद संपला? नाही. उलट तो जगभर तरारून उठला. हे एखाद्याच्या जीवावर उठलेल्यांना कळत कसे नाही? विचारांचा मुकाबला विचारांनीच व्हायला नको काय? पण जिथे विचार संपतो तिथेच मरण्या-मारण्याच्या हिंस्त्र, हिंसक भाषेचा व विचारांचा जन्म होतो. पण हा खेळ घातक आहे. तो कुणालाच परवडण्यासारखा नाही. म्हणून मतभिन्नता, सुसंस्कृतता जपली गेली पाहिजे. यातच महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनाचे हित आहे. दुसरे काय? 

– बी.व्ही. जोंधळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.