वेदनेचा सूर : उद्रेक – दैवत सावंत

वेदनेचा सूर : उद्रेक – दैवत सावंत

उद्रेक हा अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे यांचा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी यातल्या आशयगर्भ कविता कविच्या सखोल जाणिवेचा परिचय देणार्‍या आहेत. मराठी साहित्यविश्‍वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा हा काव्यसंग्रह आहे.

अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे यांचा उद्रेक हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित करण्यात आलाय. विद्यमान समाजव्यवस्थेवर परखड भाष्य करणार्‍या या काव्यसंग्रहात अंतस्थ वेदनेचा सूर व्यक्त होतो. हा काव्यसंग्रह आयशगर्भ कवितांनी नटल्याचा प्रत्यय संग्रह वाचताना येतो.


पश्‍चिमेच्या पोटात
आभाळ पेटताना पाहून
समोरचा डोंगर
चिंतित होतो
तेव्हा मलाही उगाच वाटतं
आपणही पेटावं
असंच…


विचारांच्या गर्तेत अडकलेला हा कवी मानवी संवेदनेला केंद्रीभूत मानून जीवनरूपी वाटचाल करतो आहे. आजचे वर्तमानकालीन जीवनच व्यामिश्र झाल्याने निर्माण होणार्‍या अडचणींच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. आपल्या जवळ आहे ते मांडतो. अंतर्दाह, किंकाळ्यांना शब्दरूपात मांडणारा हा संवेदनशील मनाचा आणि आजपर्यंत दुर्लक्षित असलेला कवी.
उद्रेक हा अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे यांचा पहिलाच; पण महत्त्वाचा कवितासंग्रह. मनातल्या प्रश्‍नांना शब्दात मांडून मनाला व्यक्त करणे, हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेऊन समाजात समतेचे जीवन असावं यासाठी सातत्याने विचारांची पेरणी करणारा हा माणूस. सातत्याने विनोदी जीवन जगणार्‍या कवीच्या मनातील घालमेलीचे दर्शन या काव्यसंग्रहात घडते. या संग्रहात साधारणपणे चौर्‍याहत्तर कवितांचा समावेश आहे. प्रत्येक कविता ही वेगळं जगणं मांडते. मनातल्या, जगण्यातल्या काहुराला मोकळी वाट निर्माण करून देते; पण शिल्लक राहते ती व्यथाचं. ‘उद्रेक’ या कवितेत ते लिहितात,  


तरीही
माझ्याच काळजाच्या
अंधारल्या कपारीत
खोल खोल कुठे तरी
खदखदणार्‍या तप्त लाव्ह्याचा
शोध तू लावलास
दणाणून सोडलास आसमंत
तुझ्या बुलंद आवाजाने (पृ.48)

आजच्या समाजव्यवस्थेवर प्रखरतेने आणि नेमकेपणाने बोट ठेवण्याचे काम या कवीने केलेले आहे. संविधान मूल्यांची रुजवणूक करून समाजव्यवस्थेत समता प्रस्थापित व्हावी ही त्यांची आग्रही भूमिका. यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. समाजासोबत राहून समाजाला आपण काहीएक देणं लागतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपणारा हा कवी आहे. त्याकारणाने मानवी मनाला तो अधिक जवळचा वाटतो. सर्वांच्या जगण्यात कमी-अधिक संघर्ष असतोच. तसा संघर्ष कवीच्याही वाट्याला आलेला आहे. जीवघेण्या संघर्षाची मनात गर्दी वाढतानाच कवी व्यक्त होतो. त्याच्यासोबत महापुरुषांच्या विचारांचा आणि कार्य-कर्तृत्वाचा प्रभाव असल्याने न डगमगता वाटचाल करतो आहे. व्यवस्थेविषयी असलेली चीड अगदी शांतपणे मांडून प्रत्येकाच्या मनात घर करणारा हा कवी आहे. मराठी साहित्यात आजपर्यंत अनेक कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्येही कमी-अधिक प्रमाणात दाहकता व्यक्त झालेली दिसून येत असली, तरी आपले व्यावसायिक जीवन इतरांपेक्षा वेगळे असतानादेखील भावनिकता सांभाळून लेखन करणारा हा विधिज्ञ निराळेच अनुभवविश्‍व मांडतो. गेल्या दोन वर्षांपासून जग महाभयंकर संकटाला तोंड देत आहे. या संकटाशी सामना करून देशासह जगाची वाटचाल सुरू आहे. अनेकांचे संसार या कोरोनाने उद्ध्वस्त केले आहेत. मन व्याकलून काढून टाकणार्‍या घटना घडल्या; पण ते बाजूला सारून लेखणी मात्र बंद पडलेली दिसत नाही. मनातली घालमेल शब्दातून मांडणं हे अस्सल कलावंताचं वैशिष्ट्य असतं. हाच जीवनानुभव कस्तुरे यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतो.
‘उद्रेक’ या संग्रहातील विचार मानवी संवेदना उजागर करतात. ‘भोग’ या कवितेत ते म्हणतात,


भोग झाले भोगूनी पण
दुःख नाही संपले
संपले आयुष्य किन्तु
हुंदके ना संपले (पृ.69)


यातून कवी अंतस्थ वेदना व्यक्त करतात. त्यामुळे हा जीवनानुभव केवळ कवींचा न राहता सर्वांचा होऊन जातो. या संग्रहाच्या विचाराला सार्वत्रिक जीवनाचा, वेदनेचा कंगोरा लाभतो. त्यामुळे ती एकट्याचे जीवन, व्यथा, वेदना न राहता सर्वांची होऊन जाते. यातूनच लेखनाचं सामर्थ्य कळतं. सार्वत्रिक वेदनेचा सूर या संग्रहाला प्राप्त होतो. त्यामुळे ही लेखणी कस्तुरे यांची न राहता सगळ्यांची होऊन जाते. अर्थात, येणार्‍या काळात ही कविता निश्‍चितपणे मराठी साहित्य विश्‍वात आपले स्थान निश्‍चित केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ‘उद्रेक’ या अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे यांच्या कवितेला बाजूला सारून मराठी काव्य लेखनाची परंपरा मांडणे शक्य होणार नाही, इतके ताकतीचे लेखन या संग्रहात आहे, यात तिळमात्र शंका नाही. कवी, प्रकाशक यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो…

– दैवत सावंत (लेखक हे साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.