भेगा पडत चालल्यात त्या जोशीमठाला की मोदीमठाला?- जयदेव डोळे

भेगा पडत चालल्यात त्या जोशीमठाला की मोदीमठाला?- जयदेव डोळे

दिल्लीत 16 आणि 17 जानेवारीस भारतीय जनता पक्षाचे एक महत्कार्य पार पडले. यावर्षी काही राज्यांत होणार्‍या विधानसभांच्या आणि पुढील वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय आखणी एका बैठकीत ठरली. त्यावेळी एक मोठी हास्यास्पद घटना घडली. फक्त एक-दीड किलोमीटरच्या अंतरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रोड शो’ त्यावेळी आयोजित करण्यात आला. या कार्यालयामधून त्या कार्यालयात जाण्यासाठी पंतप्रधान त्यांच्या मोटारीत उभे राहून हात हलवित निघाले. त्यांच्यावर त्यावेळी फुले व फुलांच्या पाकळ्या यांची उधळणही झाली. रस्त्यांच्या दुतर्फा लोक जमले होते. तेही मोदींना प्रतिसाद देत होते. आता यात हसण्यासारखे काय?
मोदी ना पक्षाध्यक्ष, ना सचिव, ना कसले पदाधिकारी. त्यांनी नुकताच कोणता पराक्रमही केलेला नाही. देशाच्याही नावावर काही प्रचंड केल्याची नोंद नाही. उलट दिल्ली महापालिकेतली सत्ता भाजपने गमावलेली. मिरवणुकीने दिल्लीतल्या दिल्लीत जाण्याचे कोणतेच प्रयोजन नसताना मोदींना असा आपल्याच प्रदर्शनाचा मोह का सुटला असावा? गावातल्या गावात जाताना मोदींचे दर्शन, त्यांच्या ताफ्यासह, जनतेला होतच असणार. रोजच ते आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी टीव्ही आणि वृत्तपत्रे यांच्या अग्रभागी असतातच. भाजपचे सारे कार्यक्रम मोदीजींच्या नामोच्चाराशिवाय (किंवा न.मो.च्चारासह म्हणूया) होऊ शकत नाहीत.
मग मोदींना अवघी दीड किलोमीटरची यात्रा का काढावी लागली?
स्वतःला प्रधानसेवक अन् पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणवून घेणारा माणूस असा डामडौल करीत पक्षाच्या बैठकीसाठी का बरे गेला?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा निर्मोही, निःसंग आणि निष्ठावान स्वयंसेवक फुलांचा वर्षाव झेलत का बरे निघाला?
नक्कीच कोठेतरी बिघाड झालेला दिसतो. बिघाड कशाचा, तिकडे हिमालयाच्या कुशीतल्या उत्तराखंड राज्यात गावांना तडे जाऊ लागले, तसे मोदींच्या राज्याला पडू लागले आहेत. जोशीमठ नावाचे ते गाव भेगाळले आहे. भिंती, रस्ते अन् डोंगर भेगा पडून फाकले जात आहेत. तशा भेगा मोदीमठाला पडत चालल्याचा इशारा पक्षाला मिळाला जणू, त्याने आपल्या एकमेव तारणहाराला अशी एक यात्रा काढायला लावली, जिने सर्वांनाच घोर पडला.
जूनपर्यंत देशात मंदी दिसू लागेल. असे मोदींचे एक सहकारी मध्यम व लघुउद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे नुकतेच म्हणाले. ऑक्स्फॅम नामक स्वयंसेवी संस्थेने भारतात विषमतेच्या उभ्या-आडव्या भेगा पडत चालल्याचा अहवाल मांडला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कधी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे तर कधी अतिक्रमण हटावण्याच्या मोहिमेमुळे लोक आंदोलने करू लागले आहेत. अनेक राज्यपाल नको त्या राजकीय उचापती करीत भाजपच्या भवितव्याला भगदाडे पाडत आहेत. कायदामंत्री खवळून उठल्याप्रमाणे सांगत आहेत, की न्यायमूर्तींच्या निवडीत सरकारी प्रतिनिधी असलाच पाहिजे. बेकारीची म्हैस उठायला तयार नाही.
राहुल गांधी यांचे पप्पूपण नाहीसे झाले असून त्यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेने देशभर एक हवा तयार केली आहे. त्या पदयात्रेला खुळास म्हणून मोदींनी ही दीड कि.मी.ची यात्रा काढली असेल, तर त्यासारखा दुसरा विनोद नाही. पक्षाच्या बैठकीसाठी शोभायात्रेने जाण्याची कल्पना एक गोष्ट जाहीर करते. ती म्हणजे, भाजपसारख्या पक्षाला आता मोदी यांच्यावाचून कोणी दुसरा नेता मिळत नाही, स्वतःला विचारनिष्ठ आणि तत्त्वाचा म्हणवून घेणारा हा पक्ष आता पूर्णपणे व्यक्तीनिष्ठ होऊन बसलाय. मोदींच्या कारभारापेक्षा मोदींची निवडणूक जिंकण्याची कला या पक्षाला भारी वाटते. यातच हा पक्ष किती सिद्धांतप्रिय आहे, ते लक्षात आले. भाजप म्हणजे मोदी आणि मोदी हेच भाजप, असे समीकरण या दोघांनीही तयार केलेय. या पक्षाचा अध्यक्ष स्वतःच्या राज्यात आपला पक्ष जिंकवू शकला नाही, या वरून दोन बाबी स्पष्ट होतात. जे.पी. नड्डा ही व्यक्ती फार मामुली असून ती हिमाचल प्रदेशातही प्रभावी नाही. दुसरी, हे अध्यक्ष इतके कमकुवत निघाले, की साक्षात मोदी यांचा टेकूही त्यांना उभारी देऊ शकला नाही. अजून एक गोष्ट. भाजपात पक्षाध्यक्ष निवडून जातो की नेमला जातो? जर निवडलेला असता, तर असा दारूण पराभव स्व-राज्यातच होऊ शकला नसता. तो नेमलेलाय याचा अर्थ कोणाला तरी वरचढ माणूस नकोय म्हणून असा दुबळा, निरूपद्रवी नेता अध्यक्ष म्हणून आलाय. वरचढपणा कुणाला खपत नाही, असा प्रश्‍न विचारणे फजूल आहे. कारण नड्डा दुबळे असल्यानेच मोदी बलाढ्य असल्याची जाणिव होते. पक्ष मोठा की सरकार, असा पेच भाजपत पूर्वी नव्हता. आधी पक्षसंघटन, नंतर सत्ता असे मानणारे नेतृत्व असल्यामुळे मुख्यमंत्री, पंतप्रधान ही पदे पक्षाध्यक्षापुढे कमी लेखली जात. सत्ता कोणामुळे मिळाली आणि जिंकले कोण? पक्षच ना. तरीही सरकार आज श्रेष्ठ ठरवले जात आहे, ते एका व्यक्तीमुळे.
राहुल गेली काही वर्षे अदानी-अंबानी-मोदी असा एक त्रिकोण आखून तो लोकांना दाखवत आहेत. मोदी सरकारची धोरणे या दोन उद्योगपतींच्या भल्यासाठीच राबवली जात असल्याचा राहुल आरोप करतात. आपली बदनामी करायला भाजपने चार हजार कोटी रुपये खर्चल्याचाही आरोप राहुल करतात. एवढी मोठी रक्कम उद्योगपतींच्या खजिन्याव्यतिरिक्त कुठे असते? काँग्रेससारखा पक्ष डावा समाजवादी नसतानाही दोन उद्योगपतींच्या विरोधात आघाडी उघडतो याचा अर्थ उद्योगपती ही मुळे असून मोदी त्यामुळेच उभे आहेत, असा निघतो. गरीबांची सेवा करणारा आणि साधेपणावर भर देणारा हा पक्ष असा दोन खांबांमधल्या तारेवरची कसरत करतोय तो मोदींमुळे.
मोदींना रोड शो का करावा लागतो? त्यांनी अवघे राजकारण एक स्पेक्टॅकल म्हणजे एक प्रेक्षणीय खेळ बनवून टाकल्याचे ते लक्षण होय. प्रत्येक राजकीय कृती समारंभ, सोहळा अथवा उत्सव यांत पालटून टाकायची. म्हणजे राजकारण मागे सरते आणि घटना लक्षात राहते, हा त्यामागचा कावा. प्रसिद्धी माध्यमांसाठी अशा घटना म्हणजे सुग्रास अन्न. त्यातून अवघा मीडिया गोदी झालेला! म्हणजे प्रचारच प्रचार!! मोदींच्या काळातच भारताची प्रसारमाध्यमे आपल्या कर्तव्यापासून ढळली आणि लोकविरोधी कटात जणू सामील झाली.
मोदींच्या गुजरातेत शिक्षणाची परवड कुलगुरूंच्या बेगुमान नेमणुकांमधून दिसते. तिथे तीन कुलगुरूंविरोधात आरोपसत्र सुरू झाले असून गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा नुकताच स्वीकारला गेला.
जोशीमठाची दूरवस्था त्या भागाची अर्थव्यवस्था पर्यटनाशी जोडून टाकल्याने उद्भवलेलीय. रोजगार आणि वस्तू व सेवा यांचा खप वाढावा यासाठी मोदी अनेक जागा पर्यटनासाठी खुल्या करतात, त्याचे दुष्परिणाम दिसतात. सरदार पटेलांचा पुतळा, साबरमतीचा घाट, काशीमधला कॉरिडॉर, मोरबीचा झुलता पूल, केदारनाथ, समेद शिखर इत्यादी उदाहरणे अगदी ताजी आहेत.
त्रिपुरा, कर्नाटक, मध्य प्रदेश येथून यावर्षी भाजपची सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात बळेबळे भाजप सत्तेत आहे. तामिळनाडू व केरळ केवळ अशक्य कोटीत आहेत. दहा वर्षे झालीत. मोदी यांचा कारभार कंटाळवाणा, उबगवाणा होतोय. पडझड आरंभलीय.

Related Articles

1 Comment

Avarage Rating:
  • 0 / 10
  • डॉ.धोंडोपंत मानवतकर , January 27, 2023 @ 6:39 pm

    सन्माननीय जयदेव डोळे सरांनी भाजपच्या कारकीर्दचा चिकित्सक
    लेखाजोखा मांडताना जोशीमठाला नाही , तर भाजपच्या मठाला कसे तडे जायला सुरुवात झाली आहे हे सविस्तार मांडले आहे…अभिनंदन सर.

Leave a Reply

Your email address will not be published.