जे.पी. नड्डा आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी अच्छे दिन – कमलेश गायकवाड

जे.पी. नड्डा आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी अच्छे दिन – कमलेश गायकवाड

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या नाराज आहेत. या नाराजीचे  वादळ वेळोवेळी उठत असते. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे आणि मामा प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन घेऊन आले होते. या आधारावर पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्ष म्हणजे  स्वतःचे घर असल्यासारखे वाटते. एखादी गोष्ट वाटणे आणि त्याचे अस्तित्व यात खूप अंतर आहे. एका प्रसंगी भारतीय जनता पक्ष हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. हे जरी असले तरी त्यांना त्यांच्या बापाच्या पक्षात अनेक अडथळे पार करत राजकीय व्यवहार करावा लागत आहे. त्यांना सध्या ज्या राजकीय अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. याची व्यथा त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे बोलून दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यासाठी अच्छे दिन येणार अशी शक्यता बळावली आहे.
   जे.पी. नड्डा 2 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद भेटीवर होते. या शहरात त्यांची रात्री जाहीर सभा झाली. जे.पी. नड्डा औरंगाबाद येथे मुक्कामी होते. यामुळे ते अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटले. या भेटीत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील सर्व वेदना जे.पी. नड्डा यांच्या कानावर घातल्या आहेत. मला राज्यात काही करू दिले जात नाही. माझे हात बांधून ठेवले आहेत. माझी खूप घुसमट होत आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.  औरंगाबादच्या सभेत सूत्रसंचालन शिरीष बोराळकर यांनी केले. त्यांनी मुंडे यांना बोलण्याची संधी दिली; पण त्या आधी केवळ दोन मिनिटात मनोगत व्यक्त करतील, असे म्हटले. या दोन मिनिटावर बरेच घडले. मी पक्ष शिस्त पाळते. जे.पी. नड्डा औरंगाबाद भेटीवर आले आहेत. त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करते आणि मी माझी जागा घेते, असे म्हणून त्या आपल्या जागेवर जाऊन बसल्या.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करणार आहेत. यात पंकजा मुंडे या मंत्री असण्याची शक्यता आहे. शिंदे मंत्रिमंडळात सध्या एकही महिला मंत्री नाही.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सहभागी होणार नव्हते. त्यांना जे.पी. नड्डा यांनी उपमुख्यमंत्री होण्याची सूचना केली. त्यांनी सूचना मानली नाही. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केल्यावर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. योगायोग म्हणजे औरंगाबाद येथील सभेला देवेंद्र फडणवीस हजर नव्हते. देवेंद्र फडणवीस हे जे.पी. नड्डा यांच्यावर नाराज असल्याची कुजबुज औरंगाबादमधील सभेत होत होती. देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बरी नसल्याने ते औरंगाबादमध्ये आले नाहीत, अशी चर्चा होत राहिली. पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पराभव झाला. यानंतर राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभेची निवडणूक झाली. यात पक्षाने मुंडे यांना संधी दिली नाही. मी आता 2024 ची तयारी करत आहे, असे एक विधान मुंडे यांनी केले. महाराष्ट्र राज्यात 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे मुंडे लोकसभेची निवडणूक लढतील, की विधानसभेची निवडणूक लढतील, हा देखील एक प्रश्‍न आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदार संघातून 2024 मध्ये उमेदवारी दिली जाईल. यासोबतच पुणे लोकसभा मतदार संघातून 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि रावेर लोकसभा मतदार संघातून गिरीश महाजन यांना उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती कळली. पुण्यातून सध्या गिरीश बापट भाजपचे खासदार आहेत, तर रावेरमधून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्याने 2024 मध्ये रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली जाणार नाही, हे संकेतात स्पष्ट करण्यात आले.
पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढणार म्हणजे त्या मुख्यमंत्री पदापासून दूर राहतील, असा हा राजकीय डावपेचाचा भाग आहे. राजकारणात हे डावपेच चालणारच. केंद्रीय पातळीवर प्रमोद महाजन तर राज्य पातळीवर गोपीनाथ मुंडे असे समीकरण होते. हे समीकरण तुटून अनेक वर्षे लोटली. याची जाणीव पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि पूनम महाजन यांना होणे आवश्यक आहे. पूर्वीचा भारतीय जनता पक्ष आणि आताचा भारतीय जनता पक्ष यात खूप अंतर आहे. पूर्वी किमान सामूहिकपणे निर्णय होत होते. आता केवळ नरेंद्र मोदी निर्णय घेतात. नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांना सांगितल्यानंतर त्यांना पुढील निर्णय कळतो. मग पक्षाचे उपाध्यक्ष आणि सरचिटणिसांना कळते. भाजपमध्ये आधीच्या तुलनेत सामूहिक निर्णय होत नाहीत.
जे.पी. नड्डा यांना जून 2024 पर्यंत अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. मतदान होऊन मलिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तशी निवडणूक भाजपमध्ये होणे शक्य नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याबाबत चर्चा नको म्हणून जे.पी. नड्डा यांना मुदतवाढ दिली. याला दुसरे एक कारण आहे. गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांना अध्यक्ष करायचा मनोदय मोदी यांचा होता; पण उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून सी.आर. पाटील यांच्या नावाला विरोध झाला. यामुळे नड्डा यांना मुदतवाढ देण्यात आली. नड्डा यांना मदत करण्यासाठी आता तीन कार्यकारी अध्यक्ष असतील. यात महिला आणि बालकल्याण विकासमंत्री स्मृती इराणी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सी.आर. पाटील यांचा समावेश आहे. ही व्यवस्था अंमलात आली, तर जे.पी. नड्डांच्या तुलनेत सी.आर. पाटील हे अतिशय भक्कम कार्यकारी अध्यक्ष असतील. जे.पी. नड्डांमुळे किती ठिकाणी विजयी झालो, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. जे.पी. नड्डा यांच्या स्वतःच्या राज्यात (हिमाचल प्रदेश) भाजपचा पराभव झाला. तरीही त्यांना मुदतवाढ देण्यात आली. हे आश्‍चर्यच आहे.
सी.आर. पाटील, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान यांना देशातील राज्य वाटून दिले जातील. अमित शाह एका वेळी गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष होते. त्यांना सहकार्य करण्यासाठी जे.पी. नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले होते. नंतर नड्डा अध्यक्ष झाले. आता सी.आर. पाटील, स्मृती इराणी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यापैकी पुढच्या वर्षी कोण अध्यक्ष होईल, हे समजेल. भारतीय जनता पक्षात असंतोष वाढत जात आहे. तो अद्याप चव्हाट्यावर आला नाही. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष आहेत. रावत यांनी बी.एल. संतोष यांना पक्ष व्यवहारावर बरेच सुनावले आहे. भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ही घटना घडली आहे. राजस्थानमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना डावलण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्या पण पक्ष नेतृत्वाविरुद्ध बोलण्यास सज्ज आहेत. तो काळ कधी येईल. यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा भारतीय जनता पक्ष आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी टीका करत असताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाचा उल्लेख करत असतात. मुंडे यांनी आपल्या वेळोवेळीच्या भाषणात अनेक प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेऊन प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीची दखल घेऊन त्यांना थोडे दूर ठेवण्यात आले. आता पुरे झाले म्हणत भारतीय जनता पक्ष त्यांना मंत्रिपदाची संधी देणार आहे. मुंडे आणि जे.पी. नड्डा यांच्यात मंत्रीपदाबाबत चर्चा झालेली आहे.
मुंडे यांनी शिवसेनेत (ठाकरे) यावे. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, अशी विधान समोर आली आहेत. मुंडे या शिवसेनेत जातील की नाही याचे उत्तर काळ देईल; पण सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता. त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला, तर त्यांच्या राजकीय अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या भाजपमध्ये राहिल्या तर त्यांना फायदाच होणार आहे. सध्या त्या राजकीय वादळात आहेत. ते वादळ शांत होण्याची वाट पाहणे गरजेचे आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसाची बैठक 16-17 जानेवारी रोजी दिल्लीतील नवी दिल्ली नगरपालिका सभागृहात झाली. त्यात जे.पी. नड्डा यांना मुदतवाढ देण्यात आली. यामुळे जे.पी. नड्डा आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी अच्छे दिन आले आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. 

– कमलेश गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.