मारझोड करण्याची व ओंगळ भाषेत बोलण्याची आपली संस्कृती नाही  – बी.व्ही. जोंधळे

मारझोड करण्याची व ओंगळ भाषेत बोलण्याची आपली संस्कृती नाही  – बी.व्ही. जोंधळे

महाराष्ट्र राज्यात राजकारण व समाजकारणाचा स्तर कधीही खालावला नव्हता तेवढा तो आता खालावला आहे, हे पाहून मन उद्विग्न झाल्यावाचून राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एका नव्याच निरर्थक वादाला तोंड फोडले आहे. त्यांचे म्हणणे असे, की अभिनेत्री उर्फी जावेद यांनी सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरू नये. अन्यथा ती जिथे दिसेल, तिथे तिचे थोबाड फोडण्यात येईल. आता हे प्रकरण महिला आयोगापर्यंत गेले असून पोलिस दरबारी सुद्धा एकमेकींनी एकमेकींच्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. हे पाहून प्रश्‍न असा पडतो, की या वादाला काही शेंडा-बुडखा तरी आहे काय आणि या या सर्व वितंड वादाचा जनजीवनांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नांशी संबंध काय?

भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला स्वतंत्रपणे वागण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ज्याला जसे कपडे वापरावयाचे आहेत, तसे ते वापरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच ज्याला जे खाय-प्यायचे आहे, ते खाण्यापिण्याचे स्वातंत्र्यही दिले आहे. मग असे असताना उर्फी जावेदला तिच्या कपड्यावरून लक्ष्य करण्याचे कारण काय? ती मुस्लिम आहे म्हणून? आणि उर्फीच्या कपड्यावर ज्या चित्रा वाघ आक्षेप घेत आहेत, त्या त्यांच्या भाजपात चित्रविचित्र कपडे वापरणार्‍या महिला आहेत, ते त्या का विसरतात? चित्रा वाघ आता भाजपात आहेत. अगोदर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. पक्षांतर केल्यावर भाजपच्या राजकीय संस्कृतीस धरून त्यांनी उर्फी जावेदच्या कपड्यावर राजकीय सोय म्हणून आक्षेप घेणे समजू शकते; पण समजा आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असत्या, तर त्या आज ज्या उर्फी जावेदच्या विरोधी काहूर माजवित आहेत, तसे ते त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात राहून माजविले असते काय? आणि शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांनी ते सहन तरी केले असते काय? तसे वाटत नाही. याचा अर्थ असा, की भाजपच्या राजकीय संस्कृतीस धरून हा सारा खेळ समजा. समाजात दुही माजविण्याचा खेळ चालू आहे, असे म्हटले तर चुक ठरेल काय?
चित्रा वाघ व उर्फी जावेद वाद सुरू होण्यापूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही अशाच प्रकारे लक्ष्य केले गेले. हिंदू धर्मातील अंधश्रद्धा व समाजास पोषक न ठरणार्‍या रुढी-परंपरांवर त्यांनी जे भाष्य केले, त्या भाष्याच्या जुन्या क्लिप्स व्हायरल करून त्यांना हिंदूद्वेष्ट्या ठरविण्यात आले. राष्ट्रीय कीर्तनकार म्हणविणार्‍या महिला कीर्तनकारांनी सुषमा अंधारे यांच्यावर ओंगळवाण्या भाषेत टीका-टिप्पणी केली. त्यांची तिरडी बांधण्यात आली. त्यांनाही मारहाणीची धमकी देण्यात आली. प्रश्‍न असा, की हिंदू धर्म रुढी-परंपरेची चिकित्सा काही नवी आहे काय? संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे, म. ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी हिंदू समाजास हानीकारक ठरणार्‍या हिंदू रुढी-परंपरांची कठोर चिकित्सा केली, हे खरे नाही काय? आगरकरांनी हिंदू धर्म रुढी-परंपरेस छेद देऊन स्त्रीयांच्या मानसन्मानाचा व पुरुषांच्या बरोबर त्यांनाही बरोबरीचा दर्जा मिळावा, यासाठी पुढाकार घेतला होता ना? तेव्हा सनातन्यांनी त्यांचीही जिवंतपणी प्रेत यात्रा काढली होती. आता सुषमा अंधारेंची तिरडी बांधली. धर्म चिकित्सेची इतकी भीती आपणाला कधीपासून वाटायला लागली? सुषमा अंधारेंच्या सर्वच राजकीय भूमिकांचे समर्थन करायचे काही कारण नाही; पण त्या केवळ शिवसेनेची (उद्धव ठाकरे) बाजू मांडून भाजपवर टीका करीत आहेत, म्हणून त्यांना हिंदू विरोधी ठरविण्यात येत आहे, हेच खरे आहे ना? हिंदू धर्माचे वैशिष्ट्य असे, की तिथे आस्तिकही राहता येते आणि नास्तिकही राहता येते. देव मानता येतो आणि देव न मानण्याचेही स्वातंत्र्य आहे. मग सुषमा अंधारेंना लक्ष्य का करण्यात येत आहे? राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच ना?
अर्थात, आज जे काही क्षुद्र राजकारणापायी चालू आहे, ते बरोबर तर नाहीच नाही; पण मुळी समाजहिताचेही नाही. गलिच्छ ओंगळवाण्याभाषेत टीकाकारांचा समाचार घेणे, मारझोडीची भाषा करणे, ही सुद्धा आपली संस्कृती नाही, हे संस्कृतीचे नाव घेऊन गोंधळ माजविणाऱ्यांनी जरी लक्षात घेतले, तरी पुरेसे आहे. समाजात असे अगणित प्रश्‍न आहेत, की त्यावर खरे लक्ष केंद्रीत करणे आज गरजेचे आहे. क्षुद्र राजकारण करण्याचे नाही! 

– बी.व्ही. जोंधळे (लेखक हे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.