हिंदू राष्ट्र संकल्पना? – विमल शेंडे

हिंदू राष्ट्र संकल्पना? – विमल शेंडे

बहुतेक वेळा लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामान्य माणसे आणि देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा ज्यांना भारतीय संविधानाने उच्च पदावर विराजमान केले, ते सुद्धा त्यांच्या भाषणात ‘हिंदुस्थान’ हा शब्द प्रयोग वारंवार करताना दिसतात. मग हा राष्ट्रद्रोह नव्हे काय? हा देश म्हणजे आपण ज्या भूभागावर राहतो त्या भूभागाचं नाव जगाच्या नकाशावर ‘भारत’ असं आहे. स्वतंत्र भारत देशाचं संविधान भारतीय संविधान म्हणजेच CONSTITUTION OF INDIA आणि INDIA IS A BHARAT असा लिखित स्वरूपात उल्लेख आहे.

स्वतंत्र भारत देशामध्ये हल्ली हिंदुस्थान किंवा हिंदू राष्ट्र ही संकल्पना पुन्हा मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. बहुतेक वेळा लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामान्य माणसे आणि देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा ज्यांना भारतीय संविधानाने उच्च पदावर विराजमान केले, तेसुद्धा त्यांच्या भाषणात ‘हिंदुस्थान’ हा शब्द प्रयोग वारंवार करताना दिसतात. मग हा राष्ट्रद्रोह नव्हे काय? हा देश म्हणजे आपण ज्या भूभागावर राहतो त्या भूभागाचं नाव जगाच्या नकाशावर ‘भारत’ असं आहे. स्वतंत्र भारत देशाचं संविधान भारतीय संविधान म्हणजेच CONSTITUTION OF
INDIA आणि INDIA IS A BHARAT असा लिखित स्वरूपात उल्लेख आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांपासून सुरुवात झाली आहे. या शब्दांचा अर्थ सर्वसमावेशक असा आहे. देशाला कोणताही धर्म नाही. मूळ संविधानात ‘इहवाद’ म्हणजे धर्मनिरपेक्ष असा त्याचा अर्थ आहे. जात, धर्म, पंथ याला भारतीय संविधान वेगळी मान्यता देत नाही. ‘माणूस’ हा केंद्रबिंदू असल्यामुळे एकूणच भारतीय नागरिकाच्या कल्याणाचा सर्वंकष विचार संविधानामध्ये अंतर्भूत आहे.


हिंदुस्थान या शब्दाचा अर्थ ज्या भूभागावर फक्त हिंदू म्हणवून घेणारे लोक आहेत, केवळ त्यांचच वास्तव्य असलेला देश असा होतो. वास्तविक पाहता, भारत देशात शीख, इसाई, पारसी, मुस्लिम, जैन, बौद्ध असे अनेक धर्मांचे लोक असताना फक्त हिंदूंचाच देश कसा असू शकतो? याचाच अर्थ, या देशातील जनमाणसांवर ही संकल्पना रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न लोकप्रतिनिधी करताना दिसतात. वरवर वाटत असली तरी ही संकल्पना संकुचित स्वरुपाची आहे. या संकल्पनेने कळत-नकळत आपण गुलामीच्या व्यवस्थेशी जोडले जातो. श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च-नीच अशी ही भावना असमानतेचा पुरस्कार करते. ही असमान व्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र अशी असल्यामुळे ती व्यवस्था वरच्या वर्गांच्या लोकांचे पोषण आणि शूद्र, अतिशूद्र लोकांचे मानसिक, आर्थिक, शारीरिक शोषण करते. वरच्या तीनही वर्णांची सेवा शूद्र, अतिशूद्राने करावी, असा मनुस्मृतीचा कायदा सांगतो आणि हा कायदा मानणारी माणसेच हिंदू राष्ट्र या संकल्पनेला मान्यता देणारी आहेत. हिंदुस्थानात शूद्रातिशूद्र माणसाला प्राण्यापेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली जात होती हे सर्वश्रुत आहे. भारतीय संविधानाने शोषित, पीडित, वंचित माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.
भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे स्वतंत्र संविधान लिहिले गेले. ब्रिटिशांचा अंमल या देशावर 150 वर्षे होता; पण तत्पूर्वीही फे्रंच, डच, मोगल, पोर्तुगीज, ग्रीक अशा अनेकांनी या देशावर राज्य केले. एकूण 1,250 वर्षे या देशाला गुलामीत काढावे लागले. (संदर्भ : ‘मराठोंका इतिहास हारो की दास्तान’ लेखक – ओशा) त्याला कारणच या देशातील वर्ण, जातीव्यवस्था आहे. गांधीजींच्या ‘भारत छोडो’ या आंदोलनास (1942) भारतीय माणसाने (सर्वच जाती, धर्म, पंथाचे लोक) पाठिंबा देऊन त्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला, हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. जनरेट्यामुळे आणि गांधीजींच्या कणखर नेतृत्वाने ब्रिटिशांना इथली सत्ता सोडावी लागली; पण या देशातून जाताना त्यांनी देशाची फाळणी करावी यासाठी बॅरिस्टर जिना आणि सावरकर आग्रही होते. या फाळणीचे दुष्परिणाम काय भोगावे लागले, हा इतिहास कोणीही विसरणे शक्य नाही. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र म्हणून जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेला. त्या स्वतंत्र भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. या देशात बाबासाहेब आंबेडकरांना अगदी बालवयापासून जातीयतेचे चटके सहन करावे लागले. उच्चविद्याविभूषित असतानाही जातीव्यवस्थेने त्यांचा अमानुष छळ केला. Mr. Gandhi I have no motherland असे जेव्हा डॉ. बाबासाहेब म्हणत यावरून जातीव्यवस्था मानणार्‍या माणसांनी त्यांचा किती छळ केला असेल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. डॉ. आंबेडकरांसाठी संविधान सभेची दारे-खिडक्या बंद करण्याची भाषा करणार्‍या तत्कालीन राज्यकर्त्यांना मात्र संविधान लिहिण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच पाचारण करावे लागले. ही गोष्ट प्रत्येक भारतीय माणसाला विचार करायला लावणारी आहे. हा इतिहास खूप मोठा आहे. त्यामुळे तो इथे नमूद करता येणार नाही आणि ते शक्यही नाही.
भारत देशाची राज्यघटना लिहून दि. 26 नोव्हेंबर 1949 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केली. (ही राज्यघटना संसदीय पद्धतीची आहे.) ‘आम्ही भारताचे लोक’ या प्रस्तावनेसह स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुःसूत्रीत भारतीय नागरिकांना एकत्र गुंफण्यात आले. शिवाय श्रद्धा, उपासना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दर्जाची व संधींची समानता या उदात्त विचारांचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याने भारतीयांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आणि आनंदी गीतांचे सूरही वातावरणात घुमू लागले. हजारो वर्षे जाती, धर्म, पंथांच्या रुढीत बांधला गेलेला शोषित माणूस मुक्तपणे श्‍वास घ्यायला लागला. स्वतंत्र देशात भारतीयांची विकासाकडे वाटचाल सुरू झाली. स्वातंत्र्याचा खरा अर्थ लोकांना समजू लागला.
श्रद्धा आणि उपासनेच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ व्यक्तीगत स्वरूपाची उपासना असा आहे. सार्वजनिक ठिकाणी मात्र पूजाअर्चा करण्यास संविधानाने मज्जाव केला आहे. असे असतानाही संविधानाने दिलेल्या निवडणूक प्रक्रियेतून मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मात्र शासकीय पूजा करताना दिसतात. याचा अर्थ ते गुन्हा करीत असतात. गुन्हा करणार्‍या या लोकांना भारतीय संविधान समजलेले नाही किंवा त्यांना ते मान्य नाही, असे खेदाने म्हणावे लागते. संविधानाच्या उद्देशिकेतील शब्दांचा मूळ अर्थ बदलवून गैरवापर करणे सुरू आहे. हा राष्ट्रद्रोह नव्हे का? ज्या-ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या प्रामाणिक कर्तव्याशी बेईमानी करून ‘भारतीय माणूस’ स्वस्थ कसा राहू शकतो? आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद कसा घेऊ शकतो?


भारत की हिंदुस्थान?


‘भारतीय’ ही आपली ओळख जगात ‘भारत देश’ या नावासोबत जोडलेली आहे, की ‘हिंदुस्थान’ या शब्दासोबत? हिंदू हा शब्द कोणत्याही धर्मग्रंथात नाही. तो मुळात पर्शियन शब्द आहे असे अनेक विचारवंत, इतिहासकार यांचे मत आहे. तेव्हा हिंदुस्थान हा शब्दप्रयोग करणे मुळातच चुकीचे आहे. ज्याला हिंदू धर्म म्हणतात तो वैदिक धर्म म्हणजे वर्णव्यवस्थेतील वरच्या वर्णाच्या लोकांचा आहे. कालांतराने सिंधू संस्कृतीमधील द्रविड लोकांवर, अनार्यांवर तो धर्म लादला गेला आणि मग हिंदू धर्म या अर्थाने तो रुढ झाला आणि त्याच अनुषंगाने देशाला हिंदुस्थान म्हटले गेले. हिंदुस्थान किंवा हिंदू राष्ट्र जेव्हा संबोधले जाते, तेव्हा आपला संबंध येतो तो मनुस्मृतीशी, मनुस्मृतीमधील असमान कायद्यांशी, चातुर्वर्ण्य व्यवस्थेशी, त्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ या भावनेशी म्हणजेच मालक आणि गुलाम यांच्याशी जोडणार्‍या असमान व्यवस्थेशी, अमानवी कायद्यांशी. एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या वर्ण, जातीच्या लोकांना वेगवेगळी शिक्षा आहे. म्हणजेच असमानता, जातव्यवस्था वृद्धींगत करणारी ही व्यवस्था आहे, हे सुजाण नागरिकाला सांगण्याची गरज नाही. ‘ब्राह्मण कितीही असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ असं गुणगान करणारी ही व्यवस्था. म्हणूनच प्रश्‍न पडतो, की भ्रष्ट माणूस कसा काय श्रेष्ठ होऊ शकतो? विवेकवादी माणसाने यावर विचार करणे अधिक योग्य राहील. तथाकथित वरच्या वर्णाला सौम्य शिक्षा; पण त्याच गुन्ह्यासाठी शूद्र-अतिशूद्र माणसाला कठोर शिक्षेची तरतूद हिंदू धर्मप्रणित मनुवादी व्यवस्थेत आहे. मग या व्यवस्थेत मानवी मूल्यांचं काय?
भारतीय संविधानाने एका गुन्ह्यासाठी सर्वच माणसाला सारख्या शिक्षेची तरतूद केली आहे. ही आहे समान न्यायाची योग्य व्यवस्था जी समतेचा पुरस्कार करते. मात्र, हिंदू धर्म जो चातुर्वर्ण्यप्रणित आहे, तो असमानतेचा पुरस्कार करतो. सर्वच माणसे एकाच ईश्‍वराची लेकरे आहेत, असे सांगणारा धर्म आणि तो मानणारी माणसे प्रत्यक्ष आचरणाने शूद्रांना नीच मानतात. ही आहे असमानता, चातुर्वर्ण्यप्रणित, मनुस्मृतीप्रणित. हेच उद्दिष्ट आहे, हेच अपत्य आहे हिंदू राष्ट्र संकल्पनेचे. जर हिंदू हा शब्द भारतीयांना नाही आणि या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपण स्वतःला कधीही हिंदू म्हणवून घेणार नाही. मग गर्व से कहो…… असं म्हणण्याचा प्रश्‍नच येत नाही. “मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय असं अभिमानाने म्हणणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आम्हाला अभिमान असावा; पण तसं होत नाही. कारण जातव्यवस्था, धर्माची शिकवण आम्हाला तसं म्हणण्याची परवानगी देत नाही, ही शोकांतिका आहे, हे दुर्दैव आहे या देशातील लोकांचं.”
ज्या भारतीय संविधानाने लोकशाहीमूल्ये प्रस्थापित करून प्रत्येकाला समान अधिकार दिले. त्याचबरोबर नागरिकांची जबाबदारी आणि कर्तव्येही सांगितली, त्याच भारत देशातील नागरिक बेजबाबदारीने वागतात. अलीकडे होणार्‍या, घडवून आणलेल्या घटनांनी संवेदनशील माणसाचं मन सुन्न होते, त्याच्या मनाच्या ठिकर्‍या-ठिकर्‍या होतात हे वास्तव आहे. नागरिकांच्या आहारविहार, आचार, पोशाख यांवरही बंदी घातली जात आहे. अमुक एक जात गोमांस भक्षण करते म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ले होतात. यज्ञामध्ये गाईंचा बळी देऊन ते मांस भक्षण करणारे वैदिक लोक उच्चवर्णीय होते? मग आज त्यासाठी अमानुष हल्ला करण्याचं काय कारण? हासुद्धा जातीय अन्यायाचा, राजकीय षड्यंत्राचाच एक भाग आहे. हल्ली आंतरजातीय विवाह करणार्‍या तरुण-तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळले जाते, तरुणींची विटंबना केली जाते. लग्नप्रसंगी बॅण्ड वाजवून घोड्यावरून मिरवणूक काढणार्‍या नवरदेवाला मारहाण केली जाते आणि बघ्यांचा एक समूदाय तो आनंदोत्सव साजरा करतो, हे दृश्य समाजमाध्यमांवर पाहायला मिळते. प्रियंका भोतमांगे ते मनिषा वाल्मिकीवर झालेला अत्याचार, त्यांच्यावर झालेला अन्याय, जातीव्यवस्थेचे एक लक्षण आहे. निर्भयाला वेगळा न्याय आणि प्रियंका, मनिषा वाल्मिकी यांच्यावर सामाजिक आणि राजकीय अन्याय होतो. न्यायदेवतेच्या दरबारातसुद्धा अन्यायच, हे सुदृढ सामाजिक मानसिकतेचं लक्षण नाही. धर्मनिरपेक्ष देशातल्या माणसाचे मानसिक स्वास्थ्य जातीय रोगाने ग्रासलेले असल्याचे एक उदाहरण आहे. ही देशाच्या सामाजिक एकतेला लागलेली कीड आहे. म्हणूनच अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होताना दिसते. हिंगणघाटमध्ये झालेला तरुणीवरचा अन्याय, मुंबईतल्या पत्रकार मुलीवर झालेला अन्याय, सहा वर्षे वयाच्या आसिफा या बालिकेवर बीजेपीच्या लोकांनी केलेला बलात्कार आणि तोही कृष्णाच्या मंदिरात? देव जागृत असतो असं सांगणार्‍यांना प्रश्‍न विचारावासा वाटतो, की त्यावेळी कृष्ण अर्जित रजेवर होता का? काय दर्शवितात या घटना? पाणी निसर्गाने निर्माण केले. त्यावर सृष्टीवरील प्रत्येक जीवाचा अधिकार आहे. पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या आसिफ नावाच्या शाळकरी मुलावर हल्ला केला जातो. हे भारतीय माणसाची मानसिकता रोगट असण्याचे लक्षण नव्हे काय? पाण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला, हा इतिहास साक्षी आहे. एका विशिष्ट जातीच्या माणसांवर हल्लेच होत राहावेत आणि हा देश पुन्हा विभाजित व्हावा असेच राज्यकर्त्यांचे मनसुबे असावेत, हीच तर संकल्पना आहे हिंदू राष्ट्राची.


सबका विनाश!


जगातील अनेक देश आपल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी देशाच्या प्रगतीचा, विकासाचा आलेख उंचावण्यास सतत प्रयत्नशील असतात. मात्र माझ्या स्वतंत्र ‘भारत’ देशात ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत देशाला भकास केलं जात आहे. देशातील सार्वजनिक उद्योग भांडवलदारांना विकले जात आहेत. नोटाबंदी, जी.एस.टी.च्या नावाखाली सामान्य माणसाचं जगणं मुश्किल केलं जात आहे. कृषीप्रधान असलेल्या देशात शेतकर्‍यांना कृषी बिलाविरोधात संप करावा लागतो आणि त्यांच्यावरही हल्ले केले जातात. काय हा देश, इथली माणसं खरच स्वतंत्र आहेत? 1945 साली जपान देशात हिरोशिमा, नागासाकी या शहरांवर बॉम्ब टाकून त्या देशाला उद्ध्वस्त केले. तरी तो देश 75 वर्षांत नव्याने उभा राहिला. इतकेच नव्हे, तर जगाची बाजारपेठ काबीज केली आणि आर्थिकदृष्ट्या पुन्हा तो संपन्न झाला, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या नेत्रदीपक यशामागे तिथल्या राज्यकर्त्यांचा दुर्दम्य आशावाद दिसून येतो. प्रत्येक माणूस समान आहे, त्याला समान अधिकार आहेत, हे सूत्र या यशामागे आहे. याचा विचार भारतीय राज्यकर्त्यांनी कधी करावा? फिनलॅन्डसारख्या देशात तिथल्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च सरकार करते. इथे मात्र मूलभूत हक्कांपासूनही नागरिकांना वंचित राहावे लागते, शिक्षणावर बंदी घातली जाते. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो, देश प्रगत होतो, हे सूत्र आहे विकासाचं. महात्मा फुलेंपासून तर शाहू महाराज, पेरियार रामस्वामी, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांनी शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादीत केलेले आहे. या देशात मात्र त्यांच्या नावाचा वापर करीत शिक्षणालाच सुरुंग लावला जात आहे. ज्यांचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही किंवा जे नावापुरते शिकलेले असतात, ते शिक्षण सम्राट होतात! हीच निर्मिती आहे हिंदू राष्ट्र संकल्पनेची. मराठी भाषेचा आग्रह धरणारे महाभाग स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात आणि सामान्य, गरिबांच्या मुलांना मराठी शिकण्याचा आग्रह करतात, नव्हे तशी बंधने घातली जातात. ही आहे संकल्पना हिंदू राष्ट्राची.
चातुर्वर्ण्यवस्थेतील वरच्या वर्णाची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेतात, नोकरी करतात आणि सुखाने आपले जीवन व्यतीत करतात. शूद्र आणि अस्पृश्यांची मुले मात्र देवाधर्माच्या नशेत असतात. नव्हे, त्यांना ती अफू जाणीवपूर्वक दिली जाते. मग ही मुले/माणसे, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, देवधर्म श्रेष्ठ असल्याचे गुणगान करतात. शिवाय लोकप्रतिनिधी यात भर घालण्याचे काम करतात आणि त्यात ते यशस्वी होतात. चौथा वर्ग शिकलेला उच्चवर्णीय अल्पशिक्षित माणसाचे भविष्य ठरवितो आणि बहुजन समाजातील माणसे याचा बळी ठरतात. बहुजनांनी स्वतःचा मेंदू उच्चवर्णियांकडे गहाण टाकलेला आहे. त्यांच्या हातचे बाहुले बनण्यास त्यांना अपमान वाटत नाही. हे सारे असेच अव्याहत राहण्यासाठीच तर आहे हिंदू राष्ट्राची संकल्पना?


धर्मग्रंथांची चिकित्सा महत्त्वाची


बहुजन समाजातील बुद्धीजीवी वर्गाने धर्म आणि धर्मग्रंथ यांची चिकित्सा करावी; पण तसे होत नाही. कारण धर्म सांगतो नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ विचारू नये. हीच आहे बौद्धिक मानसिक गुलामी. बुद्धिजीवी माणसं प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतात. व्यवस्थेला प्रश्‍न विचारतात आणि त्यांनी प्रश्‍न विचारू नयेत, म्हणूनच ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय वरवरा राव, आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज या साहित्यिकांना कैदेत ठेवले जाते. सरकारी यंत्रणा हे काम चोखपणे करते, हीच तर उत्पत्ती आहे हिंदू राष्ट्र संकल्पनेची.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, त्याची गळचेपी होत आहे. वेदपूर्व काळातसुद्धा याज्ञवल्क्य ऋषींनी गार्गी आणि मैत्रायणी या विदूषीची मुस्कटदाबी केली. त्यावेळी जनमाणसं कदाचित निद्राधीन असेल; पण आज तर लोक उच्चविद्याविभूषित आहेत. असे असतानाही संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्कही हिरावून घेतला जातो. 2019 मध्ये यवतमाळमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामधून नयनतारा सहगल या ज्येष्ठ साहित्यिकेला भाषण देण्यास मनाई केली, हे जगजाहीर आहे. या घटनेचा साहित्यकांनी निषेधही नोंदविला. त्याच काळात अनेक साहित्यिकांनी शासनाचे पुरस्कार नाकारले. तुलसीदासांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘ढोर, गवार, पशु, शूद्र नारी सब ताडन के अधिकारी’ अशी अवस्था आजही आहे. माथेफिरू माणूस संविधानाची प्रत संसदेसमोर जाळतो आणि सगळा गोदी मीडिया शांत असतो. देशाचे जबाबदार प्रधानमंत्री यावर अवाक्षरही काढत नाहीत. कारण ते संघप्रणित व्यवस्थेचे गुलाम आहेत. या देशातील प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 2 जुलै 2018 ला जगन्नाथपुरी मंदिरात प्रवेश नाकारला जातो. काय दर्शवितात या घटना? (कोविंद वर्णव्यवस्थेनुसार शूद्र जातीचे आहेत) इथे प्रश्‍न आहे तो समानतेचा, नव्हे की मंदिरातील देवाच्या पूजेचा.
ज्यांना संविधानाचा गंधही नाही, जे कधीही संविधान वाचत नाहीत, ते संविधानप्रेमी कसे होऊ शकतात? या देशाचे ‘भारत’ हे नाव आदराने घेतले जाते. कारण हा देश बुद्ध, महावीर, सम्राट अशोक, शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, संत तुकडोजी, संत गाडगे महाराज, पेरियार रामस्वामी यांचा देश आहे. याच महामानवांनी या देशाला जगात सर्वोच्च स्थानी नेले. बुद्धाने विज्ञाननिष्ठ धम्म या देशाला दिला. बुद्धाचं तत्त्वज्ञान जगाने स्वीकारलं. मात्र, याच देशातील संरक्षणमंत्री राफेल या लढाऊ विमानाला लिंबू मिरची बांधतात. यज्ञ केल्याने देशाचे संरक्षण होते, अशी या देशातील लोकप्रतिनिधींची विज्ञाननिष्ठा? कोरोनाच्या संक्रमण काळात आरती केल्याने, दिवे लावण्याने, थाळ्या वाजविल्याने कोरोना नष्ट होतो, असे सांगणारे भारताचे प्रधानमंत्री? मेंदूचा वापर न करता अकलेचे तारे तोडतात, ते विज्ञाननिष्ठ कसे काय होऊ शकतात? विज्ञान माणसातील अंतर्गत शक्तीचा वापर करते, नवी दृष्टी देते, नवीन शोधण्याच्या दृष्टीने वाटचाल करायला शिकविते; पण इस्टेटीसाठी नरबळी देणारी उच्चशिक्षित माणसेही या देशात आहेत. एलम्मा देवीच्या यात्रेत उच्चशिक्षित माणसाची उच्चशिक्षित मुलेही देवीची विवस्त्र पूजा करतात. हीच तर आहे उत्पत्ती हिंदू राष्ट्राची.
हिंदू राष्ट्र ही संकल्पना रुजविणार्‍या माणसाचे मेंदू कुजत आहेत. त्यातून येणारी दुर्गंधी सामान्य माणसाचे जगणेही कठीण करित आहे. एका विशिष्ठ वर्गाची, उच्चवर्णियांची सत्ता पूर्ण देशावर असावी, हा उद्देश आर.एस.एस. प्रणित लोकांचा आहे. तेव्हा संविधानप्रेमी लोकांनी हे ओळखून सावध राहणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या करणार्‍या गोडसेचे समर्थन केले जाते. सनातन संस्थेचे लोक ज्यांनी नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांची हत्या केली आणि खुनी अजूनही सापडत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे? ज्या संघटनेवर अनेक वर्षे बंदी होती, त्याच संघटनेच्या प्रमुखांच्या इशार्‍यावर देश चालत असेल, तर देश भकासच होणार ना? असमानता, गुलामीला जन्म देणारी हिंदू राष्ट्र ही संकल्पना संविधानप्रेमी नागरिकांना मान्य आहे का?


स्त्री स्वातंत्र्याची आवश्यकता


ज्या देशात स्त्रीची देवी म्हणून पूजा होते, त्याच देशात तिची विवस्त्र धिंड काढली जाते आणि लोक ते बघत असतात. भारतमातेचा जयजयकार करणार्‍या माणसांनो एका जीवंत आईला विवस्त्र केले जाते तरी आपण शांत बसावे, हा षंढ्पणा नव्हे काय? या देशातील शूरवीरांना, या देशातील शोषितांना न्याय द्या, त्यांचे संरक्षण करा. ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, मागास भटके या देशाचे भूमिपूत्र आहेत हे विसरू नका. ज्या मनुस्मृतीने माणसा-माणसात भेद निर्माण केला, जी मनुस्मृती या देशाला विभाजित करते, अशा जाती-धर्माच्या उच्च-नीचतेच्या नावाखाली देशाला विभाजित करणार्‍या मनुस्मृतीचं पुन्हा एकदा दहन करा. (25 डिसेंबर 1927 ला महाड या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केली.) शिवाजी राजेंच्या देशात असे होत असेल, तर आपण त्यांचे अनुयायी कसे म्हणता येईल? या महान देशातील शूरवीरांनो हिंदू राष्ट्र संकल्पनेला फाटा द्या आणि करा दहन मनुस्मृतीचं. देशाचं विभाजन जातीच्या, धर्माच्या नावाखाली केले जाते, त्या शक्तीचा नायनाट करा. भारताच्या स्वातंत्र्यासाठी, हा देश बलशाली करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणार्‍या महापुरुषांचे स्मरण करा. त्यांच्या कार्यांचे स्मरण करा आणि त्यांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीचं कर्तव्यनिष्ठतेने पालन करा.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. शिवाजी राजे शूद्र आहेत म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारणारे कोण होते? त्यांचा खजिना लुटणारे कोण होते? डाव्या पायाच्या अंगठ्याने त्यांच्या कपाळावर तिलक लावणारे कोण होते? शाहू महाराजांना कुणबट म्हणणारे कोण होते? महात्मा फुलेंना मारायला मारेकरी पाठविणारे कोण होते, हे आठवा. करा इतिहासाचे स्मरण. या विनाशक प्रवृत्तीचा नायनाट करा. ही जबाबदारी या देशातील सुबुद्ध नागरिकांची, तरुणांची आहे.


समरसता नको समता हवी!


तरुणांनो तुम्हाला बेरोजगार कोणी केले? तुमचा शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक विकास कोणी थांबविला? तर याचे एकच उत्तर आहे. भारतीय संविधान मान्य नसणार्‍या लोकप्रतिनिधींनी. आर.एस.एस.प्रणित मानसिकता असणार्‍या लोकांनी. कारण त्यांना तुम्हाला गुलामीत ढकलायचे आहे. मनुस्मृती लादून वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेची श्रृंखला घट्ट करायची आहे. डारीीं खपवळर, ऊळसळींरश्र खपवळर ही केवळ स्वप्नं आहेत, तुम्हाला नागविण्यासाठी, संविधान विरोधात जाण्यासाठी. उच्चवर्णियांनी अनेक वर्षे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आरक्षणाचा लाभ घेतला. मात्र, आता तेच आरक्षणविरोधी घोषणा देतात. गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उमटवितात. कशासाठी? समरसता या गोंडस नावाखाली तुम्हाला गुलामी मान्य करायला लावणारी ही व्यवस्था अप्रत्यक्षपणे तुमचं शोषण करून तुमच्या मानगुटीवर बसली आहे. 2018-2019 या वर्षांत एम.पी.एस.सी.ची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या 347 मुलांना शासकीय सेवेत रुजू करून घेण्यास नकार दिला. कारण ते वर्णव्यवस्थेने शूद्र आहेत म्हणून. काय दर्शवितात या घटना? काय तुम्ही गुलाम आहात या स्वतंत्र देशात? नाही ना? मग करा उद्ध्वस्त ही असमान व्यवस्था, जी तुमची वैचारिक शक्ती नष्ट करू पाहते. देवाधर्माच्या नादी लावून तुमचे शोषण होत आहे, तुमचा विकास थांबलेला आहे. त्यातच तुम्हाला गुंतवून ठेवलं आहे. मंदिरं माणसाला गुलामीकडे नेतात. वाचनालये तुम्हाला विकासाचा मार्ग दाखवितात. ठरवा तुम्हीच, कोणता मार्ग योग्य आहे? राम मंदिराच्या उभारणीसाठी करसेवेत (अयोध्या) किती आणि कोणती माणसे मारली गेली? ज्योतिषशास्त्राशी तुमचे काहीही घेणे देणे नाही. जगातले शास्त्रज्ञ भकंस ज्योतिषाच्या मागे लागत नाहीत. कारण मेंदू गुलाम ठेवण्याची ही व्यवस्था आहे. वाचा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे ब्राह्मणांचे कसब, त्यांचे समग्र वाङ्मय. भारत देश गुलामीपासून वाचविण्याचं काम तुम्हांला करायचं आहे, उद्ध्वस्त होत असलेल्या भारताला बलशाली बनवायचं आहे, पुन्हा सर्वोच्च स्थानी विराजमान करायचं आहे. इतिहास तुमचा कृतज्ञ राहील.
हिंदू राष्ट्र संकल्पना ही शोषणव्यवस्थेचे दुसरे नाव आहे. वरवर व्यापक वाटणारी ही संकल्पना बहुजनांचे जगणे मातीमोल करणारी आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार शूद्र-अतिशूद्र, तेली, माळी, कुणबी, चांभार, सोनार, लोहार इ. अनेक अठरापगड जाती शिवाजी महारांजाच्या सैन्यात होत्या. अष्टप्रधान मंडळात बहुतांश मुस्लिम होते. धर्म आणि जातीच्या नावाखाली या देशाचे विभाजन करण्याचं काम संविधान मान्य नसणार्‍या लोकांकडून होत आहे. बहुजन समाजाने सुज्ञ व्हावे. तुम्हाला गुलाम होणं मान्य आहे का? नाही ना! तर मग करा संरक्षण संविधानाचं, करा पुनर्निर्माण बलशाली भारत देशाचं आणि करा जयघोष सर्व मिळून ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.’

–  विमल शेंडे (लेखिका ज्येष्ठ विचारवंत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.