शाहरूख खानचा ‘जवान’- प्रा. अविनाश कोल्हे

शाहरूख खानचा ‘जवान’- प्रा. अविनाश कोल्हे

Photo Courtesy : Adgully.com

आजच्या सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात व्यवस्थेबद्दल, सामान्य माणसाच्या हतबलतेबद्दल, राजकारणात सदैव दिसत असलेल्या अमानुष भ्रष्टाचाराबद्दल चीड आहे. ही चीड या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आज आपण असं अनेक ठिकाणी बघत असतो, अशा घटनांबद्दल वाचत असतो, की गुन्हे, भ्रष्टाचार धनदांडगे करतात. पण जर ते पकडले गेले तर बळीसाठी एखादी गरीब व्यक्ती समोर केली जाते. ‘जवान’ मध्ये याविरूद्ध आवाज उठवणारा नायक आणि त्याचा तरुण मुलगा दाखवला. त्याच्या जोडीने पाच-सहा तरुणी आहेत. हेसुद्धा काळजीपूर्वक केलेले आहे.

Photo Curtsey : Koimoi.com

भारतातील हिंदी चित्रपटसृष्टी जगात सर्वात जास्त चित्रपट बनवते. मात्र प्रदर्शित झालेले बहुसंख्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटतात. एका अभ्यासकाने दाखवून दिल्याप्रमाणे हिंदी चित्रपट ‘यशस्वी’ होण्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसते. अशा स्थितीत शाहरूख खानच्या ‘जवान’ला जे जबरदस्त यश मिळाले आहे, तसे अलीकडे प्रदर्शित झालेल्या एकाही हिंदी चित्रपटाला मिळालेले नाही. यामुळेही असेल कदाचित, या चित्रपटाची अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. यात दुसरी दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, आज जमाना रणवीर सिंग, रणवीर कपूर वगैरे तरूण नटांचा असूनही शाहरूख खानसारखा साठीच्या जवळ आलेला नट केवढा जबरदस्त हिट सिनेमा देतो, याचीसुद्धा खास दखल घ्यावी लागते. तिसरा मुद्दा म्हणजे, ‘जवान’ची निर्मिती शाहरूखच्या ‘रेड चिली’ या कंपनीने केलेली आहे. थोडक्यात, ‘जवान’मध्ये शाहरूख फक्त ‘हिरो’ नाही तर ‘निर्माता’सुद्धा आहे. यात शाहरूखचा डबलरोल आहे. वडील आणि मुलगा अशा दोन्हीही भूमिका शाहरूखने विलक्षण ताकदीने सादर केल्या आहेत. ‘जवान’च्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या चित्रपटासाठी शाहरूखने दक्षिण भारतातील दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञांना पाचारण केले होते. या चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली आहे. अ‍ॅटलीचा जरी हा पहिलाच हिंदी चित्रपट असला तरी त्याने ‘थेरी’, ‘मेर्सेल’, ‘बिगील’ वगैरे चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. वयाचा विचार केला तर असे दिसेल, की अ‍ॅॅटली (जन्म : 1986) अगदीच तरूण आहे. असे असूनही शाहरूखने त्याच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी टाकली आणि त्याने ती यशस्वी करून दाखवली.
समाजात बदल होत असल्याचा पुरावा
‘जवान’ पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे. त्याची कथा तशी वेगळी नाही. आजच्या सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात व्यवस्थेबद्दल, सामान्य माणसाच्या हतबलतेबद्दल, राजकारणात सदैव दिसत असलेल्या अमानुष भ्रष्टाचाराबद्दल चीड आहे. ही चीड या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आज आपण असं अनेक ठिकाणी बघत असतो, अशा घटनांबद्दल वाचत असतो, की गुन्हे, भ्रष्टाचार धनदांडगे करतात. पण जर ते पकडले गेले तर बळीसाठी एखादी गरीब व्यक्ती समोर केली जाते. ‘जवान’ मध्ये याविरूद्ध आवाज उठवणारा नायक आणि त्याचा तरुण मुलगा दाखवला. त्याच्या जोडीने पाच-सहा तरुणी आहेत. हेसुद्धा काळजीपूर्वक केलेले आहे. आजची तरुण स्त्री अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या लढ्यात उतरू शकते, हे याद्वारे अधोरेखित केले आहे. चित्रपटाची नायिका नर्मदा ‘कुमारी माता’ दाखवली आहे. एका प्रसंगात नर्मदा शाहरूखला स्पष्टपणे सांगते, की ती एका पुरुषाच्या पे्रमात होती. त्याच्याशी शरीरसंबंध आले, त्यातून ती गरोदर झाली. त्याने तिला गर्भपात कर, तरच तुझ्याशी लग्न करेन अशी अट घातल्यावर मी त्याला सोडले.. आता तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या पाच वर्षांच्या मुलीची परवानगी घ्यावी लागेल.’ चित्रपटातला प्रसंग तसा फार महत्त्वाचा आहे. 1970 च्या दशकात आलेल्या ‘आराधना’त शर्मिला टागोरवर असाच कुमारी माता होण्याचा प्रसंग येतो, तर तिला मूल वाढवण्यासाठी केवढा त्याग करावा लागतो. आपल्या समाजात बदल होत आहेत, याचा हा पुरावा.


या संस्थांबद्दल भारतीय जनमानसात आदराची भावना


याच्या जोडीने या चित्रपटात गुप्तहेर खात्याची प्रमुखसुद्धा एक तरुण स्त्री (नर्मदा) दाखवली आहे. जेम्स बॉन्डच्या ‘गोल्डन आय’, ‘स्काय फॉल’ वगैरे चित्रपटात ‘एम.आय 6’ या ‘ब्रिटिश हेरखात्याची प्रमुख’ ही भूमिका श्रीमती जुडी डेंच या महिलेने सादर केलेली आहे. शिवाय कथानकात ‘भारतीय सैन्य’ हा घटकसुद्धा सफाईने विणला आहे. आज आपल्या देशात ‘सर्वोच्च न्यायालय’ आणि ‘भारतीय सैन्य’ या दोनच संस्था उरल्या आहेत, ज्यांच्याबद्दल भारतीय जनमानसात आदराची भावना आहे. ‘जवान’मधला संघर्ष नेहमीचे राजकीय नेते, त्यांनी पाळलेले गुंड, सरकारी कामाची कंत्राटं घेणारे कंत्राटदार वगैरे खलनायक विरुद्ध मूठभर देशप्रेमी तरुण असा आहे. म्हणूनच म्हटलं आहे, की कथा तशी जुनी असली तरी दाक्षिणात्य कलाकारांनी कथेला दिलेली ट्रिटमेंट वेगळी असल्यामुळे अडीच तासांचा चित्रपट कंटाळवाणा होत नाही. पण काही तरी वेगळं बघायला मिळेल, अशी अपेक्षा ‘जवान’ पूर्ण करत नाही.  
विक्रम राठोड (शाहरूख) हा भारतीय सैन्यदलातला एक तरूण कर्तृत्ववान अधिकारी. एका मोहिमेवर असताना जवानांच्या बंदुका काम करत नाहीत. शस्त्रपुरवठा करणारा कंत्राटदार कालीच्या (विजय सेतुपती) विरोधात सैन्याधिकारी विजय राठोड उभा राहतो. त्यामुळे चिडलेला काली विक्रम राठोडला मारतो, त्याच्या पत्नीला ऐश्‍वर्याला (दीपिका पदुकोण) तुरुंगात पाठवतो, खोटे पुरावे उभे करून तिला फाशीची शिक्षा मिळवून देतो. ऐश्‍वर्या गर्भवती असल्यामुळे फाशीची शिक्षा पुढे ढकलली जाते. मात्र मुलाला आझादला (शाहरूख) जन्म दिल्यावर तिला फाशी दिली जाते. तुरुंगातील एक महिला अधिकारी आझादला मोठा करते. नंतर आझाद त्याच जेलचा जेलर म्हणून नियुक्त होतो. आता आझाद तुरूंगातल्या मूठभर तरुण कैद्यांच्या मदतीने रूप बदलून आझाद अनेकांना न्याय मिळवून देतो. या निमित्ताने या चित्रपटात कष्ट करणार्‍या तरीही आत्महत्या कराव्या लागणार्‍या शेतकर्‍यांच्या समस्या येतात. या प्रकारे सरकारची अब्रू वेशीवर टांगणार्‍या आझादला पकडण्यासाठी नर्मदाची (नयनतारा) टीम त्याच्या मागे लागते.


…‘जवान’ याला अपवाद ठरत आहे


दुसरीकडे, आझादसुद्धा कालीशी दोन हात करतो. आझाद अडचणीत असतानाच विक्रम राठोड पुन्हा येतो. नंतर आझाद आणि राठोड कालीच्या विरोधात आघाडी उघडतात. हिंदी सिनेमात शोभेल असा प्रसंग म्हणजे स्मृतीभ्रंश झालेल्या राठोडला योग्य वेळी सर्व काही आठवते. शाहरूख चित्रपटाच्या शेवटी राजकीय भाष्य करतो आणि देशातील नागरिकांना आवाहन करून मतदानाचा अधिकार योग्य प्रकारे वापरा, असे सांगतो. येथे आपल्याला भारतात असलेल्या दोन भिन्न राजकीय संस्कृतींची दखल घ्यावी लागते. उत्तर भारताची आणि दक्षिण भारताची संस्कृती. दक्षिण भारतातील चित्रपट ठसठशीत राजकीय भूमिका घेतात. उत्तर भारताच्या संस्कृतीचा पगडा असलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये राजकीय विधानं अभावानेच आढळतात. शाहरूखचा ‘जवान’ याला अपवाद ठरत आहे. या सिनेमात भावनिक आशय ठासून भरला आहे. एक संवाद बघा ‘उसूलों पर जहाँ आँच आए तो टकराना जरूरी है, कोई जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरूरी है.’ या संवादांमागे सुमित अरोराची लेखनी आहे. त्याचे अनेक संवाद हमखास टाळ्या मिळवून देणारे आहेत. ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ ‘चाहिए तो आलिया भट्ट. लेकिन उम्र में वो थोडी छोटी है’ वगैरे संवाद खटकेबाज आहेत.


विजय सेतुपती चतुरस्त्र नट


आता शेवटचा मुद्दा. गेलेल्या काही महिन्यांपासून हिंदी चित्रपटसृष्टीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा एक प्रकारे धसका घेतला आहे. याची सुरुवात ‘पुष्पा’पासून झाली. या दरम्यान बॉलिवूडचे काही चित्रपट जरी गाजले, तरी ‘जबरदस्त कमाई’ ही बाब दाक्षिणात्य सिनेमांच्या नावावर होती. यामागे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे, या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान या अभिनेत्रींना तसं फारसं काम नसलं तरी त्यांच्या भूमिका लक्षात राहतात. दीपिका छोट्या भूमिकेतही प्रभाव पाडते. चित्रपटाची सर्व धुरा शाहरूख खानवर आहे. त्याच्या जोडीला नयनतारा आणि विजय सेतुपती आहेत. या दोघांनी शाहरूखला योग्य साथ दिली आहे. नयनताराला मध्यंतरानंतर फारसं काम नाही. हे जरी खरं असलं तरी तिची अदाकारी लक्षात राहते. विजय सेतुपती चतुरस्त्र नट आहे. तो नायकाच्या भूमिकेत असो की खलनायकाच्या, तो छाप पाडतोच. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘थोडासा वेडसर पण उलट्या काळजाचा’ खलनायक प्रथम दिसला तो ‘शोले’तील गब्बरसिंगच्या रूपाने. त्या प्रकारचा खलनायक सेतुपतीने ‘जवान’मध्ये साकार केला आहे.
काही समीक्षक ‘जवान’वर उचलेगिरीचा आरोप करतात. ‘जवान’मध्ये थोडासा ‘गजनी’ आहे, थोडासा ‘चक दे’ आहे, थोडासा ‘गब्बर इज बॅक’ आहे वगैरे आरोप झाले. या आरोपांत तथ्य आहेच. तसं पाहिलं तर अनेक हिंदी चित्रपट उचलेगिरी करून काढले असतात. ‘रोमन हॉलिडे’च्या ‘चोरी चोरी’, ‘दिल है के मानता नही’ वगैरे कॉप्या नव्हत्या का? खुद्द ‘शोले’तील कितीतरी प्रसंग अनेक परदेशी सिनेमांतून उचलले होते. मुळात अशा प्रकारे भाडोत्री गुंड आणून डाकुंचा नायनाट करायचा, ही आयडियाच मुळी ‘सेव्हन सामुराई’ या जपानी चित्रपटातून घेतली. धर्मेंद्र गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढतो ही आयडिया ‘सिक्रेट ऑफ सांता व्हिक्टोरिया’ या चित्रपटातून घेतली आहे. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे अशी उचलेगिरी करून त्यातून काही तरी चांगलं जर (‘शोले’,‘जवान’,‘चोरी चोरी’) होत असेल, तर तक्रार करण्यात अर्थ नाही. इतिहासात नोंद होते यशाची. आजचा प्रचंड यशस्वी चित्रपट म्हणजे ‘जवान’.

– प्रा. अविनाश कोल्हे
(लेखक राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.