हे महापुरुषांनो, दुर्बलांना घ्या समजून…

हे महापुरुषांनो, दुर्बलांना घ्या समजून…

कदाचित महाराष्ट्र हा जगातील एक अपवादात्मक प्रदेश असेल, की जो वर्तमानातील समस्यांना न भिडता भूतकाळातील घटना उकरून आणि महापुरुषांना अधिक, अधिक महान ठरवण्याच्या शर्यतीत भाग घेतो आहे. कोणत्या महापुरुषाला कोणते विशेषण वापरावे हे ‘महा’राष्ट्रातील ‘लघु’राजकारणातील लघु बनू पाहणारा माणूस ठरवतो आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत महापुरुषांवरून ज्या काही झुंजी सुरू झाल्या आहेत, त्या महाराष्ट्राला, तेथील पुरोगामी परंपरांना आणि माफ करा….. महापुरुषांच्या कर्तृत्वालाही खुज्या ठरवणार्‍या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज आदींच्या भोवती नवे राजकारण सुरू आहे. कोणीही महापुरुषांच्या कर्तृत्वाविषयी, तत्त्वज्ञानाविषयी बोलत नाही. महापुरुषांचे विचार घेऊन महाराष्ट्राला जातिअंताकडे, विकासाकडे, आत्महत्यामुक्त प्रदेशाकडे, धर्मनिरपेक्षतेकडे घेऊन जाऊ असे सांगत नाही. कारण तेवढे बळ या राजकारणात नाही. खुज्या माणसांनी आपल्या लांब सावल्या टाकाव्यात त्याप्रमाणे प्रत्येकजण जणू काही संशोधक बनला आहे. स्वतःलाच महापुरुषांचा सच्चा वारसदार समजू लागला आहे आणि दुसर्‍याला महापुरुषांचा दुष्मन समजू लागला आहे. महापुरुषांचे विचार जागवण्याची, त्यांचा प्रसार करण्याची हिंमत कुणाकडेच राहिलेली नाही. महापुरुषांच्या विचारांचा नव्हे, तर प्रतीके मिरवण्याचा काळ या राजकारणाने सुरू केला आहे. कुणाचा पुतळा किती उंच बांधायचा, कुणाचे स्मारक कसे करायचे, कुणाचे फोटो कुठे मिरवायचे, अती महाजयंत्या करून कोट्यवधीचा चुराडा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करायचा, आपल्या सोयीच्या राजकारणात महापुरुषांना कसे चिकटवायचे, आम्हीच मावळे आणि आम्हीच एकमेव भक्त हे ठासून कसे सांगायचे, यावर सारे राजकारण बेतले आहे.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून महाराष्ट्राचे राजकारण फंदफितुरीचे, फोडाफोडीचे, विश्‍वासघाताचे आणि अस्थिर बनले आहे. जनतेच्या जळत्या प्रश्‍नांशी कुणालाच काही देणेघेणे नाही. जनतेला कोणी जबाबदार नाही आणि तिला जुमानत नाही. पक्ष फोडू की नको, विरोधी विचारांशी आघाडी करू की नको, चाळीस आमदार घेऊन पळू की नको, वेळी-अवेळी शपथ घेऊ की नको, यापैकी कोणत्याही प्रश्‍नाच्या बाबतीत कोणी जनतेला गिणत नाही. ‘किस झाड की पत्ती’ म्हणून तिला दूर लोटायचे आणि या सार्‍यांवर पांघरुण घालण्यासाठी सतत इतिहास उकरायचा, सोयीचा इतिहास मिरवायचा, वास्तवाकडे पाठ फिरवायची असा प्रकार सुरू आहे. इतिहास सांगण्यासाठी हिंमत लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र ठरवून कोणी राज्याभिषेक नाकारला होता? पंचगंगेच्या काठावर राजर्षी शाहू महाराज यांना शूद्र ठरवणारे कोण होते, शाळेला जाणार्‍या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण-दगड फेकणारे कोण होते, सातारच्या छत्रपतींवर वर्ण शोधण्याची वेळ कोणी आणली होती, बाबासाहेबांच्या राज्यघटनेला कोण चोची मारते आहे, पुरोगामी-क्रांतिकारी महापुरुषांना प्रातःपूजेत कोण घेऊन जात आहे? एवढेच नव्हे, तर असे असंख्य प्रश्‍न आहेत, की ज्यांचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. या सर्व महापुरुषांना कोंडीत पकडण्याचे काम कोणता धर्म करत होता आणि छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर, असा वाद कोण निर्माण करते आहे, हेही सर्वांनाच दिसते आहे, ठाऊक आहे आणि कळते आहे; पण समाजात अधोरेखित सांस्कृतिक कलह सुरू करायचा असेल, तर असेच विषय चर्चेसाठी मुद्दामहून आणले जातात. एकदा का सामान्य माणसाला संस्कृतीत चिकटवले, की तो सारे काही विसरतो. त्याचे प्रश्‍न मौनात जातात. महागाई का, बेकारी का, महिलांवर वाढते अत्याचार का, दलितांवर अन्याय का, शेतकरी आत्महत्या का करतो आणि कुपोषित आदिवासी बालकांचे मृत्यू का वाढतात, हे सारे प्रश्‍नही लोक विसरून जातात. ते विसरतील अशीच परिस्थिती निर्माण केली जाते. हे केवळ एकाच पक्षात चालले आहे, असे समजण्याचे कारण नाही. सर्वच प्रश्‍नांचा अजेंडा सारखा झाल्यासारखे आहे. क्रियावादी आणि प्रतिक्रियावादी टोकाला गेले, की प्रतिकांची उगवण असते जिचे आपल्याकडे अंकुर दिसत आहेत.


अगोदर हनुमान, श्री राम, श्री ज्ञानेश्‍वर आदी काही देव आणि भक्तांवर वाद झाले. या वादाने आंदोलनाचे रुप धारण केले. काही ठिकाणी पातळी सुटली. मूळ विषय बाजूला राहिला आणि परस्परांची कुळीमुळी काढायला सुरुवात झाली. लोकांची श्रद्धास्थाने असलेल्या कोणत्याही गोष्टींवर अनावश्यक टिपणी सुरू झाली, की लोक हळवे आणि पुढे आक्रमक बनतात. कुणाच्या तरी हातातील बाहुले बनतात. ज्याला फुटपाथवरही जागा नसते तोही कुणाच्या तरी धर्मस्थळाच्या नावाने घोषणा देतो. कधी बांग विरुद्ध आरती, कधी हनुमान चालिसा या सार्‍यांचा अर्थ काय आहे? कुणालाच तो सांगता येत नाही आणि ज्यांना सांगता येतो त्यांच्या तोंडावर कायद्याने चिकटपट्ट्या चिकटवल्या जातात. कर्मवीर, धर्मवीर यांसारखे शब्द ओढून ओढून राजकारणात खेळवले जातात. यापूर्वी काही तुरुंगात गेलेले नेते आपल्या नावामागे आपल्या मोटारीवर ‘कर्मवीर’ ही उपाधी लावतात, काही जण गाड्यावर छत्रपती लिहितात, तडीपार होता होता वाचलेले काही आपल्या नावामागे धर्मवीर उपाधी घेऊन मिरवताहेत. महापुरुषांविषयी रोज चौकात गळा काढणार्‍यांना या गोष्टी कधी दिसल्या नाहीत काय? इतिहासात अतिशय दुर्मीळ महापुरुषांसाठी वापरलेल्या उपाध्या कोणीही घेऊन कसे फिरते, याचा शोध निदान ईडीने तरी घ्यायला हवा होता; पण तसे घडलेले नाही.
महापुरुषांना नागड्या राजकारणात पत्त्यांसारखे वापरणे आणखी निर्लज्जपणाचे आहे. विवस्त्र फिरणार्‍यांचे जग वाढते आहे आणि वस्त्र परिधान करणे जणू काही गुन्हा घडतो आहे. या सर्वांतून जो काही जन्माला येत असतो त्यालाच तर सांस्कृतिक युद्ध म्हणतात, मूलतत्त्ववादाने फणा काढणे म्हणतात. आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत, असा दावा-प्रतिदावा करणे हाही त्यातलाच एक भाग. कोणत्या शाळेत जाऊन कोणते हिंदुत्व शिकला आणि हिंदुत्व शब्द तरी नीट लिहू शकता का, असा जर प्रश्‍न जनतेला आणि आरतीतल्या हिंदुत्ववाद्याला विचारला तर काय घडेल, याची कल्पनाच केलेली बरी.
समाज दुबळा होतो किंवा दुबळा केला जातो, राजकारणात नैतिकतेच्या चिंध्या होतात, प्रदेशातला एखादा घटनात्मक प्रमुखच महापुरुषांचे तिरके विश्‍लेषण करायला लागतो तेव्हा समजावे, की नैतिकतेवर अनैतिकतेचे पांघरुण वाढते आहे. गेल्या सहा महिन्यांत नेत्यांची भाषा बदलत बदलत ती तळ कसा गाठते आहे, परस्परांवर टीका करताना जहरिले शब्द कसे येत आहेत, थंडीत कुडकुडणार्‍यांवर शाल पांघरण्याऐवजी वस्त्रांच्या आकारांवर चर्चा कशी होत आहे, विनयभंगाच्या व्यवस्थेवरही राजकारणाचे थेंब कसे उडत आहेत, नथुराम कसा मिरवला जातो आणि म. गांधी कसा पुन्हापुन्हा चिरडला जातो आणि विशेष म्हणजे, माध्यमांना पुतना मावशीसारखाही पान्हा फुटत नाही. या सार्‍या गोष्टी हातात हात घालून पिंगा खेळू लागल्या, की अराजकाची चाहुल लागते. महापुरुषांवरील श्रद्धेपोटी हा चाललेला राजकीय खेळ थांबवायला नेते कदाचित तयार असणारही नाहीत; पण सामान्य माणसांनी हळवे होऊन अशा गोष्टीत लक्ष घालता कामा नये. विचार भ्रष्ट करणे, विचाराला वेगळे वळण देणे आणि कंत्राटी राजकारणाचा ते भाग बनवणे यामुळे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांनाही तडे जाण्याचा धोका असतो. तसे न करता क्रिया-प्रतिक्रियांवर ओठांवर-नाकावर माशा गोळा होतील असे बोलत राहणे म्हणजे समाजाला महापुरुषांकडे नव्हे, तर काळोखाकडे नेणे होय. याला आध्यात्माच्या भाषेत पाप म्हणतात. आपल्या राजकारणाने असे पाप करू नये, अशी सामान्य माणसांची धारणा असणार.
श्रद्धेची नशा करून सामान्य माणसाला त्यात कोंडून ठेवण्याने वाईटाशिवाय काहीच घडणार नाही. महापुरुषांच्या प्रतिमा आणि विचार यात खूप अंतर आहे. नावावर येणारा पसाभर गहू किंवा कोणती तरी थाळी खाऊन हे अंतर कापण्याची क्षमता तयार होत नाही, तर महापुरुष कधीच राजकारण्यांचे नव्हते, तर सामान्य माणसांचे होते, हे लक्षात ठेवणे म्हणजेच सांस्कृतिक लढाई जिंकणे होय. 

– संपादकीय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.