घड्याळ पुतण्याकडे, पट्टा चुलत्याकडे – संपादकीय

घड्याळ पुतण्याकडे, पट्टा चुलत्याकडे – संपादकीय

महाराष्ट्राचे राजकारण जसे डाव, प्रतिडाव, फंदफितुरी, खंजीर वगैरेंनी भरलं आहे, तसंच ते पुतण्या आणि चुलत्याच्या संघर्षानेही भरलं आहे. या संघर्षालाही एक दीर्घ परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. पुढे उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे (म्हणजे भावाभावांत), भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे (आता धनंजय विरुद्ध पंकजा म्हणजे भाऊ बहीण), उदयनराजे भोसले आणि अभयसिंह भोसले (आता दुसर्‍या पिढीत उदयनराजे विरुद्ध शिवेंद्र भोसले), सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे (सध्या हा वाद आदिती तटकरेपर्यंत), जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर (सध्या हा वाद नव्या पिढीपर्यंत), अशोक पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर. (पुढे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव विरुद्ध संभाजी) असे हे काका-पुतण्यांचे वाद होते आणि आहेत. ते एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे गेले आहेत. याशिवाय भावाभावांत, वडील-भावांत संघर्ष होते आणि आहेत ते वेगळेच. देशाचे एक ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांच्यातील संघर्षाने पुन्हा एकदा हा सारा इतिहास आणि वर्तमान आठवतो आहे. शरद पवार विरुद्ध अजितदादा असा हा वरवरचा संघर्ष वाटत असला, तरी या संघर्षाला कौटुंबिक पदर कमी आणि राजकारणातील अस्तित्वासाठीचा संघर्ष अधिक असल्याचे जाणवते. पवार कुटुंबातील नात्यांमध्ये संघर्ष कधी होत नाही. कुटुंब एकसंध ठेवण्यात शरद पवार अजून तरी यशस्वी झाले आहेत. पुढे काय होणार हे प्राप्त परिस्थितीत कुणालाही सांगता येणार नाही.
तर अजितदादा बंड करणार याची कुणकुण सार्‍या महाराष्ट्रालाच लागली होती. तसा प्रयत्न पहाटेच्या शपथविधीच्या वेळी झाला होता. त्या अगोदर आणि नंतरही असा संकेत देणार्‍या हालचाली चालूच होत्या. पहाटे झालेल्या शपथविधीने दगा दिला आणि दिवस उगवण्यापूर्वीच सत्ता निसटायला लागली. केव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाण्याऐवजी चकवून गेली. सत्तेच्या मिठीत जाण्यापूर्वीच फसवून पहाट गेली असं म्हणण्याची वेळ आली. गंमत म्हणजे, या पहाटे लिहावयाच्या सत्तागाण्याला शरद पवारांचा पाठिंबा होता हे त्यांनीच पंधरा-वीस दिवसांपूर्वी स्पष्ट केले. यामागचा गेम कोणता होता हेही त्यांनी स्पष्ट केले. पहाटेने दगा दिला होता. पण पुढे आघाडी सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि दिवसाचे गाणे सुरू झाले. दोन-अडीच वर्षांच्या दिवसरात्री संपल्यानंतर सरकार कोसळले आणि शिंदेशाही आली. शिवसेना संपवणारच असा विडा उचललेल्या फडणवीस यांनी हे करून दाखवले आणि पुन्हा परत येऊन दाखवले. आता पुढचे लक्ष्य होते राष्ट्रवादी. ते दोन कारणांसाठी. उद्याच्या राजकारणात डोईजड होणारा पक्ष संपवणे आणि घर भेदून, पाहुणा होऊन आलेल्या एकनाथ शिंदे यांच्यामागे पात्र-अपात्रतेचा कायदा लागलेला आहे. जर का ते पंधरा शिलेदारांसह अपात्र ठरले, तर या परिस्थितीत सरकार टिकले पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रवादी मुळापासूनच फोडणे गरजेचे होते. त्यासाठी फडणवीस बुद्धिबळाच्या डावानं एकएक चाल करत राहिले. परिस्थिती अशी निर्माण झाली, की एकाच वेळी अजितदादा आणि त्यांच्या 40 साथीदारांना (आकडा कमी-अधिक होऊ शकतो) भाजपकडे जाण्याची आणि भाजपला त्यांना आपल्याबरोबर घेण्याची गरज तीव्र झाली. राष्ट्रवादी आपल्याबरोबर आल्याने शिंदेशाहीत पडझड झाली तरी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीस यांची भाजप अधिक बलवान होणार होती आणि तसे झालेच. अजितदादा आणि त्यांच्या 40 सहकार्‍यांनाही अशीच गरज होती. जर आपण भाजपला पाठिंबा दिला नाही, तर कोणत्याही क्षणी ईडीचे पाश आवळले जाणार होते आणि चाळिसातील डझनभर नेते तरी आत गेले असते. तसे जणू काही होणार याचा इशारा खुद्द नरेंद्र मोदी यांनीच मध्य प्रदेशातील एका राजकीय सभेत दिला होता. मुळात पंतप्रधानपदावरील माणसाने असे करावे का, हा नैतिकतेचा प्रश्‍न आहे. पण राजकारण आणि नैतिकतेचा संबंध असतोच अशी गॅरंटी देणारे दिवस आता राहिलेेले नाहीत. मोदींचा इशारा समजणार नाही इतके काही राष्ट्रवादीचे नते दुधखुळे नव्हते. अजितदादा, भुजबळ, मुश्रीफ, तटकरे अशा कितीतरी नेत्यांच्या मागं ईडीचं भूत लागलं असतं, याविषयी कुणालाही शंका नाही. गेली काही वर्षे विरोधी पक्षांना संपवण्यासाठी काही घटनात्मक संस्थांचा त्याच ईडीचाही हत्यारासारखा वापर केला जातोय, हेही काही लपून राहिलेले नाही. गब्बर विरोधकांना नमवून आपल्याकडे खेचण्यासाठी या हत्याराचा खूप वापर होतोय. अनेकजण भाजपच्या तंबूत गेले. त्यांच्यावरचे कलंक गुजरातमधील निरमा पावडर वापरून धुऊन काढण्यात आले. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी घोषणा करणार्‍या मोदींनी जे खातात, कलंकित ठरवले गेले आहेत त्यांना आपण आपल्या राजकीय आश्रयाखाली घेणार नाही, असे कधी म्हटले नव्हते. जे म्हटले नव्हते ते करत राहिले. म्हणजे एखादा भाजपात आला, की आपोआप स्वच्छ आणि बाहेर राहिला, की अस्वच्छ असं हे धोरण आहे. जगाच्या इतिहासात कधीही घडला नसावा, असा हा डाव आहे. संस्काराच्या नावानं बोंब मारणारे आता कलंकित लोकांनाच आपल्या खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. सत्तास्थानावर त्यांना विराजमान करत आहेत. असे अनेक राज्यांत झाले आहे. ते आता महाराष्ट्रातही घडले आहे. शरद पवार यांच्या पक्षातच घडले. पटेल, भुजबळ यांसारखे एकनिष्ठ नेते आणि स्वतःचा पुतण्याच कसा फितूर झाला, हा प्रश्‍न लोकांना पडला असेल; पण यांना तो पडला नसावा. यांच्यासमोर एकच प्रश्‍न होता आणि तो म्हणजे राजकीयदृष्ट्या जिवंत राहण्यासाठी भाजपबरोबर जायचं, की ईडीच्या सापळ्यात अडकायचं? यातील पहिला पर्याय त्यांनी निवडला; पण तोही सनदशीर मार्गाने. पक्षातील निम्म्यापेक्षा अधिक आमदार घेऊन ते लपतछपत नव्हे, तर वाजतगाजत भाजपच्या मांडवात गेले. बँड वाजवायला आणि घरातच तयार झालेलं गाणं म्हणायला खुद्द फडणवीस आणि पडलेला चेहरा घेऊन एकनाथ शिंदेही होते. जोरदार शपथविधी, जोरदार पाठिंब्यासाठी बाहेर शक्तीप्रदर्शन झाले. गंमत म्हणजे, या सर्व भानगडीत ना सामान्य माणसाचा, ना पुरोगामी महाराष्ट्राचा विचार होता. सगळ्या नेत्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं, की आम्ही लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राला पुरोगामी होण्यासाठी एकत्र आलो आहोत. आता भल्याभल्यांना प्रश्‍न पडलाय, की दोन फुटीरवादी एक हिंदुत्ववादी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुरोगामी कसं बनवणार? या सर्व प्रक्रियेत कोणत्या पुरोगामी विचारांचा सहभाग आहे. खरं तर, नैतिकता, विचार, सभ्यता यांची थडगी बनवून आणि त्यावर फुले वाहून महाराष्ट्र पुरोगामी बनवण्यासाठी निघालेले हे लोक आहेत आणि लोकमतही तसंच आहे. सत्ताकारण टोकाला गेले, की विचारांचे सपाटीकरण होते. चिखलाचे साम्राज्य तयार होते. कोल्हापुरातही जातीय दंगल होते, कबरी लक्ष्य बनतात, आरत्या-महाआरत्यांचा सुकाळ येतो. असं वातावरण असणारा महाराष्ट्र किंवा समाज काय पुरोगामी असतो. नागव्यांचे राजकारण, सत्तांधांचे राजकारण, सूडाचे राजकारण, विरोधी पक्ष संपवण्याचे राजकारण, नात्यांवर आघात करणारे हे राजकारण आहे. समाज, विचार यांपासून तो कोसो मैल दूर आहे. स्वार्थासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी झालेलं हे गलिच्छ राजकारण आहे. प्रफुल्ल पटेलही त्यात आले आणि राष्ट्रवादीत राहून, सत्तेत राहून, प्रोटिन्स खाऊन गलेलठ्ठही त्यात आलेच. आता हेच उद्या चौकाचौकात येऊन पुरोगामी महाराष्ट्राचा जयजयकार करतील. इथल्या परंपरेच्या गळ्यात हार घालतील. आपण बघत राहू. कारण आपण बघ्याची भूमिका निमूटपणे करत आहोत. सत्तेवर येईल त्याच्यामागं लाचार आणि लोचट होऊन जात आहोत.
आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 25 वर्षे टकटक करणारे घड्याळ पुतण्यांनी पळवले आहे. मोकळा पट्टा शरद पवारांच्या मनगटावर राहिला आहे. भाकरी परतवली गेली खरी, पुन्हा अशी भाकरी परतवली जाऊ नये म्हणून पुतण्यांनी अख्खा तवाच नेला. पिठाचा छोटा गोळा पवारांच्या हातात आणि पापड सुप्रिया सुळेंच्या हातात राहिला आहे. म्हणावं तर एक राजकीय शोकांतिका आहे, म्हणावं तर राजकारणात हाऊसफुल्ल होऊ पाहणारा भ्रष्टाचाराचा डिमांड शो आहे. भाजप कितीही खुश असली आणि वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसे मिळवण्याची परंपरा असलेले फडणवीस मोठ्या बक्षिसासाठी पात्र ठरवले गेले, तरी लोकभावना वेगळी आहे. शरद पवार पुन्हा उभारी घेतील यात कुणाला शंका नाही. त्यांना संघटनेचे नाव, चिन्ह याची गरज पूर्वी कधी भासली नव्हती, आताही ती भासणार नाही. दोनवेळा त्यांनी काँग्रेसमध्ये बंड करून नव्या नावानं आणि नव्या चिन्हानं आपला पक्ष वाढवला आहे. आताही तसेच होण्याची चिन्हे दिसत आहेत. हे काही त्यांच्या घरातील बंड नाही, तर सत्तासंघर्षातले आणि स्वतःचा राजकीय बचाव करण्याचे बंड आहे. बंड नव्हे, तर संधिसाधूपणा असे म्हणता येईल. जनतेच्या मनात याविषयी थोडीही आपुलकी नाही. हे सर्व भाजप आणि मोदींना करावे लागते आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरते आहे आणि 24 च्या निवडणुकीत तर ती आणखी घसरणार आहे. कोणा पक्षावर दरोडे टाकून आपला पक्ष कधी बळकट करता येत नाही. दरोड्यातून मिळवलेली मालमत्ता शेवटी काळ्या बाजारात विकावी लागते. कधीही पक्ष सोडणारे, स्वार्थी-विश्‍वासघातकी राजकारण करणारे कधी निष्ठावंत नसतात. ते सत्ता हस्तगत करणार्‍या आणि टिकवणार्‍या टोळ्यांचे सदस्य असतात. फार तर भाडोत्री सैनिक असतात. रशियात अशा सैनिकांनी काय केले हा इतिहास ताजाच आहे. हे सैन्य एखाद्याच्या सांगण्यावरून एखाद्याच्या घरात घुसतं, स्थिरस्थावर होतं आणि पुढं घरच बळकावतं. भाकरी परतवण्याची वाट पाहण्यास कुणाला येथे वेळ नसतो. भाजपकडे जाणारे आणि खास त्यांच्या वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ होण्याचा प्रयत्न करणारे काय आणि इतर कुठूनकुठून येणारे काय, सर्वांचं असंच चालत राहतं. तात्पर्य, भाजपने राष्ट्रवादीवर दरोडा टाकला असं जे पवार म्हणतात ते खरं नाही, तर भाजपनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. पवारांनीही स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे. कारण रात्रीत घरभेदीपणा करतील असे बलदंड त्यांच्या सावलीत तयार झालेच कसे? यापुढे सावलीचा क्ष-किरण घेण्याचे अवघड काम त्यांना करावे लागेल अन्यथा सत्तेच्या शोधात फिरणारे आणि विचारांशी दुश्मनी करणारे नेतेच पुन्हा जमा होतील. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.