भूमिपुत्रांना कोण एक बायको देईल का बायको…

भूमिपुत्रांना कोण एक बायको देईल का बायको…

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी कर्नाटकात निघालेली अविवाहित तरुणांची पदयात्रा पाहिली असती, तर त्यांनी आपल्या ‘नटसम्राट’ या प्रसिद्ध नाटकातील पुढील स्वगत बदलले असते आणि त्यात या पदयात्रींसाठी घराऐवजी बायको, पत्नी, अर्धांगिनी असा शब्द वापरला असता. त्यांच्या मूळ संवादातील हा काही अंश…


कुणी, घर देता का रे घर?
एका तुफानाला कुणी घर देता का
माणसाच्या मायेवाचून
देवाच्या दयेवाचून
डोंगरा-डोंगरात हिंडत आहे
जिथून कुणी उठवणार नाही
अशी जागा ढुंढत आहे
कुणी घर देता का रे घर?

तुफानाला महाल नको
राजवाड्याचा सेट नको
पदवी नको, हार नको
थैलीमधली भेट नको
एक हवं लहान घर..
पंख मिटून पडण्यासाठी
एक हवी आराम खुर्ची
तुफानाला बसण्यासाठी
एक तुळशी वृंदावन हवंय  
मागच्या अंगणात.. सरकारांसाठी
कुणी घर देता का रे घर?


घराच्या शोधात असलेल्या तुफानाचे आर्त बोल ऐकून माणूस हेलावून जातो. पण घर काही मिळत नाही. थाटबाट नसलेलं, नुसता आडोसा देणारं घर हे वादळ मागतं आहे आणि स्वतःची अवस्था सांगताना म्हणत आहे, की


तुफान आता थकून गेलंय
झाडाझुडपात, डोंगरदर्‍यांत
अर्ध-अधिक तुटून गेलंय
समुद्राच्या लाटांवरती
वणव्याच्या जाळावरती
झेप झुंज घेऊन घेऊन
तुफान आता थकलंय…


नटसम्राटमधील नटाची जी आर्त अवस्था झाली होती, ती तशीच आता आपल्या देशातील अनेक भूमिपुत्रांची, देशाला जगवणार्‍या बळीराजांच्या पुत्रांची झालीय. या पुत्रांशी लग्न करायला कुणी मुली तयार नाहीत. त्यांना मातीत खेळणारा नवरा नकोय, तर पंख्याखाली लोळणारा नवरा हवाय. त्यांना बांधांच्या मध्ये जगायचं नाही, तर मॉलमध्ये खेळायचं, त्यांना चिखल नाही तुडवायचा, तर नट्यांच्या गालासारखे सुंदर चकचकीत रस्ते तुडवायचे, त्यांना डोक्यावर जेवण घेऊन मळ्यामध्ये जायचं नाही, तर ऑनलाईन जेवण मागायचं किंवा हॉटेलच्या दारात अल्सिशयन कुत्र्यांप्रमाणे वेटिंगमध्ये बसायचं, कुणाशी लग्न करायचं आणि कुणाशी नाही याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. त्याचा आदर करायला हवा. त्याच वेळी लग्नासाठी कोणी मिळत नाही म्हणून पदयात्रा काढणार्‍या, मोर्चा काढणार्‍यांचाही विचार करायला हवा; पण कोण करणार?
आपल्या थोर संस्कृतीत उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं सूत्र मांडलेलं आहे. शहरीकरण, जागतिकीकरण, स्पर्धा यांच्या ओघात ते उलटं झालंय. म्हणजे उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती असं झालंय. सार्‍या मुलींनाही नोकरी करायची आहे आणि शहरातच म्हणजे विकास केंद्रात नोकरीवाला नवराच करायचा आहे. खेड्यात आणि शेतीत तिला जगायचं नाहीय. शेतीशी नाळ जोडलेल्या तरुणांना शेतीतच मातीशी इमान ठेऊन जगायचं आहे, तर काहींना नोकरी मिळत नाहीय म्हणून गावाकडं चल, गावातच रहा असं म्हणत शेतावर जायचं आहे. त्याची शेती कितीही समृद्ध असली, कितीही उत्पन्न मिळत असलं तरी त्याच्याशी लग्न करायला मुली पुढं येत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं जीवन सुंदर करण्याचा मार्ग फक्त आणि फक्त शहरातून जातो, नोकरीतून जातो. शेतातून जात नाही. शेती म्हणजे माती, धूळ, चिखल, जमिनीवरच्या भेगा, झोपडे, पालापाचोळा… कशासाठी तिथं रहायचं? हा प्रश्‍न मुलींच्या मनात. तो एका अर्थानं बरोबरही ठरतो. पण विकासाच्या केंद्राची तुलना चुकीची ठरवतो. या सार्‍या धामधुमीत संसार नवर्‍याशी करायचा, मातीशी करायचा, नोकरीशी करायचा, की झगमगत्या शहराशी करायचा, हा प्रश्‍न भिंतीला पाल चिकटावी तसा चिकटूनच राहतो. फेविकॉल लावून पाल चिकटावी तसा तो चिकटलाय. हलायलाच तयार नाही. त्यातून शेतकरी नवरा नको गं बाई, गावची शिव नको गं बाई, गावाची पांद नको गं बाई, धूळ उडवणारी खिलारी जोडी किंवा धूर ओकणारा ट्रॅक्टर नको गं बाई, यांसारख्या गोष्टी तयार झाल्या. शेतकरी होण्यात तरुणांची चूक नाही आणि त्याला नाकारण्यात मुलींची चूक नाही. दोघेही आपापल्या पातळीवर ठीक वाटतात. पण या बिनलग्नाच्या मुलांचं करायचं काय, हा प्रश्‍न लटकतच राहतो.
आपल्याला नाकारणार्‍या व्यवस्थेचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही मुलांनी आंदोलने, निवेदने, पदयात्रा, नवस यांसारखे मार्ग पकडले. समाजाला आवाहन केलं आणि आपल्या लग्नाचा विषय मांडला. ब्रह्मचारी म्हणून आम्ही किती जगायचं, वय वाढल्यानं आम्हीही निब्बर होतो आहोत. आमचीही मुलाबाळांची, संसाराची स्वप्नं आहेत. हे असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. अनेक पोरांना अनेक पोरींनी सहजपणे नाकारलं आहे. शेतकरी नवरा नको, असं स्पष्ट सांगितलं आहे. नवरा विनाअनुदानावरचा मास्तर, शिपाई कोणीही चालेल. हॉटेलमध्ये टेबल पुसणारा वेटर चालेल, हमाल चालेल, वॉचमन चालेल. पण शेतकरी नवरा नको गं बाई, असा अनेक मुलींचा संकल्प आहे. या संकल्पामुळे गावाकडची अनेक चांगली पोरं बिनलग्नाची राहू लागली आहेत. असं कसं तरी समाजचक्र फिरेल आणि अविवाहितांची गर्दी वाढेल असं कोणत्या पंचांगात दिसलं नसणार. पण ते आता प्रत्यक्ष घडताना आपण पाहतो आहोत. पोरांच्या प्रश्‍नाचं उत्तर ना समाजाकडे आहे, ना सरकारकडे आहे. प्रश्‍न खूपच चिघळला तर कुणीतरी दिल्लीतील पुढारी बिनलग्नासाठीचा भत्ता म्हणून पोरांच्या खात्यावर काही रक्कम जमा करेल, त्यांची मते पळवेल. देशातील काही भागात आजही मुलगी नको, अशी भावना असलेले खूप लोक आहेत. अशा ठिकाणी मुलींची संख्या कमी म्हणून अनेक पोरं बिनलग्नाची फिरतात, तर जेथे मुलींचं प्रमाण बर्‍यापैकी आहे तेथे शेतकरी नवरा नको आहे. एकूण काय, तर बिनलग्नाच्या पोरांची संख्या वाढते आहे. शहरात शिकली सवरलेली पोरं आणि पोरी लग्न लांबणीवर टाकतात. जगण्यासाठी सुरक्षितता नाही, नोकरीची गॅरन्टी-वॉरन्टी नाही, हे त्यामागचं कारण. दुसरं म्हणजे कोणत्याही जबाबदारीत काही पोरांना अडकायचं नाही. मुलाबाळात अडकायचं नाही. काही जण अविवाहित राहून जे काही सुख मिळवायचं ते मिळवताहेत. नवी भांडवलशाही कुटुंब आणि विवाहसंस्थेची कशी वाट लावते, हे आपण अनुभवत आहोत. हे असेच चालू राहणार असल्याने थोड्याच दिवसांत कमी लोकसंख्येचा देश ही बिरूदावली आपण प्राप्त करू याविषयी शंका बाळगण्याचे काही कारण नाही. लग्न नको, मुले नको या भूमिकेतून दुसरं काही घडण्याची शक्यता नाही.
लग्नासाठी मुली मिळाव्यात यासाठी शेतकरी पुत्रांनी सोलापुरात गेल्या वर्षी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये सोलापुरात नवरदेवाचा वेश परिधान करून घोड्यावर बसलेले, वरातीतून निघालेले दोन-तीन डझन नवरे सहभागी झाले होते. कोणी एक बायको देता का बायको, कोणी किसानपुत्रांशी लग्न करता का लग्न… हीच अपेक्षा ते व्यक्त करत होते, साद घालत होते. आमचं काय चुकलं, असा प्रश्‍न विचारत होते. प्रश्‍न जन्माला आले आणि शहरातल्या गर्दीत मरून गेले. कोणी त्यांच्याविषयी स्पीडब्रेकरजवळ थांबून श्रद्धांजली वाहिली नाही किंवा या अपेक्षांच्या मरणाची बातमी कोणा पेपरातही आली नाही. सोलापुरात काही घडलं नाही. निदान आमच्याकडे तरी घडेल, या भावनेनं सोलापूरच्या सीमेवर असलेल्या मंड्या जिल्ह्यात सुमारे शंभरेक किसानपुत्रांनी पदयात्रा काढली. मंड्यापासून 120 किलोमीटरवर असलेल्या एका मंदिरात ती पोहोचली. आमचं लग्न होवो असा नवस या भावी नवर्‍यांनी किंवा पोरी मिळत नाहीत म्हणून अविवाहित जीवन जगणार्‍यांनी केला. त्यांनी आपल्या पदयात्रेला ‘ब्रह्मचार्‍यांची पदयात्रा’ असं नाव दिलं होतं. या पोरांचे प्रश्‍न थोडे वेगळे आहेत. तेथे मुलींची संख्या आणि शेतीतलं उत्पन्न घटलंय. दरिद्री पोराशी आपल्या पोरीची गाठ मारावी, असं पोरीच्या बापाला वाटत नसावं. पोरीलाही तसं वाटल्यास त्यात नवल वाटण्याचं काही कारण नाही. ज्या पोरी पोरांप्रमाणेच गरीब आहेत, त्यांना शहरातला नोकरीवाला नवरा हवाय. त्यांच्या शोधात त्या आहेत आणि पोरं जी हताश आहेत, ती पोरींच्या शोधात आहेत. यापैकी काहींना अनेक पोरींनी नाकारलंय, काहींचं लग्नाचं वय खूप पुढं सरकलंय, काहींच्याकडे प्रेमात पडून पोरी कटवण्याची क्षमता राहिलेली नाही. 120 किलोमीटर चालत जाणं तसं काही सोपं नाही. एका अर्थानं समाजासमोर आत्मक्लेश करून घेण्याचा हा प्रकार आहे. पण तो पाहून कोणाला पाझर फुटणार की नाही, हा प्रश्‍न गुलदस्त्यातच आहे. देवाकडे नुसती प्रार्थना करून काय होणार? अजून कोणत्या देवाने वधू-वर सूचक मंडळ काढलेलं नाही. पुजार्‍यांनी काढलं असेल; पण त्यातही कोणाला शेतकरी नवरा नको आहे. एक मोठा सामाजिक पेच तयार झाला आहे. गरिबांच्या लग्नासाठी पैसे वाटणार्‍या व्यवस्थेला या नव्या वर्गाशी काही देणेघेणे नाही. कुठं आणि किती काळ हा प्रश्‍न न सुटता राहणार, याचे उत्तर अजून तरी कोणा समाजशास्त्रज्ञाकडे नाही. पोरी मिळत नाहीत म्हणून अविवाहित राहण्याची वेळ लाखो तरुणांवर येणे ही काही चांगली गोष्ट नाही. समाज कसा कुरुप बनतो आहे, हेच ती गोष्ट सांगते. हे सारं पाहून कुणीही कच्याबच्या कवी कुसुमाग्रजांच्या कवितेचे अवडंबर पुढील शब्दांत करण्याचा प्रयत्न करू शकतो…


अरे कुणी एक बायको देता का बायको?
लग्नाचं, संसाराचं स्वप्न पाहणार्‍या पोरांना
मातीशी, शेतीशी इमान राखणार्‍या किसानपुत्राला
कष्ट करून देश जगवणार्‍या बळीराजाला
बांधावर कष्टाचे जग तयार करणार्‍याला
कुणी एक बायको देता का बायको?

हुंडा नको, सोन्याचा गंडा तर नकोच नको
लग्नाचा खर्च तर तिला नकोच नको
मातीतही माणूस जगतो हे मानणारी
श्रमपूजा श्रेष्ठ असते हे समजणारी
कुणी एक बायको देता का बायको?

शेतातली पानेफुले केसात माळणारी
माती तुडवून सुगंधित होणारी
मृद्गंधाने बेभान होऊन नाचणारी
झाडाझुडपात लपून साद घालणारी
कोणी एक बायको देता का बायको?

देवाच्या दारात नवस बोलणार्‍यांना
पाय फुटेपर्यंत पदयात्रा काढणार्‍यांना
लग्नाची स्वप्ने गळ्यात मिळवणार्‍यांना
जखमी होत, हरत पण जिद्द बाळगणार्‍यांना
कोणी एक बायको देता का बायको?


अजूनही काही काही तरी बिनलग्नाच्या पोरांच्या मनात शिजत असेल. गदगदत असेल. या सर्वांचा योग्य वेळी समाजाने विचार केला नाही, या गोष्टीला सामाजिक प्रश्‍न मानले नाही, तर त्यातून कोणता आणि कसा स्फोट होईल, हे कुणालाही सांगता येणार नाही. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.