भीमजयंतीचे वारे! – बी.व्ही. जोंधळे

भीमजयंतीचे वारे! – बी.व्ही. जोंधळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे वारे आता वाहू लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांची जयंती अत्यंत उत्साहात नि धुमधडाक्यात साजरी होईल, याविषयी शंकाच नाही. बाबासाहेबांचा जयंती उत्सव खेड्यापाड्यात तर थेट महिनाभर चालतो. जनतेची ही बाबासाहेबांप्रती आदराची खरे तर, भक्तीची भावना असते. तळागाळातील, पिचलेल्या, दडपलेल्या, अमानुष जातीव्यवस्थेचे बळी ठरलेल्या लोकांना बाबासाहेब हे आपल्या जगण्याचा आधार वाटतात. त्यांची ही भावना समजून घेण्याची गरज आहे. मध्यंतरी माझी एका प्राध्यापक मित्राशी आंबेडकरी चळवळीवर चर्चा झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेत माझे प्राध्यापक मित्र मला म्हणाले, बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर चक्क म्हातार्‍या बायकाही नाचतात, हे पाहून वाईट वाटते. म्हणून मी मिरवणुकीत जाणेच आता टाळतो. काही तर पेयपान केलेले असतात. प्राध्यापकांचा पेयपानावरील आक्षेप समजू शकतो. पेयपान करून मिरवणुकीत सामील होणे चूकच! खरे तर पेयपान करणे हाच प्रकार चुकीचा आहे. पण म्हणून बायका-पोरे, लहान-थोर-तरुण-तरुणी मिरवणुकीत नाचतात, यास नाके मुरडणे काही फारसे बरोबर ठरत नाही. कारण प्राध्यापक मित्राला वा त्याच्या सारखाच विचार करणार्‍या त्याच्या पंथाला लोकांची जनभावनाच समजलेली नसते. बाबासाहेब प्रकांड पंडीत होते. ज्ञानाचा महासागर होते. बुद्धीवैभवाचे ऊत्तुंग हिमालयीन टोक होते. त्यांची बुद्धिमत्ता समुद्राच्या अथांगतेलाही लाजविणारी होती, हे खरे, पण म्हणून दिन-दुबळ्या जनतेने प्राध्यापकी थाटेने जयंती साजरी करावी, असे थोडेच आहे? दिनदुबळ्या, दडपलेल्या, पिचलेल्या, पिळलेल्या लोकांना एवढेच माहीत आहे, की बाबासाहेबांनी आपला उद्धार केला, नरकतुल्य जीवनातून आपणास माणसात आणले. अशा या आपल्या उद्धारकर्त्याची जयंती नाचून-गाऊन साजरी केली, तर बिघडले कुठे? बाबासाहेबांच्या जयंतीत जी दिनदुबळी जनता बेभानपणे नाचते-गाते तीच जनता बाबासाहेबांच्या नावाखाली मरण्या-मिटण्यासही तयार असते. आठवा तो नामांतराचा लढा. त्या नामांतर लढ्यात शहीद झालेले कोण होते? घरा-दारांची राखरांगोळी करून घेणारे कोण होते? पोलिसांच्या लाठ्या-काठ्या झेलणारे कोण होते? तुरुंग कुणी भरले होते? रस्त्यावर कोण उतरले होते? बाबासाहेबांच्या नावासाठी उरात धडकी भरविणारे विराट मोर्चे कुणी काढले होते? तर ते होते बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुकीत आज आनंदाने बेभानपणे नाचणारे दिन-दुबळे दलित बांधव. नामांतर लढ्यात बळी गेले ते. त्यांचे रक्त सांडले, खरा त्याग केला तो त्यांनी. मग ते जर जयंती मिरवणुकीत धुमधडाक्यात नाचत-गात असतील, तर पांढरपेशी दलितांनी एवढे कासावीस होण्याचे कारणच काय? याचा अर्थ असा मात्र नव्हे, की शिकून-सवरून, बंगल्यात राहणार्‍या काहीशा उच्चभ्रू दलितांना आंबेडकरी चळवळीविषयी आस्थाच नसते. ती जरूर असते. पण आपल्याच कोशात राहणार्‍या व ‘नाहीरे’ वर्गापासून तुटलेल्या या दलितमित्रांना दिनदुबळ्यांची भावना, त्यांचे निस्वार्थ आंबेडकरप्रेम समजलेलेच नसते. याचा अर्थ असा मात्र नव्हे, की बाबासाहेबांची जयंती गांभीर्याने साजरी होऊन नये. ती गांभीर्याने, चिंतनशीलपणे साजरी झाली पाहिजे, हे खरेच. म्हणजे बाबासाहेबांची जयंती साजरी करताना हर्षोल्हासाबरोबरच काही विधायक उपक्रमही राबविले पाहिजेत. बाबासाहेबांची जयंती साजरी करताना काही खर्च वाचवून विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली पाहिजेत. शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परिवर्तनवादी सामाजिक विचार तर समजाऊन सांगितलाच पाहिजे ; पण जातीयतेचे व विषमतेचे अड्डे असलेल्या खेड्यापाड्यातूनही प्रबोधनाचे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. हे काम एकदिवस करून नव्हे, तर सातत्याने चालले पाहिजे. समाजातील हेवेदावे, गटबाजी कशी संपविता येईल, या अनुषंगाने कृतिशील कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत. बाबासाहेबांनी रक्ताचे पाणी करून ज्या संस्था उभ्या केल्या; त्या वाचविण्याचे व्रत आपण अंगिकारले पाहिजे. करता येण्यासारखे खूप आहे. ते निर्धाराने केले पाहिजे, दुसरे काय? 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.