कटप्पाने धनुष्यबाण चुराया है?

कटप्पाने धनुष्यबाण चुराया है?

शिवसेनेचा धनुष्य आणि अर्थातच त्याचा बाण शिवसेना या पक्षाच्या नावासह चोरून नेण्यात आला, असं उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे अनेक हितचिंतक बोलू लागले आहेत. दिल्लीचे केजरीवाल त्यापैकी एक. इतर अनेकांना ही गोष्ट खरी वाटू लागली. जर चोरी झाली असेल, तर ती सामान्य चोरीसारखी नाहीय. एरव्ही घरातले लोक झोपल्यावर चोर गुपचूप घरात शिरतो आणि चोरी करून पसार होतो. पण धनुष्यबाणाची चोरी त्यातली नाहीय. ती दिवसाढवळ्या, मालकाला सांगून आणि घटनात्मक संस्थेच्या कार्यालयात जाऊन झाली आहे. आपण फार तर कायदेशीर चोरी म्हणू शकतो; पण काही झाले तरी चोरी कायदेशीर आणि बेकायदेशीर नसते. चोरी चोरीच असते आणि तिला कायद्याने मान्यता नसते. उद्धव ठाकरे म्हणतात, की पक्षाचे नाव, पक्ष, धनुष्य आणि बाण चोरून नेण्यात आला. त्यांच्या या आरोपावर सर्वोच्च न्यायालयात जे काही होईल ते होईल; पण मुळात चोरी का झाली, हा प्रश्‍न शिल्लक राहतोच. असाच प्रश्‍न ‘बाहुबली’ या गाजलेल्या चित्रपटाच्या शेवटाने झाला होता आणि त्याचे उत्तर चित्रपटाच्या दुसर्‍या भागात मिळाले होते. तर प्रश्‍न असा होता, की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा… आणि राजकारणातला या घटनेचा चित्रपट झाला असता, तर असाच प्रश्‍न तयार झाला असता आणि तो म्हणजे कटप्पाने धनुष्यबाण क्यूं चुराया…

पूर्वीच्या राजकारणात आपल्या शत्रूला खलास करण्यासाठी एक मार्ग सर्रास वापरला जायचा आणि तो म्हणजे शत्रूच्या एका विश्‍वासातल्या एका मोठ्या शक्तीला लालूच दाखवून त्याला फितूर करून घ्यायचे. मग हा फितूर दरवाजा मोकळा करून द्यायचा, प्रसंगी शत्रूच्या बाजूने लढायचा किंवा आपल्या मालकाला दगाफटका करायचा. कटप्पाचे तसेच झाले होते. तो समर्पित गुलाम, खानदानी गुलाम होता. आज्ञापालन हा त्याचा धर्म होता. राजवाड्यातील समांतर शक्तीने राज्य बळकावण्यासाठी बाहुबलीची हत्या करण्याचा आदेश या गुलामाला दिला. त्याने तो पार पाडला. बाहुबली इतकाच तोही लक्षात राहिला. जसे ‘शोले’त नायकांच्या जोडगोळीबरोबरच गब्बर सिंगही अधिक लक्षात राहिला.


राजकारणात दोन-तीन दशके भाजप आणि शिवसेना ही जोडगोळी हिंदुत्वाची शक्ती म्हणून वावरत होती. गळ्यात गळा घालून कधी सत्तेत तर कधी सत्तेबाहेर वावरत होती. कधी त्यांचा मुख्यमंत्री तर कधी यांचा मुख्यमंत्री असायचा. राजकारणात बिगरीमध्ये शिकणारे शेंबडे पोरही सांगू शकते, की भाजप शिवसेनेने दिलेले टॉनिक, ग्राईप बिटको, जिमची पोरं खातात ते प्रोटीन्स पद्धत शिकणे मिळवत मोठा होत होता आणि झालाही. शिवसेनेला तो एकीकडे मोठा भाऊही समजत होता आणि दुसरीकडे स्वतः त्याच्यापेक्षा मोठा बनण्याचा प्रयत्न करत होता. सत्तेच्या खेळात या गोष्टीचा विचार कोणी शहाणा माणूस नैतिकतेचे चष्मे घालून कधी करत नसतो. राजकारण आणि नैतिकता यांचा खूप दुर्मीळ संबंध असतो. सत्ताकारणात गरज निर्माण झाली, की कोणीही निरमा पावडर घेऊन किंवा कुठलं तरी एक्स्पायर झालेलं तीर्थ घेऊन डुकरालाही स्वच्छ करायला जाईल आणि हे महत्त्वाचं राष्ट्रीय कार्य कसं आहे, हे पटवूनही देईल. तसं भाजप-शिवसेनेचं निदान दिखाव्यासाठी तरी बरं चाललं होतं. पण आत धुसफूस होतीच. विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू विधानसभा जन्माला आली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा दावा केला. भाजपला तो मान्य झाला नाही. पहाटे पहाटे भाजपने राष्ट्रवादीशी मुहतूर लावला. काही तासातच पदर फाडून मोकळे होण्याची वेळ आली. त्यानंतर शिवसेनेने दोन्ही काँगे्रसशी मैत्री करून मुख्यमंत्रिपद मिळवले. भाजपच्या जिव्हारी ही गोष्ट लागली. दहा वर्षांपूर्वीच त्यांच्या कारभार्‍याने विरोधी पक्षमुक्त भारताची घोषणा केली होती आणि इथे तर तीन-तीन शत्रू भाजपच्या थेट उरावर बसले, छाती किती इंच आहे हे न मोजताच. स्वाभाविकच भाजपच्या मनात ‘बदले की आग’ भडकत होती. पण हा बदला असा घ्यायचा होता, की सरकार आणि शिवसेना संपवायची होती. शिवसेना तशी सहजासहजी संपणारी गोष्ट नव्हती. कारण ती मराठी सत्ताधार्‍यांच्या प्रयत्नांतून जन्माला आली आहे. तिला नामशेष करणे हे म्हणावे तेवढे सोपे काम नव्हते. विरोधकांना कसे संपवायचे याचे अनेक मार्ग नागपूर आणि अहमदाबादच्या प्रयोगशाळेत तयार झाले आहेत. नाईट किंगसारख्या ईडीबिडीचा वापर करून किंवा शत्रूत फूट पाडून आपलं राज्य आणण्यात भाजप अनेक ठिकाणी विजयी झाली आहे. सत्तेसाठी ती आपल्या वैचारिक शत्रूशीही तडजोड करते, हे काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार आदी अनेक राज्यांत सिद्ध झाले आहे. एकदा का राजकारण म्हणून याच्याकडे बघितलं, की यातील प्रत्येक गोष्ट पवित्र, योग्य, उचित आणि कायदेशीर वाटायला लागते. छापा टाकण्यासाठी विरोधी पक्षाचे नेतेच कसे सापडतात! सत्ताधार्‍यांमध्ये कुणाकडेच प्रचंड संपत्ती नाही आहे का? आदी प्रश्‍नांना अर्थ राहत नाही. या गोष्टी करत असताना नैतिकता, स्वायत्त संस्था आदींवर स्वतःचा ताबा मिळवावा लागतो किंवा प्रसंगी त्याला धक्का द्यावा लागतो.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा भाजपचे वक्तृत्वपटू असलेले एक नेते हे सरकार लवकर कोसळणार आणि मी परत येणार असे सांगत होते. प्रत्यक्षात त्यांची भविष्यवाणी खरी ठरली नव्हती आणि ठाकरे सरकार एक एक वर्ष पार करत पुढे जात होते. भावी पंतप्रधान म्हणून अनेक उतावीळ नेते त्यांचा उल्लेख करत होते; पण त्याच वेळेला सरकार नव्हे तर शिवसेना खतम करण्याचे ऑपरेशन सुरू होते, हे कोणाच्याच लक्षात आले नव्हते. शिवसेना संपवायची असेल, तर बाहेरचा शत्रू उपयोगी पडत नाही, तर आतच शत्रू तयार करावा लागेल, हे कौटिल्य आणि मनुला गुरू मानणार्‍यांना कळून चुकले होते. बघता बघता तीन वर्षे संपायला आली; पण भाजपच्या गळाला ठोस असे काही लागत नव्हते. ज्याला गळाला लावायचे त्याला भरपूर आणि ठोस काही द्यायचे होते. ते देण्याचे ठरले. स्वतःच्याच पक्षाविरुद्धचे बंड राजकीय वाटू नये म्हणून हिंदुत्वाचा आधार घेण्यात आला. शिवसेना मवाळ झाली. बाळासाहेबांचे आणि त्यांचाच शिष्य असलेल्या दिघे यांचे हिंदुत्व संपले. आता जे काही होईल ते हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, असा सांगणारा शिवसेनेतलाच नेता शोधण्याचा आणि त्याला हवे ते देण्याचा निर्णय भाजपने घेतला. एक-दोन नव्हे, तर मोठ्या माशाबरोबर चाळीस मासे गुवाहाटीत तीर्थक्षेत्री दाखल झाले. सरकार पडण्यापूर्वी ठाकरे यांनी राजीनामा दिला. म्हणजे सरकार पडलेच. ही कहानी आधुनिकता सोडली, की बाहुबली चित्रपटाची तशी कमीअधिक मिळतीजुळती आहे. शेवटी समाजात जे घडत असते, तेच पडद्यावर येत असते. माणसे रस्त्यावर बसतात म्हणून ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’ हा भाजपच्या लाडक्या नायकाचा म्हणजे अक्षयकुमारचा चित्रपट आला होताच आणि त्याचे बक्षीस म्हणून त्याला थेट पंतप्रधानांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. तिचा लाभ उठवत ‘आपण आंबे खाता का’ हा अतिशय गाजलेला प्रश्‍न न गाजलेल्या मुलाखतीत विचारला होता. तर भाजपने एका अर्थाने देवमासा पकडला आणि त्याच्या मदतीने जहाजच उलटे करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय भारतीय निवडणुकांच्या इतिहासात यापूर्वी कधीच झालेला नव्हता. शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरायलाच बंदी घातली. ज्यांच्याकडे आमदार, खासदार जास्त त्यांचा पक्ष असा या निकालाचा ढोबळ मानाने अर्थ आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात त्याचे दळण-कांडप होणारच आहे.
भाजपला देशभर पसरायचे आहे, हे काही त्याने लपवून ठेवलेलं नाही. प्रादेशिक पक्षांशी, छोट्या पक्षांशी मैत्री करायची, त्यांना सत्तेत एखादे बक्षिस द्यायचे, त्याला आपल्या आघाडीत सामील करून घ्यायचे आणि एक दिवस नामशेष करायचे. उत्तरेतल्या पासवानांचे काय झाले आणि आठवले चारोळ्या करत आम जनतेचे मनोरंजन कसे करत आहेत, हे आपण पाहतोच आहोत. भाजपकडे मायावी शक्ती आहे. जवळ करायचे आणि पुढे संपवायचे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत तसे घडत नव्हते. कारण शिवसेनाच त्यांना सोडून गेली आणि मित्राचा विरोधक झाली. मित्राला संपवण्याचा आणि विरोधकाला संपवण्याचा मार्ग वेगळा असतो. विरोधकांना संपवण्याचा मार्ग कसाही असू शकतो. निर्दयी, अलोकशाहीवादी वाटावा असाही असू शकतो. चार-चार वेळा आमदार, दोन-दोन वेळा मंत्री झालेल्या शिंदेंना एकाएकी हिंदुत्वाच्या उचक्या कशा लागल्या, की त्या लागाव्यात म्हणून त्यांच्या शरीरातील प्राणवायू कमी करण्यात आला, हे उद्याचा काळ ठरवणार आहे.
राजकारणातील सत्ता म्हणजे गाभुळलेली चिंच असते. कुणाच्याही तोंडाला, कुणाच्याही झाडावरच्या चिंचा बघून पाणी सुटत असते. आपल्या देशात यापूर्वी औटघटकेचे अनेक मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊन गेले आहेत. नावे सांगण्याचे कारण नाही. कारण ही औटघटकाच तेव्हाच्या नेत्यांना दीर्घ वाटत होती. चिंचा प्रत्यक्ष नाही का मिळेनात; पण त्या पाहून आणि प्रसंगी त्यांचे नाव उच्चारूनही लाळ गाळता येते, असे सांगणारे काही कमी नाहीत. सत्तेचा मोह वाटेल ते करायला भाग पाडतो. पुढून, मागून कुठूनही वार करायला लावतो. आपले राजकारण सारे अशाच घटनेने भरलेले आहे, ही खरी चिंताजनक गोष्ट आहे. ज्या चाळीस जणांनी गुवाहाटीला जाणे पसंत केले, त्यांनी आपल्याला निवडून दिलेल्या मतदारांना विश्‍वासात घेतले होते काय? एक विश्‍वासघातकी डाव मांडू का, असे भाजपने महाराष्ट्राला विचारले होते का आणि पहाटे शपथ घेणार्‍यांनी तर हा मार्ग अवलंबला होता का? इतके हिडीस, इतके अविश्‍वासू, इतके खालच्या स्तरावरचे राजकारण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते आणि शेपूट घालून मुकाट पाहणारा मतदारही कधी पाहिला नव्हता.
शिवसेनेने शिंदेंना भरमसाठ सत्ता दिली होती आणि बाहुबलीतील अमरेंद्रने कटप्पाला स्वरक्षणासाठी तलवार दिली होती. शिंदेंनी भाजपचे आज्ञापालन केले आणि स्वतःला मिळवलेली सत्ता स्वतःच्या पक्षावरच उलटवली. कटप्पाने ती राजाच्या पाटी-पोटात भोसकली. या सर्वांच्या मागे एकच कारण होते, ते म्हणजे सत्ता. कटप्पाच्या मागे अशीच वृत्ती होती. शिंदे यांचा भविष्यकाळ कोणी काही म्हटले तरी भाजपच्या मुठीत बंद आहे. उद्या सरकार पडले किंवा दोन वर्षांनी पराभूत झाले, तर शिंदे यांचे काय होणार हा एक गंभीर प्रश्‍न आहे. तो त्यांच्याही मनात असेलच. एक तर हे चाळीस-पन्नास सहकारी घेऊन त्यांना भाजपमध्ये भरती व्हावे लागेल किंवा पोटापाण्यासाठी अन्य कोणता तरी मार्ग स्वीकारावा लागेल. सत्तासंघर्षात एक गोष्ट कायम घडत आली आहे आणि ती म्हणजे एखाद्याला फितूर करून पहिल्यांदा शत्रूचा काटा काढायचा आणि फितूर मोठा होऊ नये म्हणून त्याचाही काटा काढायचा. आपण सर्वजण हे मान्य करत आलो आणि राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वचन पाठ करत आलो. पाहुण्याने यजमानाचे घर बळकावणे काय, राजाची तलवार राजाच्या पाठीत खुपसणे काय, सगळे सारखेच असते. एवढे सगळे वाचूनही काहीजण प्रश्‍न विचारतच राहतील, की कटप्पाने धनुष्यबाण क्यूं चुराया… अर्थात, या प्रश्‍नाचे उत्तर ऐकण्यासाठीही राजकारणाचा दुसरा अध्याय येण्याची वाट पहावी लागणार आहे. कारण राजकारणाला शेवट नसतो आणि इतिहासाच्या पुस्तकालाही शेवटचे पान नसते. 

-संपादकीय, द पीपल्स पोस्ट.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.