आशीर्वादाची थोतांडगिरी कशासाठी?- बी.व्ही. जोंधळे

आशीर्वादाची थोतांडगिरी कशासाठी?- बी.व्ही. जोंधळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गोंधळ अजूनही काही केल्यास थांबावयास तयार नाही, असे दिसते. आधी शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याची भाषा केली. मग पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तो परतही घेतला. पक्षाची फेररचना करताना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमले. अर्थात, शरद पवारांच्या या खेळीमुळे अजितदादा पवार नाराज झाले. नाही तरी पक्षात आणि पवार कुटुंबातील अजितदादा व सुप्रिया सुळे असा सुप्त संघर्ष असल्याची कुजबूज सुरू होती. पण दादा आणि ताई ऊसने अवसान आणून व चेहर्‍यावरचे नाटकी हास्य जराही ढळू न देता असे काही नाही, असे सांगत होते. पण अखेर व्हायचे तेच झाले.
शरद पवारांनी आपला राजकीय वारस म्हणून ज्या दिवशी सुप्रिया सुळेंची निवड जाहीर केली त्याच दिवशी पवार कुटुंब व पक्ष दुभंगला. पण तरीही इन्कार सुरूच होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. अजितदादा पवार व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप होतेच. मग हाच मुहूर्त साधून अजितदादा पवार, छगन भुजबळ, तटकरे आदींनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून भाजपशी घरोबा केला आणि दादांच्या उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अन्य बंडखोर आमदारांनाही मंत्रीपदे मिळाली. राष्ट्रवादीत अशी उभी फूट पडल्यावर अजितदादांनी भन्नाट भाषणही केले. आता शरद पवारांचे वय झाले म्हणून त्यांनी थांबावे, असे सांगतानाच पडद्याआड जेव्हा जेव्हा भाजपशी चर्चा झाल्या त्या थोरल्या पवारांच्या सल्यानेच झाल्या, असे सांगून टाकले. वर राजीनामा द्यायचाच होता तर तो परत का घेतला, असाही प्रश्‍न उपस्थित केला. याला उत्तर म्हणून सुप्रियाताई सुळेंनी आई-बापाचा नाद करायचा नाही, ते सहन केले जाणार नाही असे आक्रमक आवेशात दादा अँड कंपनीला सुनावले. फाटाफुटीचे प्रकरण इथेच थांबायला हवे होते. कारण शरद पवार व अजितदादा पवार यांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. पण नाही. असे झाले नाही. मागच्या आठवड्यात अजितदादा पवारांनी आपल्या बंडखोर मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद मागीतले. फक्त अजितदादा पवार व मंत्रीपदाच्या झुली पांघरणारेच तेवढे शरद पवारांच्या भेटीला जातात व आपणाला मात्र अंधारात ठेवले जाते, अशी नाराजी अजितदादांबरोबच गेलेल्या आमदारांनी दर्शविली. मग परत दुसर्‍या दिवशी अजितदादा पवार नाराज आमदारांसह मोठ्या पवारांना भेटले. तुम्ही आमचे दैवत आहात. तुम्हीच आमचे विठ्ठलही आहात. म्हणून तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत, अशी म्हणे त्यांनी मोठ्या पवारसाहेबांची मनधरणी केली. पवारसाहेबांनी पक्ष सोडून गेलेल्यांना आशीर्वाद दिले का नाही ते माहीत नाही. पण चहा वगैरे पाजून त्यांची बोळवण केली.
आता प्रश्‍न असा पडतो, की अजितदादा पवार आणि त्यांच्या साथींनी दुसर्‍याशी घरोबा केल्यानंतर तिथे सुखाने नांदण्याऐवजी पवार साहेबांचे आशीर्वाद कशासाठी बरे मागावेत? आम्ही तुम्हाला सोडून जातो, दगा देतो तरी साहेब ‘दिल्या घरी सुखी रहा’ असा तोंडभरून आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या, अशी अपेक्षा बाळगण्यात काय अर्थ आहे? शरद पवारांना सोडून स्वतंत्रपणे राजकारण करण्याची धमक अजितदादा पवार अँड कंपनीत असेल, तर मग आशीर्वादाची ही थोतांडगिरी तरी त्यांनी का करावी? शरद पवारांचे अध्यक्षपद काढून घ्यायचे, पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर ताबा सांगणारे पत्र निवडणूक आयोगाला द्यायचे आणि वर आशीर्वादही मागावयाचे आणि शरद पवार साहेबांचे तरी काय सांगावे? ज्यांनी पक्ष तोडला-फोडला-मोडला त्यांना शरद पवार हे दोन-दोनदा भेटतातच कसे? नाही तरी शरद पवार त्यांच्याविषयी संशय वाटेल असेच राजकारण नेहमीच करतात. आपल्या भूमिकांचा थांगपत्ता लागू न देणे, संभ्रमित वातावरण कायम ठेवणे हा राजकारणातील गुण असू शकतो. पण कायम एखाद्याविषयी संशय वाटत राहणे अंतिमतः ते त्यालाच धोकादायक ठरू शकते. नाही तरी भाजपशी पडद्याआड ज्या चर्चा झाल्या त्या साहेबांच्या परवानगीनेच झाल्या, असे अजितदादा म्हणतात. हे जर खरे असेल आणि मोठे पवारसाहेब बंडखोरांना दोनदोनदा भेटत असतील, तर शरद पवार आणि अजितदादा यांच्यातील ही मिलीभगत तर नव्हे ना, असा संशय लोकांना आला तर तो चूक तरी कसा म्हणता येईल? तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हा जो काही खेळ सुरू आहे तो थांबलेला बरा, अन्यथा शरद पवारसाहेबांची विश्‍वासार्हतासुद्धा धोक्यात यायला वेळ लागणार नाही. बाकी अजितदादा पवार आणि मंडळी ईडीच्या भीतीने वगैरे भाजपशी मैत्री करायला तयार झाले नाही तर विकास करण्यासाठी त्यांनी भाजपशी पाट लावला, असे त्यांचे म्हणणे आहे. वर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा विकास करू शकतात, असे त्यांचे सांगणे आहे. मग विकास करीत बसा ना. चांगली गोष्ट आहे. आशीर्वादाचे नाटक कशासाठी? तर स्वबळावर-स्वतंत्र राजकारण करता येणार नाही या भीतीपोटी? 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.