बळी तो कान पिळी – बी.व्ही. जोंधळे

बळी तो कान पिळी – बी.व्ही. जोंधळे

सबलांनी दुर्बलांना चेपावे-दडपावे ही आपली समाज व्यवस्था आहे. म्हणून मग बहुसंख्याक दलित-वंचितांना दडपतात. धार्मिक बहुसंख्याक धार्मिक अल्पसंख्याकांवर दहशत बसवितात, श्रीमंत गरिबांवर अन्याय करतात, पुरुष स्त्रियांना मारझोड करतात. म्हणजे सारा प्रकार ‘बळी तो कान पिळी’, ‘जिसकी लाठी ऊसकी भैस’ या प्रकाराचा सुरू आहे.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील अपक्ष आमदार ‘गीता जैन’ या एका सिव्हिल  इंजिनीअरची कॉलर पकडून त्याला चापट मारताना दिसत आहेत.

महाराष्ट्राचा राजकीय स्तर इतका काही घसरला आहे, की तो पाहून मन जसे उद्विग्न होते तसेच लाजही वाटू लागते. पण राजकीय दर्जा निचावस्थेला पोहोचला म्हणून सामाजिक आघाडीवर सारे काही आलबेल नि सुरळीत सुरू आहे, असे म्हणता येत नाही. आता हेच पाहा ना, नाशिकजवळ एका मुस्लिम तरुणाची तो गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयावरून हिंस्त्र झुंडशहा जमावाने त्याची ठेचून निर्घृण हत्या केली. नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या तरुणाने भीमजयंती साजरी केली म्हणून त्याची हत्या करण्यात आली. महाराष्ट्र शासनात अधिकारी झालेल्या दर्शना पवार या तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून तिचा प्रियकर म्हणविणार्‍या तरुणाने तिला जीवानिशी मारून टाकले. हा प्रकार पुणे परिसरात घडला. मुंबईच्या उपनगरात सत्ताधारी गोटातील लोकप्रतिनिधी म्हणविणार्‍या एका महिला नेत्याने अधिकार्‍यावर हात उगारला. सत्ताधारी गोटातील लोकप्रतिनिधी म्हणविणार्‍या बाईंनी हा असा प्रताप गाजविला तेव्हा ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी अनधिकृत बांधकाम पाडले म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यास मारहाण केली. राज्यात घडलेली ही काही अलीकडची उदाहरणे. पण भूतकाळात डोकावले तर अशी असंख्य उदाहरणे पहावयास मिळतात. दलितांवर अत्याचार करण्यास तर पारावारच राहिला नाही. हे आहे आजचे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैवी नि लाज आणणारे सामाजिक चित्र. वर ज्या घटनांचा उल्लेख केला, त्या कुठे घडत आहेत? तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि उठता-बसता आदर्श राज्यकारभारासाठी ख्यातकिर्त असलेल्या शिवाजी महाराजांचे नाव घेणार्‍या मराठी मुलखात. शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार करताना आपल्या सत्तेकडून कुणालाही एकपैचाही त्रास होणार नाही, याची दक्षता बाळगण्याचे आदेश दिले होते. आता राज्यात काय चालू आहे? तर शिवाजी महाराजांचे नाव घेणारे, लोकप्रतिनिधी म्हणविणारे लोक अधिकारी-कर्मचार्‍यांना बडवून काढतात. पण अधिकार्‍यांवर हात उचलणारे हे मात्र विसरतात, की एखाद्या अधिकार्‍याचा संयम ढळला व त्याने जर आपल्यावर उलट हात उचलला तर शोभा कुणाची होईल? पण सारी सभ्यता, शालीनता, सुसंस्कृतपणाच ज्यांनी कोळून प्यायला आहे त्यांना असले विवेकी-शहाणपणाचे प्रश्‍न विचारण्यातही काही अर्थच नाही म्हणा!
महाराष्ट्र राज्याचे जे सामाजिक चित्र वर दिले आहे, ते अर्थातच काही महाराष्ट्रापुरतेच सिमित नाही. देशभर कमी-जास्त प्रमाणात स्थिती ही अशीच आहे. सबलांनी दुर्बलांना चेपावे-दडपावे ही आपली समाज व्यवस्था आहे. म्हणून मग बहुसंख्याक दलित-वंचितांना दडपतात. धार्मिक बहुसंख्याक धार्मिक अल्पसंख्याकांवर दहशत बसवितात, श्रीमंत गरिबांवर अन्याय करतात, पुरुष स्त्रियांना मारझोड करतात. म्हणजे सारा प्रकार ‘बळी तो कान पिळी’, ‘जिसकी लाठी ऊसकी भैस’ या प्रकाराचा सुरू आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, प्रेम, कायद्यासमोर सारेजण समान वगैरेची भाषा ही फक्त तोंडी लावण्यापुरती असते. जो बलदंड आहे, पुंडशाहीत माहिर आहे त्याने दुर्बलांवर अत्याचार करणे, हे आपले खरे समाजजीवन आहे. बलदंडासाठी वेगळा कायदा असतो, तर दुर्बलांसाठी वेगळाच नियम असतो. म्हणून तर ‘सेलिब्रेटी’ म्हणविणाऱ्यांना करसवलती वगैरे मिळतात आणि बड्यांच्या मोटारीखाली गरीब चिरडले गेले, तरी गुन्हा काही सिद्ध होत नाही. तात्पर्य सर्वत्र बलदंडाचे, झुंडशाहीचे, ठगेगिरीकरणार्‍यांचे राज्य सुरू आहे. या झुंडशाहीत शोषित-पिडित-वंचित माणूस दडपला गेला तर नवल ते काणते? प्रश्‍न असा आहे, की आपली ही विषम-अन्यायकारी समाजव्यवस्था कधीच बदलणार नाही काय?
‘बळी तो कानपिळी’ हे जरी आपले दाहक समाजवास्तव असले तरी काही बाबतीत महिलांनाही पुरुषवर्गाकडून होणारी मारहाण गैर वाटत नाही, यास काय म्हणावे? उदा. अलीकडेच एक मराठी वाहिनीवरील मालिकेत सुशिक्षित, सधन घरातील नायिकेला नवर्‍याने केलेली मारहाण दाखवावी की नाही, असा प्रश्‍न मालिकेच्या निर्मात्याला पडला. या पेचातून सुटका करून घेण्यासाठी त्याने मध्यमवर्गातील गृहीणींचा एक गट व उच्च मध्यम वर्गातील महिलांचा दुसरा गट यांना आपल्या कार्यालयात बोलावून एक प्रश्‍नपत्रिका सोडवून घेतली. तेव्हा मध्यववर्गीय गटातील आणि उच्च मध्यम वर्गातील गटानेही नवर्‍याने केलेल्या थोड्याबहुत मारहाणीत गैर काहीच नसते, असे उत्तर दिले. मग मालिकेच्या निर्मात्याने नायक-नायिकेला मारहाण करतो, असे दाखविले आणि गंमत अशी, की या मालिकेचा टीआरपी वाढला. आता या विरोधाभासास काय म्हणावे? अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. इथे मात्र महिला नवर्‍याचा मार गोड मानून नवर्‍याने मारहाण करण्यात काही गैर नाही म्हणतात. आपला समाज विरोधाभासाच्या शृगांपत्तीत सापडला आहे. म्हणूनच दलित-वंचितांवर अत्याचार करण्यात काही चूक नाही कारण ते अत्याचार करण्यासाठीच असतात, अशी आपली परंपरा सांगते. थोडक्यात अन्याय, अत्याचार, जुलूम, झुंडशाही, विरोधाभास यातून बाहेर पडण्यासाठी म्हणूनच कृतीशीलतेची गरज आहे. जे चाललेय ते योग्यच व परंपरेला धरून आहे, ‘तळे राखील तो पाणी पिईल’ असे म्हणून चालणार नाही. अशाने समाज समतेच्या-बरोबरीच्या पातळीवर येऊच शकणार नाही. हो का नाही? 

– बी.व्ही. जोंधळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.