राजर्षी शाहू महाराज : मोठ्या दिलाचे राजे – बी.व्ही. जोंधळे

राजर्षी शाहू महाराज : मोठ्या दिलाचे राजे – बी.व्ही. जोंधळे

राजर्षी शाहू महाराज हे काळाच्या किती तरी पुढे होते. भारतीय संसदेने 1955 साली राज्य घटनेच्या 17 व्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट केली. पण हेच काम शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तीस-पस्तीस वर्षे आधीच करून दाखविले. अस्पृश्यतेबाबत महाराजांचे विचार स्पष्ट होते. त्यांनी म्हटले, “आमच्या धर्मात जातीभेदामुळे जो उच्चनीचपणा आला आहे तशा प्रकारचा जन्माजात भेदभाव जगाच्या पाठीवर दुसर्‍या कोणत्याही धर्मात नाही म्हणून अस्पृश्यता नष्टच झाली पाहिजे. जपानमधील सामुराई हे इतरांना तुच्छ लेखत होते. पण आधुनिक जपान घडविण्यासाठी सामुराईंनी आपला विशिष्ट दर्जा व हक्क सोडून दिले. असे आपणाकडेही व्हावे व उच्च जातींनी आपले विशेष हक्क सोडून देऊन सामाजिक समतेची कास धरावी.” शाहू महाराजांनी म्हणूनच कोल्हापूर संस्थानात वंचित व अस्पृश्य समाजाला समतेची, स्वाभीमानाची व अस्मितेची वागणूक देणारे अनेक पुरोगामी कायदे संमत केले. 1 जानेवारी 1919 रोजी महसूल, न्याय इत्यादी खात्यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी म्हटले होते, आमच्या संस्थानात जे अस्पृश्य नोकरी करतील त्यांना प्रेमाने वागवावे. हे मान्य नसणार्‍या अधिकार्‍यांनी नोकरीचा राजीनामा द्यावा. त्यांना पेन्शन मिळणार नाही. मागासजातींना शिक्षणाच्या क्षेत्रात समतेची वागणूक नाकारणार्‍यांनी नोकरीचा राजीनामा द्यावा, असेही शाहू महाराजांनी बजावले होते. 6 डिसेंबर 1919 रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविला होता. शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य दिले. अस्पृश्यांची वेठबिगारी नष्ट करून त्यांच्या नावे जमिनी करून दिल्या. उच्च जातींच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत करण्याचा मान अस्पृश्यांना मिळवून दिला. अस्पृश्य तरुणांना तलाठी केले. त्यांना वकिलीच्या सनदा दिल्या. संस्थानातील नोकर्‍यांत मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवले. त्यांच्या सरकार दरबारी अस्पृश्य नोकर होते. अस्पृश्यांना कमरेला तलवार बांधण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला. अस्पृश्यांच्या हातचे अन्न त्यांनी स्वीकारले. दलित-वंचितांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा सुरू केल्या. सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली. 1901 ते 1922 या काळात वेगवेगळ्या जातींच्या मुलांसाठी एकूण 23 वसतिगृहे निर्माण करून त्यांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या. शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानात दिगंबर जैन बोर्डिंग, लिंगायत वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क होस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, गौड सारस्वत ब्राह्मण वसतिगृह, ख्रिश्‍चन होस्टेल, कायस्थ प्रभू वसतिगृह, वैश्य बोर्डिंग, ढोर-चांभार वसतिगृह या वसतिगृहांची स्थापना करून सर्व जाती-धर्माच्या मुलांच्या शिक्षणाची तर उत्तम व्यवस्था केलीच केलीच ; मात्र शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाबाहेर नाशिक, नगर, नागपूर, पुणे आदी ठिकाणीसुद्धा वसतिगृहे स्थापन करून सर्वांच्याच शिक्षणाला गती देण्याचे मोठे ऐतिहासिक शैक्षणिक कार्य करून ठेवले. शाहू महाराजांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पाठपुरावा करताना राष्ट्रहितास प्रथम प्राधान्य दिले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज मोठ्या दिलाचे राजे होते. त्यांच्या स्मृतीस प्रणाम!

– बी.व्ही. जोंधळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.