बहुजनांनी संघाच्या षड्यंत्रापासून सावध राहावे – उल्का महाजन

बहुजनांनी संघाच्या षड्यंत्रापासून सावध राहावे – उल्का महाजन

 हा देश जातीयवाद्यांनी शिवरायांच्या व भीमरायांच्या स्वप्नापासून खूप लांब न्यायचा प्रयत्न चालवला आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांची मूळ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या राजवटीत लोकशाहीचे खच्चीकरण सुरू आहे. संविधान त्यांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळे मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन करणे सुरू आहे. बहुजनांना गुलामगिरीकडे नेणारा हा प्रवास थांबवायचा असेल, तर तरूण पिढीला, कष्टकरी समाजाला, जाणत्या नागरिकांना जागवायचे खूप प्रयत्न करायला हवेत. शिवराय, भीमराय व पुरोगामी परंपरेतील अनेक दीपस्तंभांच्या प्रकाशात पुन्हा एकदा वाटा रुंदावायला हव्यात. आपल्या पिढीची ती जबाबदारी आहे.

रायगड जिल्ह्यात आमच्या कामाला सुरुवात झाली 1990 पासून. ‘सर्वहारा जनआंदोलन’ या संघटनेची स्थापना करून काही निवडक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्वात शोषित वर्गाच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारणे हे प्रमुख उद्दिष्ट ठरले. त्या शोषित समाजघटकांमध्ये प्रामुख्याने होते, आदिवासी व दलित तसेच भटके विमुक्त. जिल्ह्याला पार्श्‍वभूमी दोन दीपस्तंभरूपी महान व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्वाची. एक शिवराय, दुसरे भीमराय. त्याच विचारांच्या प्रकाशात वाटचाल करायचे ठरले.
संघटनेत एखाद्या निश्‍चित विचारधारेचा परिवार वा पार्श्‍वभूमी असलेले माझ्यासकट कोणीही नाही. आम्ही सगळेच आमच्या जगण्याचा, आपल्याला पडणार्‍या प्रश्‍नांचा, अवतीभवतीच्या समाजाचा शोध घेत एकत्र आलो. एकमेकांच्या जगण्याचा सन्मान, अन्याय/शोषणाविरुद्द लढण्याची भावना, चिकाटी आणि प्रामाणिकपणे शोध घेण्याची तयारी, हेच आमच्यातले सामायिक गुण. बाकी आर्थिक, सामाजिक स्तर, पार्श्‍वभूमी भिन्न.


कट्टरवादी न होता चिकित्सक राहता आले पाहिजे


समाज समजून घ्यायला काही आधार लागतात, त्यामध्ये जे प्रश्‍न असतात ते का असतात, गरिबी का आहे, ती पिढ्यानपिढ्या दूर का होत नाही? समाजव्यवस्था बदलल्याशिवाय ते प्रश्‍न दूर होऊ शकतात का? मग तो समाज, ती व्यवस्था कशी बदलायची, त्याची दिशा ठरवायला, त्यातील घडामोडी समजून घ्यायला काही आयुधे लागतात. म्हणून वैचारिक बैठक असायला हवी याबाबतीत सर्वांमध्ये एकवाक्यता होती. पण तो एक विचारवाद असायला हवा का आणि तो कोणता, यावर चर्चा होत असे. त्यातून आणखी एका गोष्टीवर सहमती होती, ती म्हणजे जग झपाट्याने बदलतंय. ते समजून घ्यायचं असेल तर कट्टरवादी न होता चिकित्सक राहता आले पाहिजे.


बुजुर्गांचा हा सल्ला आम्ही स्वीकारला


संघटनेची सुरुवात झाली ते वर्ष होतं 1990. याच काळात व्यवस्थाबदलाचा, शोषणमुक्तीचा, जगातील एक महत्त्वाचा प्रयोग- सोव्हिएट रशिया कोसळत होता. कष्टकर्‍यांच्या राज्याचे स्वप्न कोसळत होते. मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागले होते. समाजवादावर आधारलेली चीनची राज्यव्यवस्थापण नव्या भांडवली वळणावर होती. सामाजिक, राजकीय विचारविश्‍वात प्रचंड घुसळण चालू होती. अशा वातावरणात एका विचारधारेचा चष्मा लावून जगाकडे पाहण्यापेक्षा जे जे काही समतावादी, पुरोगामी असेल त्याची शिदोरी बनवावी व शोधक, चिकित्सक रहावे हा या बुजुर्गांचा सल्ला आम्ही स्वीकारला. मग प्रत्यक्ष समाजात विविध प्रश्‍नांचा सामना करताना, वाचन, अभ्यासवर्ग, शिबिरे यातून अनेक तुकडे, धागेदोरे सापडत गेले. त्यातून काही प्रमाणात वैचारिक बैठक तयार होत गेली.
सामाजिक, राजकीय कामाच्या प्रेरणा या फक्त समाजातील दु:खावर, वेदनेवर स्वार होऊन चालत नाहीत. त्यांना विचारांची, विश्‍लेषणाची, प्रश्‍न सोडवणार्‍या, मार्ग काढणार्‍या बुद्धीमत्तेची जोड लागते हे कळत गेलं. गरिबी ही केवळ गरिबांच्या हातात आर्थिक साधन नसण्याचा प्रश्‍न नसतो, तर पिढ्यानपिढ्या विषमता राखणार्‍या शोषणव्यवस्थेचा तो परिणाम असतो. त्यामधे हितसंबंधांची व सत्तासंबंधांची बांधणी असते.


…हे हळूहळू कळत गेले


ही शोषणव्यवस्था कशी तयार होत गेली, तिचे ऐतिहासिक स्वरूप काय, हे समजून घ्यायला मार्क्सवादाचा गाढा अभ्यास जमला नाही तरी ओळख तरी हवी, हे जाणवलं. भारतीय संदर्भात ही विषमता व त्याची पाळंमुळं समजून घ्यायची असतील, तर महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार, चिंतन, विश्‍लेषण व त्यांनी अभ्यासलेले मार्ग समजून घ्यायला हवेत. गुलामी मानसिकतेवर मात करण्याच्या व खरे रयतेचे राज्य उभारण्याच्या प्रेरणा जागवायच्या असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा लढा अभ्यासावा लागेल, आदिवासी समाजाने स्वकीय व परकीय सत्तेविरोधी दिलेले चिकाटीचे व लढाऊ संघर्ष समजून घ्यायला बिरसा मुंडा व अनेक आदिवासी वीरांचा इतिहास समजून घ्यावा लागेल आणि आजच्या काळात गुलामगिरी व अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि उद्याच्या शांततामय समाजासाठी, शाश्‍वत पर्यावरण व जीवनासाठी गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गावर चालावे लागेल, हे हळूहळू कळत गेले. या विचारधारांमध्ये असणारे विरोधाभास, द्वंद्व हे प्रत्यक्ष अनुभवांच्या कसोटीवर तपासून बघावे लागतील, ज्येष्ठांच्या मदतीने ते उलगडावे लागतील. पण त्या वादांमध्ये अडकून न पडता तो एक प्रवास असेल, हे आम्ही स्वीकारलं. समतेच्या वाटेवरले हे सर्व आमच्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे होते. त्या वाटेवर प्रत्यक्ष झटलेले अनेक दिग्गज मग भेटत गेले ज्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे, गाडगे बाबा, संत बहिणाबाई, आगरकर, कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अण्णा भाऊ साठे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी असे अनेक जण. महाराष्ट्रात तर ही मोठी परंपरा आहे. आधुनिक जगातील पर्यावरणवाद, स्त्रीवाद, पर्यायी विकासनीती याची त्यात भर पडत गेली.


महाराष्ट्रात समतावादी परिवर्तक तीन किल्ल्यांत विभागले गेले


एका बाजूला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि खरा मुद्दा जग बदलण्याचा आहे ही दिशा, तर दुसर्‍या बाजूला सत्य, सुंदर, निर्मळाची नित्य हो आराधना ही भावना, या दोन्हींची भुरळ पडली. हे थोडे विरळा समीकरण होते. कारण देशात व प्रामुख्याने महाराष्ट्रात समतावादी परिवर्तक तीन किल्ल्यांत विभागले गेले आहेत. मार्क्सवादी, फुले-आंबेडकरवादी आणि गांधी विनोबावादी. चौथा गट माफुआवादी आहे. पण त्यांचे व पहिल्या दोन्ही गटांचे गांधीविचाराशी जमत नाही. आम्हाला गांधीजी पण अनेक बाबतीत पटत होते. मुद्दा जग बदलण्याचा तर होताच, त्या वाटेवर आपला खारीचा वाटा प्रामाणिकपणे व निश्‍चित दिशेत उचलायचा होता. कृतिशील व्हायचे होते. मार्क्सची मांडणी इतिहासाचे विश्‍लेषण करते. त्यांनी मानवी जगाच्या इतिहासाचा उलगडा श्रमिकांच्या हक्क व शोषणाच्या परिप्रेक्ष्यातून वर्गव्यवस्थेची उकल करत केलेला आहे. फुले, आंबेडकरदेखील भारतीयसंदर्भात जातीय उतरंडीची व विषमतेची नेमकी व ऐतिहासिक मांडणी करतात. तर गांधीजींच्या इतिहासाचे भान त्यांच्या कृतीतून दिसते. गांधीजी त्यांच्या कृतीतूनच बोलतात.
आम्हाला गांधी-आंबेडकरवाद समजून घ्यायचा होता; पण त्यात अडकायचे नव्हते. त्या दोन्ही महापुरुषांच्या त्यांच्या त्यांच्या सामाजिक स्थानावरून व्यक्त होणार्‍या भूमिका, त्यामागचा अनुभव, चिंतन व भारतीय समाजाला समानतेच्या वाटेवर नेण्याची प्रामाणिक आस हे त्यांच्या हेतूंबद्दल शंका न घेता समजून घ्यायचे होते.


प्रश्‍न हे विचारांचे वाहक असतात


सर्वात शोषित घटकांचा जीवनसंघर्ष उभारत शोषणाविरुद्ध टक्कर घेण्याची ताकद उभारणारी जनसंघटना असे संघटनेचे स्वरूप निश्‍चित झाले. ज्या प्रश्‍नांवर आम्ही लढलो, लढत आहोत त्या प्रश्‍नांची निवड करण्यासाठीदेखील ही वैचारिक बैठक आवश्यक आहे. प्रश्‍न हे विचारांचे वाहक असतात व त्यांवर लढण्याची प्रक्रिया हीदेखील विचारांची वाहक व्हायला हवी, हे भान येत गेले. त्यातून आमच्या कामाच्या पद्धती तयार होत गेल्या. प्रश्‍न मांडण्याची पद्धत, विश्‍लेषण, त्याला हात घालण्याची पद्धत, प्रश्‍नावरचा तुम्ही मांडत असलेला उपाय, त्यावर करायचे जनजागरण, लढण्याची रणनीती हे सारंच तुमच्या वैचारिक बैठकीवर अवलंबून असतं. यातून तुमची भूमिका निश्‍चित होत असते.
भारतीय समाजात सनातन्यांकडून व प्रस्थापितांकडून सातत्याने नाकारली, हिणवली गेलेली व प्रसंगी हल्ले करून संपवण्याचे प्रयत्न करण्यात आलेली परंपरा म्हणजे चिकित्सेची. कोणतीही वैचारिक का होईना परंपरा प्रस्थापित झाली, की ती चिकित्सा नाकारते, असे सातत्याने दिसून आले आहे. वरील सर्व विचारधारांच्या पायाशी ही चिकित्सक वृत्ती नसेल, तर आधुनिकता व खरी लोकशाही अस्तित्वात येणे व टिकणे शक्य नाही, हे भान आम्हाला आमच्या बरोबर असणार्‍या सल्लागार मंडळींनी सतत दिले. चिकित्सेची चार्वाकाची, बुद्धाची, तुकारामाची परंपरा अभ्यासणे त्यामुळे अनिवार्य ठरते.
आम्ही ज्या प्रश्‍नांना हात घातला ते या विचारांच्या दिशेत समोर आले. त्यात जमीन, जंगलावरच्या हक्काचे प्रश्‍न होते. हाताला काम व कामाला दाम म्हणजे न्याय्य मजुरी मिळण्याचे होते. आदिवासी, दलित बांधवांवर, महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे होते, मूलभूत सुविधांचे होते. सरकारी योजनांमधून केल्या जाणार्‍या वंचनेचे, भ्रष्टाचाराचे होते. प्रस्थापितांनी या कष्टकरी वर्गाच्या जगण्यावर केलेल्या आक्रमणाचे होते. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता आत्मसन्मानाचा. तो जागवत, संविधानिक अधिकारांशी त्याची सांगड घालत आम्हाला पुढे सरकायचे होते.


अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेला पहिला गुन्हा


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या खोतीविरोधी लढ्यानंतरही इतक्या दशकांनंतर गावकुसाबाहेरील अनेक कुळांना कसत्या जमिनीवर हक्क मिळालेला नव्हता. चवदार तळ्याचा सत्याग्रह होऊन पासष्ट वर्षे झाली, तरी महाडपासून तीस कि.मी. अंतरावर असणार्‍या गावात पाणवठे खुले झाले नव्हते. या मोहिमांना सुरुवात झाली. पहिला पाणवठ्याचा लढा माणगाव तालुक्यातील पळसगावचा. दळी जमिनींच्या प्रश्‍नावर मिटींग घेण्यासाठी या गावातील बौद्धवाडीवर गेलो असताना बाबासाहेबांच्या विचारांबाबत खूप चर्चा झाली. तरुण वर्ग ऐकत होता. या मिटिंगनंतर पंधरा दिवसात बौद्ध ग्रामस्थांना गावातील सवर्ण पुढार्‍यांनी, सरपंचांनी मिटिंगसाठी बोलावले.
तुम्ही पूर्वीच्या रूढीने चालाल तर गावात राहता येईल, गाव बैठकांमधे बसता येईल.  पुढार्‍यांनी थेट विषयाला हात घातला. बरीच खडाजंगी झाली. बौद्धवाडीतले ज्येष्ठ दबून होते. पण तरुणांनी वाद घातला. दुसर्‍या दिवशी सर्वजण संघटनेच्या कार्यालयात आले. तक्रार करण्यात आली. संघटनेने आवाज उठवला. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पण स्थानिक आमदारांनी दबाव आणला, फौजदारांनी समज देऊन प्रकरण गुंडाळले. पण आता सवर्णांमधले जातीयवादी खवळले होते. बौद्धवाडीचे पाणी, रस्ते अडवण्यात आले. धमक्या, शिवीगाळ, सुरू झाली. एका तरुणाला मारहाण झाली. मग अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये संघटनेने दाद मागितली. तेव्हा कायदा नवीन होता. फौजदारांना तर माहीत नव्हताच, जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनापण माहीत नव्हता. मग धाव घ्यावी लागली मुंबईत डी.आय.जी. (नागरी हक्क संरक्षण) यांच्याकडे. त्यांनी विशेष पथक पाठवून गुन्हा दाखल करून घेतला. हा रायगड जिल्ह्यात या कायद्यान्वये दाखल झालेला पहिला गुन्हा.
या केसमुळे संघटनेचा दबदबा संपूर्ण परिसरात तयार झाला. पाठोपाठ आदिवासींवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे दाखल झाले. त्या परिसरातील पाण्यावरील हक्काचे, पाणवठे खुले करण्याचे अनेक प्रश्‍न समोर आले. मग मोहीम काढून हा प्रश्‍न हाताळावा लागला. अनेकांनी टीका केली. नसलेले प्रश्‍न उकरून काढतात, समाजात तेढ निर्माण करतात असा आरोप पुरोगामी म्हणवणार्‍या स्थानिक वर्तमानपत्राच्या संपादकांनी केला. पण त्याला सामोरे गेलो.
या प्रतिकूल काळात अनेकांची मदत मागितली, प्रत्यक्ष जाऊन भेटलो. पण गावात थेट सामना करायला सत्याग्रहात सहभागी व्हायला आले फक्त रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दादासाहेब लिमये. नंतर मुंबईतील अनेक पत्रकार मित्रांनी साथ दिली. त्यात सतीश कामत, निखिल वागळे, बंधुराज लोणे, युवराज मोहिते, साहील जोशी यांसारखे अनेक होते. या लढ्यात टिकलेले कार्यकर्ते पूर्णवेळ सहकारी झाले. चंद्रकांत गायकवाड हा तरुण तेव्हा पुढे आला. सोपान सुतार, नथुराम वाघमारे हे संघटनेत जोडले गेले.


हा तर मानवमुक्तीचा लढा


या सर्व कामात वैचारिक दिशा टिकवणे व संघटनेच्या सभासदांसमोर ती कायम मांडत राहण्याचे आव्हान असते. विविध उपक्रमांतून ते करत न्यावे लागते. गावशिबिरे, संविधान यात्रा, चवदार तळे सत्याग्रह दिनी, मनुस्मृती दहन दिनी सहभाग घेणे इ. विविध मोहिमा आखत राहावे लागते. त्यातील एक मोहीम शिवराय ते भीमराय समता मार्च.
संविधान जागर समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा पुढे आली. ही समिती संघटना ज्या व्यापक आघाड्यांशी जोडलेली आहे त्यापैकी एक. सुरेश सावंत, उमेश कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा त्यात पुढाकार आहे. राज्यातील अनेक संघटना, कार्यकर्ते त्यात एकत्र आले आहेत. महाडच्या तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने नागेश जाधव याने प्रस्ताव मांडला. चवदार तळे सत्याग्रहदिनी एकाच जागेवर आंबेडकरी चळवळीतल्या विविध नेत्यांचे वेगवेगळे मंच असतात. एक विचार, तर एक मंच का नको, यासाठी प्रयत्न करायला हवेत. मग विचार केला हा दिवस फक्त दलित बांधवच मोठ्या संख्येने येऊन साजरा करतात. असे का? हा तर मानवमुक्तीचा लढा आहे. तो सर्व जातीयांनी साजरा करायला हवा. संविधानिक मूल्ये मानणार्‍या सर्वांचा त्यात सहभाग हवा.

शिवराय ते भीमराय’ समता मार्चची घोषणा

मग निर्णय झाला, सत्याग्रहाची घोषणा ज्या परिषदेत करण्यात आली, त्या दिवशी म्हणजे 19 मार्चला आपण प्रयत्न करायचा सर्वांना हाक देण्याचा. त्या दिवशी वंदन करायचे या जिल्ह्यातील दोन दीपस्तंभांप्रमाणे असणार्‍या महान व्यक्तिमत्वांना. शिवराय व भीमराय. शिवराय फक्त मराठ्यांचे नाहीत आणि भीमराय फक्त दलित वा बौद्ध बांधवांचे नाहीत. मानवमुक्तीच्या या उद्गात्यांना एकजातीय करून चालणार नाही. त्यामुळे जातीयवाद्यांचे फावते आणि घोषणा झाली शिवराय ते भीमराय समता मार्चची. दरवर्षी महाराष्ट्रातील कार्यकर्ते, संघटनांना आवाहन करून हा दिवस साजरा करायचा. सर्वजातीय, धर्मीय बांधवांना या उपक्रमांत येण्याचे आवाहन करत राहायचे. सतराव्या शतकातील सरंजामशाहीत, लोकशाहीची संकल्पना विचारात नसताना रयतेचे राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज व आधुनिक भारताच्या उभारणीसाठी राजेशाही, सरंजामशाही संपवून समतेच्या वाटेवर लोकशाहीचा रोडमॅप संविधानाच्या रुपाने मांडणारे डॉ. भीमराव आंबेडकर. या दोन प्रेरणास्थानांना नव्या पिढीसमोर बदलत्या वास्तवात पुन्हा त्यांच्या द्रष्ट्या मांडणीसह पुढे आणत जातीयवादी शक्तींना भिडणारी ताकद उभारायची, हे आव्हान आम्ही सर्वांनी सामूहिकपणे स्वीकारले. भल्या सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, मानवंदना देऊन खाली माता जिजाऊंच्या समाधीस्थळी वंदन करून यात्रा निघते. संध्याकाळी चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची प्रेरणा जागवत तिथे भीमरायांना वंदना देत यात्रेचे सभेत रूपांतर होते.
2018 पासून या मोहिमेची सुरुवात झाली आहे. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते, विविध जातीय, विविध धर्मीय नागरिक यात सहभागी होत आहेत. मधली दोन वर्षे यात कोविड साथीमुळे खंड पडला. पण पुन्हा जोमाने सुरुवात झाली आहे. आता याच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यातदेखील अशाच यात्रा याच नावाने आयोजित केल्या जात आहेत. 2027 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा या प्रयत्नांचे स्वरूप अधिक व्यापक व्हायला हवे, असा प्रयत्न आहे.
हा देश जातीयवाद्यांनी शिवरायांच्या व भीमरायांच्या स्वप्नापासून खूप लांब न्यायचा प्रयत्न चालवला आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांची मूळ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या राजवटीत लोकशाहीचे खच्चीकरण सुरू आहे. संविधान त्यांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळे मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन करणे सुरू आहे. बहुजनांना गुलामगिरीकडे नेणारा हा प्रवास थांबवायचा असेल, तर तरूण पिढीला, कष्टकरी समाजाला, जाणत्या नागरिकांना जागवायचे खूप प्रयत्न करायला हवेत. शिवराय, भीमराय व पुरोगामी परंपरेतील अनेक दीपस्तंभांच्या प्रकाशात पुन्हा एकदा वाटा रुंदावायला हव्यात. आपल्या पिढीची ती जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या संविधानविरोधी शक्ती सत्तेत आहेत. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्या सत्तेत असता कामा नयेत, असा प्रयत्न झटून करू या.
जय शिवराय, जय भीमराय.

– उल्का महाजन
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.) 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.