सच्चा आंबेडकरानुयायी : एल.आर. बाली

सच्चा आंबेडकरानुयायी : एल.आर. बाली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी एल.आर. बाली यांचे नुकतेच निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर व त्यांच्या कृतीशील कार्यावर बालींची प्रखर निष्ठा होती. हयातभर त्यांनी बाबासाहेबांच्या विचार कार्याचा प्रचार-प्रसार मोठ्या निष्ठेने केला. ‘भीम पत्रिका’ या नियतकालिकाचे संपादन त्यांनी अवितरपणे 65 वर्षे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रतिम चरित्र हिंदी भाषेत लिहून काढले. मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण करून ठेवली. महाराष्ट्राशी त्यांचे ऋृणानुबंध होते. मक्रणपूरच्या ऐतिहासिक 75 व्या परिषदेस ते आवर्जून उपस्थित होते. मराठवाड्यात ते फिरले. आंबेडकरानुयायांना ते बाबासाहेबांच्या आठवणी सांगत असत. बाबासाहेबांची अनेक भाषणे व पुस्तके इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करून आंबेडकरी विचार त्यांनी जगभर पोहचविला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञानावर निष्ठा असणार्‍या बालीसाहेबांचा काँग्रेसविरोध तीव्र होता. 1967-68 साली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जी काँग्रेस-रिपब्लिकन युती केली होती, त्या युतीस बालींचा विरोध होता. या युतीसंदर्भात 18 पानी निवेदन रिपब्लिकन पक्षश्रेष्ठींना देऊन त्यांनी युतीस विरोध करताना असे म्हटले होते, की या युतीमुळे रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येईल. झालेही असेच. बालीसाहेबांचे भाकीत खरे ठरले. आज रिपब्लिकन चळवळच खंडीत झाल्याचे आपणाला पहावे लागत आहे. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे बालीसाहेबांचे मित्र होते. झैलसिंग जेव्हा केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी बालीसाहेबांना म्हटले होते, तुम्ही काँग्रेस पक्षात या. पंतप्रधान इंदिराजी गांधींना सांगून मी तुम्हाला मंत्रीपद मिळवून देईन. पण स्वाभीमानी बालीसाहेबांनी ग्यानी झैलसिंग यांचा हा देकार स्पष्टपणे नाकारला. ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाला मी शब्द दिला आहे, की मी तुमची चळवळ नेटाने चालवीन. तेव्हा मला बाबासाहेबांना दिलेल्या शब्दाशी दगलबाजी करता येणार नाही.’
एल.आर. बालीसाहेबांचा हा तत्त्वनिष्ठ काँग्रेसविरोध पाहता आज मात्र काही जण बालीसाहेबांच्या विचार कार्याला छेद देणारे वर्तन करीत आहेत. आपल्या मराठवाड्यात नांदेड येथील एका संस्थेने एल.आर. बालींच्या नावे गुजरातमधील एका काँग्रेसी आमदारास एल .आर. बाली पुरस्काराने सन्मानीत केले. बालीसाहेबांच्या विचार-कार्याशी केलेली ही बेईमानीच नव्हे काय? कुणी सांगावे, आज जर बालीसाहेब हयात असते, तर त्यांनी अशा लोकांना त्यांच्या काठीने बडवूनच काढले असते. बालीसाहेबांच्या स्मृतीस प्रणाम…!

– बी.व्ही.जोंधळे  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.