सरकारने भिडेंना त्यांची जागा दाखवून द्यावी!

सरकारने भिडेंना त्यांची जागा दाखवून द्यावी!

मनोहर ऊर्फ संभाजी भिडे नावाचा एक विकृत माणूस गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वळवळत आहे. बेछूट, बेलगाम, निंदाव्यंजक, बदनामीकारक विधाने करणे, हा या विकृत माणसाचा घृणास्पद छंद आहे. कुठला एक आंबा खाल्ला तर महिलांना पुत्रप्राप्ती होते, असा दिव्यशोधही त्यांनी लावला आहे. मध्यंतरी एका वाहिनीच्या तरुणीने या माणसाला प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे महाशय म्हणाले, तुझ्या कपाळावर टिकली दिसत नाही, ती तू आधी लाव व मग मला प्रश्‍न विचार. भिडे महाशय इथेच थांबले नाहीत, तर राष्ट्राविषयीसुद्धा ते आपले निंदाव्यंजक फुत्कार सोडीत असतात. भिडेंना 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला हे मुळी मान्यच नाही. त्यांना भारताचा तिरंगा राष्ट्रध्वजही मान्य नाही. अर्थात, हेही काही नवीन नाही. कारण आपल्या देशात एका परिवाराला 15 ऑगस्ट 1947 ला देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यच वाटत नाही. त्यांना तिरंगाही मान्य नाही. त्यांच्याशी वैचारिक नाळ जुळलेल्या भिडेंसारख्या लोकांना 15 ऑगस्ट व राष्ट्रध्वज मान्य नसला तर काही नवल नाही. पण या भिडेची मजल आता मर्यादाभंग करून राष्ट्रपुरुषांची बदनामी करण्यापर्यंत पोहोचली आहे.
आधी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची बदनामी करणारी मुक्ताफळे उधळली. आता ते म. गांधींकडे वळले. म. गांधी करमचंदांचे पुत्र नसून एका मुस्लिम जमिनदाराचे पुत्र आहेत, असे संतापजनक भाष्य त्यांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात केले. पाठोपाठ त्यांनी म. फुलेंसह अन्य समाजसुधारकांचीही यथेच्छ बदनामी केली. वाशिम येथे त्यांनी उत्तर प्रदेशातील भारतप्रसाद मिश्रा, बंगालमधील राजा राममोहन रॉय आणि आपल्या महाराष्ट्रातील वंदनीय म. ज्योतिराव फुले यांना चक्क देशद्रोही ठरविले. या समाजसुधारकांवर गलिच्छ शब्दांचा भडीमार केला. भिडे बरळले, ‘ब्रिटिशांनी या लोकांना समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. या लोकांवर (म्हणजे भारतप्रसाद मिश्रा, राजा राममोहन रॉय, म. फुले व तामिळनाडूतील रामस्वामी नायकर) देशद्रोहाचे शिक्के असून त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत.’
भिडेंनी विदर्भात ठिकठिकाणी ही जी गरळ ओकली ती आम्ही इथे कमी शब्दात दिली आहे. भिडेंनी ज्या शब्दात आपल्या पोटातील आणि मनातील नरक भडाभडा ओकला त्यांचे ते गलिच्छ शब्दही उच्चारण्यास व लिहिण्यास आमचे मन धजत नाही. भिडे इथेच थांबले नाहीत, तर शिर्डीच्या साईबाबांवरही त्यांनी तोंडसुख घेतले असून हिंदूंनी साईबाबांना आपल्या देव्हार्‍यातून हटवून टाकावे, असे प्रलाप काढून लाखो भाविकांच्या भावनाही दुखावल्या. प्रश्‍न असा आहे, की भिडे ही व्यक्ती समाजात तेढ निर्माण करणारी, वादग्रस्त नि चीड आणणारी विधाने करतेच कशी? त्यांना एवढी हिंमत येथे ती कुठून? या प्रश्‍नाचे सरळ-साधे उत्तर असे आहे, की हे सारे काही भिडे बोलत नसून भिडेंच्या तोंडून सनातनी प्रतिगामी शक्तीच बोलते आहे. ही तीच शक्ती आहे, जी दाभोळकर, कलबुर्गी, पानसरेंना संपविण्यास कारणीभूत ठरली. एरवी उगाच का माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी विधानसभेत करताच त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली? आणि उगाच का भिडे गलिच्छ, ओंगळवाणी, संतापजनक विधाने करताना तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवून दाद देतात? कुणीच कसा जिथल्या तिथे विरोध करीत नाही?
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म. गांधींचा अवमान सहन करणार नाही, भिडेंवर जरूर कारवाई होईल, असा शब्द महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे. याबरोबर अन्य राष्ट्रपुरुषांची जी निंदानालस्ती भिडेंनी केली त्याचीही दखल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जरूर घ्यावी. अशा आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेल्या आपल्या शब्दास जागतील व भिडेंना त्यांची खरी जागा दाखवून देतील.
अर्थात, राज्य शासनाकडून भिडेंवर कारवाई व्हावी अशी जरी अपेक्षा असली, तरी ती पूर्ण होईल की नाही याबाबत मी साशंक आहे. कारण ज्या विचारांचे प्रतिनिधित्व आज राज्यशासन करते आहे, ते सरकार भिडेंवर कारवाई करेलच करेल, अशी खात्री वाटत नाही. हिंदुत्ववादी परिवारात भिडेंना गुरू मानले जाते. इतकेच नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार जेव्हा महाराष्ट्रात होते तेव्हा तत्कालीन गृहमंत्री राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील यांनी भिडेंना सरकारी संरक्षण पुरविले होते. तरीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करू म्हणतात. चांगली गोष्ट आहे. कारवाई कराच करा. 

– बी.व्ही.जोंधळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.