शहरांची नावे बदलून काय साधणार? प्रश्‍न सोडवा की

शहरांची नावे बदलून काय साधणार? प्रश्‍न सोडवा की

विशिष्ट मर्यादेपलिकडे नामांतराला महत्त्व असत नाही. नामांतर झाल्यानंतरही ते विषय जुनेच प्रश्‍न घेऊन जातात. नामांतरामुळे सांस्कृतिक, धार्मिक भावना चेतवल्या जातात. ज्यांनी ही मूळ नावे दिलेली असतात, त्यांच्याविरुद्धची म्हणजे त्यांच्या वारसदारांविरुद्धची सांस्कृतिक लढाई अधिक तीव्र होते. ती तीव्र करण्यासाठीच शहरांचे, राज्यांचे नामांतर करण्याचा पेच टाकला जातो. केंद्रात उजव्यांचे सरकार आल्यानंतर नामांतराचा धडाका सुरू आहे. अगदी काल-परवापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती आणि पुढेही ती चालूच राहणार आहे. आपल्यावर राज्य केलेल्यांचे कोणतेही चिन्ह राहू नये. ते पुसून टाकण्याचा आणि स्वतःच्या पराक्रमाच्या गाथा कोरण्याचा हा प्रयत्न असतो. शहरे, किल्ले, रेल्वेस्थानके, पर्यटनस्थळे, महत्त्वाच्या इमारती आदींची नावे बदलण्याचा हा खेळ असतो. आमच्या शत्रूंची सावलीही आम्ही ठेवणार नाही, अशी एक राजकीय भावना असते. शहरांचे नामांतर करणारे किंवा ती वसवणारे इतिहासजमा झाले. पण या इतिहासाच्या पाऊलखुणा आत सांस्कृतिक, राजकीय कलहांचा विषय बनवल्या जात आहेत. जुने एवढे वाईटच असेल, तर मग मनुस्मृती नष्ट का केली जात नाही. गोडसे खलनायक का ठरत नाही. शत्रूंना दारे उघडणार्‍यांचे काय झाले, असे अनेक विषय तयार होतात. पण सत्ताधार्‍यांना त्याच्याशी देणेघेणे नसते. आपल्याकडे जन्माला आलेली आणि आपण जन्माला घातलेली प्रत्येक गोष्ट श्रेष्ठच असते, असे वर्तमानाला मागे अंधाराच्या गुहेत नेणारे मूलतत्त्ववादी सांगत असतात. भावनांवर स्वार होऊन अशा गोष्टींचा पाठपुरावा करत असतात. याच गोष्टींना राष्ट्राचा विकास आणि राष्ट्राची घोडदौड समजत असतात. ज्या शहरांची नामांतरे झाली त्यांचा विकास करण्याची जबाबदारी यांच्यावर नसते. विकासाचा खोटा ढोल वाजवला, की झाले यांचे काम! महापुरुषांची नावे कुठे देऊ नयेत असा हा विषय नाही. ती द्यायला हवीत. त्यांची स्मारके उभी करायला हवीत. या गोष्टी प्रेरणादायी असतात; पण प्रश्‍न आहे तो हे सारे कसे करण्याचा. दुसर्‍याची रेघ पुसून आपली स्वतंत्र रेघ मारायची, की ती कायम ठेऊन स्वतंत्र मारायची, याचा विचार कोणी करत नाही. ज्या शहरांना मुस्लिमांची, इंग्रजांची, पोर्तुगिजांची नावे आहेत, म्हणून ती सारी काही राष्ट्रद्रोही, धर्मविरोधी बनलेली आहेत का, याचे भानही कोणाला नाही. नामांतराचा हा धडाका चालूच राहणार आहे. ज्याच्याकडे सामाजिक, आर्थिक विकास करण्याची क्षमता नसते तो संस्कृतीचे गाणे गात राहतो.
नागपूर, अहमदाबादपाठोपाठ आता कर्नाटक ही संघाची एक महत्त्वाची पाठशाळा बनली आहे. तेथून संघ दक्षिण भारत काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्‍नांत यांना स्वारस्य नाही, पण नामांतरात आहे. कर्नाटकातील बारा शहरांची नावे बदलण्याचा निर्णय केंद्राने एका झटक्यात घेतला. त्यामानाने औरंगाबादचे संभाजीनगर करण्यास उशीर लागला. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने तो घेतला. पण 2014 मध्ये कर्नाटकातील बारा नावे एका रात्रीत बदलली गेली. ती पुढीलप्रमाणे ः कंसात नवे म्हणजे बदललेले नाव आहे. बंगलोर (बंगळुरू), मंगलोर (मंगळुरू), म्हैसूर (म्हैसुरू), गुलबर्गा (कलबुर्गी), हुबळी (हुब्बळी), शिमोगा (शिवमोगा), चिकमंगळूर (चिक्कमंगळुरू), बेल्लारी (बल्लारी), विजापूर (विजयपुरा), हॉस्पेट (होसपेटे), आंध्रात राजमुंद्रीचे राजमहेंद्रवरम, हरियाणात गुडगावचे गुरूग्राम, उत्तर प्रदेशात अलाहाबादचे प्रयागराज, छत्तीसगढमध्ये न्यू रायपूरचे अटलनगर, महाराष्ट्रात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव वगैरे. देशातल्या अकरा रेल्वेस्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. आणखी काही स्थानकांचे नामांतर अजेंड्यावर आहे. विमानतळे, बंदरे, मैदाने, रस्ते, गद्या आदींचाही त्यात समावेश आहे. ही नामांतराची मोहीम देश आणि देशाच्या मानसिकतेला पुढे नेणार की मागे नेणार, भूतकाळाच्या सावल्यांत जगायला लावणार, की वर्तमानकाळातील लढाया करून जगायला लावणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.


तात्या विंचू 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.