भारत हा जगातील मोठ्या लोकसंख्येचा देश असून, त्यातील 50% लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. जी स्त्रीही आपले घर व्यवस्थित चालवू शकते, ती देशही चालवू शकते, हे तिने आजवर सिद्ध केलेले आहे. भारतीय संविधानाने समानता हे तत्त्व अंगीकारले आहे. सर्व स्तरांवर, सर्व ठिकाणी सर्वांना समान हक्क व अधिकार मिळणे यास समानता असे म्हणता येईल. एखादा देश कितपत प्रगत व विकसित झालेला आहे हे पाहायचे असेल, तर त्या वर्गातील स्त्रियांची स्थिती कशी आहे, हे जाणून घेतले पाहिजे. सांगण्याचे तात्पर्य असे, की देशाच्या विकासात स्त्रीविकास व स्त्रीसमानता हा विषय अत्यंत महत्त्वाचा व अविभाज्य घटक ठरतो. स्त्रीविकास व समानता यासंदर्भाने विसाव्या शतकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथातील विसाव्या अध्यायामध्ये महिलोन्नतीसंदर्भात मांडलेले विचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
भारतीय स्त्रियांस पुरुषसत्ताक व्यवस्थेने दुय्यमत्वाची वागणूक दिलेली होती. प्राचीन लेण्यातील स्त्री-पुरुष यांच्या शिल्पाकृती जरी आपण पहिल्या, तर स्त्रिया या पुरुषव्यवस्थेच्या बळीच ठरलेल्या दिसून येतात आणि त्या मानसिकतेचा पगडा आज एकविसाव्या शतकातही स्त्रियांमध्ये आपणास जाणवतो. स्त्रियांस दिलेल्या वाईट वागणूकीमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहन केले होते. भारतीय स्त्रीमुक्तीचे उद्गाते महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रिया लिहित्या झाल्या व आम्ही अबला नसून सबला आहोत, सक्षम आहोत हे त्यांनी सिद्ध केले. मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, फातिमा शेख यासारख्या क्रांतिकारक स्त्रीयांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेला जाब विचारला.
ग्रामोन्नती अध्यायाच्या सुरुवातीसच मंजुळामातेचे स्मरण तुकडोजी महाराजांनी केलेले असून, आपली माता सहनशील, कष्टाळू, धर्मप्रिय, सहृद, पतिपरायण, भक्तिमती, आदर्श गृहिणी होती. तिच्या संस्कारात मी वाढलो, असे ते म्हणतात. स्त्री ही क्षणकालची पत्नी व अनंत काळाची माता असते, हे अगदी सत्यच आहे. गावाच्या उन्नतीचा व उद्याच्या राष्ट्राच्या जडणघडणीचा पाया विद्यार्थी व गुरुजानांवर असतो; पण त्याहीपेक्षा आदर्श मातेच्या संस्कारावर अधिक अवलंबून असतो. जिजाऊ यांच्या आदर्श संस्कारांमुळेच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी मिळाले. मंजुळा मातेच्या संस्कारामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घडले. माता भुवनेश्वरी यांच्या संस्काराने स्वामी विवेकानंद जगास प्राप्त झाले. तेव्हा व्यक्तीच्या चारित्र्यनिर्माणामध्ये मातेचे उपकार अनंत आहेत. महाराज म्हणतात,
विद्या गुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार ।
गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 2)
आदर्श माता आपल्या तान्ह्यावर गर्भापासून संस्कार घडवीत राहते. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी । ती जगाते उद्धारी’ अशी म्हणच आहे. स्त्रीच्या तेजावरच पुरुषाचे मोठेपण अवलंबून राहते. ही स्त्री शक्ती बालकाला माउलीच्या रूपात प्रथम जवळ करते.पुढे वात्सल्याने त्यास सांभाळते. एखादी स्त्री भगिनी म्हणून निरपेक्ष प्रेम करते. एखादी सहधार्मिनी त्याला सर्वस्व देऊन साथसोबत करते. लोक म्हणतात ‘बाप तैसा लेक’ पण हे पूर्ण सत्य नव्हे. बाप जन्माला कारण ठरतो; पण आईच मुलाला जगात आणून चालते-बोलते करते. ‘मातृशक्तीनेच वाढते सकळीक’ हे मात्र सत्य आहे.
पुरुष सर्वकाही करी । परि बांधला राही घराबाहेरी ।
सर्व विचार घेवोनि आचरी । तरीच शांती त्यासहि लाभे ॥
उत्तम महिला हेंच करी । आपुलें घर ब्रीदासह सावरी ।
मुलबाळ आदर्श करी । वरी प्रेमळपण सर्वांशी ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 6, 7)
आपल्याकडे एक म्हण आहे, की ‘यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’. मात्र, केवळ एकाच स्त्रीचा त्या व्यक्तीच्या विकासात हात नसतो, तर घरातील सर्वच स्त्रियांचा हात त्या व्यक्तीच्या घडणीत असतो. त्याचबरोबर भारतीय स्त्री ही पूर्णपणे सक्षम बनण्यासाठी सावित्रीप्रमाणे तिच्या पाठीशी प्रत्येक घरात महात्मा जोतीराव फुले निर्माण झाल्याशिवाय स्त्री निर्भय बनणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. तसेच स्त्री-पुरुषांनी एकमेकांस पूरक वागणे. दोघांनीही निर्भेळ सहजीवन अनुभवणे यालाच स्त्री-पुरुष समानता म्हणता येईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, स्त्रियांच्या समजूतदारपणाला कुठेच तोड नाही. आपल्याकडे चार देवांना प्राथमिकता दिलेली दिसते. मातृदेवो भव! पितृदेवो भव! आचार्य देवोभव! अतिथी देवो भव! हा गौरव वेदकाळापासून आल्याचा अभिमान महाराज व्यक्त करतात. ईश्वरानंतर पहिला देव आई आहे. नंतर वडील, सद्गुरू आणि अतिथी आहेत. गृहिणीची महती सांगण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत, असे महाराज म्हणतात.
पुरुष हृद्या ना कळे जेवढे । स्त्रियेचें समजणे तितुकें गाढें ।
तियेच्या भावना-गंगेचे पवाडे । वर्णिले ना जाती माझ्याने ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 20)
कोणतीही स्त्री आपल्या घरासाठी ठरविते ते करूनच दाखविते. तिची परिश्रम, जिद्द, चिकाटी सारेच अद्भुत असते. म्हणून महाराज लिहितात,
जगात असता नाना जीव । सकलास जाहीर त्यांचा भाव ।
परि मायाळूपनाचा गौरव । माऊलीसरिसा नाही ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 27)
जगात अनेक प्राणी आहेत. प्रत्येकाला काही भाव, स्वभाव असतो; पण माउलीची भूमिका जिणे स्वीकारली तिची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. अशा माउलीरूपी स्त्रीस जर आज अधिक शिक्षण मिळाले, तर स्त्री जे-जे शिकेल ते-ते घरादारासाठी कारणी लावेल. तो स्त्रीचा अंगभूत गुणच आहे. ती जे विविध प्रयोग करेल तेही अल्पखर्चाने. पुरुषांपेक्षा स्त्रीकडे एक दक्षता असते ती मोठी विचित्रच असते. तिची ती इतरांचा विचार करण्याची रीती होय.
आजचे युग स्त्री-पुरुष समानतेचे आहे. आज पुरुषही उत्तम स्वयंपाक करू शकतो. स्त्रियाही चांगली मिळकत करू शकतात; परंतु स्त्री स्वातंत्र्याची टोकाची भूमिका महाराजांना मान्य नाही. स्त्री-पुरुषांच्या स्वभाव मिलनातूनच घरात स्वर्ग अवतरत असतो. महाराज म्हणतात,
पुरुष आहे पिंडवर्णी । स्त्री आहे दक्ष कारुणी ।
दोघांचे स्वभाव मिळताक्षणी । होय मेदिनी वैकुंठचि ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 28)
सामान्यत: पुरुष पिंडवर्णी म्हणजे व्यवहारी असतो. जे त्याच्या सोयीचे आहे ते त्याला विशेष भावते. त्यालाच तो महत्त्व देत असतो. तो थोडा आग्रही, हट्टीही असतो. स्त्री स्वभावत: कारुणिक असते. करुणेने दयाभावाने, मायाळूपणाने बहुतेक गोष्टीकडे आधी पाहते. तिला जे-जे आपले आहे, ते चांगले वाटते. आपले घर कितीही चंद्रमौळी असले, तर तेच तिचे विश्व असते. पुरुषाला दुसरे घर जवळचे वाटू शकते. स्त्रीला आपला पती, पुत्र, कन्या अगदी प्रिय वाटत असते. जिला असे वाटतच नाही आणि भलतेच वाटते ती कुणाची गृहस्वामिनी, अर्धांगिनी, माउली म्हणवली जात नाही.
व्यवहारदक्ष पुरुष, कर्तबगार पती, खंबीर-गंभीर कार्यकुशल घरधनी आणि प्रेमळ, आतिथ्यशील, प्रसन्न स्वभावाची घरधनीण, गृहस्वामिनी एकत्र येतील, तर सारा परिवार पुढे येतो. ज्याच्या त्याच्या प्रशंसेला उतरतो. जणू त्या घराचा स्वर्गच होतो. त्यातही महाराज सरळ सांगून टाकतात… उत्तम पुरुष आणि उत्तम स्त्री यांचा संसार सुखसमृद्धीचा होतोच होतो. त्यामध्ये “पुरुषाहूनि काकणभरी । महिला वरिच राहतसे !” पुरुष फटाफट बोलून जातो. स्त्री बरेच मनात ठेवून घेते. वेळप्रसंगी गोडव्याने बोलून बिघडलेले सांभाळून घेण्याची एक संयमशक्ती, सहनशक्ती, कौशल्यच तिच्यापाशी असते. पुरुषाचा मार्ग सरधोपट तर स्त्रीचा व्यवहार, चतुराईचा असतो. पुरुष चिंताक्रांत होऊन प्रसंगी खचतो, वैतागतो, त्रागाही करतो. व्यसनाकडे वळू शकतो. प्रश्नाकडे पाठ फिरवून पलायन करतो. स्त्रीला हे करता येत नाही. करील तर ती स्त्रीच नव्हे. यासाठी महाराज नमूद करतात की,
जेंव्हा पुरुष होय चिंतातूर । तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार ।
हे मी पाहीले घरी अपार । प्रसंग येता जाण्याचे ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 30)
स्वार्थाचा, अहंकाराचा निचरा झाल्याशिवाय व्यक्तीमध्ये कारुण्य उपजत नसते. करुणा नेहमी दुसर्यासाठीच असते. राष्ट्रसंतांनी गावातील महिलांच्या उन्नतीचा विषय मांडला. त्यांना केवळ स्त्रियांचे गुण व पुरुषांचे दोष मांडायचे नव्हते. हे त्याच्या संतवृतीत्त बसणार नव्हते. त्यांनी जे स्त्री-पुरुषांचे निरीक्षण केलेले होते ते पाहूनच तारतम्यानेच ते विधायक मांडणी करतात. त्यांना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये चातुर्य लक्षणे अधिक दिसली. सामान्यतः स्त्रिया भविष्याकडे दृष्टी ठेवून वर्तमानाचा कोट शिवतात. पुरुष भूतकाळात वा वर्तमानात एकारलेपणाने बुडून भविष्याचे वाटोळे करीत असलेले दिसतात.
मानवी स्वभावाचे अनुमान । प्रसंग पाहोनि अवधान ॥
पुढील काळाचे अनुसंधान । स्त्रियांचे ठायीं ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 32)
स्त्रीपाशी प्रसंगावधान असते, हे आपण हरघडी संसारात अनुभवतो. ती हातचे राखून ठेवते. कोंड्याचा मांडा करते. वेळप्रसंग निभावून नेते. जे करते ते निष्ठापूर्वक, भक्तिपूर्वक करते. तिच्यात शक्ती कमी असेल; पण भावबळ, मनोबल अधिक असते. म्हणून महाराज म्हणतात,
स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान । तिलाच संयम, शहाणपण ।
तिच्यानेच हालती वाटे संपूर्ण । संसारचक्रे ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 33)
राष्ट्रसंत म्हणतात, की स्त्री-पुरुष रथाची दोन चाके आहेत व ही दोन्ही चाके जर सारखी मजबूत केली तरच संसाराची गाडी सुखाने पुढे जाईल, समाजजीवन सुधारेल. याचा अर्थ असा, की स्त्री व पुरुष दोघांचाही समान विकास झाला तरच समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास शक्य आहे, असे त्यांना सुचवायचे होते. खरे तर जन्मतःच अपत्य हे नर किंवा मादी असते; परंतु कुटुंब व समाज त्या अपत्याला संस्काराद्वारा पुरुषत्व व स्त्रीत्व बहाल करतो. आर्थिक भेदाला सामाजिक भेदात परावर्तित करताना पुरुषाला उच्च व स्त्रीत्वाला कनिष्ठ दर्जा दिला जातो. त्यामुळे जन्मापासून (मातेच्या उदरात असल्यापासून) ते मृत्यूपर्यंत स्त्री वर्गाला असमानता, भेदभाव व अन्यायाला सातत्याने सामोरे जावे लागते. संगोपन, आहार, आरोग्य, कामाचा मोबदला, जमीन, मालमत्ता, अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी विविध बाबतीत भेद केला जातो व स्त्रियांच्या तुलनेत पुरुषाला अधिक महत्त्व व प्राधान्य दिले जाते, असे चित्र दुर्दैवाने आपल्या देशात आजही दिसते. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मुलगी म्हणजे परक्याचे धन, या संकुचित विचारामुळे मुलीचा जन्म नको. त्यासाठी गर्भपात करणे, जन्मानंतर ठार मारणे किंवा तिची हेळसांड करणे असे प्रकार घडताना दिसतात.
इ.स. 2011 च्या जनगणनेनुसार 0-6 वयोगटातील 1,000 मुलांच्या मागे 914 मुली हे प्रमाण मुलगी नको या मानसिकतेचे द्योतक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुलगा-मुलगी या दोघांनाही समान ठेवावे, हे ईश्वरी सूत्र असल्याचे तुकडोजी महाराज सांगतात.
सर्व सोयी पुरुषांकरिता । स्त्रियांसाठी सर्व व्यथा ।
हे कोण बोलले शास्त्र आता? । द्यावे आता झुगारोनि ।
माझे म्हणणे श्रोतयाते । जे-जे सुख असेल पुरुषांचे ।
महिलासीहि असावे अभिन्नपणे ते । स्वातंत्र्य सुखासाधना ॥
राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात, प्राचीन काळात स्त्रिया तत्त्वचर्चेमध्ये सहभागी होत. त्या वादविवादात अव्वल असत. नाना तर्हेच्या कलेमध्ये, युद्धामध्येदेखील त्या पारंगत होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ, राणी दुर्गावती, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचा दाखला महाराज देतात. स्वभावाने मृदू असणारी स्त्री वेळप्रसंगी कठोर चंडिकेचे रूप धारण करते. अशी सर्वगुणसंपन्न स्त्री मागे का? असा प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाचे उत्तर महाराज देतात. ते म्हणतात, स्वार्थापोटी लोकांनी स्त्रीचे जीवन रुक्ष करून टाकले. तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिला उपेक्षित ठेवले, तिला भोगवस्तू मानले, उंबरठ्याच्या आत कोंडून ठेवले, शिक्षणाचा उच्च हक्क नाकारला, त्यामुळे स्त्री मागे राहिली. स्त्रीवर्ग दीनदुबळा बनला. आज स्त्रियांसाठी सर्व क्षेत्रे खुली आहेत; परंतु दास्यत्वाचा पगडा आजही एवढा आहे, की पिंजरा उघडला; पण पक्षीच पिंजर्याबाहेर पडायला तयार नाही, अशी स्त्रीची आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्थिती आढळते. स्त्रीच्या विकासाच्या आड येणार्या प्रथा, परंपरा चुकीच्या आहेत, असे मत महाराज व्यक्त करतात.
मुलीने सदा लपोनि राहावे । मुलाने गावी रागरंग पाहावे ।
ऐसे दुष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हा ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 64)
बाईपणाची शिकवण स्त्रीस लहानपणापासूनच घरातून दिली जाते. हे मात्र आजच्या शिक्षित स्त्रीने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मुलास व मुलीस समानतेने वागविले पाहिजे.आजही गुणवत्ता यादीत झळकणार्या मुलींचे नंतर काय होते? त्या संसारातच गुरफटतात, त्यांच्या गुणवत्तेची, बुद्धीची गरज देशाला असताना त्यांच्यातील चातुर्य सीमित होते. घरातील प्रत्येक पुरुषाने सतत विचार केला पाहिजे, की माझ्या वागण्याने स्त्रीवर अन्याय होता कामा नये. मग ती आई, बहीण, पत्नी कोणीही असो, तिचा सन्मानच झाला पाहिजे. आज कितीतरी मुली स्वत:च्या आई-वडिलांना मुलांपेक्षा सक्षमपणे सांभाळताना मी पाहत आहे. आज शिक्षणाचा प्रसार व प्रभाव पालक वर्गावर दिसत आहे. मुलांप्रमाणे मुलींच्याही शिक्षणाचा विचार पालक करताना दिसत आहेत.
आज कायद्याने समान वेतन, समान काम मान्य केले असले, तरी शेतात, उद्योग कारखान्यांतून स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने मोबदला मिळत नाही. घरकामास उत्पादक संबोधले जात नाही. घरकाम हे स्त्रीचे कर्तव्य ठरविले जाते. तिला माणूस म्हणून वागविले जात नाही. स्त्रीला मानसन्मान, प्रतिष्ठा, मनुष्य म्हणून सर्व अधिकार मिळायला हवेत. महाराज हाच संदेश ग्रामगीतेतून देतात.
म्हणती स्त्री ही गुलामची असते । तिला हक्क नाही उद्धरायापुरते ।
हे म्हणणे शोभेना शहाण्यातील । स्वार्थाधतेचे ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 46)
समाजी जो पुरुषांशी आदर । तसाची महिलांशी असावा व्यवहार ।
किंबहुना अधिक त्यांचा विचार । झाला पाहिजे सामाजी ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 78)
एकीकडे स्त्री-पुरुष समानतेचा जागर चालू असताना कितीतरी निर्भया पुरुषी अन्याय, अत्याचार सहन करताना दिसतात. रोज आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहतो, वाचतो स्त्रीयांवरील अत्याचाराच्या बातम्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतात. स्त्री आज समाजातच नाही, तर घरातही किती सुरक्षित आहे? याचा विचार करण्याची गरज आहे.
आज शिक्षणामध्ये नैतिक शिक्षण, मूल्यशिक्षण, स्व-संरक्षण शिक्षण आदी देण्याची आवश्यकता आहे, सांगितले जाते; परंतु राष्ट्रसंतांनी या गोष्टी फार पूर्वी लिहून ठेवल्या आहेत.
काही मुली शक्ती शिक्षण घेती । मुलांपेक्षाही धीट असती ।
नाही गुंडाचीही छाती । हात घालील त्यांचे वरी ।
तेथे कासयासी पडदा? । परावलंबनाची आपदा ।
आत्मसामार्थायाने सदा । स्त्रिया मर्दिती असुरांना ॥
शिक्षणही सांभाळोनी तनु, मन । करावे मुलीबाळीस विद्वान ।
अंगी असावे शौर्य पूर्ण । ब्रीद आपुलें रक्षाया ॥
(ग्रामगीता अध्याय 20, ओवी 100)
स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने राष्ट्रसंतांनी सांगितलेले विचार आज तेवढेच प्रासंगिक आहेत. नववधू-वर यांना परस्परांना निवडण्याचा अधिकार, आंतरजातीय व विधवाविवाह यांचे समर्थन, बालविवाह व हुंडा पद्धतीला विरोध, स्त्री-पुरुष दोघांनाही संतती नियमनाचा सारखा अधिकार आदी विचार राष्ट्रसंतांची दूरदृष्टी व पुरोगामित्व दर्शविणारे आहेत.
आज देशात स्त्री-पुरुष समानता ही केवळ कायद्याने निर्माण होऊ शकत नाही.तरीही असमानता नष्ट करण्यासाठी महाराजांच्या विचारांबरोबर पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्यासारखा स्त्रीकडे एक आपल्यासारखीच व्यक्ती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आपणामध्ये निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जनप्रबोधनाची, लोकशिक्षणाची प्रभावी चळवळ समाजात राबविणे अत्यंत आवश्यक आहे.
संदर्भ ग्रंथ :
1. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजकृत ग्रामगीता, संपादक स्व. सुदाम सावरकर, एकोणतिसावी आवृत्ती, प्रकाशन तिथी 26 जानेवारी 2016.
2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजविरचित ग्रामगीता सुबोध निरूपण – डॉ. अशोक कामत, प्रकाशन – गुरुकुल प्रतिष्ठान, पुणे.
3. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती-स्वामी श्रीकांतानंद, प्रकाशन-तिथी 15-08-2012, रामकृष्ण मठ, पुणे.
4. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारदर्शन – संपादन डॉ. एल.एस. तुळणकर, आर.बी. प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती 08/2016.
– डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे
(लेखक हे संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)