– जयदेव डोळे
हा पंतप्रधान झोपा काढतो, असे कुणी म्हणणार नाही. मात्र, तो अनेक गोष्टी पाहून न पाहिल्यासारखा करतो, असे म्हणता येते. नाही तर रोज तीन-चार कार्यक्रम करणारे पंतप्रधान मधल्या वेळेत शांततेचे आवाहन करू शकले असते. होतेय उलटेच. खुद्द देशाचा नेता मूक झालेलाय. म्हणजे नायकमूक!
अमेरिका, युरोप, आफ्रिका हे काही गप्प बसणारे खंड नाहीत. कित्येक क्रांत्या करणारे देश आहेत तिथे. बोलणे अन् बोलायला लावणे तिथे थांबतच नाही कधी. अखंड 24 तास चालू असणारे रेडिओ, टीव्ही त्या देशांत आहेत. सतत वार्ता देण्याची टूम त्यांनीच तर आणली. इकडून तिकडे प्रवासात असणार्यांना आपल्या गावात, देशात, कंपनीत काय चाललेय ते कळत राहावे यासाठी इंटरनेटने केवढे जाळे टाकलेय जगभर… पण या देशांमधून गप्प राहिल्यामुळे अनेक गुन्हे उशिरा उघडकीस आल्याच्या वार्ता अलीकडे जास्तीच येऊ लागल्या आहेत. चर्चेसमध्ये काम करणारे बिशप, पाद्री यांनी आपले बालपणी लैंगिक शोषण केले, असे सांगणारे अनेक प्रौढ व वयस्कर लोक पुढे येत आहेत. अनेक क्रीडापटू आपापल्या क्रीडा शिक्षकांविरुद्ध तक्रारी करू लागले आहेत. स्पर्धा खेळायला तयारी करताना क्रीडा शिक्षकाने जबरी लैंगिक संबंध ठेवले, असे जाहीर करणार्या अनेक महिला क्रीडापटू न्यायालयात गेल्या आहेत. डॉक्टर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, राजकीय पुढारी, चित्रपट दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या व्यवसायांतल्या नामांकितांवर त्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप होऊ लागले आहेत.
विलंब आणि न्याय यांत मग संघर्ष नाही का होणार?
या सर्व आरोपांमधील एक समान गोष्ट म्हणजे घडलेला प्रसंग आणि त्याची झालेली वाच्यता यांतले अंतर. त्यामुळे आरोपींना आपोआप मिळणारा संशयाचा फायदा. तक्रार करणारी व्यक्ती महिला असल्यास तिच्यावर गुदरलेल्या अतिप्रसंगाची वाच्यता अनेक दिवसांनी होणे आणि त्यामुळे हा सारा बदनामी, लुबाडणूक, फसवाफसवी यांसाठी रचलेला डाव आहे, असा कांगावाही होणे हे आपल्या सवयीचे झाले आहे. अशा बातम्या वाचताना आपण चिडतो, वैतागतो आणि हळहळतो. पत्रकारांना दोन्ही बाजू द्याव्या लागतात. त्याप्रमाणे जी व्यक्ती आरोपी असते तिचे म्हणणेही त्यांना द्यावे लागते. कारण दोषी धरण्याचा अधिकार पत्रकारांना नाही. तो पोलिसांनाही नाही. न्यायालयांत खर्याखोट्याची शहानिशा होते. तिथे कळू शकते, की अनेक दिवसांपूर्वी जे घडले ते खरोखर तसेच घडले, की आणखी काही. न्यायालयांनाही प्रश्न पडतो, की इतके दिवस फिर्यादी व्यक्ती चूप का बसली? एवढे सारे सोसूनदेखील तिने लगेच तक्रार अथवा फिर्याद का नाही नोंदवली? विलंब आणि न्याय यांत मग संघर्ष नाही का होणार?
चाकोरी मनुष्य आखतो पण…
चुप चुप खड़े हो, जरूर कोई बात है… असे एक चित्रपट गीत 70 वर्षांपूर्वी खूप गाजले. त्याचे दुसरे वाक्य महत्त्वाचे आहे, ‘पहली मुलाकात है जी पहली मुलाकात है’ ही ती ओळ आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात प्रथमच घडत असते, तेव्हा माणसाकडून शब्द न फुटणे ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया असते. नावीन्याचा एक पैलू धक्का हा असतो. हा धक्का म्हणजे सरावलेल्या आपल्या मन व मेंदूला सर्वस्वी अपरिचित वा अज्ञात अनुभवाचा प्रसंग. स्पर्श, शब्द, नजर, आवाज, गंध असा तो ऐंद्रिय अनुभव असतो. प्रत्येकाने आपल्यापुरते काही सवयीचे अन् सरावाचे विश्व तयार केलेले असते. त्यात काही फेरफार होऊ नयेत याची धडपड प्रत्येक जण करतो. चाकोरी मनुष्य आखतो खरी; पण ती त्याला जखडून टाकते. कमीत कमी कष्ट व्हावेत आणि आरामात आपल्याला हवे ते मिळावे, अशी चाह माणसाची असते. म्हणूनच या चाकोरीला छेद देणारी कृती किंवा घटना माणसाला धक्का देणारी ठरते. हा असा धक्का माणसाला अव्यक्त, मूक करून सोडतो.
अज्ञानात कुणालाही भेद करता येत नाही
हे असे मौन साधेसुधे नसते. ते आतल्या आत बोलत असते. ज्या मुलींना त्यांच्या क्रीडा शिक्षकाने अनपेक्षित असा अनुभव दिला, त्यांना आपल्याकडूनच काही तरी गैर झाल्याची जाणीव होते. कारण आपण तर काही वेगळे करीत नव्हतो. इतरांसारखेच आपण असताना सदर पुरुषाने तसा स्पर्श का केला असावा, या विचारात त्या मुली दंग होऊन जातात. एकदा का विचार डोक्यात गरगरू लागला, की शब्दांना ध्वनी प्राप्त होत नाही आणि त्यांचे रूपांतर मौनात होऊन जाते. निरागसता अथवा अज्ञान यांच्यात कुणालाही भेद करता येत नाही. त्यामुळे क्रीडा शिक्षकामध्ये एक लंपट अन् बलात्कारी दडलेला आहे, हे तो जोवर स्पर्श करीत नाही तोवर माहीतच नसते. एकत्र जमण्याचे उद्दिष्ट जर क्रीडा हेच असेल, तर बाकीच्या गोष्टींची उपस्थिती तिथे असण्याचे कारणच नाही. त्यामुळे सावध असणे, लक्ष ठेवणे, जपून वागणे या गोष्टी शक्यच नसतात. निरागसता याला म्हणतात. निरागसता व एकाग्रता मैत्रिणी असतात. दोघी एकत्र असल्यावरच यश मिळते. डोक्यात नाना शक्यता भुणभुणत असताना एकाग्रता नांदेल कशी? म्हणून क्रीडापटू पुरुषांकडून लक्ष्य होण्याची शक्यता अधिक.
अशा या लैंगिक छळ झालेल्या मुली मौनात जातात. त्यांचे मौन जखमी मनाचे असते. त्यांच्या शरीरावर एक आघात झालेला असतो. तो त्यांना सुन्न करून सोडतो. कारण तो सर्वथा अनपेक्षित व अनवांच्छित असतो. चर्चमध्ये एखाद्या निर्जन जागी परमेश्वर दाखवतो म्हणून एखाद्या धर्मगुरूकडून होणारी शारीरिक लगट जेवढी धक्कादायक, तेवढे ते मौन रक्ताळलेले आणि काळेनिळे झालेले. निरागस मन देवाचा शोध घ्यायला अनावर झालेले असताना असा जबरी स्पर्श झाल्यावर बोलणार काय? सांगणार कुणाला? मौन असे अचानक माणसाच्या मानगुटीवर बसते. त्याचा काहीही दोष नसताना ते अपराधी वाटायला लावते. आपलेच काही चुकले असे ते बिंबवते जणू.
…त्या मौनाचे स्पष्टीकरण मिळत नसते
काय झालंय तुला, सांगत का नाहीस? असा वारंवार प्रश्न करूनही आपल्याला त्या मौनाचे स्पष्टीकरण मिळत नसते. कारण त्या मौनाला दुःखाचीही एक किनार असते. मैदान, देऊळ अथवा शिक्षणसंस्था ही ठिकाणे वाह्यातपणा करण्याच्या जागा नसतात, याची केवढी तरी खात्री होती मनाला; पण तिथे नकोसा व नासका अनुभव आल्यावर करणार काय? एकाच हेतूने या तीन जागा कार्यरत असताना हे मध्येच अनाठायी कसे काय उपटले? त्यामुळे बोलायचे काय अन् सांगणार कसे, हे प्रश्न मनातले शब्द कुरतडत राहतात. तोंडून बाहेर धड काही पडत नाही. अपमान, मानभंग या भावना तर मुलींच्या बाबतीत फार तीव्र असतात. त्या मनात दाटल्या की शब्द गाडून टाकतात.
सबब, मौन नेहमी दुखरे असते. आघात, अपमान अन् अघटित यांचा तो हल्ला असतो. हल्ला झाल्यावर जसे काही क्षण सुन्न असतात तसेच त्याचे.
पण आपल्या देशाचे, प्रिय भारताचे मौन जरा वेगळेच दिसते. ना त्याला कुणी फटकारले, ना त्यावर कुणी हल्ला केला, ना कुणी त्याचा अहंकार दुखावला. तिकडे श्रीलंकेची वाताहत झाली म्हणून तो चूप झालाय का? पलीकडे पाकिस्तानात एका देखण्या नायकाचे सरकार भुईसपाट झाले म्हणून तो मूक झालाय का? अजून पल्याड अफगाणिस्तानात तालिबान्यांचा खरा खेळ सुरू झाला म्हणून भारत गप्प आहे?
अहो, पण काहीही न बोलायला ते विषय चर्चेस आले तरी पाहिजेत. ते ना वृत्तपत्रांत येत आहेत, ना टीव्हीत. चार दिवस घेतली नोंद त्यांची, बस्स! चला पुढे म्हणत सारी माध्यमे हिंदू-मुस्लीम, मोदी, भाजप, ठाकरे, ईडी करत सुटलीयत.
महागाईवर हनुमान स्तोत्राची मात झालेलीय. बेकारीवर मोहन भागवत यांच्या अखंड भारताने कुरघोडी केलेलीय, तर ईश्वराप्पा नामक मंत्र्यांच्या राजीनाम्यावर जेएनयूमधल्या मारामारीने! एकंदरीत देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न कुणाच्याही तोंडी वा मुखी येईनासे झाले आहेत. त्यांनी कुणाची वाचा खुंटलीय असे म्हणावे, तर अखंड बडबड काही थांबत नाही.
वातावरण तणावपूर्ण करण्यात सत्ताधारी पक्षाचा वाटा
भारतात रामनवमीपासून वातावरण तणावपूर्ण करण्यात सत्ताधारी पक्षाशी संबंध असलेल्यांचा मोठा वाटा असून, पंतप्रधान त्याबद्दल मूक आहेत, असा आरोप 13 विरोधी पक्षांनी केलाय. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुमचा पाठिंबा आहे का, ते स्पष्ट करा, असा पेच विरोधकांनी टाकल्यामुळे नरेंद्र मोदी आणखी मौनात गेले. हो म्हटले तर पंचाईत, नाही म्हटले तर अडचण. सत्तेचे एक नवेच वैशिष्ट्य भारतात भाजपचे राज्य प्रकट करीत आहे. ऐकून न ऐकल्यासारखे केले की झाले! माहीतच नाही, समजलेच नाही असा पवित्रा घेतला, की काम भागते! सत्ता म्हटले, की जबाबदार्या आल्या. सत्ताधारी म्हटले, की लोकांना वाटते आधीच यांना मोठे काम, त्यात आपली भर कशाला? त्यामुळे फावते सत्ताधार्यांचेच. तुम्ही तेव्हाच सांगितले असते, तर कारवाई तत्काळ केली असती, आता फार उशीर झाला, असे म्हणून टाळाटाळ अधिकृत करता येते. मोदी फार वेळ काम करतात; सुटीच घेत नाहीत, असा प्रचार भरपूर झालेलाय; परंतु त्या कामाचा सारा हिस्सा देशात शांतता आहे की नाही, हिंदू-मुस्लीम एकमेकांच्या जिवावर उठलेले तर नाहीत, यावर लक्ष ठेवण्यात जायला हवा. हा पंतप्रधान झोपा काढतो, असे कुणी म्हणणार नाही. मात्र, तो अनेक गोष्टी पाहून न पाहिल्यासारखा करतो, असे म्हणता येते. नाही तर रोज तीन-चार कार्यक्रम करणारे पंतप्रधान मधल्या वेळेत शांततेचे आवाहन करू शकले असते. होतेय उलटेच. खुद्द देशाचा नेता मूक झालेलाय. म्हणजे नायकमूक!
आपल्याला हवे ते अन् हव्या त्यावेळी तोंडातून ब्र काढायला शिकावे ते संघवाल्यांकडून. वाद, संवाद यांवर विश्वास नसल्याने एक तर बोलायचे नाही. दुसरे, बोलायचे काय? कारण बोलणे झाल्यास भूमिका घ्यावी लागणार. ती घेतली, की कुणीतरी दुखावणार. त्यामुळे शक्य तो तोंड उघडायला संघ तयार नसतो. तिसरे वैशिष्ट्य संघाच्या गुप्त कारभाराचे. तोंडासमोर एक अन् मागे भलतेच, असे संघ वागत असतो. मग जे मनात ठेवलेय ते सांगायचे कशाला, असा खास कारस्थानी पवित्रा संघ घेतो.
दारापलीकडे मौन आणि दाराअलीकडे मौन
संघाच्या मौनात स्वार्थ लपलेला असतो, तो असा. मौन सहनशीलतेचेही प्रतीक आणि शहाणपणाचेही. सहनशक्तीला सीमा असते. त्यामुळे वेदनेला आवाज फुटतोच; पण शहाणपण असीम असते. वेळकाळ बघून तोंड उघडणार्यांना शहाणे म्हणतात. त्यात संघाचा गाभा ब्राह्मणी. शहाणपणाची उपजात मक्तेदारी. संघ कशावर काही बोलेनासा झाला की लोक म्हणतात, विचारमंथन चालू असेल! ब्राह्मण्य आणि विचार, ब्राह्मण आणि बुद्धी यांची सांगड अशी घट्ट घालून दिलेली, की मौनाचा आविर्भाव म्हणजे बुद्धिमत्तेचा आविष्कार, असे ठाम मत झालेले. त्याचबरोबर मौन म्हणजे न्यायाची प्रतीक्षा. एकदम रिअॅक्ट होईल तो ब्राह्मण नसतो. सर्व बाजू तपासून, बरेवाईट जोखून आणि समतोल राखायचा अभिनय करून जो बोलेल तो ब्राह्मण. संघवाले एवढेसुद्धा करणार नाहीत. याचा अर्थ ते सुपरब्राह्मण. न्यायनिवाडा आम्ही पाहून घेऊ. त्यासाठी तातडीने मतप्रदर्शन करणे योग्य नाही, असा संघवाल्यांचा कारभार असतो. सरसंघचालक लोकांकडून मते, अभिप्राय व टीकाटिप्पणी अपेक्षितात आणि त्यानुसार आपली भूमिका घोषित करतात, असे कधी घडल्याचे ऐकलेय कुणी? छे छे! असे संघाच्या मौनावर जनता नामक मूर्ख माणसांचे अतिक्रमण कधीही होऊ दिले जात नाही. सरसंघचालक समोर असताना तुम्ही परवानगी असल्यावाचून ब्रही उच्चारायचा नसतो. सरसंघचालकांना परमपूज्य हे विशेषण उगाच लावलेले नाही. आपल्यापर्यंत कुणी अनाहूत व नकोसे मतप्रदर्शन करण्यासाठी पोहोचूच नये, यासाठी उभे केलेेले ते एक दार आहे. दारापलीकडे मौन आणि दाराअलीकडे मौन, असा मौन महोत्सव या परिवारात चालू असतो. एखाद्या पीडितेचे अथवा बलात्कारीतेचे मौन आणि हे अधिकारारूढ मौन यांची तुलना कशी होऊ शकेल? तुलना सोडा, समजून तरी घेता येईल का या दोन मौनांमधला फरक?
मुक्याने, मुकाट्याने, निमूटपणे वावरणार्या स्त्रिया आपण पाहतो. आपल्याला वाटते, असतील शांत स्वभावाच्या आणि कुणाच्या अध्यातमध्यात नसणार्या. त्यांचे मौन जखमांमुळे न उमटणार्या शब्दांचे असते. त्या मौनात छळ, अपमान आणि निंदा यांचा तगादा असतो. या मौनामधूनच रेल्वेसमोर उडी, विहिरीत बुडी आणि गळफासाची कडी त्यांना खुणावते. मौनाचा व मृत्यूचा असा एक घनिष्ठ सहवास आहे.
बोला आता, हिंदू-मुसलमान एकमेकांना मारायला उठावेत अशी चिथावणी देणार्यांना आवरायला सांगा, असे म्हटल्यावर पंतप्रधान मौनात का गेले? नायक मूक का झाला?
– जयदेव डोळे
(लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)