मौनाला धर्म असतो काय?- जयदेव डोळे

मौनाला धर्म असतो काय?- जयदेव डोळे

भारतीय मुसलमान भाजपच्या राज्यात प्रचंड द्वेषही अनुभवतो आहे. त्याला सर्व क्षेत्रांतून वगळायचेही कार्यक्रम आरंभले आहेत. त्याचे अस्तित्वच मानायचे नाही म्हटल्यावर प्रतिनिधित्वाचा मुद्दा येईलच कसा? सावरकर, गोळवलकर यांनी मुसलमानांना देऊ केलेला दुय्यम दर्जा मोदी सरकार प्रत्यक्षात आणत आहे. राजकारणातून त्यांना शून्यवत केले, की अर्थकारण, समाजकारण यांतूनही बेदखल करायचा बेत यशस्वी होत चालला आहे.

तुम्ही हिंदी न्यूज चॅनलच्या चर्चा नीट ऐकल्या, तर तुम्हाला आतून भांडण चालल्याचा भास होऊ लागेल. थोड्या वेळाने सगळे एकाच वेळी बोलू लागले, की काहीच ऐकू येईनासे होईल. मग कुठे सूत्रधार बाई अथवा बाबा मध्ये पडल्यासारखे करीत भांडणार्‍यांना थांबवतो. सगळेच बाप्ये लोक असल्यामुळे ते गप्प बसतात. ती शांतता पुन्हा काही क्षणांनी येणार्‍या वादळाची खूण असते. परत कुणी तरी चिडवते, टोमणे मारते आणि खिजवते. सुरू होतो चर्चा, वाद, खंडणमंडण यांचा एकत्र मारा. शांततेत एखादा प्रश्‍न समजावून घेण्याची अन् सांगायची रीतच आता भारत विसरला आहे, असे जाणवू लागले आहे. साताठ वर्षे झाली. सौम्य, शांत सुरात भारतीय माणूस बोलेनासा झाला आहे. त्याला मुद्दाम चेतवले जात आहे, भडकावले जात आहे. हे भडकावणे, उत्तेजित करणे अकारण होत नाही. चर्चांचे 85 टक्के विषय हिंदू-मुस्लीम असेच असतात. उघड आहे, हिंदूंना मुसलमानांविरुद्ध चिथावण्यासाठी असे विषय हाताळले जातात. दोन भिन्न धर्मीय परस्परांना भिडवले की होणार काय?  धुमसणारे वातावरण तयार होणार आणि ठिणगीची वाट बघत बसणार. बर्‍याच दिवसांनी म्हणजे शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर धर्माचा समावेश नसणारे अग्निपथाचे आंदोलन सुरू झाले. ते खरे तर, नागरिक विरुद्ध सरकार असे आरंभले; पण लष्कराने ते आपल्याकढे ओढले आणि चक्क आंदोलकांना ते दटावू लागले. लोकशाहीत सैन्यदलांचा शिरकाव असा आंदोलनांनिमित्त भारतात दिसू लागला आहे. भाजप सोडता सारे राजकीय पक्ष या हस्तक्षेपाला आक्षेप घेत आहेत. पुन्हा एकदा ते विरुद्ध आम्ही, असे वातावरण भाजपने व मोदी सरकारने रुजवले. देशाचीही दुभंगावस्था झाली. आजकाल देशात सर्व प्रश्‍नांच्या फक्त दोनच बाजू असतात. हो-नाही, चूक-बरोबर, आमच्याबरोबर-आमच्याविरुद्ध, हिंदू-मुस्लीम, स्त्री-पुरुष, सवर्ण-दलित…
या गोंगाटात खूप जण गप्प आहेत. त्यांना हे वातावरण सहन होत नाही. चारचौघांसारखेच ते भारताचे नागरिक आहेत. तरीही मौन का राहावे लागते आहे त्यांना? त्यांनी बिनातक्रार राहावे. सोशीक असावे. गुलाम जगत राहावे, असे त्यांना बजावले जात आहे. कोण आहेत ते? त्यांना चूप का व कोण करते आहे? ते उलगडून घ्यायचे असेल, तर ‘चिडीचूप्प’ हा काव्यसंग्रह वाचावा लागेल. रफीक सूरज त्याचे कवी आहेत. कविता आत्माविष्काराचा एक प्रकार; पण आता भारतीयांवर विविध कारणांनी या आविष्कारावर बंधने येत आहेत. रफीक यांना त्यांचा धर्म राज्यकर्त्यांना शत्रूसम वाटतो म्हणून कवी असूनही कविता लिहिता येत नाहीत, असा अनुभव येत आहे. त्यांची ‘चिडीचूप्प’ कशी झाली, याचे वर्णन करणारी ही कविता पाहा-


वेगाने पसरत चाललेल्या
मौनाच्या घनदाट अरण्यात
पायात असलेच नाही त्राण
नीट कण्हता येत नाही की धड शब्दोच्चार
पापण्यांची साधी उघडझापही ठरतेय खूप त्रासिक
मरण जवळ आलेय असे वाटतेय खरे
अशा अगम्य गूढ चमत्कारिक अवस्थेत
एकाच जागी खिळून वाटावाटांच्या जंजाळात…
मौनाच्या घनदाट अरण्यात
कसली निबिड शांतता
वाहतेय चोहो दिशांनी?
या थंडगार शांततेेत
गारठून निरुत्तर झालीय सर्वांगाची त्वचा
घनदाट अरण्यही
निपचित पडून राहिलंय मलूलपणे
हतबल कवितेसारखं…
ह्या कसल्या हालचाली जाणवताहेत?
मुंग्या गोळा व्हाव्यात
तसा केवढा मोठा समूह अचानक कुठून आला?
भराभर चालत, पताका नाचवत तो सरसावतो आहे
समूहातले अनेक जण मोठमोठ्याने ढोल पिटताहेत
पण आवाज गोठून गेला आहे
अनेक जण कानठळ्या बसणार्‍या घोषणा देत असावेत;
पण फक्त त्यांच्या ओठांच्या हालचालीच दिसत आहेत
ध्येय साध्य झाल्याच्या मदमस्त
विजयी उन्मादात ही मिरवणूक निश्‍चित दिशेने
आक्रमकपणे पुढे पुढे जात आहे
वाटावाटांच्या जंजाळातून…


झुंडशाहीची दहशत हा या कवितेचा विषय. गेल्या साताठ वर्षांत झुंडींनी किमान 80 मुस्लीम ठार मारले. कारण काय? ते कधीच उघड झाले नाही. संशय वाटला, मारून टाकले. शंका आली, केली हत्या. अशा जमावाकडून काय केले जाते आणि होते काय, याचे वर्णन ही कविता करते. या कवितेतली असहायता, दुर्बलता फार प्रखरपणे व्यक्त होते. या हतबलतेमधून मौनाचे घनदाट अरण्य उगवले आहे. मृत्यूपूर्वी मौन येऊन आधी उभे राहते. तसा या कवितेतला असहाय जीव मृत्यूची चाहूल त्याच्या आसपास फैलावलेल्या मौनामधून घेतो आहे.
पण हे मौन नपुंसक नसते, याची जाणीव कवीला आहे. मौन म्हणजे एखाद्या स्फोटाआधीची प्रतीक्षा. पेटत जाणार्‍या वातीचा रोखलेला श्‍वास. नेम धरलेल्या बंदुकीने दाबून ठेवलेला दम. हल्लेखोराचा प्रतिकार करण्याआधी घेतलेला पवित्रा. मारेकर्‍याच्या हातून सांडून गेलेला एक पुरावा. रफीक सूरज ‘ओल’ या कवितेत म्हणतात –


तुम्ही इतके कसे
रक्षकठोरनिबरपत्थरदिल?
तरारून आलेली कोवळी लुसलुशीत हिरवळ
बेदरकारपणे लष्करी टाचांनी रौंदाळणारे…
तुमची धारधार शस्त्रेही क्रूरपणे
चिरत असतात कोवळ्या लुसलुशीत पात्यांची
जगण्याची नैसर्गिक जीव्हाग्रे!
तेव्हा तडफडत्या मरणपोळ्यातून टपकतात
थंडगार मौनाचे काही थेंब तुमच्या नकळतपणे
आणि करतात जतन अस्तित्वाची ओल
हिरवळीच्या मुळाशी चिवटपणे…


हिंसा करणारे बेफाम होतात आणि परिणामांची पर्वा करीत नाहीत. म्हणूनच खुनाला वाचा फुटते. अविचारी कृत्य खरे तर, अमानुष असते. माणूस आणि विचार यांचा सांधा निखळला, की सुरू होते हिंसा. प्राण्यांना विचार नसतात. ते त्यांना करता येत नसतात. भक्ष्य गाठताना त्यांच्या हालचाली विचारी माणसासारख्या वाटतात; पण तसे नसते. पोटाने सुचवलेल्या कारवायांना भुकेपुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे. म्हणून कवी म्हणतो, की मारेकर्‍याच्या बेसावधपणामुळे नव्या जिवाची तरतूद आपोआप होत असते. फक्त ती शांततेत, मूकपणे होऊन जाते.
भारतीय मुसलमान भाजपच्या राज्यात प्रचंड द्वेषही अनुभवतो आहे. त्याला सर्व क्षेत्रांतून वगळायचेही कार्यक्रम आरंभले आहेत. त्याचे अस्तित्वच मानायचे नाही म्हटल्यावर प्रतिनिधित्वाचा मुद्दा येईलच कसा? सावरकर, गोळवलकर यांनी मुसलमानांना देऊ केलेला दुय्यम दर्जा मोदी सरकार प्रत्यक्षात आणत आहे. राजकारणातून त्यांना शून्यवत केले, की अर्थकारण, समाजकारण यांतूनही बेदखल करायचा बेत यशस्वी होत चालला आहे. ‘संभ्रम’ या कवितेत कवी या पार्श्‍वभूमीवर म्हणतो-


अलीकडे भीतिदायक
परिस्थिती उद्भवली आहे काय?
याविषयी स्पष्टपणे बोलले जात नाही
रकानेच्या रकाने भरलेल्या
अमानुष विध्वंसाच्या बातम्या
आपल्या अजस्र अदृश्य हातांनी
इतक्या सहजतेने कोण पुसून टाकतो आहे?
त्यासंदर्भात जाणीवपूर्वक मौन
धारण केले जात आहे…
नेमकी परिस्थिती काय आहे?
याविषयी संभ्रम वाढतोय…
घरात विषारी वायुगळीच्या दर्पाने जीव
गुदमरला म्हणून बाहेर पडावे तर
दारातच खोदून ठेवलेली निखार्‍यांची खाई
म्हणजे यापुढे नैसर्गिकपणे काही घडेल
याची शाश्‍वती देता येणार नाही…


देशातल्या प्रत्येक मुसलमानाला असेच वाटत असणार. तो बोलत काहीच नाही. कारण त्याचा त्याच्या घरातही जीव गुदमरतो आहे. रफीक सूरज एक पुरोगामी, परिवर्तनवादी नागरिक आहेत. त्यांना धर्म, परंपरा, प्रथा, कर्मकांडे यांचा जाच होतो. त्यावरचा त्यांचा रोष ते कठोर प्रतिमेत व्यक्त करतात. बाहेरची निखार्‍यांची खाई कोणी खोदून ठेवली, याची कल्पना त्यांना आहे. केवळ धर्म वेगळा म्हणून जगू द्यायचे नाही, असा जप करणार्‍यांबद्दल कवी म्हणतो, की यापुढे बहुधा निसर्गक्रमाने मरण येईल, याची खात्री नाही. त्यातच संभ्रम वाढतो आहे. स्पष्टपणे ना कोणी सांगते, ना दाखवते. मौन मुद्दाम पांघरून या बरबादीकडे कोणीतरी बघते आहे. त्यांची एक छोटी कविता फार मर्मभेदक आहे-


तीव्र घुसमट
मन हे उदास
छळतो दिवस
रात्रभर
बोलता न यावी
अंतरीची गाज
कठोर रिवाज
पाळो लागे


बहुसंख्याकांची बेगुमान सत्ता एक डाव टाकत असते. आपल्याला जे नकोसे असतात त्यांची आधी यथेच्छ बदनामी करायची, त्यांच्याबाबत कंड्या पिकवायच्या. गैरसमज, अफवा, अपप्रचार यांचा भडिमार करायचा. मग भाबड्यांचा आपोआपच होकार मिळतो. नकोशांचा काटा काढयचा. माध्यमे, व्यासपीठे, विद्वान, कलाकार असे कोणी बाजू स्पष्ट करायला पुढे येत नाहीत. खरे काय ते कोणी जाणू इच्छित नाही. त्यानिमित्ताने ‘संवाद’ या कवितेत रफीक सूरजवाला काय गार्‍हाणे मांडतात ते पाहा –


कधीपासून मी तुम्हाला
आवाज देतो आहे
तुमचे माझ्याकडे लक्ष वेधले जावे
म्हणून मी मघापासून वेगवेगळ्या
खटपटी-क्लृप्त्या करीत धडपडतो आहे
पण तुम्ही तर ढुंकूणही बघत नाही आहात!
मी संवादाला फारसा उत्सुक नसतो
अशीच तर तक्रार होती नं
तुमची कालपर्यंत माझ्याबद्दल?
पण इथे तर आता स्पष्ट दिसतोच आहे की
तुमचा रिझर्व्ह अ‍ॅटिट्यूड
मग कसं मिटणार
अशा प्रकारच्या संवादाचं वन वे ट्रॅफिक?
हॅलो. आहो, ऐकून तर घ्या –
मी काय म्हणतोय ते!
असे काय रागाच्या भरात
पाठ फिरवून चालायला लागलात!
तुम्ही निघून गेल्यावर मी कुणाला ऐकवू
माझ्या घशात गुठंगळून राहिलेेले शब्द?
तुम्ही मला व्यक्त व्हायला संधी तर द्यायला हवी!


साद घालूनही जर प्रतिसाद मिळत नसेल, तर ऐकणार्‍याच्या मनात खोट आहे, हे स्पष्ट आहे. वेगळ्या वस्त्या, शाळा, रस्ते, दवाखाने, असा सारा स्वतंत्रतेचा स्वीकार करीत जाणार्‍या बहुसंख्याकांना काय गरज पडावी अल्पसंख्याकांशी संवादाची? तरीही कवी सांगतो आहे, की चला, माझ्याशी बोला; पण नाही. अहंकारी, अडेलतट्टू आणि हिंसक बहुसंख्येला तसे संबंधच ठेवायचे नाहीत.
प्रा. रफीक यांनी अन्य विषयांवरही कविता लिहिलेल्या आहेत. मात्र, आजच्या मुलसमान भारतीयांची जी स्थिती संघ परिवार आणि हिंदुत्ववादी बनलेल्या (आणि  त्यामुळे मुस्लीमद्वेष्ट्या झालेल्या) भारतीयांनी करून टाकली, त्यावर मराठीत प्रथमच इतकी स्पष्ट नोंद केली आहे. माध्यमांमधून अथवा चर्चा, अधिवेशने इत्यादी कार्यक्रमांमधून मुस्लिमांची गार्‍हाणी ऐकू येतात. मात्र, त्यांची खोली आणि व्याप्ती सांगायला एखादा कवीच लागतो. तो कविधर्म रफीक यांनी उत्तम पाळला आहे. दहशतीच्या वातावरणात मुसलमान जगतो आहे. तो भ्यायलेला आहे का? त्याने सर्व आशा सोडल्या आहेत का? त्याला आता सर्व राजकीय पक्षांनी एकटे पाडले आहे का? धार्मिक मुद्यांपुरतेच मुसलमानांना बोलायला भाग पाडले जात आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे आता तमाम भारतीयांनी दिली पाहिजेत. मुसलमान फक्त त्यांचे प्रश्‍न सोडवतील अन् हिंदू धर्मीय, त्यांची अशी विभागणी आता उपयोगाची नाही. प्रत्येकाने प्रत्येकाची बोच व त्रास कमी कसा होईल यात वाटा उचलला पाहिजे. रफीकसारख्यांना जर काही रिवाज काचत असतील, तर त्यांना समविचारी नागरिकांनी साथ देऊन त्यात घट कशी होईल, ते पाहिले पाहिजे. धर्म ही बाब खाजगी असते. विद्यमान राज्यकर्ते मुद्दाम धर्माला राज्यकर्त्या पोषाखात पुढे आणत आहेत. त्यामुळे भाबडा मुसलमान धर्म व राजकारण यात भेद असतो, हे विसरू लागला आहे. तोही धार्मिक राजकारण करणार्‍या ओवेसींसारख्यांच्या नादी लागू शकतो. सबब, ते तसे म्हणून आम्ही असे, अशा प्रकारच्या प्रतिबिंबांना आपल्या राज्यघटनेने कधीही स्थान दिलेेले नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

– जयदेव डोळे


(लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)


– चिडीचूप्प
लेखक : रफीक सूरज
प्रकाशन : शब्द प्रकाशन
किंमत : 120 रुपये
पृष्ठे : 67  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *