घर घर तिरंगा, हर घर संविधान – सुभाष वारे

घर घर तिरंगा, हर घर संविधान – सुभाष वारे

केंद्र सरकारने घर घर तिरंगा असे अभियान जाहीर करत यावर्षी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान भारतात प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाचे स्वागत आहे. आपल्या राष्ट्रध्वजाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रदीर्घ संघर्षाचा इतिहास आहे. डौलाने फडकणार्‍या भारतीय राष्ट्रध्वजाकडे आपण जेव्हा अभिमानाने पाहतो तेव्हा नकळत स्वातंत्र्यलढ्याचा संघर्षशील आणि प्रेरणादायी इतिहास आपल्या डोळ्यासमोरून पुढे सरकत असतो.

आताचा जो आपला राष्ट्रध्वज आहे त्याला भारताच्या संविधानसभेत 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आले आहे. अर्थात, तिरंगी राष्ट्रध्वजाचा इतिहास त्याहून फार जुना आहे. इंग्रजांच्या विरोधातील संघर्षात तिरंगी झेंडा हाती घेऊन भारताच्या स्वातंत्र्याचा जयजयकार करत अनेकांनी लाठ्या खाल्ल्या, कित्येकांनी तुरुंगवास पत्करला, तर अनेक शूरवीरांना शहीद व्हावे लागले.
डौलाने फडकणार्‍या राष्ट्रध्वजाला सलामी देताना आपल्याला सतत आठवत असतात नंदुरबारचे हुतात्मा शिरीषकुमार आणि त्यांचे सहकारी, सोलापूरचे मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकिशन सारडा आणि जगन्नाथ शिंदे आणि अर्थातच आठवतात शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू. या क्रांतिकारकांसह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या असीम त्यागाने आपल्या राष्ट्रध्वजाला सतत मानाने फडकण्याचा अधिकार मिळवून दिलाय.


आताच्या राष्ट्रध्वजाला सर्व जण तिरंगा म्हणत असले, तरी प्रत्यक्षात त्यात चार रंग आहेत. राष्ट्रध्वजातील केसरी रंग हा साहस आणि शौर्याचे प्रतिनिधित्व करतो. आपले राजकीय नेते आणि आपणा सर्वांकडूनही स्वार्थरहित त्यागाची अपेक्षा तो करतो. पांढरा रंग हा आपल्या मनाच्या शुद्धतेचा, शांततामय सहजीवनाचा आणि पारदर्शी परस्परव्यवहारांचा निदर्शक आहे. हिरवा रंग हा मातीशी, झाडांशी, शेतीशी, पीकपाण्याशी आणि पर्यावरणाशी नाते सांगतो. जमिनीच्या सुपीकतेतून येणार्‍या समृद्धतेचा तो निदर्शक आहे. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले निळ्या रंगातील अशोकचक्र हे ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात मौर्य साम्राज्याच्या सम्राट अशोकांनी सारनाथ येथे उभारलेल्या नीतिचक्राच्या इतिहासाशी आपल्याला जोडते. अशोकचक्र आपल्याला सतत गतिमानतेचे आणि परिवर्तनाचे महत्त्व सांगत असते. थांबला तो संपला याची आठवण करून देत असते.


भारतीय संविधान व राष्ट्रध्वज हे दोन्ही आपल्यासाठी अभिमानाचे विषय


भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जाती, धर्माचे भेद विसरून एकत्र आलेल्या भारतीयांच्या एकजुटीने महाकाय ब्रिटिश सत्तेला नमवले. एक राष्ट्र म्हणून ही एकजूट होऊ शकली. कारण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने इथल्या शेतकर्‍यांना, कामकर्‍यांना, महिलांना, आदिवासींना, जातीव्यवस्थेने मागे ठेवलेल्या समूहांना, स्वतःची ओळख शोधत असलेल्या भटक्या समूहांना, सर्वधर्मीय भारतीयांना एक स्वप्न दाखवले होते. तुम्ही कुणीही असा, स्वतंत्र भारतात तुम्हाला दोन पायर्‍या वर चढण्याची संधी नक्की मिळेल. तुमचा जन्म गावात झाला की शहरात, तुम्ही महिला आहात की पुरुष, तुम्ही जातीव्यवस्थेच्या खालच्या पायरीवर अहात की वरच्या, तुमच्या श्रद्धा वा उपासना पद्धती भलेही वेगवेगळ्या असोत; पण या कशाचाही विचार न करता स्वतंत्र भारतात तुम्हाला तुमचे आयुष्य घडविण्याची समान संधी मिळेल. तुमच्यातील लपलेल्या क्षमतांना विकसित करत माणूसपणाच्या वरच्या पायर्‍या गाठण्याची सर्वांना समान संधी असेल. हा शब्द दिला होता स्वातंत्र्यलढ्याने सर्व भारतीयांना. त्या आधीच्या भारतात हे नव्हते. मूठभर जातदांडगे आणि धनदांडगे यांनाच तेव्हा मान होता, त्यांनाच पुढे जायची संधी होती. नवा भारत मात्र सर्वांना सोबत घेऊन जाणारा बनवायचा असा स्वातंत्र्यलढ्याचा संकल्प होता. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी काहीतरी सोसले अशा सर्व देशभक्तांनी तिरंगा हातात घेऊन याच संकल्पाच्या दिशेने कूच केले होते. नव्या भारताची ही संकल्पना इंग्रजांबरोबरच्या लढ्यात विकसित होत गेली. तीच संविधानसभेच्या माध्यमातून भारतीय संविधानात शब्दबद्ध झाली. सर्व जाती-धर्मांच्या स्त्री-पुरुषांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी बहाल करणारे भारतीय संविधान आणि आपला राष्ट्रध्वज हे दोन्ही आपल्यासाठी अभिमानाचे विषय आहेत.


भारतीय राष्ट्रध्वजाला आपले मानले नव्हते


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घर घर तिरंगा हे अभियान जाहीर केले आहे. आज सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने व त्यांच्या समविचारी संघटनांनी कितीतरी वर्षे भारतीय राष्ट्रध्वजाला आपले मानले नव्हते, हे वास्तव आहे. मूठभरांचे विशेषाधिकार निरस्त करत, सर्वांना बरोबरीला आणण्याचे स्वप्न पाहणारे संविधान बदलण्याची भाषा अधूनमधून त्यांचे काही मंत्री, कार्यकर्ते करत असतात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रध्वजाने भारतीयांच्या मनामनांत पेरलेल्या स्वप्नाशी जोडून घेण्याचे आवाहन आता त्यांच्या नेतृत्वातील सरकार करत असेल, तर त्याचे स्वागत करूया. या अभियानात घरोघरी फडकले जाणारे ध्वज खादीचेच असतील अशी पूर्वतयारी केली असती, तर जास्त चांगले झाले असते. आता हे आवाहन म्हणजे केवळ एक घोषणा राहू नये, फक्त एक इव्हेंट बनून जाऊ नये, याची काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागेल. आपण घरोघरी राष्ट्रध्वजाला जरूर अभिवादन करूया; पण या अभिवादनाचा नेमका अर्थ जर पुढे न्यायचा असेल, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याने उद्याच्या भारताबद्दल भारतीयांच्या मनात पेरलेल्या त्या स्वप्नाचीही उजळणी करूया. ते स्वप्न ज्या भारतीय राज्यघटनेत सामावलेले आहे त्या भारतीय राज्यघटनेलाही अभिमानाने आपल्या मनात जागा देऊया. जातिभेदाला संपविण्याची इच्छाशक्ती दाखवूया, परधर्म द्वेषाला गाडून टाकूया, धर्मश्रद्धेला व्यक्तिगत जीवनापुरते मर्यादित ठेवूया आणि आपल्या सार्वजनिक जीवनाची वाटचाल संविधानाच्या प्रकाशातच करण्याचा निर्धार करूया.


नव्या भारताच्या उभारणीसाठी शपथबद्ध होण्याचा निर्धार


राष्ट्रध्वजाचा सन्मान करायचा म्हणजे काय करायचे, हे समजून घेऊया. राष्ट्रध्वजाला सलामी म्हणजे भारताच्या बहुविध संस्कृतीचा सन्मान, राष्ट्रध्वजाला अभिवादन म्हणजे आर्धी आबादी असलेल्या महिलांच्या न्याय्य अधिकारांचा सन्मान, राष्ट्रध्वजाचा अभिमान म्हणजे भारताचे पाडे, तांडे, झोपडी आणि पालापर्यंत शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार पोहोचावा हा आग्रह धरायचा, राष्ट्रध्वज फडकावणे म्हणजे मूठभरांच्या उपभोगासाठी गरीब आदिवासींची जगण्याची साधने हिसकावून घेतली जाणार नाहीत याचा आग्रह धरायचा. राष्ट्रध्वजाचा आदर म्हणजे संविधानाला अपेक्षित नव्या भारताच्या उभारणीसाठी शपथबद्ध होण्याचा निर्धार.
भारत सरकारच्या घर घर तिरंगा आवाहनाला साथ देताना आपण आणखी दोन पावले पुढे चालूया आणि म्हणूया, ‘हर घर तिरंगा, हर घर संविधान’.

– सुभाष वारे


(लेखक ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आहेत.) 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *