सत्यशोधक समाजाची १५० वर्षे – संपादक

सत्यशोधक समाजाची १५० वर्षे – संपादक

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून 24 सप्टेंबर, 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. या घटनेला 24 सप्टेंबर, 2022 रोजी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. नवा माणूस आणि नवा समाज घडवण्यासाठी स्थापन झालेल्या या संस्थेविषयी दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनीच प्रसिद्ध केलेला अहवाल वाचकांसाठी मुद्दाम येथे देत आहोत. या अहवालात समाज स्थापनेची उद्दिष्टे, त्यांचे स्वरूप, रचना याविषयी सविस्तर माहिती आहे.  

पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
ता. 24 सप्टेंबर, सन 1873 पासून ता.24 सप्टेंबर, सन 1875 पावेतो
दोन वर्षांचा रिपोर्ट
ता. 24 सप्टेंबर, सन 1875 पासून ता. 24 सप्टेंबर, 1876 पावेतो
एक वर्षाचा रिपोर्ट
सत्यशोधक समाजाकडील मॅनेजिंग कमिटीच्या हुकुमावरून
ज्ञानप्रकाश छापखान्यात छापले.

ता. 20 मार्च, सन 1877 इ.

सत्यशोधक समाज


समाजाची दोन वर्षांची म्हणजे समाज स्थापन झाल्या दिवसापासून आजतागायत झालेल्या सर्व प्रकारच्या वृत्तांताविषयी हकीगत.
(1) ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादिक लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज तारीख 24, माहे सप्टेंबर, 1873 इसवी रोजी स्थापन केला. या समाजात राजकीय विषयांवर बोलणे अजिबात वर्ज्य आहे.
(2) राजमान्य कृष्णराव भालेकर व रावजी शिरोळे वगैरे भांबुर्डेकर मंडळींनी समाजाचे सत्य आणि स्तुत्य उपदेश ऐकून सभासद झाले. इकतेच नाही; पण त्यांनी मौजे भांबुर्डे, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे समाजाची शाखा स्थापून लोकांना कविता म्हणजे अभंग व दिंड्या याद्वारे उपदेश करून कित्येक गृहस्थांस सभासद केले आणि हल्ली दिवसानुदिवस त्यांचा क्रम उत्तम प्रकारे चालू असून उत्तरोत्तर उत्कर्ष पावत आहे.
(3) मौजे हडपसर येथेही सभासद बरेच असून उपदेशाचा क्रम साधारण प्रकारे चांगला चालू आहे. तसेच मौजे पर्वती येथील पोलीस पाटील वगैरे मंडळी समाजाचे स्तुत्य हेतू पाहून या कामी मनःपूर्वक झटत आहेत.
(4) राजमान्य राजश्री रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नससिंगराव सायबू वडनाळा, जाया यल्लाप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवार वगैरे मंडळींनी शहर मुंबई येथे समाज स्थापून लोकांना उपदेश करून बरीच सुधारणा चालविली आहे. या परोपकारी आणि उदार सद्गृस्थांविषयी पुढे मजकूर येईल.
(5) राजमान्य राजश्री गोविंदराव बापूजी भिलारे, मौजे भिलार, तालुका जावळी, जिल्हा सातारा यांनी आपले गावी समाजाची शाखा स्थापून गावातील एकंदर रहिवासी लोकांस उपदेश केल्यावरून गावकरी आणि आसपासचे गावचे लोक सभासद झाले. याशिवाय नेमलेले दिवशी ईश्‍वराची प्रार्थना करणे व दुसर्‍या काही सुधारणा करण्याविषयी अंतःकरणपूर्वक झटत आहेत याचा उल्लेख पुढे येईल.
(6) समाजाचे हातून जी जी कृत्ये घडून आली ती येणेप्रमाणे :


लग्ने :


लग्न करतेसमयी ब्राह्मण, भट, भिक्षुक इत्यादिक शूद्र लोकांची लग्ने यथासांग न लाविता केवळ आपले हिताकडेस लक्ष देऊन शूद्र लोकांस साधारणपणे खोटेखोटे हक्क सांगून मांडवखंडणी, लज्जाहोम, साडे आणि कंकण सोडणे वगैरेबद्दल शक्ती नसतानाही केवळ जुलूम करून गरीब शूद्रांचे द्रव्य हरण करितात आणि ते जर देण्यास त्यास सामर्थ्य नसेल, तर लग्ने लावायची तशीच ठेवितात. अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टी विदित आहेतच. याजकरिता आणि यथासांग लग्नविधी होण्याकरिता व लग्नात ज्या वाईट चाली आहेत, त्या बंद करण्याकरिता आणि ब्राह्मणांचे सदरील जुलमापासून मुक्तता व्हावी; या उद्देशाने ब्राह्मणास न बोलविता व कित्येक लग्नासंबंधी ज्या वाईट चाली होत्या त्या बंद करून समाजाचे मतांप्रमाणे जी लग्ने लागली ती येणेप्रमाणे –
पहिले लग्न
वर– सीताराम जबाजी आल्हाट, राहणार पुणे, पेठ जुना गंज.
वधू – राधाबाई, बाप ग्यानोबा निंबणकर, राहणार सदर, या उभयतांनी आपले लग्न ब्राह्मणांच्या साह्याशिवाय या समाजाचे मताप्रमाणे ता. 25 माहे डिसेंबर सन 1873 इसवी रोजी केले. या स्तुत्य कृत्यास ज्या सद्गृहस्थांनी आणि सभ्य स्त्रियांनी उभय पक्षांची गरीब स्थिती पाहून उदार आश्रय दिल्यावरून ज्यांस त्रास सोसावा लागला, त्यांची नावे पुढीलप्रमाणे –
1. सौभाग्यवती सावित्रीबाई भ्रतार जोतीराव फुले.
2. सौभाग्यवती बजूबाई भ्रतार ग्यानोबा निंबणकर.
शिवाय दुसरे चार-पाच गृहस्थांनी उदार आश्रय देऊन संकटे व त्रास सहन करून कार्यसिद्धी केली; परंतु सदरील स्त्रियांपैकी सौभाग्यवती बजूबाई भ्रतार ग्यानोबा निंबणकर ह्या अद्यापपावेतो मतलबी कार्यसाधू यांचे उपदेशावरून आपले भ्रतारापासून त्रास सोशीत आहेत.


दुसरे लग्न
वर – ग्यानोबा कृष्णाजी ससाने, राहणार मौजे हडपसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे.
वधू – काशीबाई, बाप नारायणराव विठोजी शिंदे, राहणार मौजे पर्वती, तालुका हवेली, जिल्हा पुणे.
हे लग्न सिद्धीस जाण्याकरिता काही सभ्य सद्गृहस्थांनी उत्तम प्रकारे मदत करून कार्यसिद्धी तारीख 7 माहे मे सन 1874 इसवी रोजी जगन्नियंत्या परमेश्‍वराच्या कृपेने केली.
हे लग्न सिद्धीस न जावे म्हणून भवानी पेठेतील एका दुराग्रही अडत्याने मौजे हडपसर येथे जाऊन वराचे आत्पवर्गास सांगून त्यांची मने इतकी भरविली की, अखेरीस हे लग्न हडपसर येथे न करता पुणे मुक्कामी करणे भाग पडले. अशा समयी पुणे मुक्कामीही लग्न सिद्धीस जाऊ नये म्हणून मतलबी लोकांच्या सांगण्याप्रमाणे वागणारे मारुती सटवाजी फुले व तुकाराम खंडोजी फुले या उभयतांनी सदरील लग्न होते समयी मुद्दाम आपल्या अशक्त मुलांची लग्ने काढून जितकी म्हणून विघ्ने होतील तितकी केली. त्या नीच कर्माचा उच्चार येथे करणे प्रशस्त नाही म्हणून त्याजविषयी तपशीलवार हकीगत दिली नाही. ह्या प्रसंगी फारच त्रास झाला आणि या दोघांच्या व स्वहित साधणार्‍या साधू लोकांच्या सांगण्यावरून दुसरे अज्ञानी लोकांच्या विघ्नामुळे हे लग्न राहावयाचेच. परंतु अशा प्रसंगी राजमान्य राजश्री बाबाजी राणोजी फुले ह्या गृहस्थानी अजमासे 250 मनुष्य आपले आप्त वर्गापैकी आणून सदरी लिहिलेली दिवशी कार्यसिद्धी परमेश्‍वर कृपेने केली. याचप्रमाणे बंदोबस्ताचे बाबतीत रा.रा.पो. राजन्ना लिंगू व गंगाराम भाऊ म्हस्के या उभयतांनी प्रयत्न करून स्वतः झटून पोलिसांची मदत देवविली. या वेळेस मिठगंज पेठेतील मांग, महार लोकांनी व याशिवाय येथील रहिवासी मोमीन लोकांनी योग्य मदत झटून केली. ती अशी की, ज्या ज्या वेळेस सर्वथैव स्वहित साधू लोकांनी सदरील कृत्याबद्दल समाज मोडावा म्हणून विघ्ने केली ते समयी त्या लोकांची मदत देण्याचे कामी कमाल झाली. हे लोक या समाजाचे सभासद नसतानाही केवळ समाजाचा आदेश ऐकून त्यांनी या कामी अनिवार मदत केली. याकरिता आम्हांस त्यांचे आभार मानल्याशिवाय राहवत नाही. ही दोन लग्ने कशा प्रकारे झाली आणि तत्संबंधी कोणत्या वाईट चाली बंद केल्या याजबद्दलची एकंदर हकीगत समाजातील पुस्तकांत लिहिली आहे.
1. सदरहू लोकांचे बुद्धिपरस्पर अविचारामुळे जी लग्ने झाली त्यापैकी एक नवरी मुलगी वयाने दोन वर्षांची असून लग्न झाल्यानंतर थोडकेच दिवसांनी वारली. या अविचाराबद्दल रा. तुकाराम सोनाजी भुजबळ यास निदान सुमारे 400 रुपयांचे नुकसान करून घ्यावे लागले.
रा.रा. गोविंदराव बापूजी भिलारे पाटील, मौजे भिलार, ता. जावळी, जि. सातारा यांजविषयी वरील कलमात हकीगत कळवू असे लिहिले ती ही की, गृहस्थ समाजाचे सभासद आहेत. या गृहस्थांनी येथील समाजाचे सभासदांची तीळप्राय मदत न घेता पहिल्या वर्षी ब्राह्मणाचे साहाय्यावाचून 6 लग्ने केली आणि दुसरे वर्षी 5 करविली व यापैकी एक दोन लग्ने तर स्वतःचे द्रव्ये खर्च करून केली.
(7) रा. ग्यानू मल्हारजी झगडे यांनी समाजाची बाल्यावस्था पाहून मेस्त्रीच्या कामावर असल्या कारणाने यांनी अदमासे पन्नास मनुष्यास समाजाचे खरे हेतू सांगितल्या कारणाने कित्येक सभासद झाले. या कारणाकरिता त्यांच्यावरील ब्राह्मण अधिकारी यांनी फारच त्रास दिल्यामुळे अखेरीस त्यास नोकरी सोडणे भाग पडले. यांचे उपदेशामुळे झालेले सभासदांनी व यांनी पैशाची बरीच मदत केली. शिवाय थोडे दिवसांपूर्वी मौजे घोरपडी येथे एक पुनर्विवाह ब्राह्मणाशिवाय केला व ते दिवसानुदिवस समाजाचा उत्कर्ष ज्या योगाने होईल ते उपाय करीत आहेत.
(8) रा.रा. भिकोबा बाळाजी साळी या गृहस्थांनी समाजातील मुलीस विद्याभ्यास करण्याची गोडी लागून उत्तेजन यावे एतदर्श चोळीचे खण बक्षीस दिले. शिवाय या गृहस्थांनी दुसरे मंडळीस सत्याचा उपदेश करून काही लोकांस कुमार्गापासून सोडवून सुमार्गास लाविले. ज्याप्रमाणे मुलींस विद्येची गोडी लागली म्हणून बक्षीस दिले त्याप्रमाणेच सभासदांनी मुलास ऑईल क्लॉथ म्हणजे मेन कापडाची डगली करून दिली.
(9) या समाजातील काही सभासदांनी व त्यांचे कुटुंबांनी काही धर्मभोळ्या चाली बंद केल्या. त्या ह्या की, हरतालिकेचे घेणे, उपोषण, भाद्रपद शु. 4 म्हणजे गणेश चतुर्थी प्रीत्यर्थ उत्साह, ऋषी पंचमी, भाद्रपद वद्य पक्षामध्ये ती प्रीत्यर्थ ब्राह्मणास शिधा देऊन, पादपूजन करून अंगुलाचे तीर्थ उद्धार होण्याकरिता घेणे आणि फाल्गुन शु. 15 स हुताशनीचा उत्सव करून शंखध्वनी करणे.
रा. गणपतराव राजाराम फुले, सभासद, यांनी आपले मातोश्रीचे दशपिंड ब्राह्मणाशिवाय केले. याप्रमाणे रा. गणपत तुकाराम आल्हाट हेही सभासद असून त्यांनी आपल्या आजीचे पिंडदान ब्राह्मणाशिवाय केले. या उभयतांनी धैर्याने आणि पूर्ण समजुतीने स्तुत्य कृत्ये केली. हे पाहून समाजातील कित्येक लोकांनी अशा चांगल्या कृत्यास उत्तेजन द्यावे हे किती महत्त्वाचे आहे हे सांगावयास नको.
याचप्रमाणे रा.रा. नारायणराव तुकाराम नगरकर, समाजाचे चिटणीस, यांचे वडील बंधूंनी आपल्या भावजयीचे एकंदर उत्तरकार्य ब्राह्मणाशिवाय स्वतः केले. या शहरात हे गृहस्थ बरेच लोकांस माहीत असून या समाजाचे सभासद नसता हे स्तुत्य कार्य त्यांनी आपले स्वतःचे शोधावरून केले. अशाच प्रकारच्या ज्या दुसर्‍या काही दूषणास्पद असणार्‍या धर्मभोळ्या बनावट चाली अजिबात नाहीशा केल्या.
(10) सदरील धर्मभोळ्या चाली बंद होतात न होतात इतक्यात ब्राह्मण, भट, भिक्षुके इत्यादिकांस असे वाटले की, जे काही आजतागायत आपले गुह्य होते व जो मोठेपणा होता आणि ज्यांचे योगाने आपला उदरनिर्वाह होत आहे, तो आता हा समाज जर राहील तर बंद होऊन आपले वर्चस्वही राहणार नाही. या कारणावरून ज्या युक्ती-प्रयुक्तीने हा समाज नाशाप्रत पावेल ते करणे अवश्य आहे असे मनात आणून कित्येक अज्ञानी मुख्य मुख्य शूद्र लोकांस खोट्या मसलती देऊन त्यांची मने इतकी भ्रष्ट केली की, जे सभासद आहेत त्याजवर बहिष्कार ठेवावा आणि दुसरे त्यास जितका त्रास देववेल तितका द्यावा अशा प्रकारचा क्रम चालू असतानाच इतक्यात रा.रा. बापूजी हरी शिंदे, हेड अकौंटंट, जि. बुलढाणा यांनी समाजाचे खरे व स्तुत्य हेतू पाहून सभासद झाले आणि मुंबई येथील कामाठीपुर्‍यातील अठरा श्रीमान गृहस्थांनी समाजाचे खरे हेतू पाहून सभासद झाले. या योगाने समाजाचा उत्कर्ष होऊन दुष्ट लोकांचे प्रयत्न व्यर्थ केले. सदरील सभासदांपैकी रा.रा. रामय्या व्यंकय्या अय्यावारू व व्यंकू बाळाजी कालेवार या उभयतांनी समाजाचे हेतू आणि गरीब, अज्ञानी शूद्र लोकांची संकटे व भट-भिक्षुक आणि सरकारी ब्राह्मण कामगार यांजपासून त्यास जे त्रास सोसावे लागतात ते आमच्या दयाळू इंग्रज सरकारास जाहीर करण्याकरिता बाराशे रुपयांचा छापखाना दिला.
रा.रा. व्यंकू बाळाजी कालेवार हे समाजाचे सभासद होण्यापूर्वी भाद्रपद मासी गणेश चतुर्थीचे उत्सवाचे वेळी हजारो ब्राह्मणांस पक्वान्न भोजन व दक्षणा देत असत. तो गणपती प्रीत्यर्थ उत्सवाचा खर्च ते समाजाचे सभासद झाल्यापासून बंद करून सर्व जातीचे पंगू, अंध, थोटे व लुळे अशा हजारो लोकांस पक्वान्न भोजन देण्याकडेस व स्त्रियांस प्रत्येकी लुगडी व चोळी आणि प्रत्येक पुरुषास दुहेरी धोतर, बंडी आणि टोपी अशा स्तुत्य कामांकडेस खर्च करून त्यांनी पंगू लोकांस संतुष्ट करण्याची सुरुवात केली. याचप्रमाणे जाया यल्लप्पा लिंगू हे प्रतिवर्षी दीपवाळीस ब्राह्मण भोजन व दक्षिणा देत असत, तो खर्च सभासद झाल्यापासून कमी करून दरवर्षी पंचवीस रुपयांचे वर्षासन समाजातील मंडळींची जी मुले मॅट्रिक्युलेशन परीक्षेस पास होतील, त्यापैकी पहिल्यास सोन्याचे पदक देण्यास्तव दिले आहे. मुंबईकर सभासदांनी रा.रा. जोतीराव फुले यांस गतवर्षी मुंबईस बोलावून नेले आणि तेथे त्यांच्याकडून काही व्याख्याने सत्याविषयी देवविली. त्या समयी रा.रा. व्यंकू बाळाजी कालेवार आणि काराडी लिंगू या उभयतांनी समाजाचे सन्मानार्थ मेजवान्याप्रीत्यर्थ पुष्कळ खर्च केला. रा.रा. नरसिंगराव सायबू वडनाला यांनी त्यास पोषाख दिला. मुंबईकर सद्गृहस्थांनी या स्तुत्य कृत्यास उदार आश्रय दिला. हे समाज विरुद्ध असणार्‍या धूर्त लोकांस समजताच पुन्हा सभासदास आणि त्यांचे कुटुंबातील मनुष्यास त्रास देऊ लागले. तो असा की, रात्री चौर्यकर्म करणार्‍या लोकांप्रमाणे दगड मारणे, घालून पाडून बोलणे याशिवाय दुसरी इतकी नीच वर्तवणूक दाखविली की, ती या रिपोर्टात घेणे प्रशस्त नाही. हा प्रकार सुरू असता रा.रा. विश्राम रामजी घोले, असिस्टंट सर्जन व रा.रा. लक्ष्मणराव हरी शिंदे, चीफ कॉ. हे समाजाचे सभासद होताच या दुष्ट लोकांचे बंडाचा बीमोड होऊन त्रास अगदी बंद झाला. या गृहस्थांपैकी रा.रा. विश्राम रामजी घोले हे अज्ञानी, शूद्र लोकास आपण या जगात कोणते रीतीने वागावे, आपणास जगात हक्क परमेश्‍वराने कोणते दिले आहेत याजबद्दल समाजाचे स्तुत्य हेतू कळविण्याचे काम अंतःकरणपूर्वक करीत आहेत.
रा.रा. नारायणराव गोविंद कडलक व नारायणराव तुकाराम नगरकर हे करावयास लागले तो आजपावेतो ते मनःपूर्वक काम करीत आहेत.
(11) या समाजाचे खरे हेतू जाणून सत्यदीपिका म्हणजे केवळ सत्याचा दीपकच या पत्राने समाज सुरू झाल्या दिवसापासून आजतागायत जी जी मदत अवश्य आणि सत्यास अनुसरून द्यावयाची ती दिली व ज्या ज्या सभासदांनी सत्यास स्मरून जी जी स्तुत्य कृत्ये केली ती छापून प्रसिद्ध केली. याचकरिता समाज या पत्रकर्त्याचे फारच आभार मानून सर्व शक्तिमान जगाचा उत्पन्नकर्ता त्यांस अशी प्रार्थना करितो की, ते पत्र चिरकाल चालून असाच सत्याचा प्रकाश जगभर होवो. सुबोध पत्रिका म्हणजे सदुपदेश करणारे पत्र. ह्याचे आणि समाजाचे हेतू काही अंशी सारखेच आहेत. यामुळे बंधुवर्गात जशी एकमेकास मदत करितो त्याप्रमाणे ह्या पत्रकर्त्याने कित्येक वेळी केली. याबद्दल समाज ज्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे ‘प्रमोद सिंधू’ आणि ‘इंदु प्रकाश’ या दोन पत्रकर्त्यांनी समाजाचे स्तुत्य हेतू प्रदर्शित केले. याजमुळे समाज त्यांचे फार उपकार मानीत आहे.
(12) समाज स्थापन करण्याचे कामात रा.रा. विनायक बापूजी भांडारकर व विनायक बापूजी डेंगळे आणि सीताराम सखाराम दातार यांनी उत्तम प्रकारे मदत केली. त्याचप्रमाणे रा.रा. रामशेठ बापूशेठ उरवणे यांनी बरेच शूद्र लोकांस समाजाचे स्तुत्य व सत्य हेतू कळवून त्यांस समाजाचे सभासद केले व नंतर आपणही सभासद झाले. रा. धोंडीराम नामदेव व पंढरीनाथ आबाजी चव्हाण या उभयतांनी धूर्त लोक, अज्ञानी शूद्र जनांस कसे लुटतात याजवर आपले शक्त्यनुसार उपदेश केले. पैकी पहिले गृहस्थानी कविताद्वारे आणि दुसरे गृहस्थ निबंधाद्वारे अज्ञानी जनास उपदेश करीत आहेत. त्याचप्रमाणे रा. कृष्णराव पांडुरंग भालेकर व नारायणराव रामजी पांढरे वेगैरे भांबुर्डेकर मंडळींचाही असाच क्रम चालू आहे.


रा.रा. विठ्ठल नामदेव गुठाळ यांनी रा. महादेव केशवराव सूर्यवंशी यास उपदेश केल्यावरून त्यांनी आपले घराची वास्तुशांती ब्राह्मणाच्या साह्याशिवाय केली. या कारणामुळे गुठाळ यांची सर्कत ब्राह्मण लोकांचे सांगण्यावरून त्यांचे भागीदार यांनी काढली. हे इतकेच करून स्वस्थ बसले असे नाही; परंतु कित्येक व्यापारासंबंधी त्यास त्रास देऊन ज्या योगाने त्यांचे नुकसान होईल ते उपाय त्यांनी केले. यामुळे गुठाळ यांना थोडे दिवस वाईट स्थितीत राहावे लागले. अखेरीस त्यांस इतकी विपत्ती प्राप्त झाली की, आपल्या मुलाचा विद्याभ्यास चालू ठेवण्याचे सामर्थ्य त्यांना राहिले नाही. हा मजकूर रा.रा. गंगाराम भाऊ म्हस्के यास समजला. ह्या सद्गृहस्थांनी त्या मुलास दरमहा तीन रुपये स्कॉरलशिप 1 वर्षपर्यंत देण्याचे कबूल केले. ही स्कॉलरशिप गुठाळ यांनी पाच महिने घेतली. कारण पुढे त्यांचा व्यापार चालू होताच यांनी होऊन असे कळविले की, आता परमेश्‍वरकृपेने बरे चालले आणि जी काही मदत केली याजबद्दल मी आभारी आहे, असे रा. गंगाराम भाऊस कळवून स्कॉलरशिप घेण्याचे बंद केले. हे गृहस्थ समाजाचे सभासद नसून त्यांनी अशाप्रसंगी मदत केली याजमुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत.
विद्यार्थी घनश्याम किराड ह्याचा अभ्यास मॅट्रिक्युलेशन परिक्षेपर्यंत होऊन यांचे घरच्या गरिबीमुळे त्याचा अभ्यास बंद पडण्याचे वेळी रा.रा. हरी रावजी चिपळूणकर यांनी मेहेरबानी होऊन दरमहा 5 रुपयेप्रमाणे स्कॉलरशिप नऊ महिनेपर्यंत देण्याचे कबूल केले. अशा अडचणीच्या वेळी ह्या समाजातील गरीब विद्यार्थ्यास योग्य कारणास्तव साह्य दिले म्हणून समाज त्यांचा फार आभारी आहे आणि आम्ही अशी आशा करतो की, हे सद्गृहस्थ समाजातील कोणासही जर असे प्रसंग येतील तर पुढेही मदत करण्यास मागे पाऊल घेणार नाहीत, अशी आमची पूर्ण खात्री आहे. ह्यांचा उदार आश्रय असल्यामुळे समाजात हे एकूण हे एक भूषण मानले पाहिजे.
समाजाकडून ज्या विद्यार्थ्यांस स्कॉलरशिप मिळतात त्या विद्यार्थ्यांची विद्येमध्ये कितपत प्रगती झाली हे समाजास समजावे म्हणून त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याचे काम रा.रा. पो. राजन्ना लिंगू प्लिडर यांनी मेहेरबानी करून पत्करले. सबब समाज त्यांचे फार आभार मानीत आहे.

जमा तपशील  रक्कम रु. आ. पै.

रा.रा. हरी रावजी चिपळूणकर .. .. 37-8-0
रा.रा. जोतीराव गोविंदराव फुले .. .. 34-6-0
रा.रा. जाया मलाया लिंगू .. .. 25-0-0
सौ. बजूबाई निंबणकरीण (लग्न प्रीत्यर्थ) .. .. 20-0-0
सौ. सावित्रीबाई फुले (सदर) .. .. 15-0-0
रा.रा. गंगाराम भाऊ म्हस्के .. .. 15-0-0
रा.रा. ग्यानोबा झगडे .. .. 13-3-0
रा.रा. माधवराव मळोजी झगडे (लग्न प्रीत्यर्थ) ..  7-0-0
रा.रा. ग्यानू कृष्णाजी ससाणे .. ..  5-7-0
रा.रा. दावबा बापू शिंदे (लग्न प्रीत्यर्थ) .. ..  5-0-0
रा.रा. भिकोबा बाळाजी सुकळे साळी .. ..  4-0-0
रा.रा. ग्यानोबा लोंढे .. ..  3-2-0
रा.रा. तुकाराम तात्या मुंबईकर .. .. 2-10-0
सभासदाकडून दोन रुपयांच्या आतील आलेल्या रकमा मिळून – 34-12-0
222-0-0

खर्चाचा तपशील  रक्कम
रु. आ. पै.
स्कॉलरशिप खर्च .. .. 52-8-0
लग्नासंबंधी बक्षिसाद्वारे मदत .. .. 47-0-0
किरकोळ खर्च .. .. 41-13-3
छापखान्यासंबंधी खर्च .. ..   41-0-6
समाजाच्या शाखांस पुस्तके .. ..     9-4-0
बक्षीसे दिले त्याचबद्दल रा. विठ्ठल महादेव गुठाळ यास मदत   25-0-0
मुलास कपडे बक्षीस दिल्याबद्दल .. ..   4-13-0
आज तारखेस शिल्लक .. ..     0-9-3
  222-0-0

जोतीराव गोविंदराव फुले
स. शो. स. खजिनदार

ह्या प्रसंगी आम्हाला लिहिण्यास आनंद वाटतो, की आपल्या हल्लीच्या परमदयाळू सरकारने हिंदुस्थानात आगमन केल्यामुळे सर्व जातींच्या लोकांस विद्येचा सारखा लाभ व्हावा, या हेतूने गावोगावी विद्यालये स्थापिली. याच्या निःपक्षपाती व परोपकारी सर्व लहानथोर जातीच्या लोकांस विद्यालाभ करून घेण्याची संधी मिळाली व जरी या समयी लोकांचे अज्ञान अवस्थेमुळे व धर्माच्या वेड्या समजुतीमुळे शूद्र वर्गात विद्येची वृद्धी लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे, यास्तव आपले लोकांत सुधारणा करण्याकरिता हे दिवस फार उत्तम आहेत. म्हणून अशी उमेद धरली पाहिजे की, आमच्या पैकी विद्वान सद्गृहस्थांनी आपले लोकांची आणि देशाची सुधारणा करणे आहे, तरी कृत्रिमी लोकांची भीती न धरिता मनाचा दृढनिश्‍चय करून सत्यास अनुसरून वर्तन करण्यास मागे घेऊ नये. जर घेतील तर आमचे शूद्र बांधवांची मानसिक दास्यत्वाचे कैदखान्यातून कधीही मुक्तता व्हावयाची नाही. ते पुन्हा अंधाररूप सागरात बुडाल्याप्रमाणे होणार आहे. याजकडेस लक्ष देऊन जे करणे ते करावे. ह्या सत्कृत्यास आम्ही प्रथम परमेश्‍वराची आराधना करून आरंभ केला. नंतर हे सत्कृत्य त्या जगन्नियंत्या परमेश्‍वराच्या कृपेने हा काळपोवेतो दिवसानुदिवस उत्तम प्रकारे उर्जीत स्थितीत येत आहे. पुढे जगाचा निर्माणकर्ता ते उत्तम स्थितीत आणील अशाबद्दल आम्ही त्यांची अंतःकरणपूर्वक नम्रतेने प्रार्थना करितो.
समाजाचे सभासद : रा.रा. रामशेट बापूशेट उरवणे, रा. विनायक बाबाजी डेंगळे, रा.रा. ग्यानू मल्हारजी झगडे, रा. कृष्णराव पांडुरंग भालेकर, रा.रा. जोतीराव गोविंदराव फुले.


-समाप्त-

नारायण तुकाराम नगरकर,
   सत्यशोधक समाजाचे चिटणीस

(डॉ. आर.एम. पाटील, पुणे यांच्या संग्रहातून) 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *