श्रद्धा ही कुठल्याही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे आमच्या श्रद्धेला नाकारणारा कायदा आम्ही मान्य करणार नाही, असा एक सूर मूलतत्त्ववाद्यांचा असतो. राम किंवा परशुराम या व्यवस्थेचे आदर्श आहेत. राम व परशुराम दोन्हीही वर्णाश्रमधर्माचे समर्थक होते. अर्थातच ते मनुस्मृतीचे समर्थन असल्याने ‘स्त्री’ आणि शूद्रांना या व्यवस्थेत कायम दुय्यम स्थान आहे. त्यांच्या विचारांना, हक्क आणि अधिकारांना कोठेही जागा नाही. त्यांच्यासाठी आहेत ती व्यवस्थेने निर्माण केलेली कर्तव्येच.
मूलतत्त्ववाद ही एक धार्मिक, प्रतिगामी आक्रमक व हिंसक अशी धर्माधिष्ठित राजकीय चळवळ आहे. तिची अनेक रूपे आहेत. ती मूलतः अवैज्ञानिक आहे. तिच्या प्रेरणा भूतकाळातून येतात. धार्मिक हटवादीपणा हे तिचे मुख्य स्वरूप असते. आपल्या प्राचीन राष्ट्रीय वैभवाचा, संस्कृतीचा, सन्मानाचा संबंध आपल्या मूळ धर्माशी, परंपरांशी आहे. राष्ट्राला जागृत करायचे असेल, तर त्या जुन्या परंपरांचे, व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करावे लागेल. अशा प्रकारच्या विज्ञानाला विशेषकरून या चळवळी अमेरिकेतून कॅथॉलिक पंथीयांनी सुरू केल्या, असे समजले जाते. विज्ञानामुळे धर्माची जुनी इमारत खिळखिळी झाली आहे. तिला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. इस्लाममध्ये 1979 पासूनच मूलतत्त्ववादी चळवळींनी गती घेतली आहे. या धार्मिक चळवळींनी पुढे राजकारणात प्रवेश केला. राजकारण्यांसाठी हा सुगीचा काळ म्हणता येईल. कारण धर्म हेच एक प्रभावी शस्त्र आहे ज्यामुळे विरोधकांना धर्मद्रोही, देशद्रोही ठरवून त्याचा सहज पराभव करता येतो.
जगातील कुठलेही सत्य अंतिम नाही!
भारतात उजव्या शक्तींचा जन्म साधारणतः 1920 पासून सुरू होतो. अर्थात, लोकमान्य टिळकांच्या काळातही त्या होत्याच. धर्माच्या साहाय्याने ज्या वर्गसमूहांनी सत्ता, संपत्ती व विशेषाधिकार भोगले तेच या चळवळींचे सूत्रधार होते. आजही तेच आहेत. इस्लामी धर्मातील मूलतत्त्ववाद आपल्याला स्पष्टपणे दिसतो. इसिस, वहाबी पंथ, अलकायदा, लष्करे तोयबा, मुस्लीम ब्रदरहूड, अशा संघटना जिहादी पद्धतीने काम करतात. त्यातल्या काही तालिबानी लष्करी संघटना आहेत. त्यांचे म्हणणे असते, की आमचा धर्मच जगातील सर्वश्रेष्ठ आहे. कुराणातील प्रत्येक शब्द ईश्वर आहे. त्यामुळे तेच अंतिम सत्य आहे. जगातील कुठलेही सत्य अंतिम नाही, असे बुद्धाने म्हटले आहे. विज्ञानदेखील सत्याकडे जाण्याची एक पाऊलवाटच आहे. ज्ञान आणि ज्ञाता दोन्हीही बदलणारे असतात; परंतु मूलतत्त्ववाद्यांचा ना विज्ञानावर विश्वास असतो, ना ज्ञानावर. त्यामुळे धर्माचे शब्दशः पालन करणारे, ईश्वरी आदेशावर विश्वास ठेवणारे तेच खरे ‘पवित्र’ आणि बाकी सारे ‘अपवित्र’ धर्मद्रोही म्हणून शिक्षेस पात्र, अशी त्यांची धारणा असते. मूलतत्त्ववादी स्वतःला धार्मिक आदर्शवादी समजतात. आम्ही जे काही करतो ते धर्मासाठीच. त्यामुळे ‘हत्या’देखील धर्मासाठीच असल्यामुळे त्यांना ते पवित्र कृत्य किंवा कर्तव्य वाटते.
धर्म जेव्हा अधिक संघटित होतो, तेव्हा अधिक कट्टर होतो
अठराव्या शतकात भारतात उदयास आलेल्या वहाबी चळवळीवर हिंदुस्थानी धर्मपंडित शाह वली उल्लाह यांच्या विचारांचा प्रभाव होता. देवबंदच्या चळवळी मूलतः पुनरुज्जीवनवादी होत्या. तबलिगी, मुजाहिदी, तालिबानी, असे अनेक प्रकार त्यानंतर उदयास आले, तरी मूलतः एकच विचार होता तो म्हणजे कुराण हेच अंतिम सत्य असून, कुराणाच्या पलीकडे जाऊन कुणी धर्माची/सत्याची मांडणी करीत असेल, तर ते धर्मद्रोही आणि इस्लाम सत्तेत असेल, तर ते राष्ट्रद्रोही आहेत व त्यांचा नाश करणे हे धर्मसंमत आहे. इस्लाममध्ये जाती नसल्या, तरी शिया, सुन्नी असे कट्टर पंथीय आहेतच. त्यांच्या विचारात धार्मिक उदारतेला किंवा स्खलनशीलतेला थोडीही क्षमा नसते. धार्मिक संघर्षातून कट्टरता वाढते. धर्म जेव्हा अधिक संघटित होतो, तेव्हा अधिक कट्टर होतो. त्यातून मूलतत्त्वांचा प्रचार केला जातो. उदारमतवादी तत्त्वे हळूहळू समाप्त केली जातात. सर्व मूलतत्त्ववादी स्त्रियांच्या शिक्षणाला, अधिकाराला, सक्षमतेला विरोध करतात. मूलतत्त्ववाद ख्रिश्चन धर्मातही आहे. याचे कारण या दोन्ही धर्मांचे मूळ अत्यंत कट्टर अशा यहूदी धर्मात आहे. येशू ख्रिस्तांचा वध या कट्टरतेतूनच झाला. येशू ख्रिस्ताने यहुद्यांना जुन्या देवदेवतांना, परंपरांना विरोध केला होता. यहुद्यांचा देव म्हणतो, ‘मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे असे समजू नका, मी तलवार चालवण्यास आलो आहे. ज्या माझ्या वैर्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये, असे होते. त्यास येथे आणा व माझ्या देखत ठार मारा.’ अशा प्रकारचे आदेश ज्यूंच्या हिक्रू करारात आहेत. तेथूनच ते कुराणातही आले आहेत. धर्मग्रंथ ईश्वरी आहेत, असे मानल्यामुळेच हिंसेला पावित्र्य प्राप्त होते.
…हे मूलतत्त्ववादाचेच एक वेगळे रूप
धार्मिक मूलतत्त्ववाद अमेरिकेसारख्या देशातही वाढतो आहे. अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने नुकताच गर्भपातावर एक निर्णय दिला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली आहेत. हे मूलतत्त्ववादाचेच एक वेगळे रूप आहे. हिंदू पुरुषांप्रमाणेच अमेरिकन कॅथॉलिक पुरुषालाही आपली स्त्री अत्यंत पवित्र, शहाणी असे वाटते. नुकतीच एक कादंबरीही त्यावर आली आहे. आपली पत्नी बायबलप्रणीत आदर्शाप्रमाणेच वागावी आणि तिने अत्यंत पवित्र वर्तन करावे म्हणून एक कॅथॉलिक नवरा तिच्यावर अत्यंत कठोर बंधने लादतो, तिचा छळ करतो. शेवटी या आदर्शांसाठी तिचा खूनही करतो आणि शेवटपर्यंत त्याला पश्चात्ताप होत नाही. मुलीने हा सर्व छळ पाहिला. आपल्या आत्मकथेत तिने ते लिहिले. शेवटी तिने आपल्या बापाला क्षमा केली आहे. माणसाचे धर्मवेड माणसाला किती क्रूर बनवते, ते आपणही भारतातील ‘मॉब लिंचिंग’सारख्या प्रकरणात पाहिले आहे. सलमान रश्दीने म्हटले आहे, की हातात बायबल वा कुराण घेऊन देवदूतांच्या वेशात काही सैतान हैदोस घालीत आहेत. नुकताच त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला एका अज्ञात मूलतत्त्ववादी मुस्लीम तरुणाने केला आहे. त्याने ‘सॅटेनिक व्हर्सेस’ हे पुस्तक वाचलेदेखील नव्हते. मूलतत्त्ववाद विज्ञानवादी आधुनिक जीवन पद्धतीला मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करतो. हा विरोध मूलतः हिंसक पद्धतीचा असतो.
बौद्ध संस्कृती वेद स्मृतिभूती या सर्व कर्मकांडांना विरोध करणारी
इतर अनेक धर्मांप्रमाणेच हिंदूंतील मूलतत्त्ववाद गंभीर रूप धारण करतो आहे. वास्तविक, हिंदुधर्म भारतात वेगळा असा अस्तित्वात नव्हता. हिंदू हे नाव मुळात सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक या अर्थाने आहे. आर्य येण्यापूर्वी या देशातील मूळ धर्म कोणता याविषयी फार संशोधन झालेले नाही. मुळात आर्यांचा धर्मही हिंदू नाहीच. प्रत्येक गावाचा, प्रांताचा वेगवेगळा धर्म, पंथ, देवता असण्याची शक्यता आहे. आजही निरनिराळ्या जातींचे वेगवेगळे देव आहेत. ‘व्हाय आय अॅम नॉट हिंदू’ या पुस्तकात कांचा इलैय्या यांनी त्यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. अर्थात, या सर्व पंथांना, विविध विचारधारांना, परंपरांना एक चालकानुवर्ती व्यवस्थेत बंद करण्याचा प्रयत्न म्हणजे धार्मिक मूलतत्त्ववाद आहे. त्याला हिंदू राष्ट्रवाद म्हणणे म्हणजे धर्माच्या साहाय्याने एका राजकीयव्यवस्थेवर कब्जा करणे आहे. हे प्रश्न यशस्वी होतात ते येथील जातव्यवस्थेमुळे. धर्म आणि संस्कृतीची सरमिसळ केली जाते. त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढता येतो. मुळात हिंदू नावाची अशी स्वतंत्र वेगळी संस्कृती होती का? हा मूळ प्रश्न आहे. असेल तर ‘मनुस्मृती’ हीच ती संस्कृती असावी. त्याआधी बौद्ध संस्कृती होती आणि ती वर्णाश्रमधर्माच्या नेमक्या विरुद्ध होती. ती वेद स्मृतिभूती या सर्व कर्मकांडांना विरोध करणारी होती. सावरकरांना त्याची जाणीव होती. त्यांनी म्हटले आहे, “हिंदुधर्म’ हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष आणि अनन्य नाव नसून, ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूती हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे. या सार्यांना सामावणार्या धर्मसंघांचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.” या व्याख्येवर पुष्कळ चर्चा झालेली आहे. मुळात धर्माची ही राजकीय व्याख्या आहे. परधर्मीयांना वगळणे हाच मुख्य उद्देश आहे. हेडगेवारांनी म्हटले आहे, ‘हिंदुस्थानचा पंचप्राण म्हणजे हिंदू संस्कृती. हिंदुत्वाचे रक्षण करायचे म्हणजे हिंदू संस्कृतीचे रक्षण करायचे.’ या संस्कृतीचा अर्थ वर्णाश्रमधर्मावर आधारित असलेली वेद, उपनिषदे, मनुस्मृती, यज्ञयागादी आदी प्राचीनतेचा अभिमान असलेली निव्वळ ब्राह्मणी संस्कृती आहे. या संस्कृतीचा अधिनायक व देव ब्राह्मणच असला पाहिजे, अशी दृढ धारणा या संस्कृतीधारकांची आहे. ती निरनिराळ्या पद्धतीने ते मांडत असतात.
धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेचा लढा हेडगेवारांना का महत्त्वाचा वाटत होता?
हेडगेवारांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांचे आदर्श लोकमान्य टिळक आणि सावरकरच होते. हिंदुधर्माची व्याख्या पा.वा. काणेंनीही केली आहे. ती करता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षाही या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेचा लढा हेडगेवारांना का महत्त्वाचा वाटत होता, हा मुख्य प्रश्न आहे. काँग्रेस हिंदूंच्या हिताचे रक्षण करीत नाही व मुस्लीम, ख्रिश्चनांना अधिक महत्त्व देते, ते तत्कालीन परिस्थितीत फारसे महत्त्वाचे नव्हते. मुळात काँग्रेस उच्चवर्णीय हिंदूंचीच होती. त्यातील बरेच सोवळेओवळे, जातीयता पाळणारे होते. लोकमान्य टिळकांचे निधन आणि म. गांधींचा उदय हेच संघाच्या निर्मितीचे मुख्य कारण होते. म. गांधींजींची धार्मिक सहिष्णुता, हिंदू-मुस्लीम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, शेवटच्या माणसाचा विचार, वर्णव्यवस्थेला त्यांनी पुढे दिलेला नकार, ब्राह्मणेतरांचा मुख्य राजकीय प्रवाहात झालेला समावेश, अशी अनेक कारणे वा असंतोष संघाच्या स्थापनेमागे होता. मुस्लीम लीगची स्थापना, हिंदू-मुस्लीम दंगलीनंतर फाळणी आदी कारणांमुळे संघ वाढत गेला. मुस्लिमांचा, परधर्मीयांचा, शूद्र-अतिशूद्रांचा द्वेष हे संघाचे बलस्थान होते. उच्च जातीतील तथाकथित वर्णाश्रमाच्या अभिमान्यांनी हा संघ वाढवला. धर्म, जाती, वंश, संस्कृती हे नेहमीच ज्वलनशील विषय असतात. त्यांच्या साहाय्याने माणसे संघटित करता येतात, झुंजवता येतात व प्रतिस्पर्धी वाटणार्या प्रागतिक शक्तींचा पराभवही घडवून आणता येतो. प्रत्येक गोष्टीला जात, धर्म वा वंशांचा रंग दिल्याने विचारी माणसेही भ्रमित होतात व झुंडीत सामील होतात. सत्तेकडे जाण्याचा हा फार सोपा मार्ग आहे.
यालाच मूलतत्त्ववाद म्हणतात
ज्याला आपण सनातनी संस्कृती वा धर्म म्हणतो. तो कधीही समतावादी, विवेकवादी वा विज्ञानवादी नसतो. प्राचीन काळी माणसाच्या बुद्धीचा फार विकास झालेला नव्हता. त्यामुळे प्राचीन धर्म-संस्कृती वा परंपरांचा अभिमान बाळगणारे लोक माणसांच्या बौद्धिक स्वातंत्र्याला, विवेकशीलतेला, मुक्त विचारांना सर्वांत जास्त घाबरतात. धर्मचिकित्सेला त्यामुळे त्यांचा विरोध असतोच. त्यांच्या भावना कमालीच्या दुखवल्या जातात. धर्म व संस्कृतीचा चुकीचा अर्थ लावून एका शोषणव्यवस्थेला जन्म देणे व तिला बळकट करणे, यालाच मूलतत्त्ववाद म्हणतात. ही शोषणव्यवस्था वेदांतून जन्मते आणि तिचा विकास आपल्याला मनुस्मृतीत दिसतो. तसा मूलतत्त्ववाद सर्वच धर्मांत आहे आणि त्याची असंख्य रूपे आहेत. आधुनिकतेला, समतेला, विज्ञानाला आणि विवेकशीलतेला त्यांचा विरोध असतो. आमचा धर्म, संस्कृती, वेश, परंपरा या सर्वोच्च आहेत आणि त्यांना विरोध करणारे आमचे शत्रू आहेत, ही भावना त्यांना धर्मांध करते.
काँगे्रसचा राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद यात मूलगामी फरक आहे. ख्रिस्तोफर जॅफ्रोलेट यांनी लिहिले आहे,
‘Nationalism of the congress party was essentially territorial and civic identifying as Indian all inhabitants of India. Hindu nationalism has sought to identify as Indian nation according to ethnic criteria.’
हिंदू राष्ट्रवाद मुळात वंशवादी आहे. तो धर्माच्या आधारे देशाची विभागणी करू पाहतो. सर्व हिंदूंनाही तो समानतेने पाहत नाही. मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याकांना तो देशाबाहेर हाकलून देण्याचे स्वप्न पाहतो. ख्रिश्चन, मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. जातीय व धार्मिक धुव्रीकरणासाठी त्यांना ते आवश्यक वाटते. ज्याठिकाणी त्यांची सत्ता आहे, त्या उत्तर प्रदेश, गुजरातसारख्या राज्यातही अनुसूचित जाती-जमातींवर सामूहिक हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. अर्थात, जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथेही हे प्रकार होतातच. त्यामागे एक संघटित विचारधारा आहे. एक धर्म, एक संस्कृती, एक पक्ष, एक विचारधारा या पद्धतीने हिंदू राष्ट्रवाद राष्ट्राची उभारणी करू पाहतो. साहजिकच या व्यवस्थेत दलित, वंचित, शोषितवर्गाला काही स्थान राहणार नाही, हे उघडच आहे. याविषयी त्यांच्या राष्ट्रवादात काही जागा नाही. समता, स्वातंत्र्य ही तत्त्वेच मुळात त्यांना मान्य नाहीत. पुष्कळदा ते मनुस्मृतीचे समर्थनच करताना दिसतात.
‘आधुनिक हिंदू त्रिमूर्ती : गांधी, हेडगेवार, आंबेडकर’
नुकत्याच एका हायकोर्टाच्या महिला न्यायमूर्तीने मनुस्मृतीमुळे महिलांना स्वातंत्र्य मिळाले, असे म्हटले आहे. य.गो. भावे या व्यक्तीने नुकतेच एक पुस्तक ‘आधुनिक हिंदू त्रिमूर्ती : गांधी, हेडगेवार, आंबेडकर’ लिहिले आहे. यावरूनही त्यांच्या विचारांची दिशा कळून येते. हेडगेवारांच्या पंक्तीत आणि परंपरेत ते गांधी, आंबेडकरांना बसवतात. त्यापैकी एकाचा त्यांनी खून केला आहे आणि दुसर्याला ते वैचारिकदृष्ट्या संपवू पाहतात. आंबेडकर हवेत; परंतु त्यांची घटना नको. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना नष्ट करण्यासाठी ते एक बौद्धिक षड्यंत्र रचतात. त्याला ते कधी सांस्कृतिक राष्ट्रवाद, वैश्विक मानवतावाद, विश्वशांती, विश्वगुरू, हिंदू धर्मपुरुष, हिंदू राष्ट्रपुरुष, अशा अनेक संकल्पना वापरतात. प्रत्येक गोष्टीला धार्मिक व सांस्कृतिक रंग देणे व तिचे समर्थन करणे त्यासाठी आवश्यक असते. म. गांधींजींच्या खुनामागील संस्कृती समजणे तसे कठीण आहे; परंतु जणू काही ते मोठे राष्ट्रकार्य केले अशा अभिमानाने नथुरामचे पुतळे ते सहजतेने उभे करतात. त्याला विरोध होत नाही, याचे कारण बहुसंख्याकांची धार्मिक, मानसिक गुलामगिरीच होय. धर्माने निर्माण केलेली जन्मजात शूद्रता बहुसंख्याकांना कायम मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडते. या मानसिकतेचा फायदा साहजिकच मूलतत्त्ववादी घेतात.
पाश्चात्त्यांच्या राष्ट्रवादापेक्षा आमचा राष्ट्रवाद खरा
धार्मिक राष्ट्रवाद हा मूलतत्त्ववाद आहे. तथाकथित सांस्कृतिक एकता म्हणजे व्यक्तीने समष्टीमध्ये स्वतःला विलीन करून घेणे होय. राष्ट्रकार्याचे, आपल्या हक्कांचे, व्यक्तित्वाचे बलिदान करणे योग्यच होय. मग उरतात फक्त कर्तव्ये. हिंदू संस्कृतीचा पाया जर समता, स्वातंत्र्य, बंधुता असेल, तर हजारो वर्षांनी सांस्कृतिक महत्ता सांगणार्या तथाकथित विश्वगुरूंना काही नैतिक अधिकार तरी मिळेल. देशातील दारिद्य्र, अज्ञान, अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीय अत्याचार, स्त्रियांवरील बलात्कार, बेरोजगारी याविषयी काहीही न बोलता हजारो वर्षांची आमची वैदिक संस्कृती आणि त्यातून निर्माण झालेले हिंदुराष्ट्र या शब्दांना काहीही अर्थ उरत नाही. पाश्चात्त्यांच्या राष्ट्रवादापेक्षा आमचा राष्ट्रवाद खरा अधिक अस्सल, असे म्हणणारे ना इतिहास जाणत, ना संस्कृती. ही भूमिका स्वातंत्र्य समवादी तत्त्वांसाठी संघर्ष करणार्या लक्षावधी विचारवंतांवर, क्रांतिकारांवर अन्याय करणारी आहे.
प्राचीन संस्कृती म्हणजे मेलेले मढे!
या देशात जी समता, स्वातंत्र्य, लोकशाही आदी मूल्ये आली आहेत, ती लोकसंघर्षातून, आधुनिक तत्त्वप्रणालीतून. तर्क, विवेक आणि विज्ञाननिष्ठा ही बुद्धाने जगाला दिलेली देणगी आहे. भारताने जगाला एकच विश्वगुरू दिला आहे आणि तो म्हणजे भगवान बुद्धच. आपली आधुनिक शिक्षण पद्धती हीदेखील ब्रिटिशांनीच, जगानेच आपल्याला दिलेली देणगी आहे. त्याआधी होत्या पंतोजींच्या शाळा. त्यातही बहुजन समाजाला प्रवेश नव्हता. आपली राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली तीदेखील मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमुळेच. नालंदा, तक्षशिलासारखी जागतिक विद्यापीठे आली ती बौद्ध संस्कृतीतूनच. आपल्या वैदिक परंपरेत मात्र एकलव्याचे अंगठे कापले गेले किंवा शंबूकाचा ज्ञान साधनेच्या अपराधाखाली खून. आज मात्र एकविसाव्या शतकातही आपल्यापुढे आदर्श आहेत, ते गुरुकुल पद्धतीचेच. फक्त उच्चवर्णीयांनीच शिकावे, हा त्याचा अर्थ. भूतकाळापासून मुक्त होणे, हाच खरा आधुनिक संस्कृतीचा अर्थ आहे. प्राचीन संस्कृती म्हणजे मेलेले मढे आहे. त्याला कितीही सजवावे, तरी त्यातून दुर्गंधीच येत राहणार. भारतातील हिंदू राष्ट्रवाद हा फॅसिझमचेच अनुकरण करतो. वांशिक, धार्मिक व सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि क्रोनी कॅपिटॅलिझम (Crony Capitalism) यांच्याद्वारे घटनात्मक लोकशाही संपवून एकाधिकारशाही आणण्याचा तो प्रयत्न आहे. अर्थात, तो सफल होणार नाही. कारण या देशातील कनिष्ठ जातीच बहुसंख्य आहेत आणि आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे आपल्या हक्क आणि अधिकारांबाबत तो उदासीन राहिलेला नाही.
भारतात मूलतत्त्ववादी शक्ती अनेक रूपांनी कार्यरत आहेत
लोकांना भयग्रस्त आणि संकुचित करणे हाच मूलतत्त्ववाद्यांचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे समाजाची मानसिक फाळणी होते. अशा समाजात प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने पाहू लागतो. त्याचा फटका दलित, वंचित समाजाला सर्वांत जास्त बसतो. मागासवर्गीयांना असलेल्या सवलती, आरक्षण, त्यांना मिळालेले घटनात्मक संरक्षण बहुसंख्याकांच्या डोळ्यात खुपू लागते. त्यामुळे देशात बेधुंद होणार्या खाजगीकरणाला, आर्थिक विषमतेला, बेकारी, महागाई, धार्मिक व जातीय अत्याचार, याकडे लोकांचे लक्ष वेधले जात नाही. राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक प्रश्नांकडे लक्ष न देता ‘हिजाब’सारख्या छोट्याशा प्रश्नांवर लोक रस्त्यावर उतरतात, तसेच बिल्कीस बानोसारख्या प्रकरणात बलात्कारी हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचे स्वागत केले जाते. धर्मांधता माणसाला किती अधःपतित करते, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. घटनेने दिलेले मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता किंवा सामाजिक न्यायासारखी तत्त्वे सरकार पायदळी तुडवू शकते, ते अशा धार्मिक प्रदूषणामुळेच. घटनेने दिलेले मानवी हक्क नष्ट झाले तरी चालतील; परंतु या लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे, अशी मानसिकता वाढवत नेणे ही मूलतत्त्ववाद्यांची गरज असते. समाजाला ठरावीक पद्धतीनेच विचार करायला लावण्याची शिस्त अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करून केली जाते. उदारमतवाद, निधर्मी सरकार, समाजवाद, धार्मिक सहिष्णुता हे शब्द उच्चारण्याचीही लोकांना भीती वाटली पाहिजे, अशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जाते. हवा असतो तो एकसुरी नाद. दंगलीत आपला आणि परका ओळखण्याची ती खूण असते. त्यामुळे समाजाचे रूपांतर झुंडीत होते. धार्मिक झुंडी अधिक नग्न असतात, हे जगाने पाहिजे आहे. धार्मिक, जातीय वा वांशिक दंगलीत जितके लोक मेले आहेत, तितके दोन महायुद्धातही मेले नाहीत. भारतात मूलतत्त्ववादी शक्ती अनेक रूपांनी कार्यरत आहेत. इतिहासाचे विकृतीकरण करणे, नव्याने इतिहास लिहिणे, शिक्षणात धर्म आणणे, प्रशासकीय व्यवस्थेचे आधी राजकीयीकरण आणि नंतर धार्मिकीकरण करणे, परधर्मीयांविषयी मैत्री ठेवणेही गुन्हा मानणे आणि अशा तर्हेने समाजाचे धु्रवीकरण करून सत्ता मिळवणे. मूलतत्त्ववादी त्यासाठी प्रभावी प्रचारयंत्रणा उभी करतात.
आमच्या श्रद्धेला नाकारणारा कायदा आम्ही मान्य करणार नाही
राजकीय व आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण, घटनात्मक संस्थांचा गैरवापर आणि जनतेचा मूळात जातीय व धार्मिक मानसिकता येथील विवेकवादास पराभूत करीत आहे. विचारवंतांचे खून झाले आहेत, ते केवळ या व्यवस्थेला त्यांनी विरोध केला म्हणूनच. देशातल्या न्यायव्यवस्थेवरही या ‘बदलांचा’ प्रभाव पडतो आहे. गेल्या दहा वर्षांत सुप्रीम कोर्टाचे निर्णय बहुसंख्याकवादाचा अनुनय करणारे होते, असे दिसून येते. श्रद्धा ही कुठल्याही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे आमच्या श्रद्धेला नाकारणारा कायदा आम्ही मान्य करणार नाही, असा एक सूर मूलतत्त्ववाद्यांचा असतो. राम किंवा परशुराम या व्यवस्थेचे आदर्श आहेत. राम व परशुराम दोन्हीही वर्णाश्रमधर्माचे समर्थक होते. अर्थातच ते मनुस्मृतीचे समर्थन असल्याने ‘स्त्री’ आणि शूद्रांना या व्यवस्थेत कायम दुय्यम स्थान आहे. त्यांच्या विचारांना, हक्क आणि अधिकारांना कोठेही जागा नाही. त्यांच्यासाठी आहेत ती व्यवस्थेने निर्माण केलेली कर्तव्येच. आमची संस्कृती भोगावर नसून त्यागावर उभी आहे याचा अर्थही तोच आहे. समाज एक विराट पुण्यपुरुष आहे. तिथे संघर्षाला, स्पर्धेला कोठेही जागा नाही. अर्थातच हा पुण्यपुरुष ऋग्वेदातील पुरुषसूक्तातीलच आहे, त्याचे डोके ब्राह्मणाचे आणि पाय शूद्रांचे आहेत. वर्णव्यवस्थेचे विविध मार्गांनी उदात्तीकरण करणे व त्यासाठी अनेक छुप्या पद्धतीने समर्थन व बळकटीकरण करणे यासाठी बौद्धिक षड्यंत्र उभे करावे लागते. ते समजून घेणे सामान्यांना शक्य नसते.
हिंदू परंपरावादी आणि हिंदू राष्ट्रावादी यातील अंतर ब्रिटिश विद्वान जॅफरोलेट यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
Whereas the Hindu traditionalist were conservative in their approach, enlisting time-honored values to justify the continuation of a hierarchical social order, the Hindu nationalists wanted to remold Hindu society along corporatist lines and to fashion the state accordingly….
हिंदू राष्ट्रवादाची प्रेरणा हिटलरच्या फॅसिझममधून आली आहे आणि त्यामुळे ती अधिक धोकादायक आहे. त्यासाठी जनतेला विवेकशून्य बनवणे आवश्यक असते. त्या प्रयत्नात ते सफल होताना दिसत आहेत. धर्म एक अफूची गोळीच नाही, ते एक शस्त्रदेखील आहे. ते धर्मांध झुंडींच्या ताब्यात दिले, तर मोठ्या कष्टाने उभा केलेला लोकशाहीचा डोलारा ते सहजपणे उद्ध्वस्त करू शकतात.
– बी.जी. वाघ
(लेखक निवृत्त सनदी अधिकारी आहेत.)