विज्ञान, मूलतत्त्ववाद संघर्ष – प्रा. जयप्रकाश म्हात्रे

विज्ञान, मूलतत्त्ववाद संघर्ष – प्रा. जयप्रकाश म्हात्रे

निरीक्षण, परीक्षण, विश्‍लेषण व निष्कर्ष या विज्ञानाच्या कसोट्या असतात. एखादे घटित या कसोट्यांवर उतरले, की ते विज्ञान होते. मूलतत्त्ववादाचे तसे नसते. जे ग्रंथात लिहिलेले आहे तेच अंतिम सत्य, असे मूलतत्त्ववादी मानीत असतात आणि त्यामुळेच विज्ञान आणि मूलतत्त्ववाद यातील संघर्ष अटळ ठरतो.

विज्ञान (Science) आणि मूलतत्त्ववाद (Fundamentalism) यातील संघर्ष पुरातन आहे. दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानव जेव्हा चिंपांझीच्या पूर्वजापासून उत्क्रांत होऊन उदयास आला, तेव्हापासून ते त्याला आपण आपल्या भोवतालच्या इतर जीवसृष्टीपासून वेगळे आहोत, याचे भान सर्वसाधारणपणे एक ते सव्वालाख वर्षांपूर्वी येऊ लागले. तेव्हा हिमयुग सुरू होते. हिमयुगातील अत्यंत कठीण पर्यावरणात व अन्नस्रोत कमी होत असलेच्या काळात त्याला जगून व तगून राहणे अवघड जात होते. तेव्हा त्याला आपल्या वर्तनात बदल करणे भाग पडले. अशा वर्तन बदलातून त्याने अवघड परिस्थितीवर मात करायला सुरुवात केली. जगण्यासाठी व तगून राहण्यासाठी वर्तन बदलांची ही व्यूहरचना त्याने केली. पुराणवस्तुशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ स्टैनले एम्ब्रोज याने ही वर्तन बदलांची व्यूहरचना म्हणजेच संस्कृती होय, असे म्हटले आहे. आपण इतर सजीवांप्रमाणे केवळ एक सजीव नसून, या पृथ्वीतलावर उदयास आलेलो एक विशिष्ट सजीव आहोत, याचे भान त्याला या काळात येऊ लागले. तोपर्यंत मानवी उत्क्रांती ही डार्विनच्या सिद्धांतानुसार नैसर्गिक निवडीनुसार होत होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सजीव आपल्या शरीररचनेत व शरीरक्रियेत बदल करतात, असे बदल बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात व त्यानुसार नवे सजीव निर्माण होतात. या बदलातून जे बदल योग्य असतात ते बदल निसर्ग निवडतो. यालाच नैसर्गिक निवड म्हणतात. यानंतर मानवी उत्क्रांती ही वर्तन बदलानुसार म्हणजे संस्कृतीच्या आविष्कारानुसार होऊ लागली. भान येणे, माणूस म्हणून जाग येणे, बोलीभाषा येणे, विचार करता येणे, हे सर्व संस्कृतीचे आविष्कार होत. बोलीभाषेचा आविष्कार होण्यापूर्वी माणसाच्या मनात अमूर्त विचारांचे कल्लोळ निर्माण होत होते. हे कल्लोळ व्यक्त करण्यासाठी त्याने आपण राहत असलेल्या गुहांच्या भिंती व छतांवर चित्रे काढण्यास सुरुवात केली. हा कलेचा आविष्कार पुढे विकसित होत जाऊन त्याने शिल्पे बनविण्यास सुरुवात केली, तसेच स्वरयंत्रे (बासरी) ही बनविण्यास सुरुवात केली. 50 हजार वर्षांपूर्वी जेव्हा बोलीभाषेचा उगम झाला तेव्हा मानवी संस्कृतीने मोठीच झेप घेतली व या झेपेमुळे त्याला या पृथ्वीतलावर जगणे आणि सर्व पृथ्वीतलावर पसरणे व तेथे स्थायिक होणे शक्य झाले. दहा हजार वर्षांपूर्वी पर्यंत हा सांस्कृतिकदृष्ट्या विकसनशील माणूस अन्न गोळा करणारी भटकी जीवनशैली जगत होता. दहा हजार वर्षांपूर्वी हिमयुग संपुष्टात येऊन उबदार युग पृथ्वीतलावर अवतरले. भटक्या माणसांचे समूह स्थायिक होऊ लागले व ते शेती करू लागले. शेतीने त्यांना स्थिर जीवनशैली प्रदान केली. शेती संस्कृतीने सभ्यतेला (Civilization) जन्म दिला. सभ्यतेतून विशिष्ट समाजरचना निर्माण झाल्या.


विज्ञान व मूलतत्त्ववाद यांचा उगम


माणसाला जेव्हापासून भान (Consciousness) आले व त्याच्या मनात विचार प्रक्रिया (Thought Process) सुरू झाली, तेव्हापासून तो स्वतःला प्रश्‍न विचारू लागला व त्यांची उत्तरे शोधावयास लागला. मी कोण आहे? या जगाचा निर्माता कोण आहे? ही जगराहाटी कशी चालते? याविषयीचे कुतूहल त्याच्या मनात पिंगा घालू लागले. या प्रश्‍नांची उत्तरे तो शोधू लागला. भटके जीवन जगत असताना तो निसर्ग न्याहाळत होता. निसर्गात घडणार्‍या घटनांची तो निरीक्षणे करीत होता. निसर्ग रहाटी नियमन कोणीतरी करीत असावा, असे त्याचे मन त्याला सांगत होते. निसर्ग हाच देव आहे, अशी त्याची भावना होत होती. कालांतराने तो निसर्ग देवतेची पूजा करू लागला. आराधना करू लागला. त्यातूनच या ईश्‍वराच्या आराधनेची एक परंपरा निर्माण होत गेली व त्यातूनच धर्मसंस्थेचा उदय झाला. हीच धर्मसंस्था पुढे-पुढे कणखर होत गेली व त्यातूनच मूलतत्त्ववाद जन्माला आला. अनेक धर्मसंहिता निर्माण झाल्या व धर्मसंहिता सांगतात त्याप्रमाणेच ही जगरहाठी चालते, या विश्‍वासावर शिक्कामोर्तब होऊ लागले. विश्‍वाची कहाणी सांगणार्‍या धर्मसंस्था व धर्मग्रंथ हे प्रमाण आहेत आणि त्यापलीकडे दुसरे कुठलेही सत्य असू शकत नाही, हा मूलतत्त्ववाद दृढमूल होत गेला. तथापि, याला छेद देणारी चिकित्सेची सुरुवातही त्यापाठोपाठ होऊ लागली. निसर्गातील प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारणे असतील, ती आपण शोधली पाहिजेत, असे माणसाला वाटू लागले व त्यातूनच विज्ञान जन्माला आले. निरीक्षण (0bservation), परीक्षण (Experiment),  विश्‍लेषण (Analysis) व निष्कर्ष (Instance) या विज्ञानाच्या कसोट्या असतात. एखादे घटित या कसोट्यांवर उतरले, की ते विज्ञान होते. मूलतत्त्ववादाचे तसे नसते. जे ग्रंथात लिहिलेले आहे तेच अंतिम सत्य, असे मूलतत्त्ववादी मानीत असतात आणि त्यामुळेच विज्ञान आणि मूलतत्त्ववाद यातील संघर्ष अटळ ठरतो. दहा हजार वर्षांपूर्वीच्या शेती क्रांतीनंतर अनेक सभ्यता उदयास आल्या. ख्रिस्त पूर्व 5,000 वर्षे ते इसवी सन 1,000 वर्षे या काळामध्ये अनेक प्राचीन सभ्यता उदयास आल्या व लयासही गेल्या. या सभ्यतांमध्ये इजिप्शियन सभ्यता, बेबीलोन सभ्यता, सुमेरियन सभ्यता, ग्रीक व रोमन या युरोपीय सभ्यता, सिंधू खोरे सभ्यता, अरब सभ्यता या विशेषकरून नावारूपास आलेल्या सभ्यता होत. जवळजवळ सर्व सभ्यतांमध्ये निसर्गशक्तींना देव मानले जात होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्व सभ्यतांमध्ये मृत्यूनंतर जीवन असते, यावर विश्‍वास ठेवला जायचा. मृत व्यक्तींच्या थडग्यांमध्ये रोज लागणार्‍या वस्तू, तसेच दागदागिने, जवाहिरे ठेवली जायची. यातून काही धार्मिक रूढी परंपराही रुजल्या जात होत्या.


अभिजात युगातील संघर्ष


ख्रिस्त पूर्व 500 ते इसवीसन 500 हा काळ अभिजात युग म्हणून गणला जातो. हा काळ बौद्धिक जागराचा (Intellectual Consciousness), तसेच सद्विवेक (Consciences) जागृतीचा होता. ग्रीसमधील अथेन्स या शहर राज्यात सॉक्रेटिस (ख्रिस्त पूर्व 470-399) या तत्त्वज्ञाने बुद्धिप्रामाण्य (Radio al thinking) ही कसोटी आपली मते व्यक्त करण्यासाठी व अमलात आणण्यासाठी लावण्याचा आग्रह धरला. विवेक व ज्ञान (Season and Knowledge) यावर आधारितच आपली मते आपण बनविली पाहिजेत, असा सॉक्रेटिसचा आग्रह असे. ईश्‍वराचे व धर्मसंस्थांचे अस्तित्व या कसोट्यांवर टिकत नाही, असे मत तो मांडत असे. अथेन्सचा तरुणवर्ग सॉक्रेटिसचा चाहता होता. अथेन्सच्या शासनकर्त्यांनी त्याला त्याच्या या मताबद्दल व तो तरुणांना चिथावणी देतो या आरोपाखाली त्याची जाहीर निर्भर्त्सना करून त्याला कैदेत टाकले व तो आपली मते बदलण्यास तयार नाही म्हणून त्याला विष पाजून देहांताची शिक्षा दिली. मृत्यूची पर्वा न करता आपल्या मतांवर ठाम राहिलेला हा प्राचीन काळातील पहिला विचारवंत होय. सॉक्रेटिसचा अनुयायी अ‍ॅरिस्टॉटल (Aristotle ख्रिस्त पूर्व 384 ते ख्रिस्त पूर्व 322) व अ‍ॅरिस्टॉटलचा शिष्य प्लेटो ख्रिस्त पूर्व 428 ते ख्रिस्त पूर्व 348) यांनी सॉक्रेटिसच्या मतांचा पुरस्कार करून त्याचा प्रसार केला. याच काळात इकडे भारतात चार्वाकांनी वैदिक धर्माला आव्हान देऊन बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार करून मूलतत्त्ववादाला चांगलाच हादरा दिला. याच काळात गौतम बुद्ध (ख्रिस्त पूर्व 583 ते ख्रिस्त पूर्व 463), वर्धमान महावीर ख्रिस्त पूर्व 540 ते ख्रिस्त पूर्व 468) यांनी हिंदुधर्मातील अनिष्ट रूढींविरुद्ध बंड करून वेगळ्या मानवतावादी धर्मांची स्थापना केली. इसवी सन सहावे ते तेरावे शतक हा काळ अंधार युग (ऊरीज्ञ असश) म्हणून गणला जातो. हा मध्ययुगीन काळ (या काळात मानवी सभ्यतांना जणू गाढ झोप लागली अशाच प्रकारचे वातावरण होते. त्यानंतर तेराव्या शतकापासून विज्ञान युग सुरू झाले. 13 ते 19 वे शतक हा काळ पुनर्जागराचा अथवा पुनरुत्थानाचा काळ म्हणून ओळखला जातो.


पुनरुत्थान (Renaissance) आणि प्रबोधन (Enlightenment) युग


मध्ययुगीन अंधार युगात युरोप जणू गाढ झोपेत अथवा ग्लानीत होता. बौद्धिक जागरणे उन्नत झालेल्या अभिजात युगापासून तुटलेला होता. हे तुटलेपण पुनर्जागराने अथवा पुनर्जन्माने पुन्हा सांधायला सुरुवात चौदाव्या शतकापासून सुरू झाली. युरोप पुन्हा एकदा मोठी बौद्धिक झेप घेण्यास सिद्ध झाला. या काळात कला चित्रकला, वास्तुकला, मूर्तीकला, विज्ञान तसेच बँकिंग क्षेत्रांत नवीन उड्डाणे होऊ लागली. याची सुरुवात इटलीतील फ्लोरेन्स राज्य प्रजासत्ताकात झाली व त्यांनी संपूर्ण युरोप खंड व्यापला, अभिजात युगातील मानवतावादी विचारांचा पुनर्जागर होऊ लागला. अभिजात युगातील ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटो गोरस यांनी माणूस हाच जगातील सर्व घटनांचा मोजमाप आहे, असे प्रतिपादन केले होते. हा मनुष्यकेंद्रित मानवतावादी विचार या पुनरुत्थानाच्या काळात पुन्हा झपाट्याने स्वीकारला जाऊ लागला. कला, वास्तुकला, शिल्पकला साहित्य आदी क्षेत्रांत मानवी मूल्यांचे प्रतिबिंब पडू लागले. लिओनार्दो दा विंची, मिशेल अँजेलो यांची चित्रकला फिलिपो ब्रुश्‍चेलिनी व लॉरेन्झो गिलबल्टी, दांते अले घेरी यांचे साहित्य यात मानवी मूल्यांचे प्रतिबिंब दिसू लागले. राजकारण व प्रशासनात नैतिक मूल्ये जपली पाहिजेत, असा आग्रह मॅकियो व्हॅली याने धरला. या सर्व क्षेत्रांत सुरुवातीच्या काळात कॅथोलिक चर्चची मदत होत होती. तथापि, खगोलशास्त्रातील नव्या संशोधनामुळे चर्च व विज्ञान यात संघर्ष उद्भवला. गॅलिलिओ यांनी कोर्पनिकसचा विश्‍वाच्या केंद्रस्थानी सूर्य असून, त्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह फिरतात, असा जो सिद्धांत मांडला होता त्याला पुराव्यानिशी पाठिंबा दिला. स्वतः दुर्बिणीची निर्मिती करून तिच्या साहाय्याने ग्रहतार्‍यांच्या हालचाली त्याने टिपल्या व त्यानुसारच त्याने या सिद्धांताला दुजोरा दिला; परंतु हा सिद्धांत बायबलच्या पृथ्वीकेंद्रित विश्‍व या लिखाणाविरुद्ध जात असल्याकारणाने कॅथोलिक चर्चच्या रोषाला त्याला तोंड द्यावे लागले. त्याच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला व तो पाखंडी आहे, असे जाहीर करून त्याला बंदीवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गॅलिलिओने माफी मागावी, असा चर्चने आग्रह धरला; परंतु गॅलिलिओ बधला नाही व त्याने हा जन्मकैदेचा स्वीकार केला. पुनरुत्थान काळातील हा संघर्ष खूप गाजला व त्याने मानवी इतिहासाला वेगळे वळण दिले. मूलतत्त्ववाद किती निष्ठुर असतो, याचे हे आणखी एक उदाहरण.


उत्क्रांतीचा सिद्धांत व चर्च यातील संघर्ष


चार्ल्स रॉबर्ट डार्विन (1809-1882) या ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञाने ब्रिटिश नौदलाच्या एच.एम.एस.बिगल या जहाजातून 1831 ते 1836, असा 5 वर्षांचा सागरी प्रवास करून सजीवांचे निरीक्षण व संशोधन करून 1859 साली त्याने सजीवांची उत्पत्ती (Origin of Life),  सजीवांच्या उत्क्रांतीबद्दलचा सिद्धांत मांडणारा ग्रंथ प्रसिद्ध करून एकच खळबळ उडवून दिली. बायबलमध्ये प्रतिपादन केल्यानुसार सजीव सृष्टी ही एकाच वेळी व एकाच दमात निर्माण झाली नसून, ती हजारो वर्षांच्या उत्क्रांती प्रक्रियेनुसार हळूहळू निर्माण झाली. पृथ्वीवर प्रथम अतिशय साधे जीव निर्माण झाले व या जिवात बदल घडत-घडत व्यामिश्र जीवसृष्टी निर्माण होत गेली व ती प्रक्रिया आजही सुरू आहे, असे या डार्विनच्या ग्रंथात पुराव्यानिशी प्रतिपादन केले होते. पारंपरिक विचारांना उद्ध्वस्त करणारा हा सिद्धांत असल्याने धार्मिक संस्थांनी चर्चने या सिद्धांताला कडाडून विरोध केला व डार्विन पाखंडी आहे, असे घोषित करण्यात आले. तथापि, गॅलेलिओप्रमाणे त्याला धर्मसंस्था शिक्षा करू शकल्या नाहीत. इंग्लंडच्या चर्चेत धर्मगुरू आणि डार्विनचे मित्र आणि उत्क्रांतीवादाचे समर्थक थॉमस हक्सले यांच्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात वादविवाद झाला. तो वादविवाद हसले यांनी जिंकला. धर्मगुरूंचा पराभव करण्यात उत्क्रांतीवादाचे समर्थक यशस्वी झाले. त्यानंतर केवळ इंग्लंडच्याच नव्हे, तर जागतिक विचारविश्‍वात बदल घडून येऊ लागले. सृष्टी ही परमेश्‍वराने निर्माण केली, हे गृहीतत्त्व विचारी विश्‍वासमोर टिकाऊ धरू शकत नव्हते. तरीही धर्मसंस्था उत्क्रांतीवाद मान्य करीत नव्हत्या. तथापि, 150 वर्षांनंतर चर्चला आपल्या हट्टी भूमिकेवर पाणी सोडावे लागले व 1996 साली चर्चने उत्क्रांतीवादाला मान्यता दिली. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा हा मोठा विजय होय; परंतु पारंपरिक विचारांचा त्याग करण्याची मानसिकता अजूनही समाजावर असून, असा समाज उत्क्रांतीवादाला विरोध करीत आलेला आहेच. विज्ञान पुराव्यावर आधारित असल्याने ते सत्य हुडकून काढू शकते. आता तर रेनिवा जीवशास्त्र व जणूकशास्त्र या विज्ञानाच्या शाखांत इतकी प्रगती होत आहे, की उत्क्रांतीवादाच्या पुराव्यात नवी-नवी भर त्यामुळे पडत आहे. या वर्षीचे नोबेल पारितोषिक विजेते स्वान्ते पाबो यानी रेनिवा जीवशास्त्राच्या आधारे संशोधन करून मानवी उत्क्रांतीला दुजोरा दिलेला आहे व डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत असा सिद्धांत म्हणून पक्का होत आहे. विज्ञान बुद्धीप्रामाण्य मिळायला बळ देते व विचारवंतांची बौद्धिक क्षमता वाढवीत असते आणि म्हणूनच धार्मिक कर्मठपणाला व परंपरांना ते समर्थपणे सामोरे जाऊन त्यांच्याशी मुकाबला करण्यात यशस्वी होते. तरीही विज्ञान आणि मूलतत्त्ववाद यातील संघर्ष थांबलेला नाही. काळाच्या ओघात अशा संघर्षाच्या ठिणग्या वेळोवेळी पडलेल्या आहेत व आजही त्या पडत आहेत. सामाजिक व धार्मिक सुधारणांना सुरुवात अभिजात युगातच म्हणजे पहिल्या मानवी जागरापासून झाली होती. सॉक्रेटिस हा त्याचा उद्गाता होता. मधल्या मध्ययुगीन अंधार युगात काहीही घडले नाही. त्यानंतर पुनरुत्थानाच्या काळात म्हणजे पुनर्जागराच्या काळात अनेक विचारवंतांनी धार्मिक व सामाजिक अंधश्रद्धा व चुकीच्या परंपरा यावर घणाघात करायला सुरुवात केली. मार्टिन ल्युथर या जर्मन धर्मगुरूने रोमन कॅथोलिक चर्चच्या अन्याय्य परंपरांवर हल्ला करून रोमन कॅथॉलिक चर्चचा रोष ओढवून घेतला. माफी मागत नाही म्हणून रोमन कॅथोलिक धर्मगुरूंनी मार्थिन ल्युथर यांना धर्माबाहेर काढले. ल्युथरने प्रोटेस्टंट पंथ स्थापन करून आपला लढा चालूच ठेवला. इकडे भारतातील संत-महात्म्यांनी वाईट रूढी परंपरांविरुद्ध लढा पुकारला. त्यात संत तुकाराम हे अग्रस्थानी होते. अलीकडे अमेरिकन मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांनी वंशवादाविरुद्ध लढा पुकारला. दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांनी दीर्घकाळ वंशवादाविरुद्ध लढा पुकारून दीर्घकाळ कारावास भोगला. या सर्व लढाया अनिष्ट रूढी व परंपरांविरुद्ध होत्या व या लढायांचा पाया बुद्धिप्रामाण्यवाद होता. त्याला विज्ञानाची जोड होती.


सॉक्रेटिस ते दाभोलकर : सत्यशोधनाचा स्फूर्तीदायी लढा


प्रत्येक व्यक्तीने आपली मते ज्ञान व विवेक यावरच आधारित असावीत, अशी स्पष्ट मांडणी सॉक्रेटिसची होती. हेच बुद्धिप्रामाण्य (Rationalism) होय. बुद्धी प्रामाणिक व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. परिवर्तनाच्या लढाया याच तत्त्वांच्या आधारे लढल्या गेल्या व लढल्या जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून परिवर्तनाची लढाई लढत होते. बरेच जण श्रद्धा व अंधश्रद्धा यात गल्लत करीत असतात. विवेकावर आधारित विश्‍वास म्हणजे श्रद्धा, तर अविवेकावर आधारित असलेला विश्‍वास म्हणजे अंधश्रद्धा, हे बर्‍याच जणांना समजत नसल्याने श्रद्धा व अंधश्रद्धा यांची गल्लत केली जाते. यात स्पष्टता असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, महात्मा गांधींवर व त्यांच्या कार्यांवर माझा विश्‍वास असणे ही माझी महात्मा गांधींवर असलेली श्रद्धा. तथापि, अंगात येणारी व्यक्ती देव असते किंवा माणसाचे धड व प्राण्याचे तोंड असणार्‍या व्यक्तिमत्त्वाला देव मानणे ही अंधश्रद्धा होय. कारण येथे विवेकाला कोणतेही स्थान नसते. डॉ. नरेंद्र दाभोलकर याच अंधश्रद्धांविरुद्ध लढले व पारंपरिक धार्मिक विचारांचा अनुनय करणार्‍या जनसमूहाचा त्यांनी रोष ओढवून घेतला; परंतु ते कधीच डगमगले नाहीत व शेवटपर्यंत लढत राहिले. वैचारिक लढाईत आपण पराभूत होतो व होत आहोत याचा राग परंपरावाद्यांना येत राहिला आणि म्हणून त्यांना ठार मारून संपविण्यात आले. दाभोलकर सॉक्रेटिसचीच परंपरा चालवीत होते व लोकांना विवेकाचा मार्ग दाखवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करीत होते. संत तुकाराम महाराज यांचे विवेकवादी विचार पचविता येत नाहीत म्हणून त्यांचे लिखाण, त्यांची गाथा इंद्रायणीत बुडवून व त्यांना सदेह वैकुंठाला पाठवून परंपरावाद्यांनी जसे कृत्य केले, तसेच या आधुनिक काळात त्याच परंपरावाद्यांनी दाभोलकरांच्या बाबतीतही केले, हे इथे नमूद केले पाहिजे. सध्या आपल्या देशात परंपरावाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे व ते विज्ञानाचा व बुद्धिप्रामाण्यवादाचा पराभव करण्यासाठी टपलेले आहेत; परंतु व्यक्ती संपविल्या तरी विज्ञान व बुद्धिप्रामाण्यवाद कधीच संपणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे…

– प्रा. जयप्रकाश म्हात्रे


(लेखक प्राणिशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक व साहित्यिक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *