काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचे नवे पर्व – विजय नाईक

काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचे नवे पर्व – विजय नाईक

“काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी पक्षश्रेष्ठींनी मला गांभीर्यपूर्वक (इम्प्लॉर) विनंती केली,” असे या पदाचे उमेदवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडे सांगितले. याचा अर्थ, या पदाच्या निवडणुकीसाठी शशी थरूर यांनी स्वतंत्रपणे अर्ज भरला असला, तरी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वड्रा, तसेच काँग्रेसच्या कार्यकारिणीचा खरगे यांना औपचारिक पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.  

“काँग्रेसमध्ये केवळ घराणेशाही आहे,” असा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आरोप करीत आहे. खरगे यांच्या उमेदवारीने त्याला कायमचा आळा बसावा, अशी अपेक्षा आहे. ते निवडून आले, की भाजप वेगळ्या आरोपाचा सूर लावेल. तो म्हणजे, “खरगे अध्यक्ष झाले असले, तरी खरे सूत्रचालन सोनिया, राहुल व प्रियांका हेच करतील. सारांश, खरगे हे केवळ त्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले असतील.” रिमोट कन्ट्रोल या तिघांच्या हातात असेल. हाच न्याय भाजपला लावायचा झाला, तर अध्यक्षपदाची कोणतीही निवडणूक न लढलेले व केवळ मोदी व अमित शहा यांची मर्जी होती, म्हणून जगतप्रसाद नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. सारांश, “नड्डा हे मोदी व शहा यांच्या हातातील कळसूत्री बाहुले आहे, त्यांचा रिमोट कन्ट्रोल मोदी, शहा यांच्या हातात आहे, असेही म्हणता येईल.” एक गोष्ट निश्‍चित, की पक्षाच्या अध्यक्षपदासाठी कधीच निवडणुका न घेणारा भाजप व काही का होईना, गेल्या 22 वर्षांत प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक घेणारा काँग्रेस पक्ष, यातील फरक जनतेला निश्‍चितच कळेल.


गहलोतांना मुख्यमंत्रिपद सोडवेना


नाव निश्‍चित होताच खरगे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमाला ते अनुसरून आहे. अध्यक्षपदाच्या चर्चेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पक्षाचा पाठिंबा मिळूनही त्यांना मुख्यमंत्रिपद सोडवेना. त्यांना ते तर हवे होतेच; पण अध्यक्षपदही हवे होते. दोन्ही पदांवर त्यांचा डोळा आहे, असे स्पष्ट होताच, ‘भारत जोडो यात्रेवर’ असलेल्या राहुल गांधी यांनी ‘एक व्यक्ती, एक पद’ या संकेताचा पुनरुच्चार केल्याने गहलोत यांचे मुसळ केरात गेले; परंतु कोणत्याही परिस्थितीत सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाऊ द्यावयाचे नाही, असा विडा उचलून, गहलोत यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या पाठीराख्या 90 आमदारांनी बंड केले. त्यामुळे गहलोत यांचे मुख्यमंत्रिपद वाचले असले, तरी ते काही काळापुरते, असे मानले जाते. त्यांच्या बंडखोरीमुळे सोनिया व राहुल गांधी बरेच नाराज असून, त्यांना आज तरी काही करता येत नाही. कारण, राजस्थानव्यतिरिक्त देशात केवळ छत्तीसगढ हे दुसरे राज्य काँग्रेसकडे आहे. महाराष्ट्रातील फुटीर शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे भाजपमध्ये जाण्याचे गहलोत यांनी पाऊल टाकले, तर राजस्थानही काँग्रेसच्या हातून जाईल, असा धोका उद्भवतो.


‘आय एम नॉट ए स्लीपिंग (वर्किंग) प्रेसिडेन्ट’


काँग्रेसच्या अलीकडील इतिहासाकडे पाहिल्यास असे दिसते, की इंदिरा गांधी यांच्या काळात पक्षाचे अध्यक्षपद व पंतप्रधानपद ही दोन्ही पदे त्यांच्याकडे होती. म्हणजे एक व्यक्ती दोन पदे ही प्रथा होती. इंदिरा गांधी यांच्या काळात माजी संरक्षणमंत्री बाबू जगजीवन राम (दलित) कार्यकारी अध्यक्ष होते. त्यावेळीही “सारे राजकारण इंदिरा गांधी करतात, बाबूजी केवळ नावापुरते आहेत,” अशी टीका झाली, तेव्हा नाराज होऊन ते म्हणाले होते, “आय एम नॉट ए स्लीपिंग (वर्किंग) प्रेसिडेन्ट.” नंतरच्या काळात ती दोन्ही पदे राजीव गांधी यांच्याकडे होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे अर्जुन सिंग यांना त्यांनी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नेमले. अलीकडच्या काळातील ते काँग्रेसचे पहिले उपाध्यक्ष होते. “ते काँग्रेस नेत्यांना राजीव गांधी यांना भेटण्यास वारंवार अडसर निर्माण करीत आहेत,” अशा तक्रारी सातत्याने आल्याने राजीव गांधीही नाराज झाले होते. नंतर आलेल्या पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी पक्षाध्यक्षपद स्वतःकडे ठेवले. त्यामुळे सोनिया गांधी इतक्या नाराज झाल्या, की पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत, असे ठरवून त्यांनी सीताराम केसरी यांना पक्षाध्यक्षपदाचा उमेदवार केले. त्यांच्याविरुद्ध शरद पवार यांनी निवडणूक लढविली. केसरी यांना आठशे मते जास्त मिळून ते निवडून आले. तेव्हापासून, ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नियम अमलात आला. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सोनिया गांधी पक्षाध्यक्ष झाल्या व डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड झाली. “डॉ. सिंग यांच्यामागून सोनियाच सरकार चालवीत होत्या,” अशी जोरदार टीका विरोधकांनी केली. मधल्या काळात एकदा सोनिया, तर एकदा राहुल गांधी अध्यक्ष झाले. खरगे निवडून आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी हे भाजपतील लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी या नेत्यांप्रमाणे पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य बनण्याची सुतराम शक्यता नाही, तसेच मार्गदर्शक मंडळ काँग्रेसमध्ये नाही. कदाचित काँग्रेस हाय कमांडचे एखादे सल्लागार मंडळ नेमून त्याचे अध्यक्षत्व सोनिया गांधी यांना दिले जाईल. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर खरगे यांना उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या साह्याने काँग्रेसची पुनर्बांधणी करावी लागेल. त्यावेळी खरगेंचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना हे दोन नेते सामावून घेतात, त्यांना नवी जबाबदारी देतात, की त्यांना दूर ठेवतात, हे पाहावे लागेल.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानुसार, “खरगे मूळचे कर्नाटकचे आहेत, त्याचा लाभ राज्याच्या 2023 मध्ये होणार्‍या विधानसभेच्या आगामी निवडणुकांत पक्षाला होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते सिद्धरामैया यांची लोकप्रियता ध्यानात घेता, काँग्रेस पक्ष भाजपला आव्हान देऊ शकेल,” असा राजकीय गोटाचा होरा आहे. कर्नाटकातील देवणगेरे येथे सिद्धरामैया यांचा 75 वा वाढदिवस ऑगस्टमध्ये साजरा झाला, त्याला असलेली लाखो लोकांची उपस्थिती, राहुल गांधी, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ, प्रांताध्यक्ष डी.के. शिवकुमार तसेच सिद्धरामैया यांचे विरोधक के.एच. मुनिअप्पा व एस.आर. पाटील यांना निमंत्रणे देण्यात आली होती. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, खरगे यांना कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद संपुष्टात आणून पक्षऐक्य साधावे लागेल, तसेच एच.डी. देवगौडा यांच्या जनता दल (यू.एफ) यांच्याबरोबर निवडणूक समझोता करता येईल काय, हेही चाचपावे लागेल. दुसरीकडे, भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाचे सदस्य व माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना दिल्लीतील आपले स्थान टिकवायचे असेल, तर भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना व पक्षाला पुन्हा निवडून आणावे लागेल.


पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ते प्रभावीपणे काम करू शकतील


इतके दिवस चर्वितचर्वण करून काँग्रेसने अखेर खरगे यांना का निवडले? त्याआधी व्हायचा तो घोळ झालाच. चुरशीत मध्य प्रदेशचे नेते दिग्विजय सिंग, कमलनाथ, मुकुल वासनिक यांनीही आपली वर्णी लागतेय काय, हे पाहण्याचा प्रयत्न केला. खरगे हे काँग्रेसचे अनेक वर्षे लोकसभेतील ज्येष्ठ नेते असून, सरकारविरुद्ध आलेल्या अनेक चर्चा त्यांनी गाजविल्या. त्यांना इंग्रजी, हिंदी, कन्नड आदी भाषा अवगत आहेत. त्यामुळे उत्तर भारतात पक्षाचा प्रचार करण्यास खरगे यांना अडचण येणार नाही. हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तेथे खरगे यांना लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना राहुल गांधी यांचे साह्य मिळेल. प्रियांका गांधी-वड्रा त्यात कितपत भाग घेतात, हे पाहावे लागेल. तथापि, सोनिया गांधी यांची प्रकृती अधूनमधून बरी राहत नसल्याने प्रचारात त्या अपवादात्मकच भाग घेतील, असे दिसते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा खरगे यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ते प्रभावीपणे काम करू शकतील. दरम्यान, सोनिया गांधी यांना प्रभावी नेत्याला त्यांच्या जागी नेमावे लागेल.


सरकारच्या जनताविरोधी धोरणांवर सभागृहात घणाघाती हल्ला


2024 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी खरगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व तेलंगणात नवा राष्ट्रीय पक्ष (भारत राष्ट्र समिती) स्थापन केलेले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पश्‍चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व अन्य विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचे आव्हान खरगे व अन्य नेत्यांपुढे आहे. खरगे यांना राजकारण व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून गेल्या 53 वर्षांत त्यांनी पक्षबदल केला नाही. काँग्रेसशी ते एकनिष्ठ राहिले, हा महत्त्वाचा निकष त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उपयोगी ठरला. त्यांना कामगार चळवळीचा अनुभव आहे. संसदीय कामकाजात आजवर ते हिरीरीने भाग घेत आले आहेत. कोणताही सभापती असो, खरगे यांच्या ज्येष्ठतेचा त्यांनी आदर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारच्या जनताविरोधी धोरणांवर सभागृहात घणाघाती हल्ला करायला खरगेंनी मागे-पुढे पाहिले नाही.


काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याची मोठी जबाबदारी खरगेंवर


त्यांच्या पूर्वपीठिकेकडे पाहिल्यास दिसते, की काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर ते गुलबर्गा शहर काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 1972 मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका गुरमितकल या मतदारसंघातून यशस्वीपणे लढविल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्ट्रॉय रद्द करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीच्या शिफारसींनुसार, मुख्यमंत्री देवराज अर्स यांच्या सरकारने अनेक स्थानकांवरील हा कर रद्द केला. 1974 मध्ये प्राथमिक शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून खरगे यांनी अनुसूचित जाती जमातींच्या रिक्त असलेल्या तब्बल 16 हजार जागा भरून एक प्रकारचा उच्चांक केला. नंतर आलेल्या मुख्यमंत्री गुंडूराव यांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री, मुख्यमंत्री बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळात महसूलव्यतिरिक्त ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री, मुख्यंमत्री एम. वीरप्पा मोइली यांच्या मंत्रिमंडळात सहकार व मध्यम व मोठ्या उद्योग खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात कर्नाटकाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री धरमसिंग यांच्या मंत्रिमंडळात वाहतूकमंत्री, अशी अनेक महत्त्वपूर्ण पदे व जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. कर्नाटक विधानसभेत तब्बल नऊ वेळा जिंकलेले खरगे 2005 मध्ये कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. हा एक उच्चांक मानला जातो. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते गुलबर्गा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करून निवडून आले. मोदी यांची लोकप्रियता व झंझावाती नेतृत्वाच्या लाटेतही त्यांनी यश मिळविल्याने त्यांना लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी नेमण्यात आले. तथापि, या यशाची परंपरा मोडली, ती 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनी. त्यावेळीही ते गुलबर्ग्याहून उभे राहिले. तथापि, भाजपचे उमेदवार उमेश जाधव यांनी त्यांचा 95,452 मताधिक्याने पराभव केला. 12 जून 1978 रोजी खरगे यांची पक्षातर्फे राज्यसभेवर निवड झाली. 12 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांना राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमण्यात आले. ही कारकीर्द अल्प होती. कारण 1 ऑक्टोबर, 2022 रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यावेळी अनुमोदक म्हणून दिग्विजय सिंग, ए.के. अँटनी, अंबिका सोनी, प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, पवन बन्सल, मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण, कुमारी सेलजा, तारिक अन्वर, भूपिंदर हुडा, आनंद शर्मा, पी.एल. पुनिया आदी ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती, सोनिया गांधी, निष्ठावंतांचा त्यांना किती पाठिंबा आहे, हे दर्शविते. हा तपशील देण्याचे कारण, वयाच्या 80 व्या वर्षी काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याची मोठी जबाबदारी काँग्रेसने खरगे यांच्या खांद्यावर टाकली आहे, हे होय, तसेच त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला आहे, हे दर्शविते.


काँग्रेस व विरोधकांच्या दृष्टीने कसोटी


गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये ‘ओल्ड गार्ड’ व ‘युवानेते’ यांच्यात पक्ष कसा चालवावा, याबाबत तीव्र मतभेद झालेले आहेत. काँग्रेस कार्यकारिणीतील अनेक सदस्य बिनबुडाचे होते व आजही आहेत. राहुल गांधी यांचे स्नेही ज्योतिरादित्य शिंदे, जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री आर.एस. छिब, काँग्रेस नेते जी.एम. सरूरी, हाजी अब्दुल राशीद, महंमद अमीन भट, गुलजार अहमद वानी व चौधरी महंमद अकरम यांनी राजीनामे दिले. याव्यतिरिक्त जयवीर शेरगिल, कपिल सिब्बल, सुनील जाखड आदींनी पक्षाला रामराम ठोकला. गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नवा ‘आझाद काँग्रेस पक्ष’ स्थापन केला. हिमाचलचे राज्यसभेतील नेते आनंद शर्मा यांनीही राहुल गांधी व त्यांच्या निकटवर्तीयांवर जोरदार हल्ला चढविला. या गळतीकडे पाहता, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आणखी गळती होऊ नये, यासाठी खरगे यांना प्रयत्न करावे लागतील. हिमाचल, गुजरात व कर्नाटकमधील निवडणुका, ही काँग्रेस व विरोधकांच्या दृष्टीने कसोटी ठरणार आहे. किंबहुना, त्यातील यशापयशावर 2024 मधील पक्षाचे यशापयश अवलंबून राहील.


‘रबर स्टॅम्प’ म्हणून काम करण्याची शक्यता नाही


राजकीय निरीक्षकांनुसार, “खरगे हे गांधी परिवाराशी एकनिष्ठ असले, तरी अध्यक्ष झाल्यावर ‘रबर स्टॅम्प’ म्हणून काम करण्याची शक्यता नाही.” या निवडणुकीमुळे गेल्या 22 वर्षांत प्रथमच पक्षाला ‘नॉन गांधी’ नेता मिळणार आहे. ते दलित असल्याने दलित समाजात समाधान तर आहेच; परंतु त्यांच्यासाठी एक नवे आशास्थान निर्माण झाले आहे. 66 वर्षीय शशी थरूर यांचा पराभव झाला, तरी त्यांच्यासारख्या उमद्या व जागतिक कीर्तीच्या लेखकाला ते दूर सारतील, असे दिसत नाही. दोघेही दक्षिणेचे. पक्षासाठी थरूरही उत्तम प्रचारक म्हणून कार्य करू शकतात. यावेळी खरगे यांना एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल, की काँग्रेसमुक्त भारताची, भारतीय जनता पक्षाने सातत्याने चालविलेली घोषणा काही पोकळ नाही. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जिंकणार्‍या सदस्यांची संख्या 53 पेक्षा खाली आल्यास कालांतराने निवडणूक आयोगाच्या दृष्टीने राजकीय मान्यता गमावण्याची वेळ येईल. या सर्व गोष्टींची खरगे व काँग्रेसच्या नेत्यांना गंभीर व वेळीच दखल घ्यावी लागेल.


खरगेंना ओल्ड गार्ड व युवानेते या दोघांचा समन्वय साधावा लागेल


देशात आजही भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांच्याकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून पाहिले जाते. बाकीच्या पक्षांचे स्वरूप प्रादेशिक आहे. त्यातही एकमेकांचे हेवेदावे, महत्त्वाकांक्षा, प्रादेशिक अस्मिता, काँग्रेस, सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्याबाबत असलेले वैयक्तिक आकस, खरगे यांना दूर करावे लागतील. त्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारतंत्राला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे लागेल. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो पदयात्रेचा’ त्यासाठी किती लाभ होतो, हे लवकरच कळेल. खरगे यांना ओल्ड गार्ड व युवानेते या दोघांचा समन्वय साधून व त्यांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल.
असंतुष्टांचा तथाकथित ‘जी-23 गट’ आता काय पावले टाकतो, हे पाहावे लागेल. या गटाला संपूर्णपणे पक्षाचे नूतनीकरण हवे होते. गटातील बव्हंशी नेत्यांचा खरगे यांना पाठिंबा मिळालाय. निवडणुकीने गटाची महत्त्वाची मागणी पूर्ण झाली आहे. राजकीय पक्षाचे सत्तेवर असणे आणि नसणे, याचे काय काय परिणाम होतात, हे गेली काही वर्षे आपण पाहत आहोत. ‘काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ही बेगडी नाही,’ हे खरगे कशा तर्‍हेने जनता व मतदाराला पटवून देतात, भाजपच्या हिंदुत्वाचे आव्हान कसे स्वीकारतात, यावर बरेच काही अवलंबून राहील.


– विजय नाईक

(लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *