तत्त्वनिष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले – प्रतीक माधुरी ओमप्रकाश कुकडे

तत्त्वनिष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले – प्रतीक माधुरी ओमप्रकाश कुकडे

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे केवळ शिक्षण क्षेत्रात रमणारे शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर पुरोगामी विचारधारा पुढे नेणारे एक कृतिशील विचारवंतही होते. साहित्यातील सर्व प्रकार लिलया हाताळणारे ते तत्त्वनिष्ठ साहित्यिक होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कुशल प्रशासक अशा अनेक बिरूदांनी मिरवलेलं एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणूनही ते स्मरणात राहतील.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित, गद्य आणि समीक्षा अशा विविध प्रकारांत वाङ्मयनिर्मिती करून चौफेर मुशाहिरी करणारे ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा ओझरता आढावा.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 21 मार्च 1948 रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत तत्कालिन मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण होत कुलपतीच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून डॉ. यू.एम. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली 1980 साली पीएच.डी. पदवी संपादन केली. 1971 ते 1977 या काळात बीड येथील महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी 1977 ते 1996 या काळात अधिव्याख्याता आणि प्रपाठक म्हणून काम केले. 1996 ते 2005 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले. 2005 साली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख म्हणजे पुरोगामी, परिवर्तनवादी विचारांचे परखड लेखक, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अध्वर्यू, पुरोगामी विचारांचे तत्त्वनिष्ठ समीक्षक, विचारवंत अशी होती. त्यांनी जीवनभरच्या प्रवासात कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, ललित, गद्य, अनुवाद, संपादन अशा मराठी साहित्य प्रकारात मौलिक लेखन केले.


कुशल प्रशासक


लेखनाबरोबरच पुरोगामी विचारांसोबत राहत, त्याविषयीचे चिंतन आणि परखड भूमिका मांडणारे विचारवंत अशी ओळख त्यांनी निर्माण केलेली होती. शिक्षणाविषयीची तळमळ असणारा मोठ्या मनाचा माणूस, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक ही त्यांची ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असताना विद्यापीठात शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं. विद्यापीठाच्या परिप्रेक्ष्यातील राजकीय संघटनांवर नियंत्रण मिळवून त्यांनी कुशल प्रशासक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेली होती. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे व्यासंगी साहित्यिक होते. त्यांनी विपुल असे ग्रंथलेखन केलेले आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा

कवितासंग्रह :मुडूस, कृष्णमेघ, दरोबस्त लिंपून घ्यावा.
कथासंग्रह : ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘संदर्भ’, ‘राजधानी’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘कविची गोष्ट’, ‘देवाचे डोळे’, ‘सावित्रीचा निर्णय’.
कादंबरी :‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘पराभव’.
समीक्षा :‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘साहित्य अन्वयार्थ’.
मराठी कविता :‘एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’.
इतर लेखन :गावात फुले चांदणे’, ‘प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी’, ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर विकासासाठी’, ‘ललित गद्य’, ‘जोतीपर्व’ (अनुवादित पुस्तक), ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी. रघुनाथ’ (संपादन).

अनेक साहित्यिक संस्थांमध्ये होते सक्रीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून कोत्तापल्ले यांनी काम केलेले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (1988-1989), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. तसेच 2012 मध्ये चिपळूण येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. न.चिं. केळकर पुरस्कार, परिमल पुरस्कार (1985), केशवराव विचारे पारितोषिक (2002), यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (2001) आदी पुरस्कारांचा समावेश आहे.  

स्वतःला शिक्षण क्षेत्रात वाहून घेतले

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे लेखक, विचारवंत होतेच, त्याचबरोबर ते हाडाचे शिक्षक सुध्दा होते. मराठी भाषेवर त्यांचे नितांत प्रेम होते. विद्यार्थी वर्गात डॉ. नागनाथ कोतापल्ले हे लोकप्रिय होते. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असा त्यांचा नावलौकिक होता. शिक्षणामधूनच परिवर्तन घडेल, यावर त्यांचा ठाम विश्‍वास होता. विश्‍वासाबरोबर त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात तसे ठोस काम सुध्दा केलेले आहे. मराठीच्या अध्यापनापासून तर एका विद्यापीठाच्या कुलगुरूपदापर्यंतच्या त्यांच्या यशस्वी प्रवासातून हेच सिध्द होते. शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर- मार्क्स हे तत्व कायम अंगिकारले. या विचारांच्या चौकटीतून त्यांनी आयुष्यभर काम केलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांनी सदैव मार्गदर्शन व मदत केलेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे शेकडो विद्यार्थ्यीं विविध पदांवर काम करीत आहेत.
समीक्षा, ललित लेखन, कथा, कादंबरी, काव्य, अध्यापन या सर्व क्षेत्रात त्यांनी त्यांचे पाय घट्ट रोविले. शेकडो पुस्तकांना प्रस्तावना लिहिलीत. किती पुस्तकांना त्यांनी किती ब्लर्ब लिहिले असतील, हे सांगता येऊ शकतं नाही. यावरून त्यांच्या धडाकेबाज कारकिर्दीचा अंदाज येतो. त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेमामुळे शासनाने त्यांना मराठी भाषिक सल्लागार समितीचे अध्यक्ष केले होते. प्रोफेसर, विभागप्रमुख, कुलगुरू या पदांबरोबरच चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सम्मान त्यांना मिळाला होता. त्यांनी आयुष्यभर शेकडो व्याख्याने दिली, परिसंवाद व संमेलने घडवून आणली. संपूर्ण आयुष्यभर स्वत:ला त्यांनी शिक्षण क्षेत्रात वाहून घेतले होते.

पुरोगामी विचारवंत

मराठी साहित्यातील तत्वनिष्ठ साहित्यिक व समीक्षक, शिक्षणतज्ज्ञ, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, भाषातज्ज्ञ, मोठ्या मनाचा माणूस प्रा.डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अकाली जाण्याने मराठी साहित्य व सांस्कृतिक वर्तुळाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ‘द पीपल्स पोस्ट’च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

– प्रतीक माधुरी ओमप्रकाश कुकडे

(लेखक हे वाङ्मयीन चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *