लोकशाहीत बोलणे थांबवून कसे चालेल बाबा? – जयदेव डोळे

लोकशाहीत बोलणे थांबवून कसे चालेल बाबा? – जयदेव डोळे

लोकसभेत काँग्रेस नेत्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात. राहुल गांधी यांनी आपला हा अनुभव ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सांगितला. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्याच अधीर रंजन चौधरी यांचा माईक बंद केल्याचे वृत्त काही ‘धाडसी’ माध्यमांनी दिले. लोकशाहीच्या मंदिरातच लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होताहेत.

एक पत्रकार मित्र मोठ्या आनंदाने सांगू लागला, की त्याचा विपश्यना करवून घेणार्‍या एका केंद्रामध्ये प्रवेश निश्‍चित झाला असून त्याचे दहा दिवस तरी शांततेत जातील…! राज्य सरकारी कर्मचार्‍यांना या दहा दिवसांच्या विपश्यनेसाठी हक्काची रजा दिली जाते, असेही तो सांगत होता. त्याला मात्र ही सवलत मिळणार नव्हती. कारण तो राज्याचा सेवक नाही. पत्रकार असूनही त्याला लागलेली निःशब्द एकांताची ओढ तशी चमत्कारिक होती. विपश्यनेच्या त्या केंद्रात कोणी कोणाशी बोलायचे नाही, असा नियम आहे. वृत्तपत्रे, टीव्ही, मोबाईल फोन या माध्यमांतून येणार्‍या शब्दांनाही तिथे मज्जाव आहे. पत्रकार मित्र म्हणाला, असा बाहेरून येणारा ओघ थांबला, की आपली विचारप्रक्रिया थांबते अन् दोनेक दिवसांची आपली चुळबूळ थांबते व आपण विचारशून्य होऊन जातो…!


मौन प्रयोग काय ज्ञान देणार?


हे सर्व कशासाठी? तर अंतर्मनाची स्वच्छ धुलाई व्हावी म्हणून. मन ताजेतवाने व्हावे यासाठी. अनेक दिवसांचा मळ निघून जाऊन कोरेकरकरीत होण्यासाठी. त्यासाठी भाषा वर्ज्य. मुकेपण अनिवार्य. या मित्राला मी टोकले नाही, की त्याची थट्टा केली. असतो कोणाला कशात आनंद, तर तो घेण्यात आडवे येऊ नये. त्यात असा निःशब्द निरुपद्रवी उपाय त्याला पटलेला असेल, तर बरेच की. अशा उपायांवर माझा मुळीच विश्‍वास नाही. थोतांड किंवा भ्रम यापलीकडे ते काही नाही, असे मला वाटते. संवाद, वाद, भांडण आणि हिंसा यातले काय टाळायचे हे ज्यांना कळत नाही त्यांना दहा दिवसांचा मौनप्रयोग काय ज्ञान देणार? आता यावर कोणी शहाणपणाचा सल्ला देईल, की अहो, आत जाऊन अनुभवल्यावाचून कसे कळणार तुम्हाला? तुम्ही दहा दिवसांचा प्रयोग करा अन् मग सांगा.
गंमत अशी आहे, की अन्नाचा जसा उपवास असतो तसा शब्दांचा असतो का आणि तो करता येतो का, हे कळणे अवघड आहे. मला तर आहेच, इतरांनाही असेल असे वाटते. शब्द आपल्याभोवती फिरकू न देणे, त्यांना बंदी घालणे, ते वाळीत टाकणे आणि त्यांच्यावर बहिष्कार घालणे हा केवढा भयंकर प्रकार. शब्दांचा उपवास हा प्रयोग जरासा उदात्त, पवित्र, सात्विक वाटेल कदाचित. आपल्याला शब्दवंचित ठेवण्याने कोणाला हलकेफुलके झाल्यासारखे वाटेलही कदाचित. शब्द म्हणजे शब्दकोश नव्हे की बाराखडीतली अक्षरे. शब्द कर्ता, कर्म, क्रियापद, लिंग, काळ अशा अर्थनिर्मितीच्या रुपात आपल्या मनात येत असतात. म्हणजे भाषाच ती. तिला फाटकाबाहेर ठेवून द्यायची?


अभिव्यक्तीचे हाल लक्षात घेतले पाहिजेत


बालकाचे मन मग सर्वांत उत्तम मन समजायचे का? जोवर एखादे बालक भाषा शिकत नाही, तोवर ते वाढत जाणारे एक प्रश्‍नचिन्हच असणार. हातवारे, मुद्रा, आवाज आणि हालचाली या फार तर त्याची अभिव्यक्ती म्हणून काम करणार; पण भाषेशिवाय ना ते जग समजणार, ना त्याला जग समजावून घेणार. त्यामुळे मनोवस्था निर्विचार व म्हणून निर्विकल्प करणारे हे एक अगम्य असे काम दिसते. असो. विपश्यना केंद्राच्या कार्यशैलीपेक्षा आपण भाषाबंदी आणि त्यानुषंगाने अभिव्यक्तीचे हाल याचा विचार करायला हवा. स्वेच्छेने अबोला स्वीकारणे आणि सक्तीने बोलण्यावर बंदी घालणे या दोन्ही अनुभवांमधून भारत 2014 पासून चालला आहे. भाजपचे राज्य स्वातंत्र्याचा विस्तार करणारे नाही. कारण ज्या रा.स्व. संघातून हा पक्ष जन्माला आला त्याचा स्वातंत्र्य या तत्त्वावरच विश्‍वास नाही. संघ अत्यंत उघडपणे एक हुकूमशाहीनिष्ठ संघटना आहे. विचारल्याशिवाय काही सांगायचे नाही, आज्ञेशिवाय काही उच्चारायचे नाही आणि बोलायची वेळ आलीच तर बोलून टाकायचे. मात्र वागायचे त्या उलट, अशी कार्यपद्धती या संघटनेची असते. याचा अर्थ घात, फसवाफसवी, दुटप्पीपणा, धूर्तता यांचा पुरेपूर वापर या संघटनेत केला जातो. गांधीजींच्या खुनात सहभाग असल्याचा आरोप ते आणीबाणीत भराभर माफीनामे सादर करीत आपापली सुटका करवून घेण्याची पद्धत, या घटना हेच सिद्ध करतात, की हे संघटन कमालीचे बेभरवशाचे आहे. भारतात ‘प्राण जाये पर वचन न जाये’ असा हवाला अगदी रामायणकाळापासून देण्याची प्रथा आहे. कागदोपत्री काही नोंद करण्याची व्यवस्था नसतानाच्या काळात शब्द देणे व तो पाळणे हा सद्सद्विवेक जागा ठेवला जायचा; पण भाषा अक्षरबद्ध होऊ लागताच अशी वचने मागे पडू लागली. शब्द फिरवणे किंवा दिलेले वचन पूर्ण न करणे हे कृत्य सर्रास होत असणार; परंतु ज्यांची फसवणूक झाली आणि ज्यांचा वचनभंग झाला त्यांनी ‘परमेश्‍वर कधी ना कधी शिक्षा देईलच’ या दिलाशावर आपली सत्याची बाजू सोडून दिलेली नाही, असे प्राचीन वाङ्मय सांगते. खोटेपणाला तिथल्या तिथे शिक्षा मिळायचा मुद्दाच नव्हता. त्यामुळे अगम्य अशा भविष्यकाळावर भरोसा ठेऊन मनाची समजूत काढायचा प्रकार असहाय्य, हतबल, निराश माणसांत वाढत गेला. भाषा, व्याकरण आणि त्यांचा वापर याबाबतीत प्राचीन भारत अग्रेसर आहे. मात्र भाषा आणि सत्य, शब्द आणि विचार असे काही तत्त्वज्ञानात्मक चिंतन भारतात नाही. सबब, ते संघात कसे असणार?


संसदेतही विरोधकांची मुस्कटदाबी


भाषा जिथे व्यवसायाचा पाया आहे ते व्यवसाय म्हणजे राजकारण, पत्रकारिता, अध्यापन, लेखन, न्याय, वकिली. या सार्‍यांना 2014 पासून स्वेच्छेचा अन् सक्तीचा भाषिक उपवास करावा लागतो आहे. विपश्यनेच्या जागी धर्म, राष्ट्र, परंपरा, इतिहास असे शब्द टाकले की पुरे! ‘समझने वालोंको इशारा काफी है’. खोटी माहिती पसरवली या आरोपाखाली अटक किंवा दोन समुदायांत बेबनाव उत्पन्न होईल असे विधान केल्याच्या निमित्ताने धरपकड करणारे सरकार कशाला मागे लागून घ्या, असे या भाषापटूंना वाटले की झाले! कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अन् लोकशाहीतला सत्ताधार्‍यांना चार गोष्टी सुनवायचा अधिकार!! राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा आली असताना जाहीरपणे सांगितले नव्हते का, की त्यांचा मायक्रोफोन लोकसभेत बंद केला जातो ते काही बोलू लागले की. डिसेंबरात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू अन् बातमी आली, की काँगे्रसचे अधीर रंजन चौधरी यांचा माईक लोकसभेत बंद करण्यात आला. त्या पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्याचा दाखला दिला. ही बातमी सर्व माध्यमांतून प्रकटली असेही नाही. ज्यांचे धाडस अजून शिल्लक आहे, अशांनी त्याचा बभ्रा केला. लोकशाहीत बोलणे कसे थांबवायचे बाबा?
माणसाला स्वतःच्याच भाषेपासून वियोग करायला लावायचा प्रयत्न एकीकडे मनशुद्धीचा असतो म्हणे आणि दुसरीकडे वातावरणशुद्धीचा. या दुसर्‍या प्रकाराला राजशुद्धी असे नाव आपण देऊ या. राजा नागडा आहे असे एक लहान मूल त्या जुन्या गोष्टीत ओरडून सत्य सांगणारे ठरले! तसे आताचा राजाही नग्न आहे, असे सत्य सांगायचे धाडस कोणास न यावे, यासाठी शब्दांना शिक्षा दिली जात आहे. कशाला शब्दांसोबत स्वतःलाही तुरुंगवासात पाठवता? सोपा उपाय करा. शब्दांशी फारकत घ्या, स्वतःला सुखात ठेवा. काम खतम! असा गोजिरवाणा संदेश दिला जात आहे.


अख्खा इंडिया मुका होईल


पत्रकारांनी विपश्यना करावी की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. पण जे ठिकाण शब्दांवर बंदी घालते ते आध्यात्मिक आनंद देते, हे नाही पटत. गुहेत जाऊन तपश्‍चर्या करणारे अनेक तपस्वी भारत पाही; पण निदान त्यांची तपपूर्ती झाली, की त्याला जे ‘दिव्य ज्ञान’ प्राप्त झाले (असा दावा त्यांचाच) त्याचा ते प्रसार करीत. आताचे विपश्यनाकर्ते असे काही करताना ऐकू आले नाही. आपण तर असे मानतो, की गप्पच राहायचे आहे, तर एवढा शब्दांवर दाबदबाव कशासाठी? त्यांनी मोदी, भाजप, संघ, हिंदुत्व आदी विषयांवर काही भाष्य केले की पुरे? त्यांच्या पाठी परत आध्यात्मिक ‘टोळी’ लागते आणि तो माणूस गप्पगार होईतो पिच्छाच सोडत नाही. कायमचा धडा मिळतो. अशा तर्‍हेने घरबसल्या शब्दांपासून चार हात लांब राहता येते.
अशा प्रकारांना काही नावे देता येतील : विपश्यना, भाजपश्यना, अभाविपश्यना, मोदीश्यना, गपश्यना, चुपश्यना…
तो मित्र म्हणाला, तुला यायचे का? मी म्हणालो, उगाच लांब धडपडत जाऊन कशाला त्रास करवून घ्या. दीड वर्षे थांब, अख्खा इंडिया अवाक् अन् मुका केला जाणार आहे. त्यावेळी दहा दिवसांचा उपवास नसेल. 2047 पर्यंत तरी काही बोलायचे नाही. समजलास?

– जयदेव डोळे (लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *