ज्या देशात स्वातंत्र्याचा संकोच फक्त ध्वज, घरे, घोषणा, भाषणे आणि कार्यक्रम यात केला जातो, त्या देशात खरे स्वातंत्र्य नसते. लोक प्रतीकांवर लट्टू होतात आणि प्रत्यक्षाकडे दुर्लक्ष करतात. स्वातंत्र्याला प्रतीके नसतात. प्रत्यक्ष अनुभवाला ते यावे लागते.
1. (अनृत – संस्कृत्तोद्भव नपुंसकलिंगी : असत्य; विशेषण : खोटे) मराठी शब्दरत्नाकर, वा.गो. आपटे, केशव भिकाजी ढवळे, मुंबई, 2013, पृष्ठ 89.
2. (अनृत – वि. खोटे, कपटार्जित (पु.) खोटे बोलणारा, लबाडी) गीर्वाणलघुकोश, ज.वि. ओक, कॉम्प-प्रिंट कल्पना प्रा.लि. पुणे, 2002, पृष्ठ 30.
नमस्कार, हा रिपोर्ट आम्ही कोणत्या देशातून आपणास धाडीत आहोत, ते आम्ही सांगू शकत नाही. तो कोण्या देशाविषयी आहे, ते सांगायचेही स्वातंत्र्य आम्हास नाही. तुम्ही म्हणाल, मग कसले आलाय रिपोर्टर? तर आम्ही रिपोर्टरच आहोत; पण अत्यंत गुप्त आहोत. आम्ही आमच्यावरच प्रकट न व्हायचे बंधन घातलेले आहे. का की आम्ही प्रकटलो, तर भल्या-भल्या लोकांची गुपिते बाहेर पडतील आणि त्या देशाचेही समजून येईल. मग त्या देशात आमचे जिणे, फिरणे मुश्कील होईल म्हणून ही खबरदारी. आमचे नाव काय म्हणता? ठीक आहे. ऑर्वेल जॉर्ज असे समजा. 1984 साली आम्ही जन्मलो असेही समजा. इंग्रजांनी त्या देशाची हालत काय झालीय ते बघायला आम्हाला पाठवून दिले, असेही समजा. तो देश म्हणे स्वतंत्र झाला आणि बराच वयस्कर झाल्याने काळजी वाटून आम्हाला इंग्रजांनी त्या देशात जायला सांगितले. त्या देशाचे वाढलेले वय आणि थकलेली गात्रे पाहून आम्हीही म्हटले, की जायला पाहिजे तिथे. स्वातंत्र्य-स्वातंत्र्य असे जे काय म्हणतात ते पिकले पान आहे, की अजून हिरवे, तजेलदार आहे, ते टिपावे म्हणून गेलो.
चहावाल्याचे पॅकिंग करून टाकावे असे वाटले!
तर झाले असे, की त्यादिवशी आम्ही फुटपाथवरून जात होतो. लोक स्वतंत्र वाटत होते. वाहने त्याहून अधिक स्वतंत्र वाटत होती. फेरीवाले, पथारीवाले, दुकानदार सर्व स्वतंत्र दिसत होते. ज्या देशांत चहावाले, पानटपरीवाले पूर्णपणे स्वतंत्र असतात त्या देशांचे फार भले होते, असे दिसत होते. एका चहावाल्याने फुटपाथ अडवलेला होता. आम्हाला पाहताच तो अचानक किटली व कप घेऊन आला आणि कपात चहा ओतून त्याने खिशामधून काही तरी काढले. पाहतो तर कपाला त्याने पॅकिंग केलेले. आम्ही गोंधळलो. तरी चहा प्यायलो. पैसे देताना चहावाला म्हणाला, पॅकिंगचे चार्जेच धरून जीएसटीमुळे 50 रुपये द्यावे लागतील. आम्ही वैतागलो. त्या चहावाल्याचे पॅकिंग करून टाकावे असे वाटले…
आम्ही पळत-पळत त्या ताफ्यात सामील झालो
आमच्या अंगावर त्यादिवशी काळ्या रंगाचा सफारी ड्रेस होता. एकाएकी आमच्या मागून वाँव वाँव करीत लाल दिव्यांच्या गाड्या आल्या. एक तर आमच्या पुढ्यातच थांबली. तीमधून एक गोल गुबगुबीत माणूस उतरला. लगेच त्याच्या भोवती काळ्या रंगाच्या सफारी ड्रेसवाल्यांचा गराडा पडला. तो ताफा चालू लागताच कोणी तरी आम्हाला धक्का देऊन हातात एक बंदूक देऊन म्हणाले, ‘गो गो गो… फॉलो देम यू इडियट…! बेवकूफ, खडा क्यों है?’ प्रचंड घाबरल्याने आम्हाला तसे करण्यावाचून पर्यायच नव्हता. आम्ही पळत-पळत त्या ताफ्यात सामील झालो. ताफा एका मोठ्या बंगल्याच्या दिशेने जात होता. आत पांढर्या लांबलचक गाड्या, पांढरे कपडे घातलेले, त्यावर जॅकीट पहनलेले खूप लोक होते. शांतता होती. फक्त मोर ओरडत होते. ज्या देशांत मोर ओरडत असतात, त्या देशाचे ओरडण्याचे स्वातंत्र्य मोरासारखेच दिसायला सुंदर; पण निरुपयोगी असते, असे मनातल्या मनात आम्ही नोंदवले.
स्वातंत्र्य काटकसरीने, कंजुषीने वापरले पाहिजे
इकडे गराड्यामागून आमची वरात त्या बंगल्यातल्या एका प्रशस्त हॉलमध्ये पोहोचली. हा गराडा सोडून 56 इंचाचे पोट असलेला तो गोल गोळा बाहेर आला आणि एका खुर्चीवर बसला. त्याने आमच्याकडे खूण करून त्याच्या शेजारी बंदूक ताणून धरून उभे राहायला बजावले. आम्ही तसे करून समोर पाहिले, तर सुमारे 50 खुर्च्यांच्या मागे असेच बंदूकधारी समोर नेम धरून उभे. सगळी मीटिंगच अशी! मीटिंगप्रमुखाजवळ तर चौघे उभे होते बंदुका सरसावून. मीटिंगप्रमुखाने जाकीट घातलेले, दाढी वाढवलेली आणि तोच एकटा बोलत राहिला बराच वेळ. तो म्हणत होता, “मित्रों, यहां आये हुए मेरे पचास देशवासीयों, देश के प्यारो, देश की औलादो… कुछ लोग म्हणजे काही देश आपल्या स्वातंत्र्याविषयी फार अभिमानी असतात. दरवर्षी ते स्वातंत्र्यदीन साजरा करतात. साजरा करणे म्हणजे घरीच सुटी घालवतात. अशा घाबरड्या लोकांमुळे स्वातंत्र्य बदनाम होते. शिवाय त्याचा उपयोगही होत नाही. असे वाया घालवायला स्वातंत्र्यसैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले नव्हते. स्वातंत्र्य असे उधळपट्टीसाठी उपलब्ध झाले, की त्याची किंमत राहत नाही. ज्या देशात स्वातंत्र्याचा ऑक्सिजन उगाचच फुप्फुसांत भरून जगत राहणारे लोक असतात ते आमच्या दृष्टीने राष्ट्रद्रोही. स्वातंत्र्य काटकसरीने, कंजुषीने वापरले पाहिजे, असे मीटिंगप्रमुख म्हणून आमचे म्हणणे आहे. तुम्हाला काय म्हणायचेय?”
…पण मीटिंगमध्ये सन्नाटाच
मीटिंग गप्प राहिली. एकाही जाकीटवाल्याने तोंड उघडले नाही. मीटिंगप्रमुखाच्या उजव्या हाताला तिसर्या खुर्चीवर बसलेल्या जाकीटाने पाण्याच्या ग्लासाकडे हात पुढे करताच एकदम खटाखट, क्लिक क्लिक असे आवाज मीटिंगप्रमुखाच्या मागून आले. बंदुकांचे नेम त्या खुर्चीवर धरले गेले. ते जाकीट खाकरले व पाणी पिऊ लागले. मग रुमालासाठी हात खिशाकडे जाताना पुन्हा बंदुका रोखल्या गेल्या. त्याने रुमालाने चेहरा, टक्कल, कान असे सगळे पुसून कोरडे केले आणि तो टेबलावरच्या फ्लॉवरपॉटकडे टक लावून बसला.
कोणीच काही म्हणेना. आपल्यासाठी ‘कंटिन्यू प्लीज’चा इशारा आहे, असे समजून मीटिंगप्रमुख बोलू लागले, “स्वातंत्र्याचे दोन प्रकार असतात. एक आभासी. दुसरे प्रत्यक्ष. आपल्या देशात असे स्वातंत्र्याचे तुकडे परवडणार नाहीत. प्रत्यक्ष स्वातंत्र्याचा गैरवापर, अतिवापर होतो. गेल्या 70 वर्षांत अशाच प्रत्यक्ष स्वातंत्र्याने आपला देश मागे पडला. नालायक, मूर्ख, येडपट, बावळट लोकांचे राज्य येत राहिले. माझ्या मते ते पुष्कळ झाले. आता देशाला आभासी स्वातंत्र्याची गरज आहे. ‘माझे मन’ या माझ्या मासिक कार्यक्रमात मी आवाहन केले, तर 85 कोटी 27 लाख, 88 हजार 209 लोकांनी आभासी स्वातंत्र्य द्या, अशी मागणी प्रत्यक्षपणे केली आहे. लोकांनाही आता स्वातंत्र्य क्वचित वापरायची व ठेवणीतली वस्तू असल्याचे पटले आहे. त्यामुळे आता हुशार, चतुर, उमद्या आणि उदार लोकांचे राज्य देशात असावे, असा कौल आपल्याला मिळाला. आपण सगळे हुशार, चतुर वगैरे आहोत, हे लोकांना कळून चुकले आहे. ते तसे समजून घेत नसतील, तर आपण त्यांचे प्रशिक्षण सुरू करू. ते कंपल्सरी करू आणि जोवर आभासी स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांना जाणवत नाही तोवर त्यांचा पगार, पाणी, वीज, रस्ता, शिक्षण सारे बंद करू! हां, बोला आता. तुमचे मन काय म्हणते?” असे म्हणत मीटिंगप्रमुख गडगडाटी हसले. आपण मोठा विनोद केला, असे त्यांना वाटले; पण मीटिंगमध्ये सन्नाटाच.
जो-जो स्वातंत्र्याची चव चाखील त्याला धरा आणि राष्ट्रद्रोही ठरवा
तेवढ्यात मीटिंगप्रमुखांच्या उजव्या हाताने 43 व्या खुर्चीवर बसलेल्या जाकिटाचे डोके दाणकन् टेबलावर आदळले. पुन्हा खटाक्, क्लिक आवाज येऊन बंदुका तिकडे वळल्या. गदगदा हलत, खांदे घुसळत ते डोके वर झाले तेव्हा अश्रूंनी ओला चिंब चेहरा प्रकाशात चमकला. हॉल स्तब्ध होताच. जे जाकीट बोलू लागले, “प्रमुखांनी, नका हो, नका. असे आम्हाला बोलते करू नका. तुमच्या बोलण्यापुढे आम्ही बोलणे म्हणजे सरदारांच्या पुतळ्यापुढे गांधींचा अर्धपुतळा! चहापुढे हातभट्टी!! का आम्हाला विचारता? आम्हाला असे प्रत्यक्ष स्वातंत्र्य मुळीच नको. आम्ही आभासाला पत्करू. आभासी जगू. प्रत्यक्ष स्वातंत्र्यात आमचा जीव घुसमटतो. प्रमुखजी, सुरुवात आज इथे आमच्यापासून करा. तुमच्या सहकार्यांना प्रत्यक्ष स्वातंत्र्याची गरज नाही, तर ती नागरिकांना का असावी? आम्ही नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो, की स्वातंत्र्य दुर्मीळ आणि दुर्लभ राहू द्या. जो कुणी स्वातंत्र्याचा लोभ ठेवील, त्याला तुरुंगात डांबले जाईल. घराघरांत बंदुका द्या. घरोघरी हेर तयार करा. जो-जो स्वातंत्र्याची चव चाखील त्याला धरा आणि राष्ट्रद्रोही ठरवा. जय विश्वगुरू!”
शांतम् शिवम् सुंदरम् हाच देशाचा संदेश करायला हवा!
एवढे म्हणणे पूर्ण होताच सारा हॉल उभा राहिला व त्याने ‘स्वतंत्रता हाय हाय’, ‘स्वतंत्रता मुर्दाबाद’ अशा घोषणा द्यायला आरंभ केला. आता मीटिंगप्रमुखांचे डोळे पाझरू लागले. त्यांना हुंदके फुटले. स्फुंदत-स्फुंदत ते बोलू लागले, “स्वतंत्रता के प्रती आपका तिरस्कार और मेरे प्रती आदर देखकर मैं प्रसन्न हुआ! चलो, आज का दिन हम सारे स्वतंत्रता की याद में स्वतंत्रता स्मरण दिन मनाते हैं. आजसे हर 15 तारीख को स्वातंत्र्यस्मृती दिन मनाने का मैं देश को आदेश देता हूँ!” मीटिंग संपली. एकमेकांवर रोखलेल्या बंदुका खाली घेतल्या गेल्या. गोलगृहस्थाने आम्हाला त्यांच्या मागून यायला सांगितले. त्यांचे वाहन त्यांच्यानजीक येताच पुन्हा एक जोरदार धक्का आम्हाला देण्यात आला. कोणी तरी आमची बंदूक हिसकावली व आम्हाला ढकलून दिले. वाँव वाँव करीत सार्या गाड्या त्या बंगल्यामधून बाहेर पडल्या. आम्हीदेखील पुन्हा एकदा रस्त्यावर आलो. हुश्श करून उभे राहिलो. चला, आपल्यादेखत स्वातंत्र्याचा स्मृतिदिन आकाराला आल्याने आम्ही धन्य धन्य झालो. आमचे लग्न झाले व मुलांना नातवंडे झाली, की आम्ही त्यांना आमची ही गोष्ट सांगू. स्वातंत्र्यसमर्पणास जनता कशी तयार झाली, ते आम्ही रंगवून-रंगवून त्यांना सांगू. जनतेला स्वातंत्र्याचे नसते वेड असते. वेडच ते! त्याने स्वतःला व समाजाला फार त्रास होतो. वेडी माणसे अशी फार देशाची बदनामी करतात. त्याकरता त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात डांबावे लागते. औषधोपचार करावे लागतात. शॉक ट्रीटमेंट द्यावी लागते. समाज नेहमी मीटिंगप्रमुखांसारख्या शहाण्या, चतुर माणसांहाती राहिला पाहिजे. समाज शहाणा झाला, की शांत, गप्प राहतो. शांततेत देशाची प्रगती होते. सब की चुप्पी, सब की शांती, सब का गुमान विकासाकडे नेतो. शांतम् शिवम् सुंदरम् हाच देशाचा संदेश करायला हवा.
…वाटले, सारा कामधंदा सोडावा आणि चड्डी घालून स्वयंसेवक व्हावे
आम्ही जोरात श्वास घेऊन पाहिला; परंतु आम्हाला मीटिंगमधले प्रमुखजींचे भाषण आठवले.फुकटछाप श्वास घेणारे असे आम्हाला वाटू लागले. स्वातंत्र्य किती विध्वंसक असते, पर्यावरणाचा नाश करणारे असते, याचा विश्वास वाटू लागला. ‘फ्रीडम इज कंडम, फ्रीडम मीन्स बोअरडम्’ अशा घोषणा आमच्या डोक्यात घुमू लागल्या. आम्हाला फक्त रिपोर्ट बनवायला पाठवलेले होते; पण आम्ही प्रमुखजींच्या स्वप्नाचे शिल्पकार बनलो. वाटले, सारा कामधंदा सोडावा आणि चड्डी घालून स्वयंसेवक व्हावे. प्रचाराचे महत्कार्य करावे. झाले! आम्ही एकदा का विडा उचलला की उचलला. गणवेश घालून आम्ही शाखा कोठे आहे का शोधू लागलो. कोपर्यावरच सापडली. जय विश्वगुरू असे म्हणताच आम्हाला प्रवेश मिळाला. कवायती, खेळ आणि व्यायाम झाल्यावर आमचे बौद्धिक घेण्यास एक युवक उभा राहिला. तो सांगू लागला, “स्वातंत्र्याची आपल्या देशातून हकालपट्टी करायला पाहिजे. ते इंग्रजांकडे परत पाठवून दिले पाहिजे. आयात स्वातंत्र्य आम्हाला नको. आपण देशी स्वातंत्र्य जन्माला घालू. परमपूज्य घोळवलकर गुरुजी यांनी सांगितले होते, की 1947 अशा विषम संख्येतले स्वातंत्र्य खोटे असते. 2014, 2024 अशा सम आकड्यांमधले स्वातंत्र्य खरे असते; पण स्वातंत्र्य हवे तरी कशाला? आरडाओरडा, टीका, वाद, संघर्ष, प्रतिप्रश्न उद्भवतात त्यामुळे. देशी स्वातंत्र्यात जबाबदार्या व कर्तव्ये वाटून दिलेली असतील. जुन्या समाजव्यवस्थेत स्वातंत्र्याची मागणी होत नसे. कारण कामे ठरलेली असत. कोणाला कोणापासून स्वातंत्र्य नको असे. आपल्याला त्या व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करायचे आहे. तीत एकाचे स्वातंत्र्य म्हणजे दुसर्यावर दुप्पट जबाबदारी येण्याची शक्यता होती. म्हणून स्वातंत्र्याची बातच केलेली नव्हती. इंग्रजांनी आपले फार वाटोळे केले. त्यांनी स्वातंत्र्य बहाल केले आणि हक्काची, अधिकाराची, समान वाट्याची, संधीची भाषा सुरू केली. बघा ना, किती मूर्ख, नादान, बेअक्कल, घाणेरडे लोक आपल्याबरोबर येऊन बसतात. आमचे राज्य आले असे सांगतात. यापुढे आपले राज्य यावे म्हणून आधी स्वतंत्रता नाहीशी व्हायला पाहिजे. आपले प्रमुखजी त्याबाबतीत जागरूक आहेत. ते यशस्वी व्हावेत, अशी आपण प्रार्थना करूया. शुरू कर –
ओम् नमोजी भारता, समाप्त करी स्वातंत्र्या,
सुजलाम् सुफलाम् जगावया, नष्ट करी स्वातंत्र्या,
बलवान शक्तिवान असावया, घालवू या स्वातंत्र्या,
गांधी, नेहरू, काँग्रेस, समाजवादी, आंबेडकरी विचारांच्या,
नकली, पुळचट, तकलादू, अदृश्य करू स्वातंत्र्या!
सर्वांनी काय मन लावून प्रार्थना गायली. ध्वजप्रणाम करून शाखाप्रमुखाने बिकीर म्हटले. आम्ही जेवढा अभिनय करता येईल तेवढा केला. निघालो; पण आमचे स्वातंत्र्य बहुधा शाखेत हरवले. ‘नवीन दिसताय? कुठले?’ असे म्हणत तो युवक आम्हाला येऊन चिकटला. इथलाच आहे, बरेच असे म्हणून आम्ही सटकायला बघू लागलो; पण तो पक्का स्वातंत्र्यभक्षक निघाला; पण कोविडच्या काळात प्रमुखजींनी दिलेला राष्ट्र के नाम संदेश आमच्या लक्षात होताः आपदा में अवसर! म्हटले, चला, या पोराला जरा छळू या. आम्ही विचारले, तुम्हाला स्वातंत्र्याचा एवढा द्वेष का बरे? तो सांगू लागला, “आमच्यात असे ठरले आहे, की जे आमच्यापासून तयार झाले नाही ते आमचे म्हणायचे नाही! आम्ही म्हणजे कोण? आम्ही अर्थात ईश्वराचे दूत. परमेश्वराचे प्रतिनिधी लोक बरेच काही आमच्या उपस्थितीत करतात. मग स्वातंत्र्यावेळी आम्हाला का टाळले? स्वातंत्र्यसुद्धा द्यावे लागते. दानाचे, दक्षिणेचे महत्त्व आपल्या संस्कृतीत अपरंपार आहे ना? मग स्वातंत्र्याची दीक्षा आमच्याकडून का नाही घेतली. हा आमचा सवाल आहे. कळले?”
“पण तुम्ही लोक स्वतःला देशापेक्षा मोठे समजत आहात त्याचे काय? स्वातंत्र्य देशाचे आहे अन् ते देशाने मिळवले आहे.” – आम्ही.
इंग्रजांनी आमच्या धर्मात ढवळाढवळ केली नाही
चड्डीवाला युवक जरा चिडला. तावातावामध्ये टीव्हीवरच्या चर्चेत भाजपाचे प्रवक्ते बोलतात तसे दावे करू लागला. म्हणाला, “स्वातंत्र्य तरी देशापेक्षा मोठे असते काय? स्वातंत्र्य नसतानाही देश होताच ना? आम्ही देशातच होतो. आमचे काय बिघडले स्वातंत्र्य नाही म्हणून? इंग्रजांनी आमचा मान राखला. आमच्या धर्मात ढवळाढवळ केली नाही. धर्म तर देशापेक्षा प्राचीन आहे. धर्म आणि आम्ही वेगळे नव्हेत. म्हणून आम्ही पुरातन, सनातन असताना आम्हाला न विचारता आणलेले स्वातंत्र्य आम्ही मानत नाही. आम्हाला विटाळ आहे त्याचा.”
युवकाचे घर जवळ आले होते बहुधा. आम्हाला ‘जय श्रीराम’ करून तो गेला. ‘जय हिंद’ची जागा ‘जय श्रीराम’ला द्यायचा हट्ट त्यातून ऐकू आला. गंमत वाटली. ये आझादी झूठी है, असे म्हणण्याचेही स्वातंत्र्य त्यांना नकोय! फार पूर्वी कम्युनिस्ट मंडळी देशाचे स्वातंत्र्य खोटे आहे, लोकशाही बनावट आहे, असे म्हणत संसदेत जायची. लोकांना हा दुटप्पीपणा समजला. संसदेची कवाडे त्यांना बंद करण्यात आली. राज्ये हातून गेली. आता या राष्ट्रवाद्यांची पाळी दिसतेय, असे स्वतःला बजावत आम्ही देशाचे निरीक्षण करीत पुढे निघालो.
ही तर स्वातंत्र्याची उघड-उघड प्रतारणा!
वाटेत टीव्हीची एक शोरूम लागली. खूप टीव्ही चॅनल्स त्यात काहीबाही दाखवत होती. सर्वच जाहिरातींमध्ये घर आणि त्यातली माणसे आवर्जून दिसत होती. घरामध्येच राहणारी माणसे त्यांना घरपोच वस्तू आणि सेवा देणार्यांच्या जाहिराती भरपूर दिसल्या. काळजी वाटली. अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’ चालू ठेवल्याचे दिसत होते. त्यामुळे घरातच औषधे आणून देणारे, खाण्याचे पदार्थ पोहोचवणारे, किराणा सामान भरून देणारे, भाजीपाला भरणारे, घरातच क्लासेस घेणारे, चार भिंतीतच व्यायाम करायला लावणारे, घरामध्ये चित्रपट पाहायला लावणारे, घरात पलंगावर खेळ खेळायला देणारे, घरपोच कर्ज आणून देणारे, घरात हॉस्पिटल उघडून बरे व्हा म्हणणारे, घरापर्यंत तयार कपडे विकणारे, घरामध्ये पुस्तके आणून देणारे, घरात येऊन केस कापून देणारे, असे किती तरी धंदे लोकांचे स्वातंत्र्य घरबंद करीत असल्याचे आम्ही पाहत राहिलो. स्वातंत्र्याचा असा कोंडमारा आश्चर्यकारक होता. लोक आळशी झाले आहेत का? त्यांना रस्त्यांवर, दुकानांत, बागेत जावेसे वाटू नये, याचा अर्थ त्यांना स्वातंत्र्याची काही किंमत उरली नाही, असे समजायचे का? म्हातार्यांचे सोडा, ते एक वेळ घराबाहेर पडू शकणार नाहीत; पण देशाची तरुण पिढीसुद्धा रस्त्यावर येऊ इच्छित नाही म्हणजे काय? ही तर स्वातंत्र्याची उघड-उघड प्रतारणा!
हे झाले बातम्यांच्या आसपास येऊन जाणार्या जाहिरातींविषयी. बातम्यांत आम्हाला काय दिसले? देशात खाजगी चॅनल्सचा सुळसुळाट असला तरी सार्यांचे वागणे सरकारी चॅनलसारखे दिसू लागले. म्हणजे निखळ प्रचार, सरकारचा बचाव, सत्ताधार्यांची पाठराखण, राज्यावर असलेल्या पक्षाची धोरणे, विरोधी पक्षनेत्यांची टिंगल मस्करी, त्यांना तुरुंगात, अटकेत वा न्यायालयात नेतानाचे चित्र आणि चर्चांविषयी तर काय म्हणावे? ज्या देशात सूत्रसंचालक पक्षपाती असून, तो मुद्दाम सरकारी पक्षाची बाजू भक्कम करू पाहतो, त्या देशाची माध्यमे लोकशाहीनिष्ठ नसतात. ती असतात व्यक्तीनिष्ठ आणि पक्षनिष्ठ. सबब ती हुकूमशाहीची वाहक बनतात. स्वातंत्र्याचे हरण या माध्यमांतून आधी होते.
लोक प्रतीकांवर लट्टू होतात आणि प्रत्यक्षाकडे दुर्लक्ष करतात
आम्ही टीव्हीसमोर उभे असताना आमचा मोबाइल क्षणभर ठणकून थांबला. साहेबांचा संदेश आला की काय, असे वाटल्याने आम्ही मोबाइल उघडला. तो काय! घर घर तिरंगा फडकवा, असा साक्षात प्रमुखजींचा संदेश. दुसरा होता, ‘वन् नेशन. वन इमोशन. वन आयडेन्टिटी’ असे बजावत तिरंगा फडकावण्याचाच. ज्या देशात स्वातंत्र्याचा संकोच फक्त ध्वज, घरे, घोषणा, भाषणे आणि कार्यक्रम यात केला जातो, त्या देशात खरे स्वातंत्र्य नसते. लोक प्रतीकांवर लट्टू होतात आणि प्रत्यक्षाकडे दुर्लक्ष करतात. स्वातंत्र्याला प्रतीके नसतात. प्रत्यक्ष अनुभवाला ते यावे लागते.
वन् नेशन ठीक आहे; पण एक भावना आणि एक ओळख का म्हणून? वैविध्य, वैचित्र्य आणि वैपुल्य जपायचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य या देशात नाही? मारून मुटकून एकत्वाचा आग्रह हा धरायला लावायचा? संपूर्ण देशासाठी एकाच प्रकारचा अभ्यासक्रम, एकाच धाटणीचा इतिहास आणि एकाच भाषेचा हट्ट काय म्हणून आणि कोणासाठी? स्वातंत्र्याचा सोपा अर्थ हा, की भरपूर पर्याय उपलब्ध असणे. संधींची संख्या अमाप असणे. क्षमतांचा वापर करण्यासाठी वाव असणे; पण सत्ताधारी तर सारी दुनिया आपल्या हाती एकवटायला निघाले… आम्ही अचानक विचारवंत बनलो की काय?
वाचा नसलेल्याला मुका म्हणतात…
नक्कीच आम्ही रस्ता चुकलो होतो. आरामात, निवांत जाणारा एक वयोवृद्ध माणूस आम्हाला दिसला. त्यांना थांबवून आम्ही आम्हाला जिथे जायचे होते ती जागा विचारली. त्यांना बोलता येत नसावे बहुधा. तेवढ्यात शेजारच्या दुकानातून एक बाई आल्या. त्या त्यांच्या पत्नी असाव्यात. आम्ही त्यांना पत्ता सांगितला. त्या सांगू लागल्या, “तुम्ही सांगताय तो स्वातंत्र्यचौक आता जमीनदोस्त झाला आहे. त्याचे नाव संघालय चौक आहे. तुम्हाला ज्या इमारतीत जायचेय ती ‘फोर्टी सेव्हन’ इमारतही पाडलेली आहे. तिचे नाव आता ब्रह्मालय झाले आहे. तिथे कोणी स्वातंत्र्यसैनिक राहत नाहीत.”
आम्ही गडबडलो. असे कसे आमचे साहेब चुकले? त्यांनी तर ठामपणे हे पत्ते दिलेले होते. असो. ‘जिथे एक संग्रहालय आणि ग्रंथालय होते स्वातंत्र्यसैनिकांचे. ते असेल ना?’ आम्ही विचारले. त्यासरशी त्या बाईंचा चेहरा कळवळला. आवाजात एकदम कातरपणा आला. त्या सांगू लागल्या, “अहो, संगळे संपवले त्या लोकांनी. म्हणजे प्रमुखजींच्या पार्टीने. त्यांचा म्हणे अशा स्वातंत्र्यावर आणि त्याच्या पुराव्यांवर विश्वास नाही. त्यांनी ते उचलून कुठे नेलेय ते माहीत नाही. खोट्या स्वातंत्र्यापेक्षा नसलेले स्वातंत्र्य बरे, असे सांगून त्यांनी सारे कागद गायब केले! खरे-खोटे ठरवणारे ते कोण? त्यांचा काय सहभाग स्वातंत्र्य मिळवण्यात?”
आम्ही चरकलो. आता रिपोर्ट कसा पाठवणार? त्या बाईंना आम्ही विचारले, तुम्हाला कसे काय एवढे माहीत? हसून त्या म्हणाल्या, आमचे हे स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांच्या डोळ्यांदेखत त्या घटना घडल्या. तेव्हापासून त्यांची वाचाच हरपलीय! त्यांचे नाव काय? आम्ही विचारले. त्या बोलल्या, वाचा नसलेल्याला मुका म्हणतात…
– जयदेव डोळे
(लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)