काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे, हे आज जगभरात माहिती झाले आहे. ‘भारत जोडो’ यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली. 150 दिवसांत 12 राज्यांमधून जात 3,570 किमी अंतर पायी चालून फेब्रुवारी 2023 मध्ये ती श्रीनगर येथे पोहोचणार आहे. यात्रेतील प्रमुख नारा आहे ‘नफरत छोडो, भारत जोडो आणि मिले कदम, जुडे वतन!’
वाढती बेरोजगारी, महागाई आणि जातीय-धार्मिक द्वेष, तसेच क्रोनी भांडवलशाही, फॅसिझम आणि धर्मांधता यामुळे लोकशाहीला निर्माण झालेला धोका याबाबत थेट जनतेत जाऊन देशाच्या परिस्थितीबाबत जनतेला जागरूक करावे आणि देशात सामाजिक सलोखा निर्माण करावा यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा काढली आहे. राहुल गांधी स्वतः सांगत आहेत, की ही काँग्रेसची यात्रा नाही किंवा काँग्रेसची निवडणुकीची तयारी म्हणून काढलेली यात्रा नाही, तर लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी, देशात सलोखा निर्माण करून जनतेत ऐक्य साधण्यासाठी आणि संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आहे. या यात्रेमुळे काँग्रेस पक्षाला बळकटी आली तर तो अधिकच फायदा असेल; पण ते काही त्याचे लक्ष्य नाही.
‘भारत जोडो’ यात्रेची काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला का गरज भासली याबाबत राहुल गांधीने यात्रेदरम्यानच्या सभा आणि पत्रकार परिषदांमधून स्पष्ट केले आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मागील आठ वर्षांच्या कालावधीत संसदेमध्ये विरोधी पक्षांना कोणत्याही कायद्यासंबंधी आणि ढासळत्या आर्थिक सामाजिक परिस्थितीबाबत बोलू दिले जात नाही. त्यांचे खासदार बोलत असताना त्यांचा माईक बंद करून टाकला जातो. विरोधी पक्षांची विविध राज्यांतील सरकारे पाडून भाजपाची सरकारे बनवली जात आहेत, संवैधानिक संस्थांची स्वायतत्ता संपुष्टात आणली गेली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ विरोधी पक्षांची बाजू लोकांसमोर मांडत नाही. संसदेमध्ये आणि माध्यमांमधून शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, महिला यांची बाजू मांडता येत नाही. देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, परिस्थितीबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आता थेट जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनाच बोलते करावे, या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढली आहे.
सकारात्मक उद्देशाने निघालेली ऐतिहासिक ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आल्यावर त्यात सहभागी होऊन आपले योगदान म्हणून पायी चालले पाहिजे, असे मी मनोमन ठरवले. मला एका दिवसात जास्तीत जास्त दहा किलोमीटर चालण्याचा अनुभव होता; पण त्यात सातत्य नव्हते, म्हणून सप्टेंबरपासून सलग दहा-बारा किमी चालण्याचा सराव करावा, म्हणून मी चालायला सुरुवात केली. ‘भारत जोडो’ यात्रेसंदर्भात माहिती घेण्यासाठी टीव्ही आणि वर्तमानपत्रे चाळू लागलो. कुठेच काहीही बातम्या दिसत नव्हत्या म्हणून यूट्यूब आणि इतर समाजमाध्यमांतून यात्रेबद्दल माहिती घेऊ लागलो.
7 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी राहुल गांधीने भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेराम्बदुर येथे हत्या झाली होती त्याठिकाणच्या स्मृतिस्थळावर जाऊन प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण काँग्रेसच्या यूट्यूब चॅनलवर दाखवले जात होते. एका बाजूला भजन सुरू होते आणि राहुल गांधी स्मृतिस्थळासमोर बराच वेळ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्याला ध्यानस्थ बसलेला पाहून कोणाच्याही मनात अतीव करुणा उत्पन्न होईल, असाच तो प्रसंग होता. त्यानंतर राहुल गांधीने कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली आणि ‘भारत जोडो’ यात्रेला सुरुवात झाली.
दिवसभर किरकोळ बातम्यांचा रतीब घालणार्या माध्यमांनी ‘भारत जोडो’ यात्रेवर जसा काही बहिष्कार टाकल्याप्रमाणे पुढे अनेक दिवस यात्रा कव्हर करणे टाळलेच, याचे सखेद आश्चर्य वाटत होते. भाजपाच्या बाजूने ट्रोल आर्मीने मोहीम उघडलेली दिसली. त्यात राहुल गांधीने पायी चालताना किती महागडा टी-शर्ट घातला आहे यावर टीका होताना पाहिली. त्यावर प्रधानमंत्री मोदी किती लाखांचा सूट घालतात, याचे काँग्रेसच्या बाजूने प्रत्युत्तर आले. राहुलच्या टी-शर्टवरची टीका बंद झाली. काही टीव्ही चॅनलवर यात्रेचे विडंबन करणार्या जाहिराती यायला लागल्या – त्यावर बेरोजगारी आणि महागाईवरच्या प्रश्नांपासून मोदी कसे दूर पळत आहेत, असे विडंबन आले.
भाजपा सरकारमधील मंत्री – स्मृती इराणी यांनी राहुल गांधी कन्याकुमारीतून भारत जोडो यात्रा करत असताना स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिस्थळी गेले नाहीत, अशी टीका केली; पण काँग्रेसकडून राहुल गांधी विवेकानंदांना अभिवादन करतानाचे व्हिडीओ दाखवले गेले आणि इराणी गप्प झाल्या, तसा ट्रोल आर्मीचा उपद्व्याप बर्याच अंशी बंद झालेला दिसला. यावरून काँग्रेससुद्धा इतके दिवस हलक्याने घेत असलेल्या भाजपा समर्थक ट्रोल आर्मीला तोडीस तोड उत्तर देत असल्याचे दिसले. पुढे यात्रा केरळ राज्यात येण्यापूर्वीच केरळ उच्च न्यायालयात यात्रेमुळे रहदारीला त्रास होईल म्हणून यात्रेवर बंदी आणावी, अशी याचिका दाखल झाली. मात्र, उच्च न्यायालयाने ‘भारत जोडो’ यात्रेला घटनात्मक अधिकार आहे, असे म्हणत ती याचिका फेटाळली. अशा प्रकारे का होईना; पण ‘भारत जोडो’ यात्रा चर्चेत यायला लागली होती. डाव्या पक्षाचे सरकार असलेल्या केरळमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेला मोठा प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांनी काही वर्तमानपत्रांत एखादी चौकट यायला लागली. मीडियाचे स्वातंत्र्य खरेच किती दडपले गेले आहे, तो किती पक्षपाती झाला आहे, याची प्रचीतीच आली. यात्रेला आणल्या जात असलेल्या अडथळ्यामुळे यात्रेबद्दल जनतेत अधिकच सहानुभूती निर्माण होत आहे आणि लोकांची गर्दी वाढतच आहे, असे दिसत होते.
‘भारत जोडो’ यात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला. महात्मा गांधी यांची दांडी यात्रा आणि भारतीय लोक ब्रिटिशांच्या विरोधात कसे लढले हे आपण शालेय इतिहासात वाचलेले होते, त्यात सहभागी होता येणे शक्य नव्हते. ‘भारत जोडो’ यात्रेला दुसरा स्वातंत्र्यलढा म्हणूनही म्हटले जात आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ‘नफरत छोडो, भारत जोडो जात-पात के बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो’चा नारा घेऊन निघालेल्या यात्रेत अशाच भावनेने यात्रा महाराष्ट्रात येताच मी त्यात सहभागी झालो. आणखीन काही मित्र औरंगाबाद, नाशिकहून तात्काळ सहभागी झाले. नांदेड, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत तीन वेळा काही दिवस चालून आलो. आपण विनोबा भावेंची भूदान चळवळ यात्रा इत्यादींबाबत वाचलेले असेल. पुढे माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या ‘भारत यात्रे’बाबत वाचले असेल. त्यानंतरची लालकृष्ण अडवाणी यांची राममंदिर रथयात्रा याबद्दल प्रत्यक्षच कळले असेल. त्यात आणि त्यामुळे भारतभर बरीच हिंसा झाल्याचेही पाहिले, वाचले असेल. मात्र, इथे राहुल गांधीच्या यात्रेत सर्वत्र प्रेम आणि मैत्रीच दिसते.
‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीहून निघाल्यापासून यूट्यूबवरून फॉलो करत होतो. यात्रेत सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल, अशी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडे विचारणा केली. यात्रा महाराष्ट्रात कधी येईल, सहभाग नोंदवायचा असेल तर काय करावे लागेल, कुठे काय व्यवस्था आहे इत्यादी. त्यांना हेसुद्धा सांगितले, की काँग्रेस उशिरा का होईना; पण ट्रोल आर्मीला चांगले उत्तर देत आहे; पण यूट्यूबच्या चॅनलवरील यात्रेच्या लाइव्ह प्रक्षेपणाला केवळ काही हजारांत सबस्क्रायबर्स, व्ह्युव्हर्स किंवा लाइक्स दिसत आहेत, तसेच लोकल लेव्हलला काँग्रेस पुढार्यांकडून पुरेसे मोबिलायझेशन होत असलेले दिसत नाही आणि राहुल एकटा दहा हजार किलोमीटर चालला आणि लोकल नेते झोपलेले राहिले, तर ‘भारत जोडो’ यात्रा कशी काय यशस्वी होईल. त्यावर स्थानिक नेत्यांचे म्हणणे होते, की ही यात्रा काँग्रेसची नाहीच तर ती संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोकांची, जनतेची, नागरिकांची यात्रा आहे. लोकांना लोकशाही टिकवायची असेल, तर तेच यात्रा यशस्वी करतील. लोकांचा यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून ते पटले. यात्रेत गेल्यानंतर एनएसयूआय आणि युवक काँग्रेसचे झेंडे मोठ्या प्रमाणात दिसत होते, तसेच स्थानिक आणि विविध जिल्ह्यांतील प्रमुख नेते आपल्या निवडक कार्यकर्त्यांबरोबर राहुलसोबत चालताना दिसले. सोबत हजारोंच्या संख्येने कार्यकर्तेही चालत होते. यात्रा कर्नाटकात असताना सोनिया गांधी यात्रेत सहभागी झालेल्या दिसल्या. राहुल आपल्या आईच्या बुटाची लेस सुटलेली बांधताना पाहिले. ठरावीक अंतर चालून झाल्यानंतर आईला आता चालू नको म्हणून आग्रहाने गाडीत बसवणारा राहुल सर्वांनी पाहिला. यात्रेत चालताना एका ‘भारत जोडो’ यात्रीला विचारले, की सर्वांत जास्त प्रतिसाद कुठे मिळाला, तर तो म्हणाला सर्वांत जास्त प्रतिसाद आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात मिळाला. मात्र, तेलंगणात पोलिसांनी यात्रेकरूंना खूप त्रास दिला, असेही त्याने सांगितले. असाच पोलिसांनी धक्का दिल्याने रस्त्यावर पडून महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत जखमी झाल्याचे आठवले.
राहुल गांधी यांच्यासोबत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालणारे काही काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि 120 यात्री असतात. या 120 लोकांची शारीरिक क्षमता चाचणी आणि मानसिक दृढतेची तपासणी करूनच निवड करण्यात आलेली आहे, असे समजले. यात महाराष्ट्रातील 9 यात्री आहेत आणि त्यातील 4 महिला आहेत. रोज सकाळी सहा वाजता राष्ट्रध्वजारोहण करून यात्रा सुरू होते. 12 किमी अंतर चालते. तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कम्प 1, कम्प 2 आणि कम्प 3 मध्ये भारतयात्री थांबतात. यात्रेकरूंसाठी ट्रकवर 72 कंटेनर बसवलेले आहेत. त्यात एक, दोन, चार, सहा इतके यात्रेकरू राहू शकतात. काही कंटेनरमध्ये बाथरूमची सोय आहे. कम्प 2 मध्ये पासधारक अतिथी यात्री राहतात. यात त्या त्या राज्यात किंवा जिल्ह्यात सलग चालणार्यांसाठी पासेस दिलेले असतात. साधारणतः यात्रेच्या पाडावाच्या जवळच्या शाळा, कॉलेज किंवा मंगल कार्यालय आदी ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली असते, तर कम्प 3 मध्ये केवळ एक दिवस सहभागी होऊन चालणार्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली असते.
चालताना राहुलच्या भोवती पोलिस, पॅरामिलिटरी आणि कमांडो सुरक्षेचे कडे असते. त्यातून तो वेगाने चालताना दिसतो. बर्याच वेळा मागे पडलेल्यांना त्याच्यासोबत येण्यासाठी अक्षरशः धावावे लागते. मात्र, राहुल काही थकत नाही. सकाळी चालायला सुरुवात करण्यापूर्वी तो काहीवेळ सायकलिंगसुद्धा करतो, हे ऐकून आश्चर्य वाटले. यात्रेच्या मागील आणि पुढील मार्ग रहदारीसाठी काही काळ बंद करण्यात आलेले असतात किंवा वळवण्यात आलेले असतात. सुरक्षा कड्याच्या मागे पूर्णवेळ यात्री, त्यांच्यामागे पासधारक यात्री आणि त्यांच्यामागे एक दिवस चालणारे अतिथी यात्री चालत असतात. यात्रेच्या पुढे काँग्रेसच्या आणि राहुल गांधीच्या यूट्यूब चॅनलवरून यात्रेचे लाइव्ह प्रक्षेपण करणारे कॅमेरा वाहन, त्याच्यापुढे मीडियासाठीचे वाहन चालते. सर्वांत पुढे काँग्रेस सेवा दल राष्ट्रध्वज घेऊन चालत असते. त्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते चालत असतात. सर्वच बाबतीत नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले गेले आहे, हे लक्षात येते.
यात्रेचे एकूण वातावरण भारावून टाकणारेच असते. यात्रेच्या स्वागतासाठी गावोगावी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले दिसतात, सर्वच घरांवर, गच्चीवर, बाल्कनीत, बस स्टॉपच्या टपावर, झाडावर, जिथे उंच जागा मिळेल तिथे उभे राहून ते राहुलकडे पाहून हात उंचावून शुभेच्छा देत असतात, राहुलसुद्धा त्यांच्याकडे पाहून हात उंचावून प्रतिसाद देत असतो. रांगोळ्या काढून ओवाळण्यासाठी महिला उभ्या असतात, ठिकठिकाणी खास पोशाख, फेटे परिधान करून ढोल-ताशे, लेझीम पथक, नृत्य पथक कला सादर करत असतात. आदिवासी, पंजाबी पथके आपली लोककला सादर करत असतात. चौकाचौकांत ‘भारत जोडो’बद्दल भाषणे होत असतात. यात्रा जवळ येताच काही लोक भेटून निवेदन देतात. त्यांच्या हातात विविध नारे लिहिलेले फलक असतात. गावातील अनेक तरुण महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, यांच्या भावमुद्रा टिपणार्या तसबिरी घेऊन उंचावत ‘राहुलजी, राहुलजी’ म्हणून आवाज देत त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. बहुतेक तसबिरी त्यांनी स्वतः रेखाटलेल्या, रंगवलेल्या, लाकडावर कोरलेल्या, अशा विविध प्रकारच्या असतात.
नाशिकहून छात्रभारती विद्यार्थी संघटना केंद्रातील सरकारचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राज्य शासनाच्या सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाच्या विरोधात फलक घेऊन काही जण यात्रेत राहुलसोबत चालले. राहुलने त्यांच्याशी चर्चा करून तो विषय संध्याकाळच्या कॉर्नर सभेत घेऊन सरकारवर टीका केली. 2005 नंतर राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या विविध विभागांतील कर्मचार्यांनी त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये मोठी गर्दी केली होती. राहुल त्यांच्याकडे गेला आणि विषय ऐकून सायंकाळी भेटण्याची वेळ दिली.
यात्रेत नानाविध प्रकारे केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध दर्शविणारे कल्पक फलक आणि युक्त्या करून राहुलचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्याकडे लक्ष जाताच राहुल त्यांना जवळ बोलावून घेत होता आणि त्यांचे फोटो काढले जात होते. राहुलजवळ जाऊन वैयक्तिक फोटो काढण्यास परवानगी नाही. यात्रेत राहुलला भेटणार्या प्रत्येकाचे फोटो काढण्याची व्यवस्था काँग्रेसतर्फे करण्यात आलेली आहे. ते सर्व फोटो आणि व्हिडीओ काँग्रेसच्या वेबसाइटवर आणि समाजमाध्यमांवर तात्काळ टाकले जातात.
यात्रेत सुरक्षा कड्यातील पोलिस गर्दी करणार्या तरुणांना मागे सारत असताना अनेक लोक खाली पडतात. मात्र, लगेच उठून पुन्हा सोबत पळू लागतात. नांदेडजवळच्या अर्धापूरमध्ये एक तरुण दुभाजकावरून पळत पळत राहुलकडे पाहून राहुलजी मैं चार बार गीर चुका हुं, राहुलजी मैं चार बार गीर चुका हुं, मुझे बुलाईऐ म्हणत होता. ज्यांची भेट ठरलेली असते त्यांची सुरक्षा तपासणी करून त्यांना त्या कड्यात राहुलसोबत चालण्यासाठी प्रवेश मिळतो, विनापरवानगी सुरक्षा कडे तोडून राहुलकडे झेपावणार्यांना मात्र विद्युतगतीने बाहेर फेकले जाते. तरीही, राहुल चालता चालता मधेच थांबून एखाद्या झोपडीत किंवा चहाटपरीवरच्या माणसाच्या बोलावण्यावरून त्यांच्याकडे थांबून चहा पितो. चालता चालता कड्याबाहेरील कोणाही व्यक्तीला आत बोलावून तिला बोलते करतो. तो स्वतः क्वचितच बोलतो आणि जास्तीत जास्त वेळ ऐकत असतो. तो कधी अनपेक्षितपणे एखाद्या मजुराला जवळ बोलावून विचारपूस करतो, तर कधी त्याच्या कोकराला तर कधी कोणाच्या लहान मुलीला खांद्यावर घेऊन चालतो. अनेक लहान मुले, तरुण, तरुणी, महिला त्याच्यासोबत मोकळेपणाने बोलताना, त्याला मिठी मारताना आणि वयस्क महिला त्याच्या डोक्यावरून हात फिरवून गालाचा पापा घेतानाही दिसतात. राहुल कन्याकुमारी ते काश्मीर प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची पेरणी करत आहे, असेच दिसते.
सकाळी दहा ते सायंकाळी चार ही जेवण आणि विश्रांतीची वेळ असते. पहाटे लवकर उठून 12 किमी चालून झाल्यावर बहुतेक यात्रींना जेवणानंतर क्षणार्धात गाढ झोप लागते, अनेक जण आपलेच पाय चेपत बसतात, काही जण यात्रेदरम्यान काढलेले फोटो आपल्या सोशल मीडियावर टाकत असतात, तर काही उत्साही तरुण-तरुणी, बुढे-जवान डफाच्या तालावर मोठमोठ्याने चळवळीची गाणी गात असतात, अनेक जण गटागटांत चर्चा करत एकमेकांची ओळख करून घेत असतात, फोन नंबरची देवाणघेवाण करतात आणि कायमचे मित्र म्हणून जोडले जातात. पुढच्या प्रवासात एकमेकांना सहकार्य करत चालत जातात.
मात्र, या दुपारच्या विश्रांतीच्या वेळेतसुद्धा राहुल नियोजित कार्यक्रमानुसार अनेक शिष्टमंडळांना भेटतो, आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्यांच्या शेतावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेतो, त्यांच्या विधवांचे सांत्वन करतो, पहाटे लवकर उठून यात्रेपूर्वी मच्छीमारांचे प्रश्न समजून घेतो, कोविडमध्ये वारलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतो, संस्थात्मक हत्या झालेल्या रोहित वेमुलाच्या आईला भेटून तिला मीसुद्धा तुझाच मुलगा आहे म्हणून आश्वस्त करतो आणि पत्रकार परिषद घेऊन ‘भारत जोडो’ यात्रेची भूमिका आणि यात्रेचे फलित याबाबत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतो.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान महाराष्ट्रात राहुलच्या केवळ दोन जाहीर सभा होत्या – एक नांदेडमध्ये आणि दुसरी शेगावमध्ये. दोन्ही ठिकाणी रेकॉर्डब्रेक सभा झाल्या. त्याला ऐकण्यासाठी नांदेडच्या सभेत अडीच लाख लोक, तर शेगावच्या सभेत साडेचार लाख लोक आलेले होते. नांदेडमधील सभेत काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे मराठीमधून केलेले भाषण तर अत्यंत तडाखेबाज आणि सत्ताधारी पक्षावर घणाघात करणारे अविस्मरणीय असे होते.
दुपारी पाच-सहा तास विश्रांतीनंतर यात्रा पुढील पाडावापर्यंत 13 किमी चालते. तिथे चौक सभा घेतली जाते. त्यात पाच ते दहा हजार लोक असतात, त्यांच्यापुढे आयोजक आणि राहुल गांधी, असे दोनच वक्ते बोलतात. राहुल गांधी यात्रेचा उद्देश आणि देशापुढील प्रश्नांना धरून उपस्थितांशी संवाद साधतात. आज भारतात इतिहासातील सर्वांत जास्त बेरोजगारी आहे, महागाई वाढली आहे, प्रचंड वाढलेले पेट्रोल, डीझेलचे दर, घरगुती वापराचे स्वयंपाकाचे गॅस सिलिंडरचे दर, शेतकरी विरोधी कायदे, त्यांच्यावर झालेला अत्याचार, बड्या उद्योगपतींची कर्जमाफी, नोटाबंदी आणि चुकीच्या जीएसटीमुळे छोटे उद्योग आणि छोटा व्यापारी बुडाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, कोविडच्या गैरव्यवस्थापनामुळे लाखो लोकांना शेकडो किलोमीटर आपापल्या गावी चालतच जावे लागले, कोविडने लाखो लोक मृत्युमुखी पडले, भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे, कमिशन घेऊन कंत्राटे दिली जात आहेत, पैसे घेऊन सरकारी नोकर्या विकल्या जात आहेत, सरकारी शाळा बंद करून शिक्षण भांडवलदारांच्या घशात घातले जात आहे आणि याबाबत संसदेत आवाज उठवला तर त्यांचा माइक बंद करून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, सीबीआय, आयटी, ईडीचा धाक दाखवून विरोधकांना धमकावले जात आहे आणि विरोधी पक्षांची राज्य सरकारे पाडली जात आहेत, संविधानाची तोडमोड करून लोकशाही संपुष्टात आणून राजेशाही, हुकूमशाही आणण्याचा घाट घातला जात आहे, त्याच्या या बोलण्याला तरुण भरभरून प्रतिसाद देतात. अनेक वेळा समोरील जनतेला उद्देशून राहुल मधेच एखादा प्रश्न विचारतो आणि अनेक तरुण हात उंचावून उत्तरे देतात.
‘भारत जोडो’ यात्रेत चालताना अनेक अनुभव येतात, अनेक लोक भेटतात, विविध क्षेत्रांतील लोक जोडले जात आहेत. रोज कोणी विचारवंत, लेखक, पत्रकार, कलावंत, अभिनेता, अभिनेत्री, महात्मा गांधींचा पणतू तुषार गांधी यासारखी दिग्गज मंडळी पाठिंबा देण्यासाठी राहुलसोबत चालत आहेत. कोणत्याही पक्षाशी संबंध नसणारे अनेक लोक यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहेत, असेही दिसले. मुंबईत आयटी क्षेत्रात काम करणारे मोडक दांम्पत्य स्वतःच्या वाहनाने येऊन ‘भारत जोडो’ यात्रेत नांदेड-अर्धापूर मार्गावर चालताना भेटले. अंगाने स्थूल असल्याने दहा किलोमीटर चालून त्यांनी थांबायचा निर्णय घेतला; पण भारताची आजची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती बदलायला हवी, म्हणून ते चालत आहेत, असे त्यांनी सांगितले. यात्रा सर्वदूर पोहोचली आहे.
‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या एका महिला यात्रीने सांगितले की, महिलांनी आजकालच्या बहुतेक राजकारणी लोकांच्या सावलीलाही थांबू नये, असे वातावरण असताना एखादी महिला, एखादी तरुणी राहुल गांधीला अगदी सहजपणे मिठी मारू शकते, तर तो तिच्यातील विश्वास असतो, तिचा एक माणूस म्हणून स्वीकार होण्याचा विश्वास, तिथे स्त्री आणि पुरुष हा भेद गळून पडलेला असतो. भाजपा समर्थक ट्रोल आर्मी यावरून त्याचा कितीही दुस्वास करत असली तरी राहुल प्रत्येकीला आपला वाटतो, म्हणून ती स्त्री-पुरुष हा भेद विसरून मिठी मारू शकते. ज्यादिवशी तिला प्रत्येक पुरुषाबद्दल तितकाच निर्मळ विश्वास वाटेल त्यादिवशी स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार आपोआप थांबतील, असे तिला वाटते.
अजून एका महिला यात्रीने सांगितले, की आंतरजातीय – आंतरधर्मीय, प्रेम अथवा विवाहसंबंधात लव्ह जिहाद किंवा ऑनर किलिंग करणारे, जात पंचायत – खाप पंचायत चालवणारे शेवटी बळी देतात ते महिलेचाच. दोन्हीकडून बळी जाते महिलाच. याच्या मुळाशी आहे जागतिकीकरण, नव-भांडवलवादी अर्थकारण आणि त्यातून ढासळती अर्थव्यवस्था. यामुळे यापुढे महिलांवरील अत्याचारांत अधिक वाढ होण्याची भीती आहे. म्हणून लिंगभेद, लैंगिक अत्याचार हा आर्थिक प्रश्न कसा आहे, हे समजून घेऊन त्याची तातडीने सोडवणूक करण्याची गरज आहे. राहुलने कृष्णूरच्या (नायगाव नांदेड) एका सायंकाळच्या चौक सभेत त्याचदिवशी सकाळी एका लहान मुलीशी झालेला संवाद कथन केला, ती मुलगी म्हणाली, की लहान भावाने तिला त्रास दिला तरी आई-बाबा त्याला रागवत नाहीत. कारण ते त्याच्यावर अधिक प्रेम करतात. राहुल त्यावेळी म्हणाला, की मुलगा-मुलगी यात भेद करू नका, स्त्री ही माता आहे आणि तिच्याविना सृष्टी अपूर्ण आहे, तिचा सन्मान केल्याशिवाय भारत एक बलशाली राष्ट्र होऊ शकणार नाही. लिंगसमभावाचे महत्त्व समजून सांगण्याचा किती सोपा मार्ग त्याने दाखवला. प्रत्येक सभेत अशा अनेक अर्थपूर्ण कथा तो रोज शेअर करत लोकांशी संवाद साधत असतो.
‘नफरत छोडो’ – उजव्या विचारसरणीचे लोक प्रत्येकाच्या मनात भीती घालून एकमेकांबद्दल द्वेषाची पेरणी करत आहेत आणि त्या द्वेषातून हिंसा जन्म घेत आहे, त्यामुळे हिंसा थांबवायची असेल तर प्रथमतः आपल्या मनातील भीती आणि द्वेष संपवणे गरजेचे आहे, हे राहुल गांधींचे विश्लेषण प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेत आहे. त्यामुळे “डरो मत बिल्कुल मत डरो, किसीसे मत डरो, डर को अपने दिल से निकाल फेको और देश के लिये काम करो” या संदेशाला तरुण भरभरून दाद देत आहेत. ऐतिहासिक पुरावे देत सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशातील तरुणांचे आदर्श होऊ शकत नाहीत, अशी मांडणी करून राहुलने भाजपाची मोठी अडचण केली आहे, असे वाटते.
आमचे संपादक मित्र श्री. चेतन शिंदे यांच्या समन्वयाने डॉ. रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला राहुल गांधी यांना जलंब, बुलडाणा येथे 19 नोव्हेंबर रोजी भेटण्याचे निमंत्रण काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यातर्फे आले. त्या शिष्टमंडळात मला राहुल गांधी यांना भेटण्याची संधी मिळाली. राहुलने त्या दिवशीच्या तीन शिष्टमंडळांचे शांतपणे ऐकून घेतले. शेवटी स्वतःचे मतही मांडले. काही तरुणांनी काँग्रेस पक्षात काम करण्याची इच्छा आहे; पण दलित, आदिवासी, बहुजनवर्गाला काँग्रेस पक्षात समान संधी मिळत नसल्याचे सांगितले. यावर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्र येऊन काँग्रेस पक्षात काम करण्याचे आवाहन त्याने केले. त्याच्या बोलण्यातून एक वेगळाच राजकारणी दिसला. त्याने आपली मते कोणतेही राजकीय आढेवेढे न घेता अत्यंत स्पष्टपणे मांडली. राहुलला ऐकताना तो केवळ निवडणुकीच्या राजकारणाचा विचार करत नाही, तर निवडणुकीच्या पलीकडच्या भारतीय राजकारणाची दिशा काय असावी याबद्दल अधिक गंभीरपणे विचार करतो आहे, असे वाटले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपार दुःख पचवून कुठलेही अवडंबर न माजवता लोकांमध्ये मिसळण्यासाठी पदयात्रा काढून हजारो किलोमीटर सामान्य वारकरी होऊन महात्मा गांधींच्या विचारांच्या वाटेवरून तो चालत आहे. राहुल विपश्यना करणारा एक विपश्शीही आहे. यात्रेदरम्यान किंवा सभेदरम्यान ऊन, वारा, पाऊस आला तरी तो थांबत नाही. त्याच्या पदयात्रेतून त्याच्यात बुद्धाच्या संघाची तपश्चर्या दिसते आहे. आता तो महानतेच्या वाटेने निघालेला आहे, त्याच्या चालण्यातून आणि चिंतनातून आजकालच्या राजकारणाचा पोत बदलायचा त्याचा निश्चय आहे, असे ध्वनित होत आहे.
माणूस म्हणून तो अतिशय निष्पाप, निर्मळ, आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेला पण तितकाच मनमिळाऊ आणि दिलखुलास, कोणत्याही विकृतीचा स्पर्श नसलेला राजकारणी आहे, असेच वाटून गेले. रूढ अर्थाने राजकीय लोकांत असलेला बेरकीपणा, दुटप्पीपणा असले अवगुण त्याच्यात अजिबातच दिसले नाहीत. मनात एक आणि बाहेर दुसरेच असे राजकीय डावपेच मांडणार्यांपैकी तो असूच शकत नाही, याची खात्री वाटली. त्यामुळे तो संसदेत आणि संसदेच्या बाहेर जे काही बोलतो त्यात त्याचा प्रामाणिकपणाच असतो, हे जाणवले.
विरोधकांनी अनेक वर्षांपासून हजारो करोड रुपये खर्चून त्याला ज्या प्रतिमेच्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न केला आहे, तो प्रयत्न राखेप्रमाणे केव्हाच उडून गेला आहे आणि राहुलची पवित्र मनाचा माणूस म्हणून खरीखुरी प्रतिमा रोजच्या रोज लोकांसमोर येत आहे. त्यामुळे करोडो लोक त्याच्याशी जोडले जात आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेतून त्याला खूप प्रेम आणि खूप शिकायलाही मिळाले, देशातील विविध भागांतील, विविध क्षेत्रांतील लोकांचे मूलभूत प्रश्न काय आहेत ते समजले, असेही तो म्हणतो आहे. ‘भारत जोडो’ यात्रा देशातील लोकांच्या मनातील पोकळी भरून काढत आहे. लोकांना अशी काही कृती, असा काही प्रयत्न हवाच होता, म्हणून तेही उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. यात्रेमुळे काँग्रेस पक्षाचा, त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. ‘भारत जोडो’ने भारत सांधला जाईल, असा विश्वास वाटतो. लोकशाही बळकट होण्याच्या दिशेने लाखो पावले पडत आहेत, हे मात्र नक्की.
20 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथून ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्राचा निरोप घेऊन मध्य प्रदेशात दाखल झालेली आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक जोमाने तुम्ही सामील झालात, अशा शब्दांत राहुलने मध्य प्रदेशातील जनतेचे कौतुक केले आहे. यावरून उत्तर भारतात ‘भारत जोडो’ यात्रा आणखीन जोमाने मार्गक्रमण करेल, असे वाटते. भारत जोडण्याच्या दक्षिण-उत्तर यात्रेनंतर पुढची ‘भारत जोडो’ यात्रा पश्चिम-पूर्व भारत अशी निघेल, असे ऐकण्यात येत आहे, त्यासाठी राहुलला खूप खूप शुभेच्छा !
– प्रा. नागार्जुन वाडेकर
(लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत.)