कलांमधील चलाख टोळधाड! – संजय पवार

कलांमधील चलाख टोळधाड! – संजय पवार

कलेला शूद्र ठरवले ती कलाच ताब्यात घेऊन तिची नवी बाजारपेठही ताब्यात घेऊन आपले अजेंडे राबवणारी मोठीच टोळधाड सक्रिय आहे. सध्या तीच करतेय शूद्र कलेचे शुद्धीकरण केलेले सेलिब्रेशन व तीच पुढे आणते शुद्ध झालेले सेलिब्रेटी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक नुकतेच एका कार्यक्रमात म्हणाले, की ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे! ब्राह्मणांनी फक्त जातीयता वा अस्पृश्यता पाळली म्हणून पापक्षालन करायचेय? की एकूणच हिंदू धर्मात जी ब्राह्मणी जातसत्ताक, पितृसत्ताक पुरोहितशाही रुजवली त्याबद्दल पापक्षालन करायचेय?
भागवतांचे हे विधान एका ग्रंथप्रकाशनातील भाषणादरम्यान केलेले आहे. त्या भाषणाचे टिपण रविवार, लोकसत्ता 16 ऑक्टोबर 2022 च्या अंकात आहे. जो ग्रंथ प्रकाशित झालाय व त्याप्रसंगी भागवतांनी जे विचार मांडलेत त्यावरही स्वतंत्र चर्चा झडतील किंवा झडायलाच हव्यात. कारण चर्चेला त्यांनी तोंड फोडलेय, तर ती पुढे गेली पाहिजे.


ब्राह्मणांनी कलेचे महत्त्व ओळखले


तूर्तास तो विषय बाजूला ठेवून पापक्षालनाचा एकच मुद्दा वेगळ्यासंदर्भात घ्यायचाय. तो मुद्दा म्हणजे ब्राह्मणांनी सर्व कला व त्या सादर करणार्‍यांना शूद्र ठरवले होते आणि त्याचा परिणाम म्हणून पिढ्यान्पिढ्या कला व कलावंतांना सामाजिक प्रतिष्ठा मिळालीच नाही. कालांतराने ब्राह्मणांनी या कलांचे महत्त्व ओळखले शिवाय काही ब्राह्मणच हे कलेचे शूद्र कर्म करत होते. मग ब्राह्मणांनी त्यांच्या नेहमीच्या चातुर्याने कलेत शुद्धीकरण मोहीम सुरू केली आणि तिला गावकुसाबाहेरून गावात आणले!
शुद्धीकरण करून गावात आणलेली कला नंतर ब्राह्मणांनी अशी काही कडेकडेने प्रतिष्ठित करत नेली, की आज हजारो वर्षांनंतर आजच्या ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात याच कलेची बाजारपेठ करून त्यावर पुन्हा आपलेच वर्चस्व राहील याची काळजी घेताहेत. म्हणजे पूर्वी त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत केले तेच ते आता कलेच्या बाबतीत करू पाहताहेत. शिक्षण हे जसे त्यांनी सुरुवातीला स्वत:च्या आधिपत्याखाली ठेवले होते, तसेच आता कलेची बाजारपेठ त्यांना त्यांच्या आधिपत्याखाली हवीय. आता 2014 नंतर तर त्यांनी जातीसोबत धर्मवर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केलीय. धार्मिक ध्रुवीकरणाची राजकीय खेळी यशस्वी करायला त्यांनी आता कलामाध्यमांचा वापर करायला सुरुवात केलीय.


खाऊजा धोरणांची राबवणूक नेटाने…


स्वातंत्र्य चळवळीतील गांधी-नेहरू यांचा प्रभाव स्वातंत्र्योत्तर भारतावर अगदी 80 च्या दशकापर्यंत होता. 84 ची इंदिरा गांधींची हत्या आणि 89 च्या राजीव गांधी हत्येनंतर स्वातंत्र्यपूर्व काळापासून दबा धरून बसलेल्या संघपरिवाराने आता थेट हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राम जन्मभूमी आंदोलनाचा उपयोग आपली राजकीय शाखा भाजपला विस्तारण्यासाठी उघडपणे सुरू केला. बाबरी मशीद जमीनदोस्त केल्यावर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. याला मंडल कमिशनचे निर्णय लागू करून व्ही.पी. सिंग यांनी लोहियाप्रणीत पिछड्यांच्या राजकारणाने घेरण्याचा प्रयत्न केला; पण तो फारसा यशस्वी झाला नाही. कारण अशा गोष्टींसाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती तेव्हाच्या डाव्या-उजव्यांच्या मिश्र सरकारांमुळे त्या वेळच्या अनुक्रमे व्ही.पी. सिंह, चरणसिंह, देवेगौडा, गुजराल आणि चंद्रशेखर यापैकी कुणाच्याही सरकारला ती राबवता आली नाही.कारण ही सर्वच सरकारे अल्पायुषी ठरली.
या अस्थिरतेचा आणि नंतरच्या नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात संघपरिवार व भाजपने आपल्या आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार केला. नरसिंहरावांचे सरकारही अल्पमतातले व बहुपक्षीय होते. तरीही खाऊजा धोरणांची राबवणूक त्यांनी नेटाने केली. ज्याचा फायदा हिंदू मध्यमवर्ग हा नवश्रीमंतांना झाला, तंत्र निपुण झाला व संघपरिवाराच्या नवहिंदुत्ववादाच्या प्रभावाखाली आला, तो उत्तरोत्तर कडवेपणाकडे झुकत गेला व आता तो बेमुर्वतखोर झालाय.


नाटक, सिनेमात काम करणे दुय्यम मानले जात होते


स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा जरी विचार केला, तर कला प्रांतात म्हणजेच साहित्य, नाट्य, चित्रपट, गायन, वादन या क्षेत्रांवर जर नजर टाकली, तर साधारण 60/70 चे दशक संपेपर्यंत या क्षेत्रात (साहित्य वगळता) काम करणे हे दुय्यम दर्जाचे मानले जात होते. विशेषत: नाटक, सिनेमात. अनेक सवर्ण नाट्यकर्मींनी याबाबत आपल्या आत्मचरित्रात नोंदी केल्यात. शिक्षण अर्धवट राहणे, सामाजिक प्रतिष्ठा नसल्याने सजातीय विवाह होण्यात अडचणी येत. पठ्ठे बापूराव हे मूळ कुलकर्णी; पण तमाशात कार्यरत राहण्यासाठी ते डिकास्ट झाले!
सुरुवातीला संगीत रंगभूमीचा प्रभाव राहिला. त्यातील कलाकारांना वरील सर्व गोष्टींना सामोरे जावे लागे. तरीही दुसर्‍या बाजूला नारायण राजहंस यांचे गायन व स्त्रीवेशातील भूमिका यांनी त्या वेळच्या ब्राह्मणवर्गाला वेड लावले होते. त्यांना बालगंधर्व ही उपाधी दिली होती आणि तत्कालीन उच्चकुलीन स्त्रिया त्यांच्या पोशाखाचे अनुकरण करत! मराठी रंगभूमीचा हा सुवर्णकाळ मानला जातो.


मराठी लावण्यांच्या चाली ढापून नाट्यगीते रचली


या सुवर्णकाळाचे शिरोमणी बालगंधर्व यांनी आपल्या अनेक नाटकांतल्या पदांच्या चाली या जगप्रसिद्ध गायिका गोहर जान यांच्या गाण्यांवरून चोरल्या होत्या. मराठी लावण्यांच्या चाली ढापून नाट्यगीते रचली. या गोहर जान म्हणजे बालगंधर्वांनी ज्यांच्याशी अखेरच्या काळात धर्म बदलून निकाह केला होता, त्या गोहर जान नव्हे. मात्र, या गोहर जानमुळे गंधर्वांच्या निधनानंतर त्यांना अग्नी द्यावा, की दफन करावे यावरून बराच वाद झाला होता. असो.
तर मूळ गोहर जान ही भारतातील त्या वेळची प्रसिद्ध तवायफ व कोठेवाली होती. भारतीय शास्त्रीय संगीत म्हणून आज जे काही आहे, ते या गोहर जान व तिच्या समकालीन तवायफ व कोठेवालींचे रीतसर पळवून नंतर त्याचे तथाकथित शुद्धीकरण करून ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायन म्हणून प्रचलित केले गेले. यात आपले संगीतसूर्य भातखंडे वगैरे आघाडीवर होते. यांनी इंग्लंडमधील शुद्धीकरण मोहिमेवरून प्रेरणा घेऊन इथल्या तवायफ व कोठेवाल्यांकडून त्यांच्या चिजा, बंदिशी घेऊन नंतर त्यांना भिकेला लावून वेश्या व्यवसाय करायला मजबूर केले.
My name is Gauhar jaan: The life Times of – Musician By Vikram Sampat. या पुस्तकात हिंदुस्थानी संगीताचा सगळा निलाजरा इतिहास तपशिलात मांडलाय. निलाजरा अशासाठी म्हणतोय, कारण गौहरबाईंना कुणीतरी सांगितले, की तुमच्या चाली चोरून महाराष्ट्रात बालगंधर्व झालेत! त्यावर त्यांनी फारशी प्रतिक्रिया दिली नाही. कालांतराने त्या पुण्यात आल्या असता गंधर्वांना भेटून त्यांनी विचारले, की तुम्ही तर आमच्याच चाली गाताय! यावर चोरी पकडल्यासारखे गंधर्व ओशाळे हसले (अगदी असाच प्रसंग घडला नसेल; पण आशय हाच). केवळ बालगंधर्व नाही, तर आजचे संपूर्ण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे तवायफांची देन आहे; पण ब्राह्मणीव्यवस्थेने त्यावर डाका तर घातलाच; पण नंतर त्यांना बदनाम करून थेट वेश्या बनवून रस्त्यावर आणले!


गौहर जानबद्दलची अळीमिळी गुपचिळी आश्‍चर्यकारक


या त्याच गौहर जान आहेत ज्यांच्या गाण्याची रेकॉर्ड ही संपूर्ण भारतातील पहिली रेकॉर्ड आहे! गानसम्राज्ञी, कोकिळा, सरस्वती सर्व नंतर खूप वर्षांनी. या गौहर जान यांचा आब नि रुबाब असा होताच, की त्या म्हणत असत गौहर जान म्हणतात मला! आता पुढची मजेदार गोष्ट. विक्रम संपत यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला. (गौहर जान म्हणतात मला! भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटवणारी कलावंत.) उपशीर्षकात पहिली हा शब्द घालायला सोईस्कर बगल! या अनुवादाला अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. सुप्रसिद्ध राजहंस प्रकाशनाने तो प्रसिद्ध केलाय; पण आश्‍चर्य म्हणजे राजहंसच्या अलीकडल्या कुठल्याही जाहिरातीत हे पुस्तक नसते वा त्याची स्वतंत्र जाहिरात नसते. विक्रीनिपुण राजहंस प्रकाशनाची साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त गौहर जानबद्दलची अळीमिळी गुपचिळी आश्‍चर्यकारक आहे! याउलट आयएएस, आयपीएस बनविण्याचे घाऊक कंत्राटदार यांचे ‘75 सोनेरी पाने’ या पुस्तकाची तीन शहरांत तीन वेळा लोकार्पणे झाली!
गौहर जानची कला तर ढापलीत; पण तिचे चरित्रही आता नव्या अमृत काळात गैरसोयीचे ठरतेय? हीच (गैरसोयीची) भावना मूळ लेखक विक्रम संपत यांची असावी.कारण या पुस्तकानंतर त्यांनी सावरकरांवर दोन घसघशीत खंड लिहिलेत! यावर ‘गौहर जान’ नंतर एकदम सावरकर का? या प्रश्‍नावर ते म्हणाले, मी भारावून गेलो! योगायोगाने हा भारित काळ 2014 पासूनचा आहे. तर जिज्ञासूंनी इंग्रजी वा मराठी (मिळाले तर!) पुस्तक खरेदी करून वाचावे आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात येता-जाता कानाची पाळी धरणार्‍यांचे कान धरून सांगितले पाहिजे, की तुम्ही तवायफांची, कोठेवाल्यांची माफी मागून पापक्षालन करा!
शेक्सपिअर आजही मराठी रंगभूमीला मूलद्रव्य देतोच आहे
दुसरीकडे नाटकात संगीत नाटकांनंतर स्थळ दिवाणखाना या पद्धतीच्या सामाजिक, कौटुंबिक व काही ऐतिहासिक नाटकांवर थेट ब्रिटिश प्रभाव होता. शेक्सपिअर आजही मराठी रंगभूमीला मूलद्रव्य देतोच आहे. पु.लं.ची सर्वच नाटके रूपांतरित होती व शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ची शोकांतिका ही शेक्सपिअरकडून प्रेरणा घेतलेली. आश्‍चर्य एवढेच वाटते, की फुलवाली वा विपन्न अवस्थेतील कलावंत आपल्याच समाजात उपस्थित असताना त्यांची आयुष्ये नाट्यविषय व्हायला आम्हाला शॉ व शेक्सपिअरकडून शिकावे लागले. वर कौतुक म्हणून किती छान केलेले रूपांतर! वाटतच नाही मूळ इंग्रजी आहे!! पु.लं.सारखा आणीबाणीविरोधात (मर्यादित काळ) उतरलेला लेखकही ‘एक झुंज वार्‍याशी’ अनुवादित करून आविष्कृत करतो?


दलित व देशीवादी साहित्याला जगात ओळख


साठोत्तरी साहित्य, नाट्य, चित्रपट चळवळींनी वातावरण बदलत गेले व प्रामुख्याने दलित साहित्य चळवळी व नेमाडेंच्या वादग्रस्त ठरलेल्या वा ठरवलेल्या देशीवादाने मराठी साहित्य, बोटीवरून आलेल्या साहित्य प्रेरणांपासून तयार झालेले साहित्य मोडीत काढून जगणे आणि लिहिणे यातले अंतर कमी करतानाच साहित्य, प्रेरणा ब्रिटिश थडग्यांपासून लांबवर असलेल्या आफ्रिकन, जपानी, इराणी, अशा नव्या जागतिक परिप्रेक्ष्याशी जोडल्या. आज जगात भारतीय साहित्य म्हणून जे ओळखले जाते, ते प्रामुख्याने दलित व देशीवादी आहे. त्यामुळे सर्व कला प्रकारांमधल्या ब्राह्मणी वर्चस्वाला बाबरी ढाच्यासारखे जमीनदोस्त केले गेले (ही प्रतीकात्मकता धर्मांधतेने घेऊ नये!) 60 ते 90 च्या दशकापर्यंत.


2014 ची पायाभरणी राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच सुरू झालेली…


90 नंतर जग व भारतही वेगाने बदलत गेला. विसावे शतक संपताना भारत राजकीयदृष्ट्या डाव्या, उजव्या व काँग्रेसच्या मधल्या राजकारणावर हेलखावे खातानाच खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण याचे दृश्य परिणाम दिसू लागले. 85 साली राजीव गांधींनी पायाभरणी केलेली दूरसंचार व संगणक क्रांतीने विसावे शतक संपताच जोरदार उसळी घेतली व एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच संपूर्ण विसावे शतक डिलीट केल्यासारखे वातावरण तयार झाले.
अठराव्या शतकापासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळी, सामाजिक चळवळी, धर्म चिकित्सा, धर्मांतरे, फाळणी, स्वातंत्र्य, गांधी-नेहरू युग, स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी विचारपूर्वक केलेली नवभारताची उभारणी, फाळणीनंतरही देशात कायम ठेवलेले गंगा जमनी तहजीबीचे वातावरण, संसदीय लोकशाही व न्याययंत्रणांसह इतर संविधानिक संस्थांची स्वायत्तता, माध्यम स्वातंत्र्य या सर्वांवर पहिला घाला घातला तो नेहरू कन्या इंदिरा गांधींनी! त्यांनी आणीबाणी लादून देशात प्रथमच एकाधिकारशाही, सरकारी संस्थांची स्वायत्तता संपविली. आविष्कार स्वातंत्र्यावर मर्यादा व माध्यमांची मुस्कटदाबी केली. नेहरू युग पाहिलेले, त्यांचे राजकीय विरोधक राहिलेले, तरीही नेहरूंच्या उद्योग, शिक्षण, परराष्ट्र धोरणांची पुष्टी करणारे इंदिराबाईंच्या आणीबाणीने चक्रावले. स्वत: जयप्रकाश नारायण राजकीय निवृत्तीतून परत आले. त्यांच्या नेतृत्वाखालील आणीबाणीविरोधी आंदोलन यशस्वी झाले. जनता पार्टी सत्तेत आली गेली. पुन्हा इंदिरा सत्ता. मग त्यांची हत्या. पुढे राजीव गांधी पंतप्रधान आणि त्यांचीही हत्या. त्यानंतर घसरणीला लागलेला काँग्रेस प्रभाव व आघाड्यांच्या राजकारणात हिंदुत्वाचे राजकारण करणार्‍या पूर्वाश्रमीच्या जनसंघाला व आजच्या भाजपचा राजकीय अस्पृश्यतेचा काळ सरला व त्यांनी भारतीय राजकारणात काँग्रेसच्या दलित, मुस्लीम राजकीय अवकाशाला स्वत:च्या हिंदुत्व  आणि हिंदू इतर मागास, हिंदू मागास व आदिवासींसह काही भटके यांची मोट बांधून कातरण्याचे काम सुरू केले.
हे सर्व करताना त्यांनी निर्नायक काँग्रेस, खाऊजा धोरणाने बेदखल झालेले डावे, समाजवादी आणि डॉ. बाबासाहेबांनंतर कायमच निर्नायकी राहिलेले आंबेडकरवादी यांना स्वत:च्याच सेक्युलर स्वप्नरंजनात रमवून नवश्रीमंत अभिजन, एनआरआय यांच्यात हिंदुत्व पेरताना या दोन्ही गटांकडून निधी, मनुष्यबळ व वेगवान आधुनिक तंत्रज्ञान हिंदुत्वाने भारित तंत्रज्ञानासह मिळवले. भारतात व भारताबाहेरही. 2014 ची पायाभरणी जवळपास राजीव हत्येनंतरच सुरू झालेली होती. परिणामस्वरूप आज हिंदुत्ववादी भाजपचे सरकार केंद्रात व अनेक राज्यांत दुसरी खेप पूर्ण करतेय.


झुंडीच्या तंत्रज्ञानावर आधारित समाजगट


पूर्ण बहुमताच्या हिंदुत्ववादी भाजप सरकारने गंगा जमनी तहजीब, आहार-विहार, पोशाख, विचारस्वातंत्र्य यावर कधी थेट, तर कधी आपल्या जहाल जनसंघटनांद्वारे हिंसक हल्ले करवले, तर नव्या समाजमाध्यमात जल्पक टोळ्या तयार करून नवे झुंडीच्या तंत्रज्ञानावर आधारित निर्बुद्ध, हिंसक, शिवराळ समाजगट तयार केले आणि देशात पुन्हा हिंदू-मुस्लीम फाळणीसदृश वातावरण तर तयार केलेच आहे; पण थेट केंद्र सरकारकडून अवैज्ञानिक, असंविधानिक, अर्थनिरक्षर आणि हडेलहप्पी निर्णय घेतले जाऊ लागलेत.
यातली आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आजवर सांस्कृतिक जगतात जी माणसे डावी, समाजवादी, आंबेडकरवादी नव्हती; पण समन्वय, मध्यममार्गी वा सहिष्णू व विज्ञान मानणारी जी एक मोठी जनसंख्या होती व जी आजवर आणीबाणी, आविष्कारस्वातंत्र्य, नामांतर चळवळ, दलित साहित्य, नाटक, समांतर सिनेमा, साहित्य यांना ते समजून घेत आपल्या हिंदू असण्यासकट, धार्मिक रीतिरिवाजांसह, आस्तिकतेसह स्वीकारत होती, ती जनसंख्या तो समाजगट अचानक एका रात्रीत कडवट हिंदू झाला!


प्रपोगंडा म्हणजेच कलात्मकता राहणार का?


हा तोच समाज होता ज्यांनी प्रभातचे समाजपरिवर्तनीय चित्रपट वाखाणले, तिकीट बारीवर यशस्वी केले. हा तोच समाज होता, ज्यांने हिंदीत सुजाता, देवदास, मुघलेआझम, अनारकली, ताजमहाल, असे चित्रपट पाहिले, त्यातल्या कलाकार तंत्रज्ञासह गीत-संगीत डोक्यावर घेतले. हा तोच समाज होता, ज्याने वरेरकर ते तेंडुलकर असे प्रयोगशील नाटककार आशयासह स्वीकारले. श्री.म. माटे ते गं.बा. सरदार स्वीकारले. मर्ढेकर ते चित्रे, कोलटकर स्वीकारले. चित्रपटसृष्टीवरचा सुरुवातीचा प्रागतिक मराठी, साहित्यिक बंगाली व उर्दूच्या प्रभावाने अजोड अविस्मरणीय कलाकृती निर्माण झाल्या. गझल, कव्वालीसारखा प्रकार रुजला. नंतरच्या पंजाबी निर्मात्यांनी ठोकळेबाज सिनेमे केले. त्यात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्‍चन, मराठी, मारवाडी, दक्षिणी, पारशी अशी पात्रे असत. अनेकदा ती विनोदनिर्मितीसाठी वापरली गेली; पण 75 वर्षांत एखादा अपवाद वगळता धार्मिक वा जातीय अस्मितेचा मुद्दा कधी आला नाही. याउलट अमर अकबर अ‍ॅन्थनीसारख्या चित्रपटांनी लोकप्रियतेचा कहर केला!
या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वाने भारित असे नाट्य चित्रपट क्षेत्र पाहिले व ताश्कंद, 31 ऑक्टोबर, अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, उरी, काश्मीर फाईल्स, शिवराय अष्टक वगैेरे चित्रपट पाहिले किंवा सावरकरांना, विवेकानंदांना विशिष्ट प्रकारे प्रोजेक्ट करताना पाहिले, की वाटते आता प्रपोगंडा म्हणजेच कलात्मकता राहणार का? ऐतिहासिक चित्रपट काढायचे, मग वाद उकरायचे, अस्मिता पणाला लावायच्या, हा सर्व विरोध विचारांती की बाजारपेठेची गरज म्हणून निर्माण केले जातात? भाजप वा भाजप मित्रपक्ष यांना हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण होईल, असेच विषय का सापडतात. गवताच्या गंजीतही सुई सापडावी तसे?
समाजमाध्यमांवरील व्यक्तिगत टीका-टिपणीतही आता जाणीवपूर्वक धर्म, जात आणली जाते. गणपती सलमानकडे आला तरी वाद, भाऊ कदमकडे आला तरी वाद, दीपिका जेएनयूत गेली तरी वाद, संगीतकार शेखर आपच्या प्रचारात तरी वाद! प्रकाशराज, नसीर, स्वरा, हे तर आता नेहमीचे झुंडबळी!
नाट्य, चित्रपटानंतर उभ्या राहिलेल्या चित्रवाणी वाहिन्या, तिथल्या मालिका, त्यातले कलाकार यामधली थोडी उघड व मोठ्या प्रमाणावरची छुपी धार्मिक व जातीय हिंदुत्ववादी मानसिकता ही तर उबग आणणारी आहे. विशेष म्हणजे, कलेला शूद्र मानणार्‍या धर्म-जातीची तरफदारी करणार्‍या दुतोंडी झुंडींची तिथे अनभिषिक्त सत्ता आहे! तिथल्या ब्राह्मणेतरांचे वेगाने ब्राह्मणीकरण करता येते. कारण मालिकांचे विषय, त्यातले वातावरण, मालिकांनी मिळणारी प्रसिद्धी व पैसा आणि ते सतत देणारी प्रमोशनच्या नावाखालची धार्मिक यात्रा यातून हिंदुत्वाचे पक्षीय राजकारण करणारे फार दूरवरून ही सर्व सूत्रे हलवीत असतात! दर्शनी दिसतो निव्वळ कला व कलाव्यवहार!


जिला शूद्र ठरवले ती कलाच ताब्यात घेऊन तिची नवी बाजारपेठही ताब्यात घेऊन आपले अजेंडे राबवणारी मोठीच टोळधाड सक्रिय आहे. सध्या तीच करतेय शूद्र कलेचे शुद्धीकरण केलेले सेलिब्रेशन व तीच पुढे आणते शुद्ध झालेले सेलिब्रेटी!


– संजय पवार

(लेखक ज्येष्ठ नाटककार व विचारवंत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *