पदसिद्ध अपप्रचारक – जयदेव डोळे

पदसिद्ध अपप्रचारक – जयदेव डोळे

अभ्यास, संशोधन, नवनिर्मिती, प्रतिवाद आदी बौद्धिक आदानप्रदान जिथे नसेल, तिथे संघाचा वावर आवर्जून असतो. त्यामुळेच तर्कहीन बोलले काय, धडधडीत खोटे सांगितले काय अन् प्रचारकी विधाने केली काय, कोणाच्या लक्षात येणार आहे? सत्याशी संबंध नाही म्हणूनच तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक वा शास्त्रज्ञ यांना जवळ फटकू द्यायचे नाही, हा संघाचा खाक्या.

काही पदे अशी असतात ज्यांवर बसलेल्या व्यक्ती जे काही बोलतील ते गांभीर्याने स्वीकारले जाते. लोकशाहीत अशी भरपूर पदे असतात. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि निर्णयप्रक्रियेचे वितरण यांसाठी या पदांचे महत्त्व असते; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही पद लोकशाही प्रक्रिया आणि निर्णयाचे वितरण यांमधून भरले जात नाही. तिथे नेमणूक, नियुक्ती कशी होते हे कोणालाच माहीत नाही. कोणत्या क्षमता तिथे अजमावल्या जातात अन् कशाकशावर माणसांची पारख केली जाते, हे सारे गुप्त असते. एकीकडे संघाच्या शाखा भरमसाट वाढल्याचे वृत्त छापून आणण्याची केली जाणारी व्यवस्था आणि सततचा सामूहिक कवायती, संचलने, शाखा यांच्या छायाचित्रांचा भडिमार याचा परिणाम या समजुतीत होतो, की संघ म्हणजे प्रचंड अशी संघटना आहे. साहजिकच एवढ्या मोठ्या संघटनेचा प्रमुख म्हणजे फार बुद्धिमान, मेहनती, उत्तम संघटक अथवा प्रभावशाली वक्ता असला पाहिजे, असा ग्रह बहुतेकांचा होणार; पण खरे तर यातल्या कशातच तथ्य नाही. संघाचा बहुतेक वेळ आपल्याविषयी समाजाचे मत चांगले कसे होईल आणि त्यासाठी काय काय करता येईल, या धडपडीत जात असतो. त्यात हे सारे करीत असताना आपल्याकडे कोणाचे लक्ष असणार नाही यासाठी केली जाणारी खटपट, त्यांचा अजून वेळ खात असते. अत्यंत नकारात्मक, सदोदित शत्रू शोधून बोलत राहणारी आणि स्वतः नामनिराळे राष्ट्र इच्छिणारी ही संघटना मग कोण्या तोंडाने, कोण्या विषयावर सार्थ, सरळ व स्पष्ट बोलू शकणार? अभ्यासावर भरोसा नाही, की संशोधनावर भिस्त! परिवर्तनाची आस नाही, की बदलाचा सोस!! सनातन धर्म, सनातन संस्कृती, सनातन राष्ट्र यांचा सततचा आग्रह धरण्यासाठी नवनव्या कल्पनांना विरोध करणे आलेच. त्यामुळे रा.स्व. संघ ही एक मठ्ठ, मख्ख आणि मंद संघटना असूनही तिचे म्होरके पत्रकारांशी संगनमत करून (नारदाच्या नावाने पुरस्कार देऊन) प्रसिद्धीचे वलय आपल्याभोवती उत्पन्न करीत राहतात. आपोआपच मग त्या व्यक्तींची पदे, कथने आणि प्रतिक्रिया महत्त्वाच्या वाटू लागतात. समाज अशा वक्तव्यांची चर्चा करू लागतो. लोकशाहीतल्या जबाबदार संवादांची तुलना संघातल्या स्वयंभू लोकांच्या बडबडीशी करू लागतो.


सारे एका पळपुट्या शैलीचे पटाईत!


सरसंघचालक या पदावरची व्यक्ती शिकलेली काहीही असो, ती कायम एका चौकटीत बोलत राहते. ती चौकट म्हणजे हेडगेवार, गोळवलकर, देवरस आदी पूर्वसुरीची कथने. तीही फार अभ्यासपूर्ण अथवा प्रगल्भ असली पाहिजेत, असे नाही. कारण प्रत्येकाने आपल्या आधीच्या पुढार्‍याकडे पाहत पाहत विधाने केलेली. म्हणून गोळवलकर यांचे 12 खंडांत विखुरलेले लेखन व भाषणे त्यांच्या नंतरच्या सर्वांना मार्गदर्शक म्हणून आज उपलब्ध आहेत. सलग 30 वर्षे सरसंघचालक म्हणून वावर करता आलेले गोळवलकर हेच खर्‍या अर्थात संघाचे विचारस्रोत आहेत. त्यांनी केलेली विधाने विचार या संज्ञेत मोडत नसली तरी! बिनबुडाची, कुतर्क ठरणारी, केवळ स्वानुभवावर आधारलेली आणि अत्यंत भावनिक भाष्ये हा गोळवलकरांचा विशेष. आज मोदी जसे कोणाशीही वाद घालत नाहीत, तसा गोळवलकरांचा प्रयत्न असे. खरे तर, तो शुद्ध पलायनवाद असतो. मात्र, आपलेच म्हणणे खरे आणि परिपूर्ण असल्याचा आव आणीत, ठाम विधाने करीत जाणे म्हणजे विचार असा संघातल्या लोकांचा थाट. मोदी काय, गोळवलकर काय किंवा आताचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काय! सारे एका पळपुट्या शैलीचे पटाईत. हे मूळचे ब्राह्मण्य!! ब्राह्मणांची वाणी म्हणजे देववाणी, त्याच्या तोंडचे शब्द म्हणजे देवाचा शब्द. तो अपरिवर्तनीय, पवित्र आणि तेजस्वी…


…त्यांना वैचारिक आधार नसून, ती निव्वळ तारकालिकता आहे


तर डॉ. भागवत या वर्षात असे काही तेजस्वी अन् देदीप्यमान बोलले, की अवघे विश्‍व त्याने दिपले. हिंदू व मुसलमान यांची गुणसूत्रे एकच आहेत, असे सांगणे, मुसलमानांच्या धर्मनेत्यांशी भेटीगाठी करणे, जाती व्यवस्था वाईट आहे, असे म्हणणे, लोकसंख्येत संतुलन आले पाहिजे, असे बोलणे, भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर चालल्याची हमी देणे, महिलांना भारतात कायम सन्मान मिळत आल्याचे ठासून सांगणे इत्यादी… संघ सांस्कृतिक राष्ट्रवाद मानतो व त्याप्रमाणे आचरण करतो, असा संघाचाच एकेकाळचा दावा असे. 2014 पासून हिंदुराष्ट्र बनवण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवणे याचा उच्चार जाहीरपणे केला जाऊ लागला. अधूनमधून अखंड भारत व्हावा, असे सांगितले जाऊ लागले. भागवतच त्याबद्दल बोलले होते. सध्या भागवत जे बोलतात ते सारे ज्या राज्यात विधानसभा निवडणुका असतात त्या समोर ठेवून बोलतात, असे स्पष्ट दिसते.  त्यामुळे धर्म, जात, भाषा, लिंग, प्रदेश, वर्ग, वर्ण हे विषय भागवत जेव्हा काढतात तेव्हा त्यांना वैचारिक आधार नसून, ती निव्वळ तारकालिकता आहे, हे लक्षात घ्यावे लागते.


…मग तरीही भागवत उलटसुलट का बोलत राहतात?


यातला प्रत्येक विषय एकेका अभ्यासकाचे आयुष्य खपवणारा आहे. कारण त्याला असणारी शेकडो वर्षांची परंपरा, इतिहास, पैलू आणि प्रकार. आंबेडकर असोत की लोहिया, शरद पाटील असोत की तरुण संशोधक सूरज येंगडे, सर्वांना प्रचंड वाचून, तपासून, पारखून आपले म्हणणे मांडावे लागेल; परंतु भागवत मात्र बिनदिक्कत असंख्य विषय आपल्या भाषणांमधून मांडत राहतात. योग्य की अयोग्य, याचा विचार त्यांना जमत नाही. कारण लगेच पुढच्या गावी नव्या कार्यक्रमात त्यांना भाषण करायचे असते. ते वाचतात काय, त्यांना कोणता विचारवंत मानवतो आणि त्यांची विचारपद्धती काय याचा कोणाला ना पत्ता, ना खबर! भाषाशास्त्री, वंशशास्त्रज्ञ, धर्मपंडित, समाजशास्त्रज्ञ, संस्कृतीचे अभ्यासक अथवा निरनिराळे वैज्ञानिक भागवतांच्या दिमतीला असतात, असेही दिसत नाही. त्या लोकांशी भागवत सल्लामसलत करीत असल्याचेही कोणाला कधी समजले नाही. त्यामुळे भागवतांपाशी असणारे एक पद त्यांच्या कसल्याही बेताल, बेछूट, बेजबाबदार विधानांना सावरते, असे म्हणावे लागते. पदाचा लाभ होताच अनेकांची वृत्ती बहरते, बुद्धी विकसते आणि दृष्टी फाकते, असे म्हटले जाते; पण त्यासाठी वय, शिक्षण, संधी यांची सांगड लागते. वयाची पन्नाशी-साठी उलटल्यावर एखादे पद लाभल्याने फरक काय पडणार आहे? मेंदूला लागलेेले वळण मोडणे त्यावेळी शक्य होते. मग तरीही भागवत उलटसुलट का बोलत राहतात? जाहीर मतप्रदर्शन का करीत असतात?


देश हे सारे सहन का करतो?


भारतातच नव्हे, तर अवघ्या जगात तीन-चार प्रकारांतच लोकसंवाद होत असतो. राजकीय सभागृहे व प्रचारसभा, राष्ट्रप्रमुखांची संबोधने, विशेषज्ञांची चर्चासत्रे अथवा परस्पर संवाद आणि शैक्षणिक म्हणजे शाळा-महाविद्यालये यांत होणारा, प्रसिद्धीमाध्यमे या सर्व प्रकारच्या भाषिक विश्‍वावर जगतात. त्यांची स्वतंत्र विषयनिर्मिती अत्यल्प असते. संघ उघडपणे कधी कोणाशी संवाद, संभाषण वा संपर्क करतो का? नाही. का? तसा रिवाज नाही, असे त्यांचे उत्तर असते; परंतु नीट न्याहाळले तर लक्षात येईल, की संघाचे कार्यक्रम त्यांच्यासारख्या बौद्धिक कुवतीच्या लोकांतच होत असतात. अभ्यास, संशोधन, नवनिर्मिती, प्रतिवाद आदी बौद्धिक आदानप्रदान जिथे नसेल, तिथे संघाचा वावर आवर्जून असतो. त्यामुळेच तर्कहीन बोलले काय, धडधडीत खोटे सांगितले काय अन् प्रचारकी विधाने केली काय, कोणाच्या लक्षात येणार आहे? सत्याशी संबंध नाही म्हणूनच तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक वा शास्त्रज्ञ यांना जवळ फटकू द्यायचे नाही, हा संघाचा खाक्या. त्यामुळे निवडणूक असो, की दोन समाजात वितुष्ट पेटवणे असो, आपल्याला हवे ते बोलले की झाले, असा भागवतांपर्यंतच्या नेत्यांचा परिपाठ झालेला आहे. खुलासे, स्पष्टीकरणे, दिलगिरी अथवा क्षमायाचना कोण्या सरसंघचालकाने केल्याचा पुरावा नाही. याचे कारण हेच, की कोणाचीच विधाने सत्यावर वा वस्तुस्थितीवर आधारलेली नसतात. ‘आमच्या म्हणण्याचा विपर्यास केला’ असे तरी सांगता येते किंवा ‘ती संघाची अधिकृत भूमिका नाही’ अशी पळवाट तरी गाठता येते. एकंदर, काहीही करून आपले म्हणणे रेटून नेत राहायचे हेही खास फॅसिस्ट पद्धत संघामध्ये त्याच्या आरंभापासूनच आहे. विज्ञानाचे पदवीधर असणारे चार सरसंघचालक भारताने पाहिले; पण संघाचा व विज्ञानाचा, वैज्ञानिक सत्याचा आणि वैज्ञानिक विचार प्रक्रियेचा कधीही संबंध पाहिला नाही. याचा अर्थ काय? देश हे सारे सहन का करतो?
खरे तर हे असत्य, प्रचारकी आणि बेताल बोलणे असह्यच व्हायला हवे. मात्र, ते राष्ट्र, राष्ट्रप्रेम, धर्मप्रीती, स्वार्थत्याग, राष्ट्रैक्य, बंधुभाव अशा भावनिक मुद्यांशी जोडून सादर केले जात असल्याने लोकांची फसगत होते. जो जमाव भागवतांसारख्या व्यक्तीच्या भाषणाला जमतो किंवा जमवला जातो, तो साधारणपणे सामान्य नागरिक म्हणून गणला जात नाही. सरसंघचालक हे काही ‘मास लीडर’ अर्थात लोकनेता नसतात. सदर जमाव विशिष्टांचा असून, तो केवळ पूज्यभाव आणि आज्ञापालन या दोन वृत्तींना प्रतिसाद देणारा असतो. त्यातले सर्व जण जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश, वर्ण आदींविषयी कमालीचे आग्रही असतात. म्हणूनच त्यांच्याकडून संघनेत्यांच्या विधानांची उलटतपासणी अथवा चिकित्सा होत नसते. हा जमाव सवर्ण, मध्यमवर्गीय, शहरी-निमशहरी आणि किमान सुशिक्षित असतो. परिणामतः भागवत काय बोलले आणि का बोलले, याचा विचार आपण करायचा असतो. त्यांच्या बोलण्यातली तर्कदृष्टता, विकृती आणि खोटेपणा उघड करायचा असतो. नाही तर खंडणमंडण ही परंपरा शंकराचार्यांनी मान्य केली होती, ती पुढे न्यायची आहे.

– जयदेव डोळे


(लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *