आपला देश अनेक टप्प्यांतून वाटचाल करत गेला आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांची दूरदृष्टी होती आणि त्यांनी पुरेपूर, समयोचित आणि निःसंदिग्ध असे काही इशारे दिले होते. आज त्यांच्या विचारांना एक नवीन परिमाण आणि महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, ते सखोल अभ्यासाची आवश्यकता असल्याची हाक देत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मते आणि निरीक्षणे अतिशय प्रभावीपणे त्यांची आकलनशक्ती, दृष्टी, दूरदृष्टी व स्पष्टपणाची स्पष्ट साक्ष देतात. त्यांची दूरदृष्टी, त्यांचा पूर्ण प्रामाणिकपणा, सखोलता आणि दृढ निश्चयाचे धैर्य आणि त्यांच्या कार्याप्रती असलेल्या संपूर्ण निष्ठेची प्रशंसा केली पाहिजे. आपला देश अनेक टप्प्यांतून वाटचाल करत गेला आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती आणि त्यांनी पुरेपूर, समयोचित आणि निःसंदिग्ध असे काही इशारे दिले होते. आज त्यांच्या विचारांना एक नवीन परिमाण आणि महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, ते सखोल अभ्यासाची आवश्यकता असल्याची हाक देत आहे. त्यांचे शब्द शहाणपणाचे आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी देशहितासाठी त्यांची पुनरावृत्ती करावी. अन्यथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे : कोणताही भुकेलेला माणूस एखाद्या टीकाकाराबद्दल सहानुभूती बाळगणार नाही. तो त्याला सांगेल, “माझ्या प्रिय मित्रा, मी सत्तेत, अधिकारात असलो तरी, माझ्याकडे प्रकरणे व्यवस्थित करण्याचे सर्व कायदेशीर अधिकार असले तरी, तु माझ्याकडून चमत्कार घडण्याची अपेक्षा करू नये. कारण मला वारशाने एक भूतकाळ मिळाला आहे, जो अतिशय निंदनीय आहे.” जर सरकार ठराविक वेळेत निकाल देत नसेल, लोक हताश होण्याआधी, लोकांत सरकार नसल्याची भावना तयार होण्याआधी, जर आपण संसदेत आपल्या जबाबदार्या ओळखून वाजवी वेळेत लोकांचे कल्याण आणि हित पाहण्याचं काम आपल्या खांद्यावर घेतले नाही, तर या संसदेला जनता अतिशय तिरुस्कृत भावनेने पाहिल, याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही.
लोकप्रतिनिधी कायद्यावरील चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले : शिक्षण ही संसद सदस्यत्वाची एकमेव पात्रता असू शकत नाही. जर मी बुद्धाचे शब्द वापरले, तर माणसाला दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक ज्ञान आणि दुसरे शील. शीलशिवाय ज्ञान फार घातक आहे; शील सोबत असणे आवश्यक आहे, ज्याचा अर्थ चारित्र्य, नैतिक धैर्य, कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून स्वातंत्र राहण्याची क्षमता, एखाद्याच्या आदर्शांशी प्रामाणिक असणे.
राजकारण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली खबरदारी लक्षात ठेवावी
राजकीय पक्ष त्यांच्या स्वत:च्या राजकीय हेतूने या प्रकरणाकडे लक्ष देत नसतील, तर कालांतराने लोक स्वतःच याकडे लक्ष देतील. जे लोक या सभागृहात त्यांचे कार्य योग्यरित्या पार पाडू शकत नाहीत, त्यांना लोक परत निवडून देणार नाहीत. लोकांना परिणाम हवे आहेत, त्यांचे कल्याण व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून या सदनात चांगली माणसे पाठवणे हे एकमेव साधन आहे, ज्याद्वारे ते हा हेतू साध्य करू शकतात.
काळ बदलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावध करत म्हणतात, आपल्यासह लोक नवीन विचारधारेने प्रवृत्त होत आहेत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारे सरकार हे तत्त्व ठसवण्याचा प्रयत्न केला आहे, ते संविधान टिकवायचे असेल, तर आपल्या मार्गावर असलेल्या दुष्कृत्यांना ओळखण्यात उशीर न करण्याचा आपण संकल्प करूया.
आपल्याला लोकशाही टिकवायची असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सल्ला देतात, “आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या घटनात्मक पद्धतींना आपण घट्ट धरून राहणे, ही पहिली गोष्ट आहे. याचा अर्थ आपण क्रांतीची रक्तरंजित पद्धत सोडली पाहिजे. याचा अर्थ सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या पद्धतींचा त्याग केला पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असंवैधानिक पद्धतींचे मोठ्या प्रमाणात समर्थन होते; परंतु जेथे घटनात्मक पद्धती खुल्या आहेत, तेथे या असंवैधानिक पद्धतींचे समर्थन होऊ शकत नाही. या पद्धती अराजकतेच्या व्याकरणाशिवाय दुसरे काहीच नाहीत आणि त्या लवकर सोडून दिल्या तर आपल्यासाठी चांगले.”
जॉन स्टुअर्ट मिलने लोकशाही राखण्यात स्वारस्य असलेल्या सर्वांना दिलेली सावधगिरी बाळगणे ही दुसरी गोष्ट म्हणजे, एखाद्या महामानवाच्या पाया पडू नये किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नये. देशासाठी आयुष्यभर सेवा देणार्या महापुरुषांप्रती कृतज्ञता बाळगण्यात गैर काहीच नाही; पण कृतज्ञतेला मर्यादा असतात. आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल यांनी म्हटल्याप्रमाणे, कोणताही पुरुष त्याच्या सन्मानाच्या किंमतीवर कृतज्ञ होऊ शकत नाही, कोणतीही स्त्री तिच्या पवित्रतेच्या किंमतीवर कृतज्ञ होऊ शकत नाही आणि कोणतेही राष्ट्र त्याच्या स्वातंत्र्याच्या किंमतीवर कृतज्ञ होऊ शकत नाही. इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे अधिक आवश्यक आहे. कारण भारतामध्ये भक्ती किंवा राजकारणात जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात खेळल्या जाणार्या भूमिकेच्या तुलनेत अतुलनीय अशी भूमिका बजावतो. धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मोक्षाचा मार्ग असू शकतो; पण राजकारणात भक्ती किंवा नायक-पूजा हा अधोगतीचा आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा निश्चित मार्ग आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त म्हटले होते: पंधरा वर्षांपासून तुम्ही माझा जन्मदिवस साजरा करत आहात. मी त्यांना कधीच हजेरी लावली नाही. माझा त्याला नेहमीच विरोध राहिला आहे. तुम्ही माझा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा केला, तो आता पुरे. यापुढे कोणतेही उत्सव होऊ देऊ नका.
कार्लाइलने इतिहासातील महापुरुषांचे वर्णन बँकेच्या चलनी नोटा म्हणून केला. या चालनाप्रमाणे ते सोन्याचे प्रतिनिधित्व करतात. त्या बनावट नोटा नाहीत, हे आपण पाहिले पाहिजे. महापुरुषांच्या उपासनेत आपण अधिक सावध असले पाहिजे. कारण या देशात आपण कदाचित अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, की ‘पाकीटमारांपासून सावध रहा’ या सूचना फलकांच्या बरोबरीने ‘महापुरुषांपासून सावध रहा’ असे सूचना फलक लावले पाहिजेत.
संविधानावर
25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, की संविधानाचे कार्य संपूर्णपणे राज्यघटनेच्या स्वरूपावर अवलंबून नाही. राज्यघटना केवळ विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांसारख्या राज्यांचे अवयव देऊ शकते. राज्याच्या या अवयवांचे कार्य लोकहित आणि राजकीय पक्षांची इच्छा या घटकांवर अवलंबून असते. लोकांच्या इच्छा आणि त्यांची धोरणे पार पाडण्यासाठी या अवयवांचे ते साधन म्हणून उपयोग करतील. भारतातील लोक आणि त्यांचे पक्ष कसे वागतील, हे कोण सांगू शकेल? ते त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या घटनात्मक पद्धतींचा आधार घेतील, की क्रांतिकारक पद्धतींना प्राधान्य देतील?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे मानतात, की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हे राजकीय लोकशाहीचे उती आणि तंतू आहेत. ते ताकीद देतात, की वर्गभेद आणि लिंगभेद यांच्यातील असमानता जो हिंदू समाजाचा आत्मा आहे, त्याला अस्पर्शित ठेवणे आणि आर्थिक समस्यांशी संबंधित कायदे करत राहणे, म्हणजे आपल्या राज्यघटनेचा उपहास करणे आणि शेणावर महाल बांधणे होय.
संविधान स्विकारण्यापूर्वी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, की आम्ही किती दिवस हे विरोधाभासाचे जीवन जगणार? सामाजिक आणि आर्थिक जीवनातील समानता आपण किती दिवस नाकारत राहणार? जर आपण दीर्घकाळ ती नाकारत राहिलो, तर आपण आपली लोकशाही धोक्यात घालू. हा विरोधाभास आपण लवकरात लवकर दूर केला पाहिजे, अन्यथा ज्यांना विषमतेने ग्रासले आहे, ते अत्यंत कष्टाने उभारलेल्या राजकीय लोकशाहीच्या संरचनेला उडवून लावतील.
राष्ट्राची संकल्पना
राष्ट्र या संकल्पनेकडे लक्ष वेधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले: माझे असे मत आहे, की आपण राष्ट्र आहोत, असे मानून आपण एक मोठा भ्रम जपत आहोत. हजारो जातींमध्ये विभागलेले लोक राष्ट्र कसे असू शकतात? या शब्दाच्या सामाजिक आणि मानसिक अर्थाने आपण अजून एक राष्ट्र नाही, हे जितक्या लवकर लक्षात येईल, तितके आपल्यासाठी चांगले. तेव्हाच आपण राष्ट्र बनण्याची खरी गरज ओळखू आणि ध्येय साध्य करण्याच्या मार्गांचा आणि साधनांचा गांभीर्याने विचार करू. या ध्येयाची पूर्तता करणे खूप कठीण होणार आहे- युनायटेड स्टेट्सपेक्षा ते अधिक कठीण आहे. युनायटेड स्टेट्समध्ये जातीय समस्या नाही. भारतात जाती आहेत. या जाती प्रथमतः देशद्रोही आहेत. कारण त्या समाजजीवनात विभक्तता आणतात. त्या जाती-जातींमध्ये वैमनस्य आणि मत्सर निर्माण करतात. पण प्रत्यक्षात राष्ट्र बनायचे असेल, तर या सर्व अडचणींवर मात केली पाहिजे. जेव्हा राष्ट्र असेल, तेव्हाच बंधुता ही वस्तुस्थिती असू शकते. बंधुत्वाशिवाय, समानता आणि स्वातंत्र्य रंगाच्या कोटांपेक्षा जास्त नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर जातिव्यवस्थेविरुद्ध लढले. भारतीय जातिव्यवस्थेचा कहर जाणून घेण्यासाठी त्यांचे ‘जातीचे उच्चाटन’ हे पुस्तक वाचावे लागेल. जातीपातीच्या आरक्षणासाठी सुरू केलेली आंदोलने आणि त्याला नमते सरकार यामुळे मला अशी भीती वाटते, की 21 व्या शतकात जातिव्यवस्था पुन्हा उफाळून येईल की काय?
शेषराव चव्हाण
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)
मूळ लेख इंग्रजीत आहे. भाषांतर प्रा.डॉ.संदीप इंगळे यांनी केलेला असून ते इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत. (गडहिंग्लज,कोल्हापूर.)